हरहुन्नरी कलावंत: विनोदमूर्ती ‘वसंत शिंदे’

– © डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.

 

नाशिक ही अण्णांची म्हणजे वसंत शिंदे यांची जन्मभूमीच.. जन्म १४ मे १९१२ भंडारदर्‍याचा (नाशिक पासून वीस-पंचवीस मैलावर असलेल्या भंडारदरा एक खेडं. जे आता धरणाखाली गेलेलं आहे ) नाशिक मधील सरकार वाडा जवळ अण्णांच्या वडिलांचे घड्याळाचे दुकान. हिंदुस्थानच्या चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या हिंदुस्थान फिल्म कंपनीत वयाच्या बाराव्या वर्षी नोकरी व पहिली भूमिका. रसरंग पुरस्कृत दादासाहेब फाळके गौरवचिन्ह अण्णांना “सांगते ऐका” या चित्रपटासाठी मे १९५९ ला मिळाले होते. असा नाशिकशी ऋणानुबंध..

अगदी अण्णांच्या शब्दातच सांगायचे झाले तर “वयाच्या १२ व्या वर्षी १९२४ पासून तोंडाला रंग लावून मूकपटात गेलो. तेव्हापासून मूकपट, नाटक, लोकनाट्य आणि चित्रपट असा जवळपास पाऊनशे वर्षाचा हा कलाक्षेत्रातील प्रवास झाला “. ७२ वर्षांची कलाक्षेत्रातील, कलाजीवनाची सक्रिय कारकीर्द ही केवळ नशिबवान असलेल्यांनाच मिळते. आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात श्रीगणेशाने करतो अगदी असेच अण्णांच्या बाबत झाले. आयुष्यात प्रथमच ज्या भूमिकेसाठी तोंडाला रंग लावला तो मूकपट होता चतुर्थीचा चंद्र अर्थात गणेश जन्म आणि अण्णांची भूमिका होती गणपतीची. आहे की नाही नशीब …

१९२४ पासून सुरू झालेला रंगदेवतेच्या आराधनेचा हा प्रवास अखंडपणे चालू होता, तो १९९६ पर्यंत. दादा कोंडके यांच्या “वाजवू का?” या चित्रपटात त्यांच्या गुरुची वाजंत्रीवाला ही भूमिका अण्णांनी केली तो त्यांचा शेवटचा चित्रपट. रंगदेवता, नाट्य देवता, रंगभूमीचा निस्सीमभक्त आणि रसिक प्रेक्षकांचा लाडका, आवडता बहुगुणी, बहुरंगी, हरहुन्नरी कलावंत म्हणजे अण्णा.आई, वडील, पाच भावंडे चार भाऊ, एक बहिण. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. पोटापाण्यासाठी आत्येभावाच्या मदतीने म्हणजे प्रभाकर चव्हाण यांच्या मदतीने दादासाहेब फाळके यांच्या हिंदुस्थान फिल्म कंपनी मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी रुजू. दादासाहेबांचे मुख्य कॅमेरामन अण्णासाहेब साळुंखे यांचे सहाय्यक म्हणून प्रभाकर चव्हाण हे काम करत. सुरुवातीला स्टुडिओ मधील सुतारकाम विभागात रवानगी झाली. या सुतारकामा सोबतच अण्णांना चतुर्थीचा चंद्र या मूकपटात दादासाहेबांनी पहिली संधी दिली. मूकपटाचा हा प्रवास पुढे ५ वर्षात १९ चित्रपट करून म्हणजे बोलकी तपेली या १९२९ यावर्षी प्रदर्शित झालेल्या मूकपटाने संपला. ©

–चित्रपट कारकीर्द–

तद्नंतर दहा वर्षांनी १९३९ मायाबाजार या चित्रपटातून अत्यंत छोट्याशा भूमिकेने परत सुरुवात झाली. तर १९४६ला भालजी पेंढारकर यांचा सासुरवास चित्रपट त्यांना मिळाला. तेव्हापासून अण्णांचा चित्रपट प्रवास धुमधडाक्यात सुरू झाला. जय भवानी, जिवाचा सखा, संत जनाबाई, केतकीच्या बनात, बाळा जो जो रे, अखेर जमलं, पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, कांचनगंगा, भाऊबीज, गंगेत घोडे न्हाले, गृहदेवता, प्रीतिसंगम, धाकटी जाऊ, सांगते ऐका, शिकलेली बायको, पैशाचा पाऊस, कन्यादान, मानिनी, बाप माझा ब्रह्मचारी प्रीती विवाह, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा असाच सुसाट झाला.१९६४ मधील “काय हो चमत्कार” हा शंभरावा चित्रपट. तद्नंतर अण्णांनी १९९६ पर्यंत जवळपास आणखी पंच्याहत्तर चित्रपट केले. यात प्रामुख्याने धर्मकन्या, थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीच वाण, मल्हारी मार्तंड, वारणेचा वाघ, थापाड्या, बायांनो नवरे सांभाळा, पांडोबा पोरगी फसली, बन्या बापू, बोट लावीन तिथे गुदगुल्या, सतीची पुण्याई, आली अंगावर, बहुरूपी, निखारे, मुका घ्या मुका गौराचा नवरा, पळवा पळवी, येऊ का घरात, वाजवू का? अशा यशस्वी चित्रपटांचा समावेश आहे. सात हिंदी चित्रपटातून देखील अण्णांनी आपली भूमिका केली आहे.

— विनोद मूर्ती —

भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या एका चित्रपटाच्या जाहिरातीतून वसंत शिंदे यांचा उल्लेख विनोदमूर्ती असा केला आणि अण्णांना विनोदमूर्ती ही एक मोठी उपाधी मिळाली. विनोदी भूमिका साकारताना विनोदाचा अशोक टाइमिंग साधणारा हा बापमाणूस असे मी मानतो.अण्णांच्या संदर्भात असे म्हणावे लागते की लेखक आणि दिग्दर्शक यांच्या कल्पनेपलीकडे काम अण्णा करत. एखाद्या भूमिकेचं आकलन आणि त्याचे सादरीकरण करताना ती भूमिका अण्णा अक्षरशः जगत. असे म्हणतात की कलाकारांना एखादी भूमिका करताना त्या भूमिकेत शिरावे लागते पण अण्णांच्या बाबतीत कदाचित हे उलट होत असावे. ती भूमिका,ते पात्रच अण्णांच्या अंगात शिरून अस्सल सादरीकरण करत असे म्हणूनच अण्णांनी सादर केलेले घरगडी, तमासगीर, भटजी, वारकरी, सोंगाड्या, बैलगाडीवाला, मारवाडी, मांत्रिक, सरदार, शेतकरी, न्हावी, पोलीस असे प्रत्येक पात्र, भूमिका ही रसिकांच्या हृदयात जाऊन भिडली. त्यांना ती आपली वाटली. ही एक आगळीवेगळी शक्तीच म्हणावे लागेल.

— सांगा या वेडीला —

अण्णांवर चित्रीत झालेली काही गाणी पाहताना खरंच खूप आनंद मिळतो. आजही त्यांचे सांगते ऐका १९५९ या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील लीला गांधी यांच्या सह चित्रित झालेले “सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला” “हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला” हे गीत. असो की “नाकात वाकडा नथीचा आकडा” हे वैभव (१९६९ )या चित्रपटातील गीत असो,अथवा
लता कर्नाटकी ( लता या दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या पत्नी व प्रिया बेर्डे यांच्या मातोश्री ) यांच्यासोबतचे सतीचं वाण या चित्रपटातील “अगं अगं कारभारणी ग कारभारणी” हे गीत असो अण्णांच्या अभिनयाची वेगळीच नजाकत अनुभवयास मिळते. नवरा बायकोचे प्रेमळ भांडण आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध गमती जमती या गीतांतून त्यांनी खूप सहजतेने साकारल्या आहेत. अचूक टायमिंग,अचूक मुखाभिनय हा एक महत्त्वाचा गुण त्यांच्या भूमिका लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरला, असे मला वाटते.

— सर्वसामान्यांचा कलावंत —

निखारे या चित्रपटाची निर्मिती बीड येथे झालेली आहे. चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या मराठवाड्यातील बीडसारख्या गावात तयार झालेला हा चित्रपट. या चित्रपटातील स्थानिक
कलावंतांसोबत अण्णांचे खूप जमले. एवढा मोठा कलावंत असूनही अण्णांनी प्रत्येकाला समजून घेतले. आजही ही कलावंत मंडळी चित्रपटाची चर्चा निघाली की अण्णांच्या माणुसकीचे व त्यांच्या स्वभावाचे गुणगाण गातात. या चित्रपटात त्यावेळी बीड येथे पोलीस सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक बाजीराव राठोड यांनी काम केले होते. ते मोठे हौशी कलावंत होते. पुढे त्यांनी सतीश रणदिवे यांच्या अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या बहुरूपी चित्रपटातूनही अण्णांसोबत काम केले. अण्णा, शरद तळवलकर आणि बाजीराव राठोड असे तीन पोलिस इन्स्पेक्टर या चित्रपटात आहेत. ©

— नाट्यकला प्रवास —

आपल्या प्रदिर्घ कलाप्रवासात त्यांनी संगीत नाटक, ऐतिहासिक नाटक, लोकनाट्य, सामाजिक नाटक, आकाशवाणीवरील नाटके, दूरदर्शनच्या मालिका यातूनही रसिकप्रेक्षकांना आपल्या समर्थ अभिनयाची ओळख करून दिलेली आहे. मुळातच हा लोकात रमणारा कलावंत असे म्हटले तर ते वावगे ठरत नाही. अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास २०० पेक्षा अधिक नाटकातून काम केलेले आहे. या क्षेत्रातील प्रत्येक चढ-उतार त्यांनी अनुभवला, मोठ्या धैर्याने त्याला सामोरे गेले आणि पुण्यामध्ये विनोदवृक्ष उभारला. विनोदवृक्ष हे त्यांच्या घराचे नाव. विनोद अण्णांचा मुलगा. अण्णांचा शेवटचा काही काळ अडचणीतच गेला. विनोद मूर्ती -वसंत शिंदे या मधू पोतदार यांनी शब्दबध्द केलेल्या आत्मचरित्रात याचा सविस्तर उल्लेख आहे.अगदी त्यांच्या निधनाची चुकीची वार्ता त्यांच्या मुलाने पसरविली.

अण्णांना प्रचंड त्रास झाला, असे सविस्तर या पुस्तकात आहे.
असो, तो भाग वेगळा पण एक कलावंत म्हणून रसिकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलेले विनोद मूर्ती अण्णा हे अफलातून कलावंतच. लावणी भुलली अभंगाला हे एक त्यांचे नाटक. या नाटकातील कलावंत रजनी चव्हाण, (उषा चव्हाण यांच्या भगिनी) सुनील तारे (सतीश तारे यांचे ज्येष्ठ बंधू) ,दादा पासलकर आणि अण्णा म्हणजे वसंत शिंदे. या नाटकाचे चार पाच प्रयोग मी पाहिले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा या माझ्या मूळ गावी मी १४ सप्टेंबर १९८६ रोजी लावणी भुलली अभंगाला च्या प्रयोगानंतर अण्णांची मुलाखत घेतली होती. त्या दिवसापासून अण्णांच्या बद्दल मनामध्ये एक आत्मीय ओढ राहिली. त्यानंतर अण्णांची एक-दोन वेळेस भेट झाली पण पुढे मात्र माझ्या दुर्दैवाने मी त्यांना भेटू शकलो नाही ही खंत आहेच.

( लेखन संदर्भ–विनोद मूर्ती- वसंत शिंदे .ले. मधू पोतदार )
………………………………..

raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment