-अजिंक्य उजळंबकर

-स्केच सौजन्य: श्रीकांत धोंगडे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

तमाशा… ग्रामीण महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जगाला सांगणारा लोकप्रिय कलाप्रकार. १९५०, ६० व ७० अशी तीन दशके मराठी चित्रपटावरही या कलाप्रकाराची घट्ट पकड होती. मराठी चित्रसृष्टीत तमाशापटांनी व लावणीपटांनी एक काळ गाजविला होता. तमाशा म्हटले कि तमाशिनीसोबत ‘नाच्या’ आलाच. मग मराठी चित्रपटात नाच्या म्हणजे ‘गणपत पाटील’ (Actor Ganpat Patil) ही ओळखही तितकीच घट्ट होती जी आजही रसिकांच्या स्मरणात आहे.  २० ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेल्या गणपत पाटलांचा आज १०१ वा जन्मदिन आहे. २००८ साली गणपत पाटील भलेही हे जग सोडून गेले पण “आत्ता गं बया!” म्हणत त्यांनी साकारलेला नाच्या प्रेक्षक अद्यापही विसरू शकलेले नाहीत. (Remembering Ganpat Patil one of the Most Popular Actor of Marathi Tamasha Films)

Ganpat Patil

गणपत पाटलांचा जन्म कोल्हापूरचा. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यात लहानपणी वडिलांचे निधन झाले व त्यामुळे त्यांची व इतर सहा भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडलेली. मग आईला मदत म्हणून लहानपणीच छोट्या गणपतने मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. भाज्या विकणे, मोलमजुरी करणे आदी कामे करतांना अभिनयाचे वेड मात्र काही केल्या गणपतला स्वस्थ बसू देत नव्हते. तो काळ पारतंत्र्याचा. कोल्हापुरात मेळ्यांमधून रामायणामध्ये सीतेची भूमिका ते करत. वयाच्या १४ व्या वर्षी ‘बाल ध्रुव’ या चित्रपटात भूमिका केली. अशी छोटी छोटी कामे करत असतांना पुढे जाऊन त्यांचा अभिनेते राजा गोसावी यांच्याशी परिचय झाला व त्यांच्या ओळखीने मा. विनायक यांच्या शालिनी सिनेटोनमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. पण तिथेही सुरुवातीला सुतारकाम करणे, मेक-अप करणे ही कामे करावी लागली. पण या कामातून त्यांचा अनेकांशी परिचय झाला. त्यात एक होते राजा परांजपे. त्यांनी तरुण गणपतला काही चित्रपटातून संधी दिली.

१९४८ साली राम गबालेंचा ‘वंदे मातरम’ व राजा परांजपे यांचा ‘बलिदान’ या चित्रपटातून काम करण्याची संधी तरुण गणपतला मिळाली. त्यांचे काम बघून मग खुद्द भालजी पेंढारकरांनी आपल्या ‘मीठभाकर’, ‘सख्या साजणा’ या चित्रपटात गणपतला महत्वाची भूमिका दिली. आता कामे मिळत होती पण दाम फारसा मिळत नव्हता. म्हणून मग मेक-अपची कामे सुरूच होती व नाटकातूनही कामे सुरु होती. जयप्रकाश दानवे यांचे ‘ऐका हो ऐका’ व आय. बारगीर यांचे ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या दोन नाटकातून गणपत पाटलांनी केलेल्या तुतीयपंथी सोंगाड्या च्या भूमिका महाराष्ट्रभर गाजल्या. इथूनच नाट्य व चित्रपटसृष्टीला तिचा एक परमनंट तुतीयपंथी सोंगाड्या मिळाला. हुबेहूब बायकी आवाज काढण्याची कला, विनोदाची व त्याच्या टायमिंगची जाण, कमरेवर हात ठेऊन उभे राहण्याची व बायकांसारखे चालण्याची लकब व तितकाच कमालीचा अभिनय याच्या जोरावर गणपत पाटलांनी रसिक प्रेक्षकांना त्याकाळी अगदी खिळवून ठेवले होते.

१९६४ साली आलेल्या ‘वाघ्या मुरळी’ या चित्रपटातील तुतीयपंथी भूमिकेसाठी गणपत पाटलांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट चरित्र अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुढे ‘राम राम पाव्हणं’, ‘थोरातांची कमळा’, ‘बोला दाजीबा’, ‘मल्हारी मार्तंड’, ‘एक गाव बारा भानगडी’, सवाल माझा ऐका, गणानं घुंगरू हरवलं, केला इशारा जाता जाता, सोंगाड्या, पिंजरा, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ इत्यादी अशा जवळपास ६२ सिनेमे व १७ नाटकांमधून गणपत पाटलांनी भूमिका केल्या. १९९३ सालचा अनंत माने दिग्दर्शित ‘लावण्यवती’ हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट होय. त्यांच्या या नाच्याच्या भूमिकेवर जरी रसिकांनी भरभरून प्रेम केले असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांना अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. जसे त्यांचे स्वतःचे लग्न जमायला अनंत अडचणी आल्या तशाच नंतर त्यांच्या दोन मुले व दोन मुलींच्या लग्नाच्या वेळी पण त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मध्यंतरी हा सर्व अनुभव सांगत असतांना दुरदर्शनवरील एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या अश्रूंना जणू त्यांनी मोकळी वाटच करून दिली होती.

Marathi Actor Ganpat Patil Felicitation

२००६ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या “चित्रभूषण” पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तसेच झी-मराठी तर्फे त्यांना “लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” ने गौरविण्यात आलं. २३ मार्च २००८ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी या नटरंगाने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली ती कायमचीच. 

अशा या महान कलाकारास, अद्भुत नटरंगास  त्यांच्या एकशे एकाव्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

मराठी सिनेमावरील संबंधित लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment