-पद्माकर पाठकजी

दुःख आहे म्हणून सुखाची किंमत कळते. दुष्ट व्यक्ति आहे म्हणून सुष्ट अथवा सत् व्यक्तींचे महत्त्व जास्त जाणवते. म्हणजेच दृष्ट व्यक्तींचे एक प्रकारे महत्व असतेच ना ? एखाद्या कथेत जेंव्हा दुष्ट व्यक्ती एखाद्याला छळते ,त्रास देते तेव्हा ती सहन करणारी व्यक्ती सोज्वळ व सोशिक असेल तर त्या छळणारी ला शिव्याशाप दिले जातात. छळवणूक होते त्याचे दुःख जास्त भावण्यासाठी एक प्रकारे ही छळणारी व्यक्ती त्या कथेत साहाय्यभूत ठरते. एखादा सिनेमा ही कथाच असते नाही का ? आणि त्यामुळे हे छळणारे व्यक्तीमत्व साकार करणारे कलावंतही, …..त्या चित्रपटाचा प्रमुख नायक अगर नायिका जेवढे महत्त्वाचे असतात, तेवढेच महत्त्व या खलनायकाला अगर खल नायिकेला असते. असेच महत्व तिचे चित्रपटात होते .” बाबुल की दुवाँए लेती जा …”या गाण्याला ढसा ढसा रडणारा स्त्रि प्रेक्षकवर्ग,’ नीलकमल’ चित्रपटांमध्ये वहिदा रहेमान बद्दल सहानुभूती दाखवत होता ,आणि तिला छळणार्‍या सासूला, नणंदेला शिव्याशाप देत होता. हिंदी चित्रपटांनी काही नात्यांच्या प्रतिमा सिने प्रेमींच्या डोक्यात फिट्ट बसवल्या होत्या. उदाहरणार्थ आदर्श मोठा भाऊ म्हणजे बलराज सहानी ! प्रेमळ भावजय म्हणजे निरुपा रॉय ! आजी म्हणजे दुर्गा खोटे  आणि छळणारी कजाग सासू म्हणजे ललिता पवार व टोचून बोलणारी नणंद म्हणजे शशिकला (Shashikala) होय. तीच शशिकला, जी काल चार एप्रिलला हे जग सोडून गेली.

‘पडद्यावरील सर्वात दृष्ट स्त्री’ म्हणून समीक्षकांनी जीची संभावना केली , ती शशिकला गेली , तेंव्हा तिच्या असंख्य भूमिका व जीवनपट डोळ्यासमोर आला आणि जाणवले की, शशिकला दिसायला सुंदर होती. तिची उंची , शरीरयष्टी योग्य होती. नृत्य मग ते कोणत्याही प्रकारचे असो, ती आत्मसात करुन घेत असे, उत्तम तऱ्हेने सादर करत असे. “फूल और पत्थर” चित्रपटातील नृत्या करीता , नृत्यदिग्दर्शक सूर्यकुमार कडे तीने दहा-दहा तास सराव केला होता. हिंदी चित्रपटात काम करायचे म्हणजे हिंदी व उर्दू या दोन्ही भाषा उत्कृष्टपणे बोलता आल्या पाहिजेत. शशिकला (Shashikala) या सोलापूरच्या राहणाऱ्या, तेथील सोलापुरी हिंदी चित्रपटासाठी उपयोगाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी गायिका अभिनेत्री नूरजहाँन (Noor Jehan) यांच्या मदतीने एका मौलवीं कडून उर्दू शिकून घेतले होते. आणि महत्त्वाचा जो अभिनय , त्याबाबत तर कधी भांडणे लावणारी स्त्री, तर कधी कुटील स्त्री , कधी स्वार्थी व मतलबी स्त्री तर कधी स्वच्छंदी तरूणी आणि कधी प्रेमळ नायीकाही ! अशा विविध भूमिका त्यांनी, त्यांचा चेहरा , डोळे यांच्या अप्रतिम अभिनयाने आणि देह बोलीने साकार केल्या होत्या.

actress Shashikala passes away at 88

पी.एन. आरोरा, अमिया चक्रवर्ती, व्ही. शांताराम ,बिमल रॉय यांनी त्यांची अभिनय क्षमता ओळखूनच आपल्या चित्रपटात त्यांना काम दिले होते. परंतु इतके सगळे असूनही शशिकला या प्रमुख नायिका म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या नाहीत . त्यांच्या जवळ सर्व काही होते , पण त्या काळात तरी त्यांचे नशीब त्यांच्या बरोबर नव्हते. नजारे, सुनहरे कदम , सुरंग , अशा काही चित्रपटात त्या प्रमुख नायिका होत्या .पण ते चित्रपट दुर्दैवाने फारसे चालले नाहीत. करोडपती या चित्रपटाची स्थिती तर काय होती बघा– शंकर-जयकिशन यांचे त्या चित्रपटाला संगीत होते. शैलेंद्र , हसरत जयपुरी, यांनी लिहिलेली गीते , मोहम्मद रफी, मन्ना डे, लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी गायली होती. त्या चित्रपटाचा नायक किशोर कुमार होता. चित्रपटाची कथा ही तशी चांगली होती. तरीही तो चित्रपट चालला नाही कारण एकच ,त्याची नायिका शशिकला होती .ती आणि तिचे, तिला प्रमुख यशस्वी नायिका बनवु न देणारे नशीब ! यामुळेच तो चित्रपट लोकप्रिय ठरला नाही.

पण १९६०-६१ च्या सुमारास ताराचंद बडजात्या त्यांच्याकडे एक खलनायिकाची भूमिका घेऊन आले. 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या, ‘आरती ‘या चित्रपटाने शशिकला यांचे नशिब बदलले . मायबाप प्रेक्षकांचे शिव्याशाप खाणारी खलनायिका त्या झाल्या. निर्मात्यांची मागणी या मुळे कधी खलनायिका बनल्या तर कधी सहनायिका बनल्या. जंगली, वक्त , फूल और पत्थर,  सुजाता, नीलकमल, अनुपमा , बटवारा अशा अनेक चित्रपटात त्या दिसुन आल्या. ऋषिकेश मुखर्जी , बिमल रॉय , बी .आर .चोप्रा असे मान्यवर दिग्दर्शक शशिकला यांच्यातील अभिनय गुणांचा,  त्यांच्या सौंदर्याचा , देखणेपणा चा योग्य उपयोग करून घेऊ लागले. प्रमुख नायिका म्हणून यश मिळाले नाही पण सहनायिका, खलनायिका अशा भूमिकांनी शशिकला या चित्रपट प्रेमींच्या स्मरणात बसल्या.

actress shashikala

मुळची महाराष्ट्रीयन असणारी ही अभिनेत्री मराठी चित्रपटांमध्येही आपल्याला दिसून येते. अर्थात त्यांची संख्या जास्त नाही. धाकटी सून, लेक चालली सासरला , महानंदा, यंदा कर्तव्य आहे ,पठ्ठे बाबूराव , इत्यादी मराठी चित्रपटांमधूनही शशिकला दिसुन आल्या. फक्त वयपरत्वे त्या छळणारी नणंद होण्याच्या ऐवजी, छळणारी सासू बनल्या. चित्रपट सृष्टीत त्यांनी दिलेल्या, योगदानाचा गौरव पुरस्कारांनी ही झाला. परंतु तरीही मनःशांती न मिळालेल्या या अभिनेत्रीने काही काळ , विपश्यना केंद्रात , तर काही काळ (जवळजवळ नऊ वर्षे) मदर तेरेसा यांच्या बरोबर सामाजिक कार्यात आपला काळ घालवला.

वयाच्या 90 नंतरच्या टप्प्यातील त्यांचा मृत्यू तसा अकस्मीत म्हणता येणार नाही .कालमानानुसार हे घडायचे होते. हे जरी सगळे खरे असले तरी , त्या अभिनेत्रीने कधीकाळी आपल्याला ,तिच्या अभिनय कलेने रिझवले होते , हे मन विसरू शकत नाही. म्हणूनच तिच्या आत्म्यास सद्गती मिळावी या साठी परमेश्वरापुढे हात जोडले जातात. खलनायिका अगर सह अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकला यांच्या वाट्याला सुंदर सुंदर गाणी पण आलेली होती.

 

त्यांच्या काही गाण्यांचा विचार त्यांच्या जीवनाच्या वाटचाली संदर्भात केला असता…….आपण एक प्रमुख अभिनेत्री म्हणून यशस्वी होऊ शकलो नाही म्हणून, “आहे न भरे शिकवे न किये” हे गाणे जगणाऱ्या शशिकला, त्यांच्या पडद्यावरच्या गीतातून सांगत असतात , “जिंदगी मे प्यार करना सीख लो”! प्रेमिकांसाठीही त्या इशारा देऊन गेल्या आहेत, “ये रास्ते है प्यार के चलना संभल संभल के…..”! स्वतःच्या , करोडपती’, या चित्रपटाच्या निर्मितीने अपयश पाहिल्यावर, “मांँगने से जो मौत मिल जाती, कौन जिता इस जमाने मे ……” या आपणच पडद्यावर गायलेल्या गीताचा अनुभव त्यांनी घेतला होता , आणि त्यातूनही बाहेर पडून त्या चित्रपटसृष्टीत रमल्या होत्या.

“कभी तो आ ,कभी तो आ ….”या , ‘पटरानी’ तील गाण्याच्या अर्था सारखी मनस्थिती, मनःशांतीसाठी , होऊन त्या चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्या व पुन्हा सिनेमात आल्या. मेहरबान , पैसा या प्यार , नौ दो ग्यारह , बटवारा, अशा चित्रपटात खत्रूड भूमिका करणाऱ्या शशिकला सुजाता, अनुपमा, मध्ये अल्लड तरुणीच्या रूपात भेटल्या , आणि शशिकला अशा ही भूमिका करू शकते हे दाखवून गेल्या.

त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांच्या अशा काही भूमिका आणि गाणी आठवत, ऐकत, बघत रात्रीचे अकरा कधी वाजून गेले कळलेच नाही. सिनेमाची गोडी लागल्यानंतरचे ते माझ्या जीवनातले गत दिवस डोळ्यापुढे आले आणि त्याच वेळी ,माझ्या समोरच्या स्क्रीनवर शशिकला जी माझ्या मनाचे भाव दर्शवणारे गीत गात होत्या ,
“बचपन …..बचपनके दिन भी क्या दिन थे……..”

Padmakar Pathakji
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.