– जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

‘ तुम आ गये हो, नूर आ गया है, नही तो चरागोंसे लौ जा रही थी ’

  एकेकाळची आघाडीची नायिका व चरित्र अभिनेत्री सुचित्रा सेनचे हिंदी पडद्यावरचे आगमन असेच होते. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्वाच्या साक्षीदार ठरल्या. हिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल इतिहासात कॅमेऱ्याना भुरळ पाडणाऱ्या लावण्यांचे जे सोहळे झाले त्यात सुचित्रा सेन यांचा एक महत्वाचा चेहरा होता. आरस्पानी बंगाली सौंदर्य आणि काळजाला हात घालणाऱ्या अभिनयासह बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक दंतकथा बनून राहिलेली सुचित्रा सेन ही रवींद्रनाथ टागोर यांचा सहवास लाभलेली नितळ,निर्मळ आणि मोहक तसेच डोळ्यांतून सह्स्त्रभाव प्रकट करणारी गोड अभिनेत्री.केसांच्या रुपेरी बटांमुळे अधिकच खुलून येणारे खानदानी सौंदर्य,साडीलाच भरजरी करणारे व्यक्तिमत्व आणि अत्यंत उच्च कोटीचा अभिनय हे त्यांचे वैशिष्टय होतं. 

     सुचित्रा सेन यांचा जन्म ६ एप्रिल, १९३१ मध्ये बांगलादेशमध्ये असणाऱ्या पाबना या शहरात झाला. त्यांचा १९३१ चा जन्म म्हणजे महात्मा गांधीजींच्या मीठाच्या सत्याग्रहानंतरचं वर्ष, तसेच देशातला ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट तयार झालेले वर्ष. सुचित्राचे वडील करुणामय दासगुप्ता हे हेडमास्तर, तर आई इंदिरा दासगुप्ता या गृहिणी.

यांना तीन मुले व पाच मुली होत्या. त्यामध्ये सुचित्रा हे त्यांचे पाचवे अपत्य. सुचित्राचे मूळ नांव रमा दासगुप्ता.त्यांचे शिक्षण पाबनालाच झाले. गंमत म्हणजे शाळा, कॉलेजमध्ये असताना त्या  नाटकांत वा नृत्यांमध्ये खूप भाग घ्यायच्या असं काही घडलं नव्हतं. उद्योगपती आदिनाथ सेन यांच्या मुलाशी म्हणजेच दिबानाथ यांचेशी १९४७ साली म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी सुचित्राचा विवाह झाला. त्याकाळी स्त्रियांचा विवाह लहान वयात होत असे.सुचित्रा सेन यांना चित्रपट कारकिर्दीसाठी त्यांचे पती दिबानाथ यांनी प्रोत्साहन दिलं. विवाहानंतर त्यांना मुलगी झाली. तीच मूनमून सेन. ती सुद्धा अभिनेत्री होती. पुढे त्यांच्या दोन नातीपर्यंत त्यांचा अभिनय झिरपला.

     सुचित्रा सेननी विवाहानंतर सहा वर्षांनी १९५२ साली पहिला सिनेमा केला. त्याच नांव ‘शेष कोथाई’. या बंगाली अभिनेत्रीनं बंगाली प्रेक्षकांवर मोहिनी घातली. बंगाली चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका करणाऱ्या सुचित्रा सेन या तिथल्या प्रत्येकाच्या जगण्याचे कारण आणि प्रेरणा ठरल्या. अगदी नवरात्रीतल्या देवीचे मुखवटेही त्यांच्या चेहऱ्यावर बेतले जाऊ लागले. ‘एखादी कशी दिसते?’ या प्रश्नाचे उत्तर जर ‘सुचित्रा सेनसारखे’ असे आले, तरच सार्थक वाटण्याचा तो काळ. हे तारांकित आयुष्य सांभाळताना करावी लागणारी कसरत सुचित्रा सेन यांनी फार कष्टाने केली. बंगाली अभिनेता उत्तमकुमार आणि सुचित्रा सेन या जोडीने जवळजवळ तीस चित्रपट केले आणि ते त्यावेळचे आयकॉन्स बनले. दोघांचे मेलोड्रामाज आणि रोमांटीक चित्रपट गाजले. पडद्यावर नायक-नायिकेची ही जोडी लोकांना आवडायची. उत्तमकुमार व सुचित्रा सेन ‘बेंगाली सिनेमाज फर्स्ट कपल’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ स्नेह होता. सुचित्राबद्दल उत्तमकुमारच्या मनात एक हळवा कोपरा होता. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ही दुक्कल जशी होती तशीच ही जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

     हिंदी चित्रपटसृष्टीत बिमल रॉय यांच्या अजरामर ‘देवदास’ मधून सुचित्रा सेन यांनी १९५५ मध्ये हिंदी चित्रपटात प्रवेश केला. त्यांनी रंगवलेली ‘पारो’ ही स्मरणात रहाणारी ठरली. दिलीपकुमार सारखा कसलेला अभिनेता आणि वैजयंतीमाला या  त्या काळातील आघाडीच्या नायिकेसमोर तिची व्यक्तिरेखा उठून दिसली याचे कारण तिच्या देखणेपणात नव्हते तर अभिनयात होते. तिच्यातील अभिनय संपन्नतेने चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच तिने भुरळ घातली.तिचं वंग सौंदर्य,गायीसारखी भावूक व गरीब नजर यामुळे ती खेडेगावातील अस्सल पारो वाटली. खरं तर या भूमिकेसाठी बिमल रॉयना मीनाकुमारी हवी होती पण मानिनी पारोसाठी मीनाकुमारीच्या व्यक्तिमत्वाऐवजी सुचित्राचे करारी व्यक्तिमत्वच गरजेचे होते असं देवदास पाहिल्यावर जाणवतं. चित्रपटात देवदास शहरातून गावी आल्यानंतर जेव्हा  तिला हाक मारतो तेव्हा ती दिवा लावत असते. तिच्या चेहऱ्यावर एकदम प्रकाश पडतो आणि तिची उजळ मुद्रा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. चित्रपटाच्या अखेरीस मृत्युच्या दारात असलेल्या देवदासला पाहून  सुचित्राने असा अभिनय केलाय की, आपण तो विसरूच शकत नाही.पारोच्या स्वभावाचे हे अवघड कंगोरे तिने लीलया दाखवले जणू त्याच भूमिकेसाठी तिचा जन्म झाला होता. ५० च्या दशकात बिमल रॉय हे बडे प्रस्थ होते. त्यांच्यासारख्या रत्नपारखी संवेदनशील दिग्दर्शकाने सुचित्रा सेनची पारोसाठी निवड केली आणि शरतचंद्राच्या साहित्यकृतीतली अजरामर पारो सुचित्रा सेनच्या रूपाने रुपेरी पडद्यावर अमर झाली. या भूमिकेबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.

Suchitra Sen

     ‘बंबई का बाबू’ (१९६०) या चित्रपटांत देखण्या देव आनंद समोर सुचित्रा सेन देखील देखणी दिसली.अस्सल पंजाबी अल्लड तरुणी तिनं अशी काही साकारली की ती बंगाली आहे,एका मुलीची आई आहे हे प्रेक्षक विसरले. या चित्रपटात तिचे कुटुंबीय देवला आपला हरवलेला  मुलगाच समजतात. प्रत्यक्षात तो तिचा भाऊ नसतो.नायिकेचं दुसऱ्याशी लग्न ठरतं तेव्हा ‘चलरी सजनी अब क्या सोचे, कजरा ना बह जाये रोते रोते’ हे मुकेशचं गाणं लागतं त्यावेळी नायिकेची कोंडी, व्यथा-वेदना सुचित्राने सहजसुंदर अभिनयाने जिवंत केली. तिच्या अभिनयाचा खरा कस लागला होता. ‘देखनेमें भोला है दिल का सलोना’ हे अवखळ गाणं रंगवताना तिचं कसब डोळ्यात भरणारं होतं. या गाण्यात सुचित्राने धमाल केली आहे.

     त्यानंतर त्यांचा चित्रपट आला ‘ममता’ (१९६६). उत्तर फाल्गुनी या बंगाली चित्रपटाचा ममता हा रिमेक होता.त्यात पन्नाबाई आणि सुवर्णा अशी दोन पात्रे त्यांनी रंगवली. मनीष म्हणजे अशोककुमारवर देवयानीचे प्रेम असते.देवयानीचे वडील आर्थिक विपत्तीत सापडल्यामुळे एका म्हाताऱ्याशी तिचे लग्न लावतात. पण  तिचा नवरा तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो. त्यानंतर पन्नाबाई म्हणून पडद्यावर वावरणारी  देवयानी आपल्या मुलीला ज्या निर्धाराने या वाईट व्यवसायाबाहेर ठेवते,वाढवते ती पन्नाबाईची ग्रेस, आब आणि वेदना सुचित्रा सेनने समर्थपणे प्रकट केली आहे. त्याचबरोबर  नायक धर्मेंद्र याच्यासोबत सुवर्णाची तरुण भूमिकाही अल्लडपणाने साकार  केली आहे. वकिलीचा अभ्यास करणारी बुद्धिमान स्त्री आणि कोर्टात वकील म्हणून वावरणारी स्त्री समर्थपणे तिने दाखवली आहे. एकाचवेळी मुलीचे यश दुरून पाहणारी आई आणि वकील म्हणून खूनी स्त्रीचा राग करणारी मुलगी अशा डब्बल रोलचे वर्तुळ आणि वेगवेगळ्या वयाच्या स्त्रीमधील भिन्नता त्यांनी ताकदीने दाखवली.

     सुचित्रा सेनची ‘आंधी’ (१९७५) मधील आरतीदेवी अभिनयाचे मापदंड प्रस्थापित करणारी होती. हा चित्रपट इंदिरा गांधींच्या आयुष्यावर बेतला असल्याच्या शंकेने आणीबाणीत या चित्रपटावर बंदी आणली. पण आणीबाणी संपल्यानंतर हा चित्रपट खूपच गाजला.सुचित्रा सेनचे व्यक्तिमत्व प्रभावी,दरारा निर्माण करणारे असल्याने आंधी आणि सुचित्रा सेन, सुचित्रा सेन आणि संजीवकुमार, सुचित्रा सेन आणि गुलजार हा मणिकांचन योग जुळून आला. त्यांचा इंदिराजींचा गेटअप, केसांतल्या त्या सुपरिचित पांढऱ्या झुपक्यासह तंतोतंत जमला होता.व्यक्तिचित्रण,अभिनय आणि रंगभूषा यांचा सुंदर मिलाफ या भूमिकेत होता. डावपेच खेळणारी राजकारणी स्त्री सुचित्राने झोकात उभी केली आणि त्याच सहजतेनं प्रेयसी आणि गृहिणी या रुपामधली मिस्कीलता आणि लाघव तिनं साकारलं. इंदिराजींच्या व्यक्तीमत्वातला अधिकार आणि तोरा तसेच दरारा आणि निर्भयता तिच्या व्यक्तीमत्वात होती. अशी नायिकेची दोन रूपे त्यांनी कमालीच्या सहजपणे दाखवली.

     आंधी मध्ये बऱ्याच दिवसांच्या अंतरालानंतर आपली जिद्दी पत्नी घरी आल्यावर त्या दोघांतले संवाद आणि पौर्णिमेच्या चांदण्यातले ‘तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं..’ हे गुलजार गीत रसिकांच्या मनांत अलवारपणे अजूनही घर करून आहे. मातृभाषा हिंदी नसलेल्या सुचित्राच्या बंगाली जिभेला ‘र’ उच्चारणं जड जायचं, औरतचा उच्चार त्या औडत करायच्या पण तरीही हिंदी भाषा शिकून त्याकाळच्या मीनाकुमारी, नर्गिस, वहिदा, वैजयंतीमाला, नूतन या अभिनयगुण संपन्न कलाकारांच्या समोर उण्यापुऱ्या चित्रपटातून आपल्या नावाचा खोल ठसा त्यांनी उमटवला. स्त्रीचे अबला नारी हे रूप दूर करून स्वतंत्र आणि कणखर स्त्रीचे दर्शन घडविले म्हणूनच गुलजार त्यांना मैडम ऐवजी सर म्हणायचे. हिंदीत स्वत: संवाद म्हणण्याचा आग्रह त्यांनी आंधीत धरला. या आरतीच्या खंबीरपणाला न्यायही मिळाला आणि त्यांना ‘आंधी’ ने फिल्मफेअर अवार्ड मिळवून दिले. हा त्यांचा हिंदीतला शेवटचा चित्रपट.

     सुचित्रा सेन यांनी १९७८ नंतर कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. हॉलीवूडला वेड लावून स्वत: त्या गर्दीपासून कटाक्षाने दूर राहणारी आणि त्यामुळे अधिकचं वेड लावणारी ‘ग्रेटा गार्बो’ ही जशी रहस्य बनली तशा सुचित्रा सेनही विजनवासात निघून गेल्या. म्हणून त्यांना भारताची ‘ग्रेटा गार्बो’ असं नांव पडलं. अर्थात अतिशय बोलका, रेखीव चेहरा आणि बुद्धीला आव्हान देणारे अभिनयाचे वैभव यातही त्या ग्रेटा गार्बोच्या तोडीच्या होत्या. आपल्या खासगीपणाची प्राणपणाने जपणूक करताना त्यांनी चक्क दादासाहेब फाळके पुरस्काराचाही अव्हेर केला. पुरस्कार मिळावेत म्हणून धडपडणाऱ्या जगात सुचित्रा सेन हे न सुटणारे कोडेच राहिले.

     १९६३ साली मास्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सात पाके बांधा’ या बंगाली चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला,पश्चिम बंगाल सरकारने त्यांना ‘बांग भूषण’ या राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारने गौरवले तर हिंदी चित्रपटात ‘देवदास’ आणि ‘आंधी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार  मिळाला. पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.

     ५२ बंगाली आणि ७ हिंदी चित्रपट केलेल्या सुचित्रा सेननी चित्रपटसृष्टीला अलबिदा केल्यानंतर अनेक वर्षे पश्चिम बंगालमध्ये रामकृष्ण मिशनचे काम सांभाळले. रामकृष्ण मिशनचे काम करताना त्यांनी अनवाणी पायाने दक्षिण कलकत्त्यातील आपल्या घरापासून बेल्लूर मठापर्यंत प्रवास केला.सुचित्रा सेन ही अभिनेत्री सोनेरी जमान्याची सन्माननीय प्रतिनिधी होती. बंगाली चित्रपटांची ती अनभिषिक्त सम्राज्ञी होती.लाखात एक देखणी नव्हती पण लाखांमध्ये उठून दिसेल अशी अभिनेत्री होती. देवदास,ममता,आंधी या फक्त तीन चित्रपटामधून हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत आपलं नांव कोरणाऱ्या या अभिनेत्रीने  हिंदी चित्रपटाचा वयाच्या पन्नाशीतच म्हणजे  १७ जानेवारी २०१४ ला इहलोकाचा निरोप घेतला.

     हे एक असाधारण व्यक्तिमत्व होतं. पार्ट्या, समारंभ, सामाजिक कार्याच्या मुखवट्या आडची प्रसिद्धी याचा त्यांना तिटकारा होता.व्यावसायिक चित्रपटसृष्टीत देखील अस्सल मुद्राभिनयावर भर असलेला सहजसुंदर अभिनय याचं सुचित्रा सेन हे एक उत्तम व दुर्मिळ उदाहरण होय. क विशिष्ट तत्व आयुष्यभर पाळून चित्रपटसृष्टीच्या मायाजालात राहून या झगमगाटाचा मोह नसलेल्या सुचित्रा सेन यांची ओळख म्हणजे

        ‘रहे ना रहे हम महका करेंगे

           बन के कली बन के सबा बागे वफा में’

                                                                          

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment