– अभय परांजपे, मुंबई

२०१० साली महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन पन्नास वर्षे उलटली. मागे वळून अनेक गोष्टींचा धांडोळा घ्यायचा म्हटलं तर प्रामुख्याने चित्रसृष्टीचा विचार केला गेला पाहिजे. कारण एकच. जगाच्या इतिहासात एवढ्या वेगाने विकसित झालेली आणि इतक्या सर्वदूर लोकांना मोहीत करणारी दुसरी कला नाही, पण मराठी चित्रपटांचा वेगळा विचार करायचा की भारतीय चित्रसृष्टीचा विचार करायचा? कारण भारतीय चित्रसृष्टीचीचं सुरुवात मराठी माणसाने केली. सुरुवातीला मूकपटच बनत होते. त्यांना आपण भाषेचा शिक्काच मारू शकत नाही. त्यानंतर मराठी चित्रसृष्टीची प्रभात झाली. भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, व्ही. शांताराम ही मराठी चित्रसृष्टीची पहिली फळी होती. तामिळ व कलकत्याच्या चित्रसृष्टीतही जोरदार निर्मिती होत होती, पण त्या काळचे मूकपट मुख्यत्वे करून पौराणिक कथानकांवर आधारितच होते.

१९६० ते २०१० या ५० वर्षात अनेक एकापेक्षा एक मराठी सिनेमांनी रसिकांचे मनोरंजन केले. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने १९६० पासून गेल्या पन्नास वर्षांत काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब करायचा आहे. या पन्नास वर्षांतले मैलाचे दगड काय फुटपट्ट्या लावून बाजूला काढायचे? मूठभर लोकांनाच करणारी अगम्य कला पाहायची की धंदा करणार्‍या चित्रपटांचा विचार करायचा? अभिनय, दिग्दर्शनाच्या सामर्थ्यांने खिळवून ठेवणारे सिनेमे आठवायचे की पारितोषिके मिळालेल्या सिनेमांना प्राधान्य द्यायचं? गुंतागुंत प्रचंड आहे. त्यातून मी एक माझ्यापुरता सोपा मार्ग काढला आहे. माझ्या मते जे मैलाचे दगड ठरले अशा सिनेमांचा मी यात विचार केलाय. हे सगळ्यांना शंभर टक्के मान्य होतील असं नाही. किंबहुना नाहीच होणार. पण त्यात वर उल्लेखिलेल्या सगळ्या फुटपट्ट्यांचा विचार केलाय.

महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या अदल्याच वर्षी ‘सांगत्ये ऐका’ या सिनेमाने इतिहास घडवायला सुरुवात केली होती. १९५९ चा सिनेमा अगदीच वेगळ्या अर्थाने मैलाचा दगड होता. पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये हा सिनेमा जवळपास तीन वर्षे सतत गर्दी खेचत होता. त्यानंतरचे काळानुसार आलेल्या सिनेमांचा विचार करूया.

Jagachya Pathivar Marathi film

जगाच्या पाठीवर (१९६०) :
चार्ली चॅप्लीनच्या सिटीलाईटस या सिनेमाच्या आधाराने राजा परांजपेंनी या सिनेमाची कथा बेतली. हा सिनेमा राज परांजपे, सुधीर फडके आणि ग.दि. माडगूळकर या त्रयीचे सुवर्णयुग सुरू करणारा चित्रपट होता. संगीत, काव्य, अभिनय, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टीत जमून आलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये नर्म कारुण्य विनोदाने कथानक फुलविले होते.

Pathlag Marathi film

पाठलाग (१९६५) : 
जयंत देवकुळे यांच्या आशा परत येते या कथेवर आधारीत राजा परांजपेंचा हा सिनेमा रहस्यप्रधान सिनेमांची नवीन वाट चोखाळणारा होता. गुंगवून टाकणारे कथानक, श्रवणीय गाणी हा या सिनेमाचा प्राण होता. याच सिनेमावरून हिंदीमध्ये राज खोसला यांनी मेरा साया हा सिनेमा केला. तो अर्थातच रंगीत होता. सुनील दत्त, साधनासारखे त्या वेळचे यशस्वी कलाकार मनमोहनचे अफलातून संगीत आणि अत्यंत उत्तम पटकथा यामुळे हा सिनेमा पाठलागपेक्षा अनेक पट चांगला होता असं म्हणावं लागेल. पण पाठलागला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Songadya Marathi Film

