सुप्रसिद्ध व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा आज ९५ वा वाढदिवस. आजच्या दिवशी १९२६ साली कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. तब्बल ६ दशके रमेश देव यांनी असंख्यमराठी, हिंदी चित्रपटांमधून एक अत्यंत प्रतिभासंपन्न व चतुरस्त्र अभिनेत्यासोबतच एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. आधी सहाय्यक अभिनेता, मग व्हिलन, मग हिरो, चरित्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, डिस्ट्रिब्युटर, ऍड फिल्म मेकर असा प्रदीर्घ व यशस्वी प्रवास रमेश देवांनी पूर्ण केलाय. २००५ साली राजा प्रकाशन, मुंबई तर्फे “या सुखांनो या” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यातील रमेश देव यांनी कथन केलेला, एक अत्यंत रंजक किस्सा, त्यांच्याच शब्दात, “थँक्यू लता दिदी” आज साभार शेअर करत आहोत. रमेश देव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

थँक्यू लता दिदी 

बाबांनी ( पेंढारकर) मला त्यांच्या ” ये रे माझ्या मागल्या” या चित्रपटात व्हिलनची भूमिका दिली. रुपये ठरले २५०/-. पण त्या पैशापेक्षाही दामुअण्णा मालवणकर आणि शशिकला बाई यांच्याबरोबर काम करायला मिळणार या आनंदात मी होतो. ते दोघे या चित्रपटात हिरो-हिरोईन होते, तर मी होतो लाडावलेला, बेजबाबदार, बिघडलेला एक सरदार पुत्र. 

माझा अगदी प्रथम शूटिंगचा दिवस. बाबांनी असा शॉट लावला होता की मी जोरजोरात हसत, हातात एक अल्सेशिअन कुत्रा घेऊन, हॉलमध्ये प्रवेश करतो. ते अल्सेशिअन कुत्र चांगलंच मोठं होतं. ते थोडंसं भेदरलेलं देखील होतं. त्यामुळे ते माझ्या हाताला हिसडे देऊन सारखा सेटवरून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होतं. त्याला धरून ठेवतांना माझी अगदी तिरपीत उडाली होती. रिहर्सल सुरु झाली. मी जरा मोठ्याने हसत, हातात ते कुत्र घेऊन, हॉलमध्ये प्रवेश केला. माझ्या हसण्यामुळे म्हणा किंवा मोठ्या मोठ्या लाइट्समुळे म्हणा, ते कुत्र बिचकलं आणि एकदम गुरगुरत माझ्या अंगावर आलं. मग कुठलं हसणं? मी घाबरून एकदम पट्टा सोडून दिला. जोरजोरात ओरडत ते कुत्र सेटवर धावू लागलं. सारे जण घाबरले कारण ते कुत्र होतंच तसं भयानक. एवढ्यात त्याचा मालक ओरडला, ” टायगर थांब!” गप्प दिशी ते कुत्र थांबलं. उगीच नाही कुत्र्याला इमानी म्हणत. माणसं अशी प्रामाणिक असती मालकाशी, मित्राशी एकनिष्ठ असती, तर… सीझर मारला गेला नसता, पौरस सिकंदर समोर हरला नसता, संभाजीराजे कैद झाले नसते… इतकं लांब कशाला, इंदिरा गांधींची हत्या झाली नसती. 

पण त्या दिवशी माझी हालत त्या कुत्र्याने जाम केली. मी इतका नर्व्हस झालो होतो की मला काही केल्या जोरात हसताच येईना. हळू हळू माझं हसणं केविलवाणं, हास्यास्पद होऊ लागलं. त्या काळात डबिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे शुटिंगच्याच वेळी सर्व फायनल होत असे. सेटवर कुणी माझ्या हसण्याला हसत नव्हते ते फक्त बाबांच्या दराऱ्यामुळे. मला वाटतं, सातवा किंवा आठवा रिटेक असेल, शॉट सुरु झाला. माझं हसणं…नव्हे.. रडवं  हसणं सुरु झालं आणि अचानक … एका स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला. त्या हास्याच्या लकेरीमुळे आत्तापर्यंत आवरून ठेवलेल्या इतरांच्या हसण्याचा बांधा फुटला आणि सर्व जण खो खो हसू लागले. मला मेल्याहून मेल्यासारखे झालं आणि कोण ही हसणारी स्त्री? म्हणून संतापून तिच्याकडे पाहिलं आणि अक्षरशः थिजलो. ओळख नसतांनाही ज्या व्यक्तीबद्दल मला आदर होता, मलाच काय पण साऱ्या भारतात ज्या स्त्रीबद्दल नितांत श्रद्धा, गौरव आणि प्रेमाची भावना होती, जिच्या सुरेल भूपाळीने भारताचा दिवस सुरु होत असे व भैरवीने संपत असे अशी दैवी वाणी, असलेली स्त्री माझ्या हसण्याला हसत होती. साक्षात लता मंगेशकर मला हसत होती. माझी चीड कुठल्या कुठे नाहीशी झाली. मान शरमेने खाली झुकली. लता दीदींचं काहीच चुकलं नव्हतं. चूक मर्जीचा होती, माझं हसणंच  तसं हास्यास्पद होतं. 

बाबा कुठल्याही अडचणीवर मात करणारे दिग्दर्शक होते. त्यांनी शॉट मध्ये जरा बदल केला व मला म्हणाले, “रमेश तू मोठ्याने न हसता, फक्त हसरा चेहरा ठेऊन हॉलमध्ये ये.” तसा शॉट झाला. मी स्वतःलाच दोष देत एका कोपऱ्यात जाऊन बसलो. धड जोराने हसता येत नाही आणि निघालोय अभिनेता व्हायला! चुल्लू भर पाणी में डूब मर लेका! वैगरे वैगरे.. माझे विचार माझ्याशीच चालू होते.  पण मात्र एक निश्चय केला की हसण्याची प्रॅक्टीस करायचीच. दुसऱ्याच दिवसापासून कोल्हापूरच्या टेम्बलाबाईच्या माळावर जाऊन मी जोरजोराने हसण्याची प्रॅक्टिस सुरु केली. मला हसणं जमू लागलं. मग आरशासमोर उभा राहून निरनिराळ्या भावना, छटा असलेली नाटकातील वाक्य म्हणू लागलो. हेतू इतकाच कि आपल्याला कुणी हसू नये. या साऱ्याचा फायदा मला माझ्या पहिल्या व्यावसायिक चित्रपटात, “आंधळा मागतो एक डोळा” यात झाला. कारण त्या चित्रपटात मला असंच विकट हास्य करायचं होतं. त्या माझ्या हसण्यावर राजाभाऊ इतके खुश झाले की मला म्हणाले,” व्वा! माझ्या कल्पनेपेक्षाही तू मस्त हसलास!” 

ही शाबासकी मला नव्हती तर ती लताबाईंच्या हसण्याला होती. त्या जर मला हसल्या नसत्या, तर माझ्यातली जिद्द जागी झाली नसती, मी प्रॅक्टिस केली नसती. मग मला राजाभाऊ परांजपेंची शाबासकी मिळाली नसती, त्यांच्या पिक्चर्स मध्ये सतत कामं मिळाली नसती. कदाचित मी कलावंतही झालो नसतो. तेंव्हा लता दिदी मनापासून तुम्हाला थँक्स. 

साभार- “या सुखांनो या”

प्रकाशक- सौ शुभदा मुळे, राजा प्रकाशन, माहीम, मुंबई 

कॉपीराईट हक्क राखीव- रमेश देव 

संपादकीय संस्कार- अपर्णा पाडगांवकर 

Ramesh Deo with Seema Deo
Ramesh Deo with Seema Deo
Website | + posts

Leave a comment