१९६५ सालच्या ‘द साउंड ऑफ म्युझिक’ या संगीतमय ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचे नायक व २०१२ साली ‘ऑस्कर जिंकणारे सर्वात वयोवृद्ध अभिनेते’ ठरलेले हॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते ‘क्रिस्टोफर प्लमर’ यांचे शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. प्लमर यांचे कनेक्टिकट (अमेरिका) येथील घरी शांतपणे निधन झाले असे त्यांच्या व्यवस्थापकाने कळविले आहे. 

प्लमर यांनी आपल्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत विविध टप्प्यात, नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटातून विविध अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांना विशेषकरून ‘द साऊंड ऑफ म्युझिक’मधील भूमिकेसाठी ओळखले जात असे. वयाच्या सत्तरीनंतरही ते जोमाने कार्यरत होते. २०१२ साली ‘बिगिनर्स’ मधील भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले तेंव्हा प्लमर यांचे वय होते ८२ वर्षांचे! वयाच्या ८२ व्या वर्षी ऑस्कर जिंकणारे ते सर्वात वृद्ध अभिनेते ठरले. त्या पुरस्कार समारंभात ऑस्कर च्या बाहुलीला उद्देशून त्यांनी म्हटलेला व प्रचंड लोकप्रिय झालेला संवाद “तू माझ्यापेक्षा केवळ २ वर्षांनीच मोठी आहेस” रसिकांच्या कायम स्मरणात राहील. 

Christopher Plummer and Julie Andrews in The Sound of Music
Christopher Plummer and Julie Andrews in The Sound of Music

 

१३ डिसेंबर १९२९ साली जन्मलेले प्लमर हे टोरांटो, कॅनडा चे रहिवाशी होते. रंगभूमीवर विविध भूमिका साकारल्यानंतर १९५८ साली स्टेज स्ट्रक या सिनेमाद्वारे त्यांनी चित्रपट दुनियेत प्रवेश केला होता. प्लमर यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दि फॉल ऑफ रोमन एम्पायर, दि मॅन व्हू वुड बी किंग, वॉटरलू, दि इन्सायडर, दि लास्ट स्टेशन अशा असंख्य नावांचा समावेश आहे. त्यांना ऑस्करसोबतच इतरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.  

क्रिस्टोफर प्लमर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

Website | + posts

Leave a comment