– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Actor Laxmikant Berde, Popularly known for his Comic Roles in Marathi and Hindi Cinema. महाराष्ट्राच्या लाडक्या लक्ष्याने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली त्यास आज १७ वर्षे झाली आहेत. अकाली म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षीच तो गेला. विदूषक जसा हसवून हसवून नकळत रडवतो तसे हे लक्ष्याचे अचानक निघून जाणे होते. लक्ष्याचे प्रतिबिंब असलेला त्याचा मुलगा अभिनय याचा रुपेरी पडद्यावरील सहज वावर बघतांना सतत लक्ष्याची आठवण आल्याशिवाय राहवत नाही. १९५४ साली त्याचा जन्म झाला तो दिवस लक्ष्मीपूजनाचा होता. दिपावलीत दाराच्या उंबऱ्यावर जो दिवा लावतात त्याचा प्रकाश घरात आणि बाहेर दोन्हीकडे पडतो… लक्ष्याच्या अभिनयाचा प्रकाशही जसा महाराष्ट्रात पडला तसा हिंदी सिनेसृष्टीत केलेल्या कामामुळे जगभर या दिव्याचा प्रकाश पसरला. 

लक्ष्याचा जन्म मुंबईचा. लहानपणापासूनच अभिनयाची आवड. पाचवीत असतानाच ‘वयम् मोठम् खोटम्’ या पु.लं. देशपांडेंच्या नाटकात अभिनय केला. गिरगावात लहानपण गेले. गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनय केला. पुढे महाविद्यालयातून अनेक नाटकांमधून बक्षिसे मिळविली. वयाच्या १८ व्या वर्षीपासूनच मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांमध्ये बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून मिळेल ते काम केले. १९७२ ते ७९ हा तो कालखंड. याचा फायदा असा झाला कि साहित्य संघाच्याच ‘अमृत नाट्यनारती’ द्वारे रंगभूमीवर पाऊल टाकले. पहिला मोठा ब्रेक मिळाला तो ‘टुरटुर’ या पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नाटकातून. मग ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ या नाटकांनी धुमाकूळ घातला. याचदरम्यान १९८४ साली पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. लेक चालली सासरला. याच वर्षी सचिन यांचा ‘नवरी मिळे नवऱ्याला’ प्रदर्शित झाला होता. सचिन-अशोक सराफ जोडी प्रेक्षकांना आवडली होती. लक्ष्यासोबत ‘लेक चालली’ मध्ये नायक असलेला महेश कोठारे याने लक्ष्यामधले विनोदाचे गुण हेरले व त्याने लक्ष्यासोबत पुढच्याच वर्षी म्हणजे १९८५ साली ‘धुमधडाका आणला’.

या सिनेमाने नावाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत धुमधडाका केला. लक्ष्या-महेश ही जोडी जमली ती इथून जी शेवटपर्यंत कायम राहिली. अगदी लक्ष्या जावोस्तर. या जोडीच्या दे-दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला या सिनेमांनी काय इतिहास घडविला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. धुमधडाका ने जशी महेश-लक्ष्याची जोडी जमवली तशीच अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे या मराठी सिनेमांच्या विनोद सम्राटांची सुद्धा. या जोडीने इथून पुढे जवळपास १० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. दोघांची धमाल केमिस्ट्री बघायला मिळाली ती १९८८ सालच्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात. यातील लक्ष्याची स्त्री व्यक्तिरेखेने तर कमाल केली.

मराठीत लक्ष्या हे चलनी नाणे झालेलं पाहून हिंदीच्या निर्मात्यांचे त्याने लक्ष वेधले व १९८९ साली मैने प्यार किया आला. या चित्रपटाच्या यशाने लक्ष्याला हिंदीत प्रवेश मिळाला. भूमिका दुय्यम होत्या, त्या त्याने करू नयेत अशी मराठी रसिकांची इच्छा होती. मराठीत नायक असलेला लक्ष्या हिंदीत घरगडी म्हणून बघणे रसिकांना आवडत नव्हते परंतु लक्ष्याने त्या केल्या. अगदी २००४ सालापर्यंत केल्या. लक्ष्याच्या विनोदी भूमिकांच्या चित्रपटांची यादी भली लांबलचक आहे. लक्ष्या खरंतर चतुरस्त्र अभिनेता पण विनोदाच्या चौकटीत अडकला. एक होता विदूषक (१९९२) मधील आबूराव या विनोदी नटाच्या शोकांतिकेने रसिकांना रडवले. 

लक्ष्याचा वावर कॅमेऱ्यासमोर व रंगभूमीवर अगदी सहज होता. विनोदाला लागणारी उत्स्फूर्तता त्याच्यात ठासून भरलेली होती. त्याच्या अभिनयात नेहमीच कमालीची ऊर्जा दिसत असे. काही लोकांना तो लाऊड वाटायचा, अशोक मामा आणि त्याच्यात समीक्षक तुलना करायचे व मामांच्या अभिनयाला झुकते माप द्यायचे. पण लक्ष्याने कधी या गोष्टींना महत्व दिले नाही व केवळ आपल्या अभिनयावर लक्ष दिले. त्याने केलेल्या शाब्दिक कोट्यानी प्रेक्षकांचे दोन दशके मनोरंजन केले. त्याला संगीताची जाण होती व स्वतः एक उत्तम गिटारवादक होता. त्याच्या केसांची खास कोंबडा स्टाईल रसिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती. लक्ष्या कट नावाने. भाषेवर कमालीचे प्रभुत्व ही त्याची आणखी एक जमेची बाजू. त्यामुळे शब्दोच्चारात असलेली स्पष्टता, संवाद फेकीवर त्याचे कायम राज्य होते. रुही बेर्डे या आपल्या पहिल्या पत्नीसोबत १९९८ साली फारकत घेतल्यानंतर पडद्यावर जिच्यासोबत त्याची जोडी गाजली ती अभिनेत्री प्रिया अरुण सोबत त्याने संसार थाटला.

शेवटच्या काही दिवसात मूत्रपिंडाच्या आजाराने त्याला ग्रासले. तरीही तो कार्यरत होता. २००४ साली तो गेला त्या वर्षी तो अखेरच्या चित्रपटात दिसला. महेश कोठारे यांचा ‘पछाडलेला’ हा तो सिनेमा. म्हणजे काय दुर्दैवी योगायोग बघा. ज्या जिगरी मित्रासोबत धुमधडाक्यात करिअर सुरु केले त्यासोबतच अखेरचा सिनेमा. मित्रासाठी जीव ओवाळून टाकणारा असा लक्ष्या. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या त्यांच्या ‘धडाकेबाज’ मधील गाजलेल्या गाण्याला खरं ठरवत कायमचा निघून गेला. धडाकेबाज बऱ्यापैकी शोले वरून घेतलेला होता. महेश-लक्ष्याची जय-वीरू ची ही मराठी सिनेमातील जोडी. शोले मध्ये जसा जय अकाली निघून जातो तसा वीरू महेश कोठारे ला सोडून लक्ष्या गेला… कायमचा …पण आजही या जय ला विनोदी अभिनयात पराभूत करणारा कोणी अभिनेता त्याची जागा घेऊ शकलेला नाही. 

लक्ष्या वुई मिस यु! 

मराठी चित्रपटसृष्टी विषयीच्या इतर लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.