-मानसी पटवर्धन.

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

श्री सुधीर फडके आणि ज्येष्ठ गायिका श्रीमती ललिता फडके यांचा समृद्ध संगीत वारसा आणि संस्कार लाभलेले, उच्च विद्या विभूषित, अभंग, भावगीत, चित्रपटगीत, गझल, अशा विविध गान प्रकारात मुक्तपणे मुशाफिरी करून त्यातील स्वरांचे गारुड जनमानसावर उमटविणारे आपल्या सर्वांचे लाडके संगीतकार ”श्री श्रीधर फडके ” (Music Director and Singer Shridhar Phadke) यांचा आज जन्मदिन…..!!!!!! श्रीधरजी,आपल्याला जन्मदिनाच्या लक्ष लक्ष सुरेल शुभेच्छा…..!!!!!!  (Birthday Greetings to Music Director and Singer Shridhar Phadke) 

लहानपणापासूनच श्रीधरजींचे विश्व संगीताभोवती फिरणारे होते. रूढ अर्थाने शास्त्रीय संगीताचे अध्ययन केले नसले तरी संगीत त्यांच्या रक्तातच होते आणि संगीतासाठी घरातील वातावरण पोषक होते. अनेक नामवंत मंडळी घरी येत असत.त्यांना जवळून पाहण्याची संधी श्रीधरजींना मिळाली.

१९७१ मध्ये ”युवदर्शन” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात त्यांनी चार पाच मिनिटांच्या दोन वाद्य वृंद रचना सादर केल्या होत्या. ती त्यांच्या संगीत दिग्दर्शनाची सुरुवात म्हणता येईल. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले असताना त्यांनी ”देवाचिये द्वारी ”हा अभंग स्वरबद्ध केला. व तो बाबूजींनी अमेरिकेत आपल्या कार्यक्रमात गायला.

ग दि. माडगुळकर यांची काही अप्रकाशित गीते व ज्ञानेश्वरांचे काही अभंग निवडून श्रीधरजींनी स्वरबद्ध केले व सादर केले. त्यात “त्रिभंगी देहुडा”, “निळिये रजनी”, “अवघा विठ्ठलू” यांचा समावेश होता. या सगळ्या गान प्रवासात उत्तम गेय काव्य शोधण्याचा त्यांना नादच लागला.

“फिटे अंधाराचे जाळे” हे सुधीर मोघे यांचे काव्य हाती पडल्यावर त्यांनी त्याला चाल लावली. ती ऐकून ”लक्ष्मीची पावले ”या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्यावर त्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली व श्रीधरजींचा चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला आणि मराठी चित्रसृष्टीला एक सृजनशील संगीतकार मिळाला.

”ऋतू हिरवा ‘ही ध्वनिफीत म्हणजे त्यांच्या संगीतातील मुकुट मणीच……!!!!!! त्यांनी स्वरबद्ध केलेली गीते आशाजींच्या अमृतस्वरात ऐकणे म्हणजे रसिकांना मेजवानीच…….!!! ऋतू हिरवा, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे बिन, जय शारदे वागीश्वरी, घनरानी साजणा, सांज ये गोकुळी या सगळ्या गीतातून श्रीधरजींचे अलौकिक प्रतिभा सामर्थ्य जाणवते. “ऋतू हिरवा” ने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला, प्रत्येक गीत मनावर कोरले गेले…हा पाचूचा सुरेल “रुजवा” रसिकांच्या मनामनात झाला…!!!

“साकार गंधार हा” ही त्यांची आणखी एक अवीट गोडी लाभलेल्या गीतांनी बहरलेली ध्वनिफीत…!!! यातील सर्वच गीते श्रवणीय…! ८० व्या वर्षी जेव्हा एखाद्या गायिकेच्या स्वरातील “स्वयंभू गंधाराची” अनुभूती येते….तेव्हा त्या दिव्य गीत संगीताने मन थक्क होते………नतमस्तक होते, त्या आशाताईंच्या अलौकिक स्वरलहरींवर आरूढ होते………..मंत्र मुग्ध होते……..मंदिरातील गाभाऱ्यात ज्या पावित्र्याची अनुभूती येते, तीच अनुभूती हे दिव्य स्वर, काव्य आणि संगीत देते………….!!!!!!!! ”साकार गंधार हा “या ध्वनिफितीतही साकार गंधार हा, सख्या रे, भुलवी तन मन, रसिक प्रियजन, (हे खास आशाताईंच्या पसंतीचे गीत, यातील ताना, मुरक्या या फार सुंदर…गायिकेचा खऱ्या अर्थाने कस लावणारे गीत…संगीतही बहारदार)

मंदिरे सुनी सुनी, रुतत चालले, सजणा पुन्हा स्मरशील ना ही यातील काही गीते…सगळीच अप्रतिम…दिव्य अनुभूती देणारी…!!! गीतातील अर्थाला साजेसे संगीत देणे ही तर श्रीधरजींची खासियत….!! प्रत्येक गीतातील भाव वेगळा….शांताबाई शेळके यांच्या “साकार गंधार हा ” सुंदर संगीताचा साज लाभला आहे आणि यात श्रीधरजींनी केलेला कोरस चा वापर लक्षणीय….!!!! “सख्या रे “या नितीन आखवे यांच्या गीताच्या सुरांच्या हिंदोळ्यावर मन अलगद झुलते….!!! “रुतत चालले कणा कणाने” मधील पराकोटीचे दु:ख डोळ्यात पाणी आणते…ही किमया त्यांचे संगीत आणि आशाताईंच्या स्वरांची…”भुलवी तन मन “हे गतिमान गीत स्थळकाळाचा विसर पाडणारे…..!!!! “सजणा पुन्हा स्मरशील ना” मधील नाजुक हरकतीही लाजवाब……हा गंधार आपल्या मनात साकारल्यावर एका वेगळ्या स्वर्गीय आनंदाची बरसात करतो आणि मनात झंकारत राहतो….!!!!

भावगीतासारखेच अभंगानाही चाली देताना त्यांची स्वर प्रतिभा अधिकच बहरते. “ओंकार स्वरूपा” ही बैरागी रागातील अजरामर कलाकृती ……!!!!! त्यातील समर्पण भाव, आर्तता वाखाणण्यासारखी….!!! मी किती वेळा “ओंकार स्वरूपा” ऐकले असेल याची गणतीच नाही…. तसेच तल्लीन गोविंदे , देवाचिये द्वारी, रूपे सुंदर, कोमल वाचा दे रे राम असे अनेक अभंग त्यांच्या सुंदर संगीताने सजले आहेत व त्या तरल स्वरातून अध्यात्माचा सोनचाफा आजही दरवळत आहे. “सूर वरदा रामा “ही त्यांची ध्वनिफीत ऐकली की मन राम भक्तीने दरवळते… यातील गीतांची धाटणी पाहून गायकांची केलेली निवड आणि त्यानुसार संगीत दिग्दर्शन पाहिले की अलौकिक सृजनाचा साक्षात्कार होतो…!!! यासाठी यातील रामाची आरती जरूर ऐकून पहावी…!

श्रीधरजी अत्यंत संवेदनशील आहेत. म्हणूनच अनिल कांबळे यांची ”त्या कोवळ्या फुलांचा ”ही रचना त्यांना भावली. हे गीत आणि संगीत दोन्ही अस्वस्थ करणारे …….!!!!! श्रीधरजींच्या स्वरातून गीतातील अस्वस्थता अधिकच गडद होते. त्यांची प्रत्येक रचना आपल्याला स्वत;चे वेगळेपण घेऊन भेटते आणि सहजपणे आपल्या मनात रुजते. त्यांची ”मधुकंस रागातील “मी राधिका ”ही रचना प्रेम भक्ती भाव जतन करते आणि खरच “तन श्याम मन श्याम” होऊन जाते….ही त्यांच्या संगीताचीच जादू…..!!!! तर” विठ्ठल नामाचा रे टाहो” ही मालकंस रागातील रचना त्या सावळ्याचे मनोहर रूप डोळ्यासमोर उभे करते”. तल्लीन गोविंदे” चा ठेका आपल्याला नकळत तालात रंगवून टाकतो तर ”साकार गंधार हा” या गीताने मन आनंदून जाते. त्या स्वरात आपण हरवतो.” काही बोलायचे आहे”, “तेजोमय नाद ब्रह्म”, “संगीत मनमोही रे” या त्यांच्या दर्जेदार संगीताने नटलेल्या ध्वनिफितीत मन गुंग होते.

“अबोलीचे बोल” मन हळवे करून जातात तर “घर असावे घरासारखे” मनावर कोरले जाते ………”. एक वेस ओलांडली” मधील” एकटेपणा” मन उदास करून जातो …….. ………तर “मना घडवी संस्कार” ऐकले कि आपली अनमोल अशी भारतीय संस्कृती जतन केल्याचे समाधान मिळते……”मनी वसे स्वप्नी दिसे” मधील त्यांच्या स्वरातील मिश्कीलपणा ……..त्यांचे हास्य ……अगदी लाजवाब ………..मनाला भिडते…..!!!!!! “वारा लबाड आहे”…..वारा…आजही गीत ऐकताना त्याचा ताल, त्याची लय मनात घुमतेय……….!!!!!!! श्रीमती पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातील “क्षितिजी आले भरते ग ऐकले” की त्याचा सूर ताल संगीत यात आपण गुंगून जातो…बा. भ. बोरकरांच्या “गडद निळे गडद निळे’, “क्षितिजी आले भरते ” आणि सरीवर सरी आल्या ग” या तीन कवितांचा कित्ती सुरेल गोफ श्रीधरजींनी अलवारपणे विणलाय….!!!! शब्द फिके आहेत या प्रतिभेपुढे….!!!! प्रत्येक गीत म्हणजे शंभर नंबरी सोनेच….!!!

हे गगना” ही कुसुमाग्रजांची सुंदर कविता…एक गावात राहणारी ती , दुसऱ्या गावातील तो पण दोघांना एकाच “विशाल गगनाने” आसरा दिला आहे…त्याला सारी कहाणी ज्ञात आहे…यातील “गगनाला’ श्रीधरजींनी घातलेली साद मनाला भिडते…!! “सदाफुली” ही त्यांची आणखी एक सुंदर ध्वनिफित… श्रीधरजी नेहमीच नवोदित गायकांना प्रोत्साहीत करून त्यांना संधी देत असतात…यातही याचा प्रत्यय येतो…! नुकतीच त्यांची माता भवानी जगताची जननी ही श्रुती विश्वकर्मा आणि शिल्पाताईंच्या स्वरातील रचना ऐकली आणि त्यातील भक्तीने, दाणेदार तानांनी मन आणि कान तृप्त झाले..तसेच श्रीमती आरती अंकलिकर आणि श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरातील “हृदयेश्वर तू खरा” ही भक्तिमय गुरुवंदनाही अशी सुंदर…!!!!

उत्तम संगीतकार हा उत्तम वाचक आणि संवेदनशील रसिक असावा लागतो. तरच त्याचे संगीत लोकमान्यता पावते. श्रीधरजी याचे उत्तम उदाहरण आहेत. संगीताइतकेच साहित्यावरही त्यांचे प्रेम आहे. ज्या साहित्यिकांमुळे आपण समृद्ध झालो त्यांच्याबद्दल त्यांच्या गीतांना चाली लावून आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. संगीताद्वारे समाजाशी नाळ जोडून घेण्याचा प्रयत्न श्रीधरजी करतात. ”लिलाव” या त्यांच्या अल्बम मध्ये कुसुमाग्रजांच्या व इतर प्रतिभावंतांच्या कविता समाविष्ट आहेत.

गायक, संगीतकार, साहित्य प्रेमी अशा कितीतरी भूमिका बजावत आज श्रीधरजींनी भावगीतांचे भाव-विश्व संपन्न केले आहे. आणि म्हणूनच शब्द आणि स्वर यांच्यावर स्वार होऊन आपल्या प्रतिभेने आपल्या कर्तृत्वाची सुंदर मोहोर रसिक मनावर उमटविली आहे. आपल्या वडिलांनी माननीय बाबूजींनी महाराष्ट्राला ज्या अलौकिक गीत रामायणाची सुरेल अनुभूती दिली ते गीत रामायण मोठ्या भक्तिभावाने, त्यात समरसून श्रीधरजी सादर करतात…”माता न तू वैरीणी”, “पराधीन आहे जगती”, “उगा का काळीज माझे उले” ही त्यांनी गायिलेली गीते ऐकून बाबूजींच्या या सुपुत्राचा अभिमान वाटतो….!!! एक प्रकारे ही दिव्य तेजाची आरतीच नव्हे का…!!

श्रीधरजी, आपल्या विविधांगी संगीताचे, गीतांचे गारूड रसिकमनावर चिरंतन उमटले आहे….हा सृजनाचा पारिजात असाच नित्य दरवळत राहो अशीच त्या दयाघनाच्या चरणी प्रार्थना करते…!!!पूज्य बाबूजी आणि आपल्या मातोश्री श्रीमती ललिताताई यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेच आहेत….!!! हे अलौकिक नादब्रह्म त्यांच्याच कृपेने साकारले आहे…आणि साकारत राहील….!!!गीते सादर करण्याआधी अत्यंत नम्रपणे आपण रसिकांना अभिवादन करता, आणि आपली हार्मोनियम, गाण्यांची वही यांनाही वंदन करून मोठ्या उत्साहाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करता…आपला नम्रभाव पाहून आमचेही मस्तक आदराने झुकते…आपल्यासारख्या सृजनशील संगीतकाराशी प्रत्यक्ष सुसंवाद साधता आला हे माझे भाग्यच म्हणायला हवे…

विविधरंगात नटलेल्या सुरेल कलाकृती निर्मिणाऱ्या या प्रतिभावान सरस्वतीच्या उपासकास पुन्हा एकदा जन्म दिनाच्या अनंत मंगल शुभेच्छा ……..!!!!! अशाच सुंदर सुरेल स्वराकृती त्यांच्या संगीतातून जन्मा येवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना ……!!!!!!!.

मराठी गीत-संगीताच्या जगतातील अशाच इतर माहितीपूर्ण  लेखांसाठी क्लिक करा 

 

Manasi Patwardhan
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.