-धनंजय कुलकर्णी

पन्नासच्या दशकातील मराठी चित्रपटाच्या दुनियेतील अग्रणी व्यक्तीमत्व म्हणजे राजा परांजपे! (Raja Paranjape) एक अग्रगण्य अष्टपैलू अभिनेता, असामान्य प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आणि द्रष्टा निर्माता या नात्याने या ‘राजा’ने  मराठी  चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवले. सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटात जो नववास्तववाद आणला, अगदी त्याच धर्तीवर राजाभाऊंनी मराठीत ‘पुढचं पाऊल’, ‘उनपाऊस’, ‘देवघर’ असे काही कलात्मक चित्रपट देण्याचा धाडसी प्रयोग केला. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द राजाभाऊंमध्ये होती. मा. विनायक यांनी निर्माण केलेली विनोदी चित्रपटांची अभिजात परंपरा राजाभाऊंनी ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘इन मिन साडेतीन’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आधी कळस मग पाया’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गुरुकिल्ली’- असे विनोदी चित्रपट देऊन यशस्वीपणे चालवली.

चित्रपटाच्या कथेतील आशयाला ते सर्वात जास्त महत्व देत. कथा सुचण्यासाठी त्यांना एखादी ओळ देखील पुरेशी असे. एकदा गदीमा आणि राजाभाऊ असेच गप्पा मारत होते या मैफीलीत गोविंद घाणेकर सामील झाले. घाणेकरांनी गमतीने सहज एक प्रश्न विचारला “जर वेड्याच्या इस्पितळातून पळालेला एखादा वेडा शहाण्या माणसांच्या घरात घुसला तर काय होईल?’ घाणेकर बोलून गेले पण या दोघांच्या डोक्यात लगेच चक्र फिरू लागली आणि ’पेडगावचे शहाणे’ या चित्रपटाचा जन्म झाला. मा. विनायक यांच्या प्रतिभा संपन्न विनोदी  चित्रपटाच्या परंपरेतील हा चित्रपट तूफान लोकप्रिय ठरला. यात राजाभाऊंचा डबल रोल होता. म्हणजे ते निर्माते दिग्दर्शक तर होतेच पण अभिनय करताना देखील ते दुहेरी भूमिकेत होते.

या मराठी चित्रपटाचे अफाट यश बघून हिंदीतील नामवंत निर्माते ए आर कारदार यांनाही याचा मोह पडला. त्यांनी लगेच १९५३ साली या चित्रपटाचा हिंदी अवतार ’चाचा चौधरी’ या नावाने हिंदीत आणला. स्वत: हिंदीतील नामांकीत दिग्दर्शक असतानाही त्यांनी हा सिनेमा राजाभाऊंकडे दिग्दर्शनासाठी सोपवला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यातील डबलरोलची भूमिका त्यांनाच करायला लावली. पेडगावचे शहाणे चित्रपटात सारंग मामाची भूमिका धुमाळ यांनी केली होती. ती इतकी गाजली की या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत तर ते होतेच पण त्यांच्याकरीता हिंदी सिनेमाचे प्रवेशद्वार उघडणारी हि भूमिका ठरली. १९५५ साली राजा परांजपे यांचा ’गंगेत घोडं न्हालं’ हा चित्रपट आला होता; राजा गोसावी आणि रेखा कामत यांच्या त्यात भूमिका होत्या. या कथानकावर आर सी तलवार यांनी १९६३ साली हिंदीत ’एक दिल सौ अफसाने ’ हा सिनेमा बनविला ज्यात राजकपूर , वहिदा रहमान यांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेमाच्या सुवर्णयुगाच्या काळात मराठीतील सिनेमा हिंदी व अन्य भाषिकांकरीता प्रेरणादायक ठरत होता आता मात्र नेमकाउलट चालू  प्रवास झाला आहे. (Remembering Actor/Director Raja Paranjape)

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment