-अशोक उजळंबकर

Remembering the Greatest Showman of Hindi Cinema, Raj Kapoor राज कपूरच्या (Actor Director Raj Kapoor) थोबाडीत देऊन त्याला लगेच आपल्या चित्रपटाचा नायक म्हणून संधी देणारा करार त्याच्या हातात ठेवणारा दिग्दर्शक केदार शर्माचा सहायक म्हणून राज कपूरने बरेच काम केले. लहानपणापासून मोठी स्वप्ने रंगविणारा हा कलावंत. राज कपूरच्या अनेक चित्रपटांचा मुहूर्त 14 डिसेंबर या दिवशी पार पडायचा. कारण हा त्याचा वाढदिवस; परंतु त्याचा लाडका गीतकार शैलेंद्र हा जेव्हा 14 डिसेंबर 1966 रोजी वारला त्यानंतर राज कपूर ने आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. पुढे जाऊन रणधीर कपूरने हिनाचा मुहूर्त 14 डिसेंबर रोजी केला होता. 

दिग्दर्शक राज कपूर याची कारकीर्द जरी थोडीच असली तरी खूपच उल्लेखनीय ठरली होती. स्वतःच काही तरी करून दाखविण्याची त्याची तळमळ लहानपणापासूनच होती. सिनियर केंब्रिजची परीक्षा नापास झाल्यानंतर त्याने आपले सगळे लक्ष सिनेमाकडेच केंद्रित केले. 1943 मध्ये केदार शर्मा यांनी त्याला सहायक म्हणून कामावर घेतले. कोणाच्या तरी हाताखाली काम करावं हे त्याला लहानपणापासूनच मान्य नव्हतं. चित्रपटात सहायक म्हणून काम करीत असतानाच नाटक कंपनीत त्याने प्रवेश मिळवला. तेथे रंगभूमीवर काही नाटकांतून व्यवस्थित भूमिका पार पाडल्या. त्याच्या रंगभूमीवरील कामामुळे त्याला चित्रपटात ऑफर्स येत होत्या; परंतु त्या सर्वच दुय्यम दर्जाच्या होत्या. त्याला नायक म्हणून खरी पहिली संधी दिली ती ‘नीलकमल’ मध्ये शर्मा यांनी; परंतु नायक म्हणून जरी तो येथे दाखल झाला होता तरी त्यावर समाधानी नव्हता. त्याने लगेच आपल्या स्वतःच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू केली. चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शन या दोन्ही भूमिका आपण पार पाडीत असताना नायक म्हणून केवळ आपल्याच चित्रपटात काम करायचे, असे त्याने ठरविले. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने आर. के. फिल्मस्‌ची स्थापना केली.

आर. के. फिल्मस्‌च्या बॅनरखाली त्याने ‘आग’ या चित्रपटाची निर्मिती केली. निगार व कामिनी कौशल या दोन नायिका असताना त्याने नर्गिसची निवड केली. जद्दनबाईची कन्या नर्गिससोबत त्याची अगोदर ओळख झालेली होती व चित्रपटनिर्मिती सुरू केल्यानंतर ‘मी तुला संधी देईन इतकेच नव्हे, तर पार्टनर करून घेईन’ असे त्याने तिला आश्‍वासन दिले होते. केदार शर्माकडे दिग्दर्शन सहाय्यक म्हणून मिळालेल्या अनुभवावर त्याने ‘आग’ सुरू केला. आपला मेव्हणा प्रेमनाथ, बी. एम. व्यास व भाऊ शशी कपूर यांना त्याने बरोबर घेतले होते. संगिताची जबाबदारी राम गांगुली यांनी सांभाळली होती. व्यावसायिकदृष्ट्या राजच्या या पहिल्याच कलाकृतीला आग लागली, कारण बॉक्स ऑफिस खिडकीवर तो साफ आदळला. मुकेशच्या आवाजातील ‘जिंदा हूँ इस तरह के गमे जिंदगी नही; जलता हुआ दिया हूँ मगर रोशनी नही’, हे गाणं मात्र गाजलं. दिग्दर्शक, नायक, निर्माता या तिन्ही जबाबदाऱ्या त्याच्याकडेच होत्या. प्रेमाचा त्रिकोण त्याने येथे दाखविला; कथेमध्ये नाविन्य होते. हा चित्रपट काळाच्या फार पुढे होता. राजचं दिग्दर्शनही छानच होतं. पण प्रेक्षकांच्या दृष्टीने हा चित्रपट समजायला अवघड होता.

‘आग’ जरी अयशस्वी ठरला होता तरी दुसऱ्या चित्रपटाची तयारी राज कपूरने चालविली होती. स्त्री ही उपभोग्य वस्तू समजून तिचा उपभोग घेतल्यानंतर तिच्याकडे पाठ फिरवणारा एक नायक, तर दुसरा प्रेमाच्या उदात्ततेचा पाठपुरावा करणारा नायक त्याने बरसातमध्ये दाखविला होता. प्रेमनाथसोबत ‘बरसात’मध्ये त्याने अनेक प्रसंगांत अप्रतिम अभिनय तर केला होताच; परंतु आपल्या कुशल दिग्दर्शन शैलीचा वापर त्याने येथे केला होता. प्रेमाचा गंध नसलेली नायिका नर्गिस जेव्हा प्रेमाचा आविष्कार जाणवतो तेव्हा कशी भावविभोर होते हे त्याने बरसातमध्ये दाखविले. आपल्या शहरी बाबूवर विश्‍वास ठेवून स्वतःला त्याच्या हवाली करणारी नायिका निम्मीने खूपच सुंदर पेश केली होती. प्रेमनाथ व राज कपूर या दोघांमधील प्रेमाबद्दलचे संवाद हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा प्रसंग होय. नायिकेच्या कपड्यांना कात्री लावणे हा उद्योग त्याने सुरू केला होता. नर्गिससोबत त्याच्या प्रणय दृश्‍यांनी आर. के. चा मोनोग्राम तयार झाला व पुढच्या पिढीला तो आदर्श ठरला. व्हायोलिनच्या आवाजाने धुंद झालेली नायिका आपल्या प्रियकराच्या बाहुपाशात येऊन विसावते हे दृश्‍य आजही डोळ्यासमोरून जात नाही. निर्मिती क्षेत्रात लागलेली ‘आग’ तो ‘बरसात’च्या थंड पाण्यांनी विझवू शकला. त्या काळी सुवर्णमहोत्सवी होण्याचं भाग्य ‘बरसात’ ला लाभलं. शंकर – जयकिशन, मुकेश, शैलेंद्र – हसरत जयपुरी हे पंच महाभाग आर. के. च्या यशाचे वाटेकरी ठरले होते. दिग्दर्शक म्हणून राजच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा झाली.

‘बरसात’मध्ये राज – नर्गिस ही जोडी खूपच यशस्वी ठरली. राजच्या आर.के. बॅनरमध्ये नर्गिस तन-मन-धनाने सामील झाली होती, त्यामुळे राजच्या वैवाहिक जीवनात वादावादीला प्रारंभ झाला होता. ‘बरसात’नंतर ‘आवारा’ची जुळवाजुळव त्याने सुरू केली होती. उच्च कुळात जन्म घेतलेला मुलगा जर एखाद्या डाकूच्या हाती पडला, तर त्याच्यावर होणाऱ्या संस्कारामुळे तो देखील डाकूच होतो, नव्हे दुष्कृत्ये करतो. जन्म कोठे झाला यापेक्षा बालपणी होणारे संस्कार मोठे हे त्याने आवारामध्ये दाखविले. राजकपूरचा ट्रॅम्प (भटक्या) इथेच प्रथम पडद्यावर आला. राज कपूर दिग्दर्शकापेक्षा नायक म्हणूनच आवारामध्ये खुलला होता. त्याच्या अंगी असलेल्या अभिनयक्षमतेला त्याने प्रत्येक प्रसंगात खुलवले होते. आवारामध्ये राजने भव्यदिव्य सेट्सवर पैसे खर्च केले होते. एका स्वप्नदृश्‍याकरिता त्याने त्यावेळी लाखो रुपये उधळले होते. आपले वडील पृथ्वीराज कपूर आणि आजोबा विश्‍वंभरनाथ कपूर यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या होत्या. राजच्या बालपणाची भुमिका शशी कपूरने केली होती. आवाराच्या गाण्यांमधून राजच्या अभिनयाचे विविध पैलू दिसून आले होते. रशियामध्ये तर आवाराने भरघोस यश मिळवले होते. ‘आग’ व ‘बरसात’, हे दोन चित्रपट प्रणयप्रधान चित्रपट होते, तर आवारामध्ये राजने प्रेमाचा वेगळाच आविष्कार दाखविला होता. के. ए. आब्बास, वसंत साठे व राज कपूर या तिघांनी एकत्र बसून सामाजिक संघर्षाची पार्श्‍वभूमी त्यात दाखविली होती. आवाराची सगळीच गाणी गाजली व ‘बरसात’पाठोपाठ ‘आवारा’ला लक्षणीय यश मिळालं.

दिग्दर्शक राजने ‘बरसात’ व ‘आवारा’द्वारा घवघवीत यश मिळवलं होतं, त्यामुळे पुढचे दोन चित्रपट आपण दिग्दर्शित न करता त्याने ही संधी आपल्या मित्रांना दिली. ‘आह’ व ‘बुट पॉलिश’ या आर.के. बॅनरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे व प्रकाश अरोरा यांनी केले. दिग्दर्शक राज तेव्हा इतरांच्या चित्रपटात नायक म्हणून चमकत होता. आपण स्वतः निर्माता – दिग्दर्शक असताना राज बाहेरच्या चित्रपटातदेखील काम करीत होता. इतर दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करून राज अनुभव एकत्रित करीत होता.

चार्ली चॅप्लीनच्या विश्‍वविख्यात भटक्याची भारतीय आवृत्ती म्हणजे राजचा ‘श्री 420’. श्रीमंत समाजाची काही दुष्कृत्ये उघडून दाखविणारा भोळाभाबडा नायक येथे पाहायला मिळाला. दरिद्रीनारायणाच्या यातना त्याने यात मांडल्या होत्या. म्हणून समाजवादी जनतेने ‘श्री 420’ला डोक्यावर घेतले. पायात चप्पल नाही, अंगावर धड कपडा नाही तरी प्रेमाची, विश्‍वबंधुत्वाची शिकवण आपल्या गाण्यांमधून देणारा राजचा नायक रसिकांनी उचलून धरला होता. आपण हिंदुस्थानी आहोत व त्याचा आपल्याला अभिमान आहे, हेच त्याने दाखविले. भारतीय जनता किती भोळीभाबडी आहे हेच त्याने दाखविले. 2 आण्याच्या तीन केळी देणाऱ्या ललिता पवारला हा नायक तीन आण्याच्या दोन केळी मागतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. ‘श्री 420’ नंतर आलेल्या ‘जागते रहो’ चे दिग्दर्शन शंभू मित्रा व अमित मित्रा यांनी केले होते, तर ‘जिस देश में गंगा बहती है’ चे दिग्दर्शन राजचे छायाचित्रकार राधू कर्मकार याने केले. काही चित्रपटांच्या वेळी राजच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्याने त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. परंतु पडद्याआड राहून ‘जागते रहो’, ’बुट पॉलिश’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटांवर राजने आपली छाप सोडली होती.

‘जिस देश में गंगा बहती है’ च्या वेळी आर.के. मधून नर्गिस बाहेर पडली होती. ‘मदर इंडिया’च्या वेळी भेटलेल्या सुनील दत्तसोबत तिने विवाह केला होता. नर्गिसच्या जाण्याचा राजच्या मनावर खूपच परिणाम झाला. ‘जिस देश में..’ आपण दिग्दर्शित करूच शकणार नाही असेच जणू त्याला वाटले असणार. राधू कर्मकार यांनी मात्र राजच्या परंपरेला शोभेल असेच दिग्दर्शन करून या गंगेला यश मिळवून दिलं. 1949 पासून राजच्या डोक्यात दिलीपकुमारला सोबत घेऊन ‘घरोंदा’ या चित्रपटाची कल्पना घोळत होते व तिला त्याने संगमच्या रूपाने 1964 मध्ये सादर केले. दिलीपकुमार आता काम करणार नव्हता तर त्याची जागा राजेंद्रकुमारने घेतली होती. मैत्रीची व त्यागाची गाथा दाखविणाऱ्या या चित्रपटाने हिंदी चित्रपट इतिहासात एक नवा अध्याय निर्माण केला. संगमला दोन मध्यंतरे होती.

प्रथम संगम जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो 24 रिळांचा होता. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण राज कपूरने परदेशात केले होते. इराणमध्ये या चित्रपटाला दणदणीत यश मिळाले व तेहरान विद्यापीठाने राज कपूरला डी.लिट. ही पदवी बहाल केली. वैजयंतीमाला व राजेंद्रकुमार यांचा अभिनय खूपच सुरेख झाला होता. संपूर्ण चित्रपटात वैजयंतीमाला अनेक दृश्‍यांत पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये पाहायला मिळाली. शुभ्र वस्त्रातील नायिका हे राजच्या दिग्दर्शन कौशल्याचे खास वैशिष्ट्य होते. नर्गिस आर.के. मधून बाहेर पडल्यापासून राज खूपच व्यथित होता. संगमनंतर वैजयंतीमालादेखील डॉ. बाली यांच्याबरोबर विवाहबद्ध झाली.

