‘जलते है जिस के लिए……..’
‘सुजाता’ मधले हे गाणे ऐकले की समोर उभे आठवतात सुनिल दत्त. मुंबईच्या बेस्ट उपक्रमातल्या रेशनिंग विभागात क्लार्क म्हणून करियर सुरु करुन, रेडिओ सिलोन चे अनाऊन्सर, अभिनेता,निर्माता, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ता, मुंबई चे नगरपाल, खासदार, केंद्रीय मंत्री, प्रेमळ पति, प्रेमळ पिता असलेल्या सुह्रद सुनिल दत्त (Actor Sunil Dutt) यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या काही आठवणी आज सर्वांसमोर मांडायचा हा प्रयत्न.

बलराज दत्त उर्फ सुनिल दत्त यांचा जन्म पंजाब मधल्या नक्का खूर्द गावात ६ जून १९२९ साली झाला. त्यांचे वडिल दिवाण रघुनाथ दत्त आणि आई कुलवंतीदेवी दत्त. या जोडप्याला दोन मुलगे (बलराज आणि सोम) आणि एक मुलगी (राणी). पाच वर्षाचे असताना बलराज यांचे वडिल वारले. शालेय शिक्षण पुर्ण झाले.त्याच सुमारास देशाची फाळणी झाली.रहाते गाव पाकिस्तानात गेल्यामुळे निर्वासित म्हणून हे कुटुंब याकुब नावाच्या गृहस्थाच्या मदतीने भारतात आले.पंजाबमधल्या यमुना नगर च्या मंडौली गावात राहू लागले. नंतर लखनौ ला आले. पदवी शिक्षण घेताना काही काळ अमिनाबाद ला राहिल्यावर मुंबईत आले. अर्धवट राहिलेले पदवी शिक्षण मुंबईच्या जयहिंद काॅलेज मध्ये पुर्ण करुन १९५४ ला बी.ए. ची पदवी त्यांनी मिळवली. मुंबईच्या बेस्ट उपक्रमात काही काळ रेशनिंग विभागात कारकूनाची नोकरी केली.या नंतर रेडिओ सिलोनवर अनाउन्सर ची नोकरी मिळाली. या निमित्ताने सिनेविश्वातील अनेकांच्या मुलाखती घ्यायची संधी त्यांना मिळाली. दो बीघा जमीन चा प्रिमीयर शो मुंबईच्या मेट्रो सिनेमात झाला. त्या वेळी आलेल्या सिनेकलाकारांच्या मुलाखती घेताना समोर आलेल्या नर्गिस ला पाहून बलराज गडबडले. ही त्यांची आवडती अभिनेत्री होती. प्रश्र विचारायचे ते विसरले. नियती ची इच्छा वेगळी होती. काही कालांतराने नर्गिस आपली सहधर्मचारिणी होईल याची बलराज ना अजिबात कल्पना नव्हती. रेडिओ सिलोनवर बलराज दत्त खूप लोकप्रिय होते. त्यांचा लिप्टन के सितारे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. शिकस्त सिनेमाचे नायक दिलिपकुमार यांची मुलाखत घेताना निर्माते रमेश सहगल बलराज दत्त यांच्या व्यक्तिमत्वाने आणि आवाजाने प्रभावित झाले. रेल्वे प्लॅटफाॅर्म सिनेमात त्यांना नायकाची भुमिका दिली. रमेश सहगल नी बलराज दत्त यांचे नाव सुनिल दत्त केले. सुनिल दत्त यांचा सिनेविश्वात प्रवेश झाला.

सिनेविश्वात आल्यावर सुनिल दत्त ना मिळालेल्या ‘मदर इंडिया’ सिनेमाने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आगीची दृश्ये चित्रीत करत असताना वार्‍याने दिशा बदलली आणि नर्गिस त्यात सापडली. सुनिल दत्त ने जीवावर उदार होऊन त्या आगीत उडी घेतली आणि तिला वाचवले. यात दोघेही भाजले. बरे झाल्यानंतर शूटींग परत सुरु झाले. सुनिल दत्त च्या बहिणीला टी.बी.झाला. शस्रक्रिया करायची होती. पैसे नसल्याने शक्य नव्हते. नर्गिस ला समजल्यावर तिने मदत केली.त्यामुळे राणी बरी झाली. तिला पहायला नर्गिस घरी यायची. यातूनच नर्गिस बद्दल प्रेमभावना सुनिल दत्त ना वाटू लागली. एकदा त्यांनी नर्गिस ला मागणी घातली. नर्गिस ने उत्तर द्यायला दोन दिवस घेतले. सुनिल दत्त च्या घरच्यांना नर्गिस सून म्हणून पसंत पडली. धर्म बदलणार नाही या अटीवर नर्गिस कबूल झाली. रजिस्टर पध्दतीने लग्न करायचे ठरले. शूटींग संपवून संध्याकाळी लग्न करायचे ठरले. पहिल्या दिवशी दोघांची चुकामुक झाली. दुसर्‍या दिवशी लग्न झाले. मेहबूब खान नी सांगितले मदर इंडिया रिलीज होईपर्यंत लग्नाची बातमी जाहीर करु नका. मदर इंडिया रिलीज झाल्यानंतर मेहबूब खान नी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सुनिल दत्त नर्गिस च्या लग्नाची बातमी जाहीर केली.

या दोघांचा संसार सुरु झाला. १९५० आणि १९६० च्या दशकात सुनिल दत्त एक यशस्वी अभिनेता म्हणून यशस्वी झाले. साधना(१९५८), इन्सान जाग उठा (१९५९), सुजाता (१९५९), मुझे जीने दो (१९६३), गुमराह (१९६३), खानदान (१९६५), वक्त (१९६५), मेरा साया (१९६६), पडोसन (१९६७), हमराज (१९६७) असे अनेक यशस्वी सिनेमे त्यांना मिळाले.

नर्गिस च्या प्रेरणेमुळे अजंठा आर्टस नावाची चित्रसंस्था त्यांनी सुरु केली. मुझे जीने दो पासून सुनिल दत्त निर्माता बनले. आगाजान काश्मिरीसकट अनेक साहित्यिक त्यांचे मित्र होते. १९६४ साली यादे हा एकपात्री सिनेमा त्यांनी निर्माण केला. जगातला हा पहिला एकपात्री सिनेमा फारसा धंदा करु शकला नाही. आपल्या भाऊ सोम दत्त ,विनोद खन्ना,लिना चंदावरकर यांना घेऊन मन का मीत (१९६८) सिनेमाची निर्मिती केली. १९७१ साली त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘रेश्मा और’ शेरा सिनेमाला पण फारसे यश लाभले नाही.

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मात्र सुनिल दत्त आणि मधुबाला यांचा बरेच वर्षे रखडलेला ज्वाला सिनेमा रिलीज झाला आणि अपयशी झाला. हिरा(१९७३), गीता मेरा नाम (१९७४), नागीन(१९७६), जानी दुश्मन (१९७९), मुकाबला (१९८०), शान (१९८०) अश्या सिनेमात सुनिल दत्त नी प्रमुख भुमिका केल्या. १९७९ ला नर्गिस राज्यसभेवर निवडली गेली. १९८० ला तिला कॅन्सर झाला. उपचारा साठी सुनिल दत्त तिला घेऊन अमेरिकेला गेले. दीर्ध काळ उपचार घेऊन दोघेही भारतात परत आले. आपल्या मुलासाठी राॅकी सिनेमाची निर्मिती सुनिल दत्त नी सुरु केली. राॅकी सिनेमा रिलीज व्हायच्या आधी नर्गिस चे निधन झाले. दत्त परिवाराला हा मोठाच धक्का होता. यातून सुनिल दत्त सावरले.नर्गिस च्या स्मृतिसाठी नर्गिस दत्त फाऊंडेशन ची स्थापना त्यांनी केली. त्यातून कॅन्सरग्रस्तांना मदत केली जाते.सत्तरच्या दशकाच्या अखेरी काही पंजाबी सिनेमात सुनिल दत्त नी भुमिका केल्या. ऐंशीच्या दशकात त्यांनी सहाय्यक भुमिका स्वीकारायला सुरुवात केली. दर्द का रिश्ता, बदलेकी आग, राजतिलक, मंगलदादा, वतन के रखवाले आणि धर्मयुध्द या सिनेमात ते सहाय्यक भुमिकेत होते. सामाजिक कार्यावर भर द्यायला सुरुवात केल्यावर त्यांनी सिनेमे स्वीकारणे कमी केले. त्यांचे सामाजिक क्षेत्रातले योगदान पाहून १९८२ साली त्यांची मुंबइचे नगरपाल म्हणून नियुक्ती झाली. नव्वद च्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ ते १९९६ या कालखंडात सुनिल दत्त खासदार होते.संजय दत्त व्यसनाधीन झाला. त्याला त्यातून सोडवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यातच १९९२च्या बाॅम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्त ला अटक झाली.

