-©विवेक पुणतांबेकर
प्रख्यात चरित्र अभिनेते ओम प्रकाश बक्षी उर्फ ओम प्रकाश यांचा आज स्मृतिदिन. अभिनयासोबतच ओम प्रकाश यांनी निर्मिती व दिग्दर्शनातही नशीब आजमावले होते. १९५७ सालच्या ओमप्रकाश निर्मित-दिग्दर्शित व मधुबाला, भारत भूषण व प्रदीप कुमार यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ या सिनेमाच्या वेळचा हा रंजक किस्सा.
ओम प्रकाश, सी.रामचंद्र आणि राजेंद्रकृष्ण यांची मैत्री होती. राजेंद्रकृष्ण स्वभावाने मिश्किल होते. अनेकदा ओम प्रकाशची फिरकी घेत असत. एकदा मद्रासच्या निर्मात्याने विमानाची तीन तिकीटे पाठवून मद्रासला बोलावले. ओम प्रकाश विमान प्रवासाला घाबरायचा. तो रेल्वेने येणार होता. राजेंद्र कृष्णला ओम प्रकाशची खोडी काढायची हुक्की आली. त्याने मद्रासचे बॅंडवाले, स्टेशनवरचे हिजडे गाठले. ओम प्रकाश मद्रास स्टेशनवर उतरला. बॅंड वाजायला लागला. हिजड्यांनी चपलांचा हार घातला. एका लहान मुलाने पत्र दिलं, त्यात रेल्वेतून आल्याबद्दल अभिनंदन केले होते. ओमप्रकाश समजून गेला की ही किमया राजेंद्र कृष्णची. रागात त्याने बोलणे बंद केले.
त्याच वेळी ओम प्रकाशने ‘गेटवे ऑफ इंडिया’ सिनेमा लाॅंच केला. संगीतकार मदनमोहनला गीतकार म्हणून राजेंद्र कृष्णच हवा होता. या दोघांची कट्टी होती. राजेंद्र कृष्णला रेसचा नाद होता. तो बंगलोरहून विमानाने यायचा होता. सांताक्रूज विमानतळावर ओम प्रकाशने ड्रायव्हर हरबंस ला गाडीसकट पाठवले. हरबंस ला पाहिल्यावर राजेंद्र कृष्ण समजून गेला. गपचूप गाडीत बसला व चेंबूरला ओम प्रकाश च्या बंगल्यात आला. ओमप्रकाशचा राग गेला नव्हता. दारातूनच कागद पेन सरकवले आणि सिचुएशन सांगितली. जिद्दी राजेंद्र कृष्ण ने पायरीवर बसून गाणे लिहिले आणि सांगितले पैसे मला घरी आणून द्यायचे. इथे घेणार नाही. गाणे वाचल्यावर ओम प्रकाश विरघळला. घरी नेऊन पैसै दिले आणि दिलजमाई झाली.
आमच्या चेंबूरच्या सुनेहरे पल कार्यक्रमात मी ही आठवण सांगितली. राजेंद्र कृष्ण यांचे सुपुत्र राजेश दुग्गल हजर होते. मला मिठी मारुन म्हणाले “अंकल यह सब मेरे सामने हुआ था!”
ओमप्रकाश यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.
Vivek Puntambekar
Science Graduate from Somayya College in the year 1977.
Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.
Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.
Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.
Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.
Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.