वैजयंतीमाला गेल्यानंतर तो खूपच व्याकूळ झाला होता. त्याच्या आर. के. स्टुडिओत नर्गिस आणि वैजयंतीमाला यांचेच फोटो लावले आहेत. आपल्या आयुष्यातील चढ-उतार दाखविणारा ‘मेरा नाम जोकर’ हा त्याचा भव्य प्रकल्प होता; परंतु या त्याच्या आत्मकथेला रसिकांनी उचलून धरलं नाही. शिक्षिका, सर्कस सुंदरी व चित्रपटाची नायिका त्याने ‘मेरा नाम जोकर’मध्ये दाखविल्या होत्या. ‘मेरा नाम जोकर’ दोन भागांत तयार करायची त्याची योजना होती. ‘मेरा नाम जोकर’ची मूळ कल्पना चांगली होती; परंतु चित्रपटाच्या लांबीमुळे तो प्रेक्षकांना मानवला नाही. ‘मेरा नाम जोकर’मध्ये त्याला प्रचंड अपयश आले व राज पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. दिग्दर्शक राजची पूर्ण वाताहात झाली, अशी या वर्तुळात चर्चा होती; परंतु तसे घडले नाही. ‘मेरा नाम जोकर’ची सर्व सर्व टीम तेथेच ठेवून राजने बॉबीची घोषणा केली.

नर्गिसच्या चेहऱ्याशी साम्य असणारी डिंपल व आपला मुलगा ऋषी कपूर यांना त्याने संधी दिली. एका साधारण प्रेमकथेत त्याने असे काही रंग भरले की, त्याचे टिकाकार पाहतच राहिले, बॉबीला न भुतो न भविष्यती असे यश मिळाले. जोकरचे अपयश पार धुऊन निघाले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट राजकपूरच्या ‘आग’ या चित्रपटाचा रिमेक म्हणता येईल. ‘आग’च्या नायका सारखी परिस्थिती सत्यम मधील नायिकेची होती. ‘सत्यम’मध्ये नायिका झिनत अमान चमकली. झिनत अमान ग्रामीण युवती म्हणून बिल्कुल शोभली नाही. तिचे देहप्रदर्शन बिभत्सतेकडे झुकणारे होते. खरं तर दिग्दर्शक राज ‘सत्यम्‌’ मध्ये बरंच काही दाखवू पाहत होता; परंतु त्याच्या कल्पनांना पेलण्याची क्षमता समोरच्या कलावंतांमध्ये नव्हती. प्रेमरोगला यश मिळालं; परंतु राज त्या यशावर समाधानी नव्हता. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाने मात्र उत्पन्नाचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. हिनाची कल्पना त्याच्या डोक्यात होती. हिनाचे ‘चिठ्ठीये दर्द फिराक वाली ये’ हे गाणे ध्वनीमुद्रित करून त्याने सुरुवात केली होती; परंतु चित्रपट पूर्ण होण्याआधीच 2 जून 1988 रोजी एकाएकी राज हे जग सोडून गेला.

हिंदी चित्रपटसृष्टीचा हा ‘सपनो का सौदागर’ एवढ्या लवकर जाईल अशी कल्पना नव्हती; दिग्दर्शक म्हणून राज कपूरने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. प्रत्येक चित्रपट वेगळा विषय घेऊन त्याने सादर केला होता. प्रेमाच्या पवित्र बंधनाबाबत त्याने प्रत्येक चित्रपटात आपले मत प्रदर्शित केलेले दिसून आले. ‘मेरा नाम जोकर’नंतर त्याने स्वतः नायक म्हणून काम करणे बंद केले. त्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट नायिकाप्रधान होते, असे दिसून आले. दिग्दर्शक राज कपूरला संगिताचं देखील अंग होतं. चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक बारकाव्याशी तो संबंधित असायचा. दिग्दर्शक म्हणून त्याच्या 10 चित्रपटांना भरपूर यश मिळाले. दिग्दर्शक राज कपूरची कामगिरी अविस्मरणीय होती, यात शंका नाही. 

Raj Kapoor with Hasrat Jaipuri, Shnakar-Jaikishan and Shailendra
Raj Kapoor with Hasrat Jaipuri, Shnakar-Jaikishan and Shailendra
Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.