या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या राजकारणावर झाला. १९९९ साली ते परत खासदार झाले.मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात २००४ साली युवा कल्याण आणि क्रिडा खात्याचे मंत्री झाले. सुनिल दत्त स्वभावाने सज्जन होते.कधीही निर्मात्याशी अडवणूक केली नाही.सहकार्‍यांबरोबर नेहमी मैत्रीपूर्ण संबंध होते.कोणत्याही अभिनेत्री बरोबर त्यांचे नाव जोडले गेले नाही. बरोबर काम करणार्‍या अभिनेत्रींची ते फार काळजी घेत. स्व.नंदाने आठवण सांगितली होती.एकदा एका दाक्षिणात्य सिनेमाचे शूटींग मैसूर ला वृंदावन गार्डन ला होते.शूटींग संपायला उशीर झाला. बंगलोर ला परत जायचे होते. नंदाच्या गाडीच्या पाठोपाठ सुनिल दत्त यांची गाडी होती. बरीच रात्र झाल्यामुळे वाटेत एका हाॅटेलात मुक्काम करायचा विचार नंदाने केला. सुनिल दत्त त्यांच्याबरोबर आत गेले. हाॅटेलमधल्या सगळ्या खोल्या भरल्या होत्या. मॅनेजर ने स्वतःची खोली खाली करुन दिली. नंदा तिची आई आणि हेअर ड्रेसर यांना त्या खोलीत पाठवून आपल्या स्टारडम ची पर्वा न करता लाॅबीतल्या सोफ्यावर सुनिल दत्त झोपले. सकाळी लवकर उठून हे सगळे बंगलोर ला पोहोचले.

राजकपूर बरोबर नाव जोडले गेलेले असूनही नर्गिस बरोबर लग्न करायचा त्यांचा निर्णय पण क्रांतीकारी होता. हे अवघड शिवधनुष्य पेलून नर्गिस बरोबर सुखाचा संसार त्यांनी केला. राज कपूर बद्दल कधीही अपशब्द काढले नाही. इतकेच नव्हे तर राजकपूर यांचे वडिल आणि आई यांचा आठ दिवसाच्या अंतराने मृत्यु झाला त्यावेळी त्यांचे सांत्वन करायला सुनिल दत्त आणि नर्गिस हे दोघे प्रथम त्यांना भेटायला गेले. ऋषि कपूरच्या एंगेजमेंटला तर सगळे दत्त कुटुंब हजर होते.खासदार असताना सर्वसामान्यांना ते कधीही भेटत. त्यांच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करत. वांद्रे येथे दिलिप कुमाराच्या बंगल्याच्या शेजारचा बंगला त्यांचा होता. तिथेच त्यांचे अजंठा डबिंग थिएटर होते. नर्गिस गेल्यावर त्यांनी तो बंगला विकायच्या आधी व्हिडीओ शूटींग करुन त्या बंगल्याशी संबंधीत आठवणी कायम स्वरुपी जवळ ठेवल्या. तिथेच मोठे अपार्टमेंट झाले. तिथे वरच्या मजल्यावर सुनिल दत्त नम्रता आणि प्रिया या आपल्या मुलींबरोबर रहात असत.

Sunil Dutt Family Photo

१९६३ साली मुझे जीने दो, यादे खानदान, मिलन सिनेमातल्या अभिनयासाठी बक्षिस मिळवणार्‍या सुनिल दत्त ना भारत सरकार ने १९६८ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. फिल्मफेअर लाईफ टाईम अचिवमेंट अवाॅर्ड, स्क्रिन लाइफटाईम अचिवमेंट अवाॅर्ड, झी सिने लाईफ टाईम अवाॅड मिळवणारे सुनिल दत्त २५ मे २००५ ला ह्रदयविकाराच्या झटक्याने आपल्यातून गेले. सुनिल दत्त ना माझी आदरांजली

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment