-धनंजय कुलकर्णी

हिंदी सिनेमाच्या दुनियातील साठच्या दशकातील  दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतला अभिनेता चंद्रशेखर यांचे आज निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी (जन्म ७ जुलै १९२३) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्याकडे इतिहास हा नेहमी विजयी वीरांचा लिहिला जातो परंतु वीरांच्या विजयात त्यांच्या साथीदारांचा देखील तितकाच सहभाग असतो, हे आपण विसरतो. अभिनेता चंद्रशेखर वैद्य (Actor Chandrashekhar) यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व नामवंत दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यासमवेत अभिनय केला. व्ही. शांताराम, नितीन बोस, देवकी बोस, विजय भट्ट, भगवान, बी.आर. चोप्रा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, शक्ती सामंता, रामानंद सागर, प्रमोद चक्रवर्ती, दिलीप कुमार, देव आनंद, राजेंद्र कुमार, भारत भूषण, दारा सिंग, राजेश खन्ना, मनोज कुमार आणि अमिताभ बच्चनयांच्या सोबत त्यांनी अभिनय केला. भूमिका किरकोळ असल्या तरी चंद्रशेखर नजरेत भरत त्यांच्या राजबिंड्या रूपाने! त्यांच्या चरित्र अभिनेत्याच्या कालखंडात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या. (Tribute to Veteran Actor and Director of Hindi Cinema, Chandrashekhar Vaidya, who passed away today at the age of 97)

माझं भाग्य थोर आहे की या अभिनेत्याला मे २०१४ मध्ये अंधेरी ला त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा योग मला आला होता. पुण्यातील ज्येष्ठ चित्रपट संग्राहक आणि माझे स्नेही श्री नारायणराव फडके यांच्यामुळे हा योग जुळून आला होता. त्यावेळी अभिनेता चंद्रशेखर हे आजारी होते आणि अंथरुणाला खिळून होते. पण तरीही आम्ही त्यांच्याशी थोडाफार संवाद साधु शकलो. ते खिन्नपणे हसत आमच्या गप्पांना दाद देत होते. अभिनेता  चंद्रशेखर म्हटलं की त्याचा ‘चाचाचा’ हा १९६४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट पटकन डोळ्यापुढे येतो. या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेत्री हेलन हिला मध्यवर्ती भूमिका मिळाली होती. हा चित्रपट संगीतकार इक्बाल कुरेशी यांनी संगीतबद्ध केला होता. गंमत म्हणजे इक्बाल कुरेशी आणि अभिनेता चंद्रशेखर हे जुने मित्र होते काही काळ इक्बाल कुरेशी यांचे वास्तव्य आंध्रप्रदेशमध्ये होतं.त्यांचा  चाचाचा हा चित्रपट कृष्णधवल असला तरी त्यातील संगीतामुळे प्रचंड गाजला.सुबह न आये ऐसी शाम ना आये जिस दिन तेरी याद ना आयी याद ना आयी,दो बदन प्यार की आग में जल गये एक चमेली के मडवे तले , वो तुम न थे वो हम न थे या गाण्यांनी आजही जुन्या रसिकांना स्मृतिगंध याचा आनंद मिळतो. या चित्रपटाच्या यशानंतर १९६६ साली  त्यांनी स्ट्रीटसिंगर हा चित्रपट तयार केला. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन स्वतः चंद्रशेखर यांनी केले होते.स्ट्रीट सिंगर हा चित्रपट शंकर-जयकिशन यांनी स्वरबद्ध केला होता.  शंकर हेदेखील मूळचे हैदराबादचे! एकेकाळी लहान असताना चंद्रशेखर आणि शंकर हे कुस्तीच्या मैदानात एकत्र कुस्ती खेळत होते ही आठवण ठेवून चंद्रशेखर यांच्या स्ट्रीटसिंगरला शंकर-जयकिशन यांनी संगीत दिले. परंतु त्याच वेळी या जोडीमध्ये मतभेदाचे वादळ शिरल्याने हा चित्रपट एकट्या शंकरने ‘सुरज’ या नावाने संगीतबद्ध केला होता. चंद्रशेखर यांना सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागला.

हैदराबादला असल्याने त्यांचा उर्दू आणि हिंदी चा खूप चांगला अभ्यास होता देखणे रुप असलेले बऱ्याच जणी त्यांना चित्रपटसृष्टीत जाण्याचा सल्ला दिला त्याच काळात हैदराबादला निजामाच्या विरुद्ध आर्य समाजाने आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात नेमके चंद्रशेखर अडकले  गेले आणि पोलिस पकडतील या भीतीने त्यांनी बेंगलोर गाठले. तिथे त्यांनी कन्नड चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या कन्नड आणि तेलुगूचे  उच्चार इतके सदोष होते की तिथल्या लोकांनी त्यांना मुंबईला जाऊन नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. १९४१आणि वयाच्या अठराव्या  वर्षी अभिनेते चंद्रशेखर हे मायानगरीत आले आणि रोज स्टुडिओचे दरवाजे ठोठावू लागले. त्यांना सुरुवातीला दीड रुपये रोज या पगारावर एक्स्ट्रा ची भूमिका करायला मिळाली. पुढे अनेक चित्रपटातून ते एक्स्ट्रा  च्या भूमिकेत दिसून आले. त्यांचा आवाज देखील चांगला असल्याने ते कोरस मध्ये देखील गात होते. एकदा कोरस मध्ये गाताना गायिका शमशाद बेगम यांनी त्यांना पाहिले आणि त्यांचे देखणे रूप लक्षात घेऊन त्यांना अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांना पुण्याला डब्ल्यू झेड अहमद यांच्या शालिमार स्टुडिओत पाठवले. इकडे पुण्यात शालीमार  स्टुडिओत आल्या नंतर त्यांनी काही (रंगीला राजस्थान , पृथ्वीराज संयुक्ता ) चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. पण पुढे फाळणी नंतर शालिमार स्टुडिओचे मालक पाकिस्तान निघून गेल्याने त्यांना पुन्हा एकदा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.