सोंगाड्या (१९७१) :
लागोपाठ नऊ चित्रपट रौप्य महोत्सवी करण्याच्या विक्रमाची सुरूवात इथून झाली. पांढरपेशा मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांनी कितीही नाके मुरडली तरी दादांचा स्वतःचा एक प्रक्षेकवर्ग होता आणि आहे. दादांचे पहिले चार सिनेमे तर बेअरचे चेक आहेत. केव्हाही प्रदर्शित करावेत आणि पैसे कमवावेत असे हे सिनेमे नंतर दादांची गाडी अश्‍लीलतेच्या रूळावर गेली. पण तरीही अशा प्रकारच्या गुदगुल्या करणार्‍या चावट संवादांचा एक प्रेक्षक आहे आणि तो कोणत्याही काळात राहणार आहे हे ठसठशीतपणो दादांनी सिध्द करून दाखवले म्हणून हा चित्रपटसृष्टीला वळण देणारा सिनेमा मानला पाहिजे.

 

पिंजरा (१९७३) :
ब्लू एंजल्स नावाच्या इंग्रजी सिनेमावरून घेतलेले कथासूत्र उत्कृष्ट पध्दतीने ग्रामीण मातीत रूजवून त्यातून जे फॅन्टॅस्टिक पीक बाहेर पडलं ते म्हणजे ‘पिंजरा’. सर्वांगसुंदर असंच या सिनेमाचं वर्णन करावं लागेल. तोपर्यंत आशयघन कलात्मक सिनेमे करणार्‍या शांतारामबापूंनी आधीच्या सिनेमांच्या अपयशामुळे व्यवसायाचा विचार करून पिंजरा बनविला. त्याच काळात मेरा नाम जोकरच्या अपयशाने खचून लोकांना हवं ते देतो इरेला पेटून राज कपूर बॉबी करत होता. दोन्ही सिनेमांचा एकत्र विचार करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जमाना बदलत चालला होता. लोकांना मसाला सिनेमे हवे होते. पिंजराचं अफाट रसायन फारच जमून आलं होतं. डॉ. श्रीराम लागू, निळू, फुले, जगदीश खेबुडकरांची गाणी, राम कदमांचं संगीत, शंकर पाटीलांची पटकथा या सगळ्या जमलेल्या साजात अगदी मनापासून सांगायचं तर फक्त संध्याबाईच मिसफिट वाटत होत्या. ना. डॉ. लागूंच्या अभिनयाशी त्यांची नाळ जुळत होती, ना नवरंगची लकाकी त्यांच्या नृत्यात राहिली होती. वाद काय झाले त्यात आपल्याला पडायचं नाही पण वदंता अशी आहे की जयश्री गडकर ही भूमिका करणार होत्या. तसं जर झालं असतं तर सोन्याहून पिवळं झालं असतं. पणा शांतारामबापूंच्या दिग्दर्शनाची कमाल अशी की त्यांनी तरीही हा सिनेमा हीट करून दाखवला. पाटील सरपंचाच्या पुढे नाचणारी बाई एवढचं तमाशाचं स्वरूप न ठेवता तमाशाचा विषय असा सुंदर हाताळला की मैलाच्या दगडांमध्ये या सिनेमाचा समावेशा करणं अपरिहार्यच आहे. पण या सिनेमाला राज्य पुरस्कार नाही मिळाला. पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. असं का ते संशोधकांनी शोधावं.

Pinjra and Jait Re Jait Marathi film

जैत रे जैत (१९७३ :
डॉ. जब्बार पटेलांनी या सिनेमामध्ये सूत्रधारासाठी जी पद्धत वापरली, त्यासाठी हृदयनाथ मंगेशकरांनी जी गाणी केली तेच या सिनेमांच बलस्थान ठरलं. खरं तर कथा अगदी साधी, पणा स्मित पाटील आणि डॉ. मोहन आगाशे यांचा अभिनय आणि निवेदनाच मराठीसाठी अगदी वेगळाच असा रंगमंचीय आकृती बंध यामुळे हा सिनेमा एका वेगळ्या वळणावर गेला. तसा प्रयत्न नंतर कोणी केला नाही.

Sinhasan Marathi film

सिंहासन (१९७९) :
अरूण साधूंच्या दोन कांदबर्‍यांची सरमिसळ करून तयार झालेला सिनेमा. पत्रकरिता, राजकारण, गुंडागिरी, युनियनबाजी या सगळ्याचं एक वेगळंच चित्रण लोकांच्या समोर आलं. मराठीतला पहिला राजकीय चित्रपट असं याचं वर्णन केलं जातं. खंर पाहिलं तर याला एक अ पासून सुरू होऊन ब पाशी संपणारी कथा नाही. हा चित्रपट म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर घडणार्‍या वेगवेगळ्या घटना आहेत. मारियो पुझो स्टाईलची पटकथेची कसरत करूनही हा चित्रपट पकड घेतो याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे यातली पात्रयोजना. मराठीतले त्या वेळचे सगळे नामवंत कलाकार या सिनेमात होते. या सगळ्यांचा ताफा जमवणं, त्यांचा तोल सांभाळणं आणि एकंदरीत एक निर्मिती म्हणून सगळ्या गोष्टी कशा जुळवून आणायच्या याचं अत्यंत धंदेवाईक भान डॉ. जब्बार पटेलांना या सिनेमापासून आल्याचं दिसतं. पण खटकेबाज संवाद आणि माजघरातून बाहेर पडलेला सिनेमा म्हणून याचा विचार मैलाच्या दगडांमध्ये करायलाच हवा.

22 june 1897 marathi film

22 जून 1897 (१९७९) :
सिंहासनच्याच वर्षी हा सिनेमा यावा हा एक योगायोग आहे. चापेकर बंधूंनी पुण्याच्या गणेश खिंडीत केलेली जॅक्सनची हत्या हा अगदी वेगळाच विषय घेऊन नचिकेत आणि जयू पटवर्धन यांनी एक साधा सोपा पण मनाची पकड घेणारा सिनेमा बनविला. इतिहासकालीन अनेक सिनेमे भालजी पेंढारकरांनी त्यापूर्वी केले होते. पण स्वातंत्र्ययुद्घाच्या काळावर बेतलेला. भव्य दिव्य सेटस नसलेला, युद्धाची पडदा भरून टाकणारी इथे नसताना एका छोट्याश्या पण दूरगामी परिणाम करणार्‍या घटनेवर आधारित असा हा सिनेमा त्यातल्या साधेपणामुळे मैलाचा दगड बनून गेला.

ashi hi banwabanwi marathi film

अशी ही बनवाबनवी (१९८८) :
सचिनने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा तद्दन धंदेवाईक, ओरिजिनल कथानक नसलेला, चवन्नी छटाक सिनेमा होता. पण तरीही हा मला वेगळं वळण देणारा सिनेमा का वाटतो असा प्रश्‍न पडण्याची शक्यता आहे. त्यांच साधं उत्तर असं आहे की यापूर्वीच्या काही वर्षांत अस्ताव्यस्त झालेल्या मराठी सिनेमाकडे शहरी प्रेक्षक पुन्हा खेचून आणण्याचं श्रेय या सिनेमाला जातं. तोपर्यंत पाटील, सरपंच, चावडी, तमाशा अशा कथानकात हरवलेल्या प्रेक्षकाला सचिनने उंची दिवाणखान्यात आणलं. पूर्णपणे शहरी कथानक असलेल्या या सिनेमापासून महेशा कोठारे, गिरीश, घाणेकर, लक्ष्मीकांत बेडर्ें, अशोक सराफ अशी ताजी फळी पुढे आली आणि मराठी सिनेमाला एक वेगळं वळण लागलं. चांगलं की वाईट ते पाहणार्‍याच्या नजरेवर अवलंबून आहे. पण वळण लागलं हे नक्की.

raatra aarambh marathi film

रात्र आरंभ (१९९९) :
या सिनेमाचं नाव पाहून लोक दचकतील. कदाचित अनेक लोकांना हा पाहायलाही मिळाला नसेल. पण लक्षात असं घ्यायला हवं की लक्ष्या, अशोक आणि सचिन, महेशाच्या पंजात सापडलेल्या मराठी चिपटसृष्टीमध्ये काही वेगळा विचारच कोणी करायला तयार होत नव्हतं. एक तथाकथित विनोदी कथानक (बर्‍याच वेळा ते हास्यास्पद असायचं) घ्यायचं. लक्षा, अशोकला घ्यायचं आणि एक सिनेमा चेपायचा असं सरसकट होत असताना अजय फणसेकरने ‘रात्र आरंभ’ नावाचा हा सिनेमा जो केला तो लिहिणे आणि करणे अतिशय कठीण होते. स्किझोफ्रेनियासारख्या जडजंबाल विषयावर खिळवून ठेवणारा सिनेमा करणे सोपे नाही. बर्‍याच वेळा करायला गेला गणपती आणि झाला मारूती असं काही तरी होऊन बसत. (शंका असणार्‍यांनी देवराई नावाचा सिनेमा पाहून डोक्याचा चिवडा करून घ्यावी.) पैशाचं पाठबळ नाही, लेखनाची, दिग्दर्शनाची पार्श्‍वभूमी नाही. असं असताना अजय फणसेकरने हा जो प्रयोग केला तो खरोखरच स्तुत्य होता. या सिनेमाने मराठी सिनेमाला वळण वगैरे काही दिलं नाही. पण प्रवाहाविरूद्ध पोहायचं धाडस करणारा हा प्रयत्न त्याला दाद द्यायलाच हवी.

Shwaas Marathi film

श्‍वास (२००३) :
सरावलेल्या गृहिणीने स्वयंपाक न करता एखाद्या नव्या नवरीने काही तरी करायला जावं, करताना असंख्य चुका कराव्यात आणि त्यातून जे काही तयार होईल ते अनपेक्षितपणे चविष्ट व्हावं तसं श्‍वास या सिनेमाबद्दल म्हणता येईल. दिग्दर्शक संदीप सावंतने हा सिनेमा करताना असंख्य तांत्रिक चूका केल्या. पण साधी सोपी मनाला भिडणारी कथा, कलाकारांचा उत्तम अभिनय (अमृता सुभाषचा अपवाद) अप्रतिम छायाचित्रण यामुळे या सिनेमा कुठल्या कुठे गेला. पन्नास वर्षांनी श्यामची आईनंतर हा सिनेमाला राष्ट्रपती पदक मिळालं. मग तो ऑस्करच्या स्पर्धेत काय गेला वगैरे पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. केवळ त्यासाठी नाही तर सिनेमाच्या एका प्रमुख अंगाकडे तोपर्यंत दुर्लक्ष होत होतं. छायाचित्रण समोर असलेला प्रसंग चकचकीत प्रकाशयोजना करून दाखवायचा या पलीकडे छायाचित्रणमध्ये फार प्रयोग करण्याच्या भागडीत कोणी पडत नव्हतं. पण संजय मेमाणेने या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे त्याला नेत्रसुखद हा एकच शब्द वापरता येईल. मराठी सिनेमा एवढा छान त्यापूर्वी कधीच दिसला नव्हता. कॅमेरामनचे युग सुरू करणारा आणि सुवर्णकमळ मिळवणारा हा सिनेमा म्हणून हा उल्लेखनीय आहे.

Harishchandrachi Factory Marathi film

हरिश्‍चंद्राची फॅक्टरी (२००९) :
या सिनेमाने एक वर्तुळ पूर्ण आहे. धुंडिराज गोविंद फाळके यांनी सुरू केलेल्या चित्रसृष्टीची कथा सांगणारा हा सिनेमा पुन्हा एकदा मराठी सिनेमाचे झेंडे अटकेपार फडकवणारा ठरला. दादासाहेबांना राजा हरिश्‍चंद्र बनविताना जेवढा त्रास झाला असेल कदाचित तेवढाच त्रास घेऊन चित्रपट दिग्दर्शनाचा काहीही अनुभव नसलेल्या परेश मोकाशीने अप्रतिम असा साधा सुंदर सिनेमा बनविला. कलाकारांपेक्षा सिनेमाचा विषय खूप मोठा होण्याचे अलीकडच्या काळातले कादाचित हे एकमेव उदाहरण असेल.

 

सुरूवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्यांना ही निवड कदाचित आवडणार नाही. सर्जा, सामना, उंबरठा, आक्रीत, शापित, माहेरची साडी, जोगवा सारखे चित्रपट या यादीत का नाहीत असा प्रश्‍न पडू शकतो. ज्यांना सहा राज्यपुरस्कार ओळीने मिळाले आणि सातवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या राजदत्तांचा एकही सिनेमा यात का नाही? प्रश्‍न पडू शकतो. पण एक लक्षात घ्या. चांगले सिनेमे अनेक आहेत. पण ज्यांनी इतिहासाला बरे वाईट वळण दिले, ज्यांनी वेगळे प्रयोग केले अशाच सिनेमांची इथे मी निवड केली आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर त्यात दगडघोटे जास्त आणि मैलाचे दगड कमी अशीच परिस्थिती दिसते. पण व्यावहारिक विचार केला तर मैलभर चालल्यानंतर दिसणारे खुणेचे दगडच दिशा दाखवतात. ते कमी असतात. म्हणूनच त्यांचे महत्त्व आहे.

Abhay Paranjpe
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.