– ©विवेक पुणतांबेकर

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ आठवला की अनेक प्रतिभावान गीतकार आठवतात. त्यातलेच एक राजेंद्रकृष्ण (Lyricist, Poet Rajendra Krishan). मूळचे सिमला येथे रहाणारे राजेंद्रकृष्ण पदवीधर झाल्यावर सिमला येथल्या एका इंग्रजी वर्तमानपत्रात छंद म्हणून इंग्रजी चित्रपटाची परिक्षणे लिहीत. उदरनिर्वाहासाठी सिमला नगर पालिकेत नोकरी करत. त्यांच्या ऑफिसच्या  वरच्या मजल्यावर एक फोटो स्टुडिओ होता. याच स्टुडिओत प्राण सिनेमात यायच्या आधी फोटो री टचिंग चे काम करायचा. स्वतःचे मासिक सुरु करायचा विचार राजेंद्रकृष्ण नी केला. या साठी पैसे कमवायला मोहनगरी मुंबईला जायचे. पैसा भरपूर कमवायचा आणि सिमला येथे परत यायचे या विचाराने १९४३ साली राजेंद्रकृष्ण मुंबईला आले. (Remembering Popular Lyricist of Hindi Cinema Rajendra Krishan)

—————————–

इथे ते आपले मित्र रघुपत राय ना भेटले. रघुपत राय त्या वेळी शहनशहा अकबर सिनेमा निर्मितीत गुंतले होते. त्यांनी संवाद आणि गाणी लिहायची विनंती राजेंद्रकृष्ण ना केली. पण या सिनेमाची कथा राजेंद्रकृष्ण ना आवडली नसल्याने त्यांनी नकार दिला. पण सिनमाच्या जाहिरातीचे काम केले. हा सिनेमा दणकून आपटला. लाहोर ला संतप्त प्रेक्षकांनी थिएटर ची इतकी नासधूस केली की फक्त ३ खुर्च्या वाचल्या. या सिनेमाच्या वेळी संगीतकार एच.सी. बाली यांच्या ओळखीतून जनता पिक्चर्स च्या जनता सिनेमासाठी दोन गाणी लिहीली. पगार होता ६० रुपये पण वेळेवर मिळत नसे. मग ही नोकरीसोडून शांती लोग पिक्चर्स मध्ये राजेंद्रकृष्ण गेले. तिथे महेश कौल यांचा मायादास सिनेमा त्यांनी लिहीला. पण हा सिनेमा सेंसाॅर ने अडकवला. मग बाबुराव पै यांच्या फेमस पिक्चर्स मध्ये नोकरी साठी राजेंद्रकृष्ण गेले. अर्जात पगाराची अपेक्षा म्हणून ५०० रुपये असे त्यांनी लिहीले. बाबुराव पैं नी त्यांना विचारलं लग्न झाले आहे? दारु पितोस ?? रेस ला जातोस?? राजेंद्रकृष्णनी होकार दिला. नोकरी मिळाली. अपाॅंटमेंट लेटर पाहिल्यावर धक्का बसला ८०० रुपये पगार दिला होता. संसार संभाळून शौक चालू ठेवता यावे या साठी वाढीव पगार दिला होता. आयुष्यातला सुखद अनुभव म्हणून हे अपाॅंटमेंट लेटर त्यांनी शेवटपर्यंत जपून ठेवले होते.

फेमस पिक्चर्स मधला त्यांचा पहिला सिनेमा होता ‘आज की रात’. यात मोतीलाल, सुरैय्या ही जोडी होती. या सिनेमाच्या अफाट यशानंतर राजेंद्रकृष्ण यांची गीतकार आणि लेखक म्हणून यशस्वी वाटचाल सुरु झाली आणि सिमल्याला परत जायचा विचार त्यांनी सोडून दिला. चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी तीनशे सिनेमे आणि असंख्य गीते लिहीली. ज्या खाजगी गाण्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली ते गाणे होते ‘सुनो सुनो ऐ दुनियावालो बापूजी की अमर कहानी’. रफींनी गायलेले हे गाणे इतके लोकप्रिय झाले की बाबुराव पै यांनी एक लघुपट तयार केला ‘बापू की अमर कहानी’ आणि त्यात हे गाणे वापरले. या नंतर बडी बहन, प्यार की जीत या सिनेमात हुसनलाल भगतराम या संगीतकार जोडीबरोबर त्यांनी काम केले. ‘प्यार की जीत’ सिनेमात हुसनलाल भगतराम यांचे सहाय्यक होते शंकर ( शंकर जयकिशन जोडीतले). या सिनेमात शंकर नी एक नृत्य सादर केले होते. ‘बडी बहन’ ची ‘चुप चुप खडे हो जरुर कोई बात है’ आणि ‘चले जाना नही’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘बडी बहन’ चे चले जाना नही गाण्याची धून शामसुंदरच्या पंजाबी गाण्यावर आ धारलेली होती. हे गाणे होते ‘मेरी डाची दिया मेरी हालविच द लिया’.

श्यामसुंदर मुंबईत आल्यावर त्यांनी संगीत दिलेला सिनेमा होता ‘लाहोर’. ‘लाहोर’ अपयशी झाला पण यातले राजेंद्रकृष्ण नी लिहिलेले ‘बहारे फिरभी आयेगी’ लतादिदींच्या अत्यंत आवडत्या गाण्यातले एक. या नंतर श्यामसुंदर बरोबर त्यांनी दोन सिनेमे केले ‘बादल’ आणि ‘कमल के फूल’. शामसुंदर अतिरिक्त मद्यपानामुळे लवकर गेले. वर्मा फिल्मच्या ‘पतंगा’ सिनेमापासून सी. रामचंद्र आणि राजेंद्रकृष्ण एकत्र आले. या नंतर अलबेला, खजाना, सगाई, घुंगरु, साकी, हंगामा, अनारकली, झमेला, झांझर, लहेरे, शगुफा, कवि, पहली झलक, मीनार, आझाद, इंसानियत, तिरंदाज, दुनिया गोल है, लुटेरा, २६ जानवरी, देवता, शतरंज, आशा, तलाक, बारिश, शारदा, समाधी, कारिगर, अमरदिप सिनेमातून दोघे रसिकांचे मन तृप्त करत राहिले. ‘पतंगा’ मधले राजेंद्रकृष्ण नी लिहिलेले ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे इतके लोकप्रिय झाले की मुंबई आणि रंगून ही दोन शहरे टेलिफोन लाईन ने जोडली. ‘पतंगा’ सिनेमा मद्रास ला १६ आठवडे चालला. या आधी कोणताच हिंदी सिनेमा मद्रासला चालला नव्हता. तामीळ सिनेमाचा हिंदी रीमेक आझाद चे संगीत आणि गाणी एक रात्र आणि अर्ध्या दिवसात या जोडीने केली. रंभा संभा आणि राॅक अँड रोल हे प्रकार सी. रामचंद्रनी हिंदीत आणले. ‘गोरे गोरे’ हे ‘समाधी’  सिनेमातले हिंदीतले पहिले रंभा संभा गीत राजेंद्रकृष्ण यांचेच. हिंदीतले पहिले राॅक अँड रोल गाणे आशा सिनेमात आले ‘इना मीना डीका’. हे पण लिहीणारे राजेंद्रकृष्णच. काही काळाने सी. रामचंद्र आणि राजेंद्रकृष्ण यांच्यात दूरावा आला. पण दोघांनी संबंध तोडले नाहीत. भगवानदादांच्या प्रयत्नाने ‘हम दिवाने’ सिनेमात हे दोघे परत एकत्र आले खरे पण तो पर्यंत सी. रामचंद्र यांचा पडता काळ सुरु झाला होता.

या नंतर मदनमोहन, हेमंतकुमार, चित्रगुप्त, रवि अश्या अनेक संगीतकारांबरोबर त्यांची युती जमली. आशियाना सिनेमापासून मदनमोहन बरोबर त्यांचा प्रवास सुरु झाला. जेलर, चाचा झिंदाबाद, मेमसाहिब, दुनिया ना माने, मिनिस्टर, मोहर, बहाना, समुंदर, संजोग, मनमौजी, जहांआरा, शराबी, भाई भाई, गेटवे ऑफ इंडिया, मस्ताना, एक कली मुस्काई या सिनेमासाठी दोधांनी एकत्र काम केले. यातले बरेचसे सिनेमे अपयशी होते पण अविस्मरणीय संगीताने गाजले. 

अभिनेता ओमप्रकाश ने स्वतःची लाईट अँड शेड ही चित्रसंस्था स्थापन केली. ‘कन्हैय्या’ सिनेमाचा अपवाद वगवता बाकी सारे सिनेमे राजेंद्रकृष्ण मदनमोहन जोडीला दिले. एकदा दोघांमध्ये वाद झाला. काम करणे थांबवले पण शेवटपर्यंत संबंध टिकून राहिले. हेमंतकुमार आणि राजेंद्रकृष्ण नागिन सिनेमापासून एकत्र आले. या नंतर फेरी, लगन, अंजान, ताज, बंदी, चंपाकली, मिस मेरी, दुनिया झुकती है बंधन या सिनेमातली या जोडीची गाणी खूप गाजली. बिमल राॅय प्राॅडक्शन्स चा प्रेमपत्र हा एकच सिनेमा त्यांनी लिहीला. ‘वचन’ सिनेमापासुन रवि आणि राजेंद्रकृष्णनी जवानी की हवा, नजराना, बाॅंबे का चोर, राखी, भरोसा, ये रास्ते है प्यार के, शहनाई, खानदान, सगाई मेहेरबान, डोली, