-हेमा उजळंबकर
कमलाबाई रघुनाथराव गोखले म्हणजे कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री बाल कलाकार. होय. प्रथम स्त्री बाल कलाकार. आणि प्रथम स्त्री कलाकार कोण तर त्यांच्याच आई दुर्गाबाई कामत. ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटानंतर नंतर दादासाहेब फाळकेंनी काढलेला १९१३ सालचा, ‘मोहिनी भस्मासुर’ या दुसऱ्या चित्रपटात आई-लेकीने अनुक्रमे पार्वती व मोहिनीची भूमिका केली होती. एखाद्या स्त्रीने चित्रपट व नाटकात काम करणं म्हणजे त्याकाळी एकप्रकारे समाज व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या बंडापेक्षा कमी नव्हतं. पण या आई-लेकीने ते पुकारलं होतं. आज याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दुर्गाबाईंचा नातू व कमलाबाईंचा पुत्र म्हणजे अभिनेते चंद्रकांत गोखले. होय, अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील. आज चंद्रकांतजींचा जन्मदिन आहे.
Actor Chandrakant Gokhale's childhood photo with his Mother Kamlabaai
Actor Chandrakant Gokhale’s childhood photo with his Mother Kamlabaai
कमलाबाईंची घरचीच नाटक कंपनी होती. ‘चित्ताकर्ष’ नावाची. वडील रघुनाथराव सुद्धा गायक-नट म्हणून रंगभूमीवर काम करीत असत. १९०७ साली स्थापित. घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची. त्यामुळे नाटकात-चित्रपटात कामं करून चंद्रकांत यांना लहानाचे मोठे केले. नकळतपणे चंद्रकांत यांच्यावर अभिनयाचे संस्कार होत गेले व आईप्रमाणेच बालकलाकार म्हणून वयाच्या आठव्या वर्षीच चंद्रकांत यांनी ‘पुन्हा हिंदू’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर प्रवेश केला. मराठी नाटके व चित्रपटात तब्बल सात दशके चंद्रकांतजींनी काम केलंय. लहानपणीच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणही न घेऊ शकलेले चंद्रकांत अभिनयात मात्र एखाद्या मुख्याध्यापकाप्रमाणे होते. सुरवातीच्या काळात “बेबंदशाही’ आणि “पद्मिनी’ यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या.
Actor Chandrakant Gokhale
त्यांनी अभिनय केलेल्या ६४ नाटकांपैकी “नटसम्राट’, “पुण्यप्रभाव’, “भावबंधन’, “राजसंन्यास’, “बॅरिस्टर’, “पुरुष’, “पर्याय’, “कुलवधू”, “राणीचा बाग”, “राजे मास्तर”, “सिंहासन”, “झुंझारराव” ही त्यांची काही गाजलेली नाटकं. तसेच त्यांनी अभिनय केलेल्या जवळपास ७० मराठी चित्रपटांपैकी ‘धाकटी जाऊ’, ‘भैरवी’, ‘माणसाला पंख असतात’, ‘सुखाची सावली’, ‘स्वप्न तेच लोचनी’, ‘ईर्षा’, ‘जावई माझा भला’, ‘जीवाचा सखा’, ‘धर्मकन्या’, ‘महाराणी येसूबाई’, ‘मानिनी’, ‘सुवासिनी’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. १९३८ साली लक्ष्मीचे खेळ या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम भूमिका केली. काही हिंदी चित्रपटातून त्यांनी चरित्र भूमिकाही केल्या. उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच चंद्रकांतजी उत्तम गायकही होते. दीनानाथ मंगेशकरांना ते गुरुस्थानी मानीत. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या ‘गीतरामायण’ या काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला’चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते.
Vikram Gokhale with his Grandmother Kamlabaai and father Chandrakant Gokhale
Vikram Gokhale with his Grandmother Kamlabaai and father Chandrakant Gokhale
चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, नाट्यदर्पण, कलारंजन असे असंख्य सन्मानही मिळाले होते. शरीरयष्टीने अतिशय कृश असलेले चंद्रकांतजी अभिनयात मात्र वजनदार अभिनेते होते व आपल्या धारदार वक्तृत्वाने प्रेक्षकांवर कमालीचा प्रभाव पाडत असत. वैयक्तिक आयुष्यात चंद्रकांतजी अतिशय साधे आणि सच्चे व्यक्तिमत्व होते. त्यांनी १९९९ साली कारगिल जवानांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला व तितकेच पैसे आर्मी वेलफेअर फंडात देणगी म्हणून जमा केले. काही पैशांची बँकेत मुदत ठेव केली व त्यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही सैनिकांच्या मदतीसाठी ते अखेरपर्यंत वापरत होते. त्यांच्या मृत्यूनंतरही ही मदत आजही देणे सुरु आहे.
अशा या महान अभिनेत्यास आज त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.
Hema Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.