इथे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्याला करियर करता येईल का याची चाचपणी केली आणि काही चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन देखील केले. राजकमल स्टुडिओ मध्ये त्यांचा प्रवेश योगायोगाने झाला. शांताराम बापू यांनी या अभिनेत्याचे कलागुण ओळखून त्यांना ‘सुरंग’ (१९५३) या चित्रपटात प्रमुख नायकाची भूमिका दिली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एकदा शांतारामबापूंनी त्यांना सर्वांसमोर खूप झापले आणि त्यांचा पान उतारा केला, अपमान केला. चंद्रशेखर खूप चिडले आणि रागारागात त्यांनी पुढचा शॉट दिला! संध्याकाळी शांतारामबापूंनी त्यांना जवळ बोलावून सांगितले की मी मुद्दाम तुझा अपमान केला जेणेकरून तुझ्यातील द्वेष/ राग उफाळून आला पाहिजे, जो मला पुढच्या शॉट साठी आवश्यक होता! शांताराम बापूंच्या चित्रपटातील नायक तसे पुढे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. चंद्रशेखर देखील त्याला अपवाद नव्हते.  

पण चंद्रशेखर मात्र काही संगीतमय चित्रपटांसाठी आठवले जातात विषेशत: ‘काली टोपी लाल रुमाल’ या चित्रपटातील ‘लागी छुटे ना अब तो सनम’,’ ओ काली टोपी वाले जरा नाम तो बता’,’ दगा दगा वई वई’, दिवाना आदमी को बनाती है रोटीया’ हि  चंद्रशेखर यांच्यावर चित्रित गाणं आज देखील लोकप्रिय आहे. भगवानदादा यांच्या एका चित्रपटात त्यांना डान्स करायचा होता परंतु नृत्याचे  त्यांना फारसे अंग नव्हते. त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले आणि काही काळातच त्यांनी चांगला नृत्य करता येईल याचे शिक्षण घेतले याचा फायदा त्यांना पुढच्या साठच्या दशकातील दोन चित्रपटांसाठी झाला .त्यांनी स्वतः निर्मित आणि दिग्दर्शित केले होते चित्रपट होते ‘चा चा चा’  आणि स्ट्रीटसिंगर!

दरम्यान पन्नासच्या दशकात त्यांना त्यांना अनेक चित्रपटात भूमिका मिळत गेल्या. हे चित्रपट खूप यशस्वी ठरले. मस्ताना, बारादरी ,जिंदगी के मेले, बागी सिपाही, टॅक्सी स्टँड काली टोपी लाल रुमाल ,बरसात की रात ,तेल मालिश बूटपॉलिश ,बात एक रात की, किंग कोंग, सच्चे का बोलबाला, या चित्रपटातून चंद्रशेखर प्रेक्षकांना दिसूनआले. चंद्रशेखर यांनी ३०चित्रपटात नायकाची भूमिका केल्यानंतर सत्तरच्या दशकात त्यांनी चरित्र अभिनेत्याची भूमिका करायला सुरुवात केली.सुपरस्टार  राजेश खन्ना सोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. कटी पतंग, मेहबूबा, अजनबी, अलग-अलग या चित्रपटातून ते एकत्र होते.  तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुली, शराबी ,नमक हलाल या चित्रपटातून त्यांनी भूमिका केली. विशेषत: शराबी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला एडवोकेट सक्सेना बऱ्याच जणांना आजही आठवत असेल.१९८८ साली ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी सुमंत यांची भूमिका केली या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा दिला.

रुपेरी पडद्यावरची चंद्रशेखर यांचीही कारकीर्द पाहत असताना त्यांनी पडद्याच्या मागचे काम केले आहे ते देखील खूप महत्त्वाचे आहे. आपण सुरुवातीला  एक्स्ट्रॉ कलाकार होतो या  कलाकारांची कदर या इंडस्ट्रीत कोणी घेत नाही याची जाणीव त्यांना कायम वाटत राहायची.  त्यामुळे त्यांनी सिने फेडरेशन, इम्पा, इंडियन फिल्म डायरेक्टर असोसिएशन, अशा अनेक संस्थांसोबत काम केले आणि वंचितांना त्यांचा हक्क मिळवून दिला. चंद्रशेखर यांचा मुलगा त्यांचा नातू हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. कोणताही Godfather पाठीशी नसताना  आपल्या स्वकर्तुत्वाने तब्बल चाळीस वर्षे पडद्यावर चंद्रशेखर यांनी काम केले. आपल्या सहकलाकारांच्या हक्कासाठी लढले.

चंद्रशेखर यांच्या भेटीच्या वेळी आमच्या मनात त्यांनी पडद्यावर साकारलेली गाणं कायम आठवत होतो ‘तसवीर बनाता हून मगर तसवीर नही बनती’ या गाण्यात एका ठिकाणी तलत मेहमूद गावून जातो ‘दम भर के लिये मेरी दुनिया मे चले आओ…’ खरोखरच काही तासांसाठी आम्ही अभिनेता चंद्रशेखर यांना  भेटलो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘दम भर के लिए’ त्याच्या आयुष्यात आम्ही जाऊ शकलो. त्या वेळी ते फार काही बोलू शकले नाहीत. पण आम्ही जे बोलत होतो ते ऐकत त्यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू मूकपणे आमच्याशी संवाद साधत होते.

(संदर्भ: इन्टरनेट, बीते हुये दिन)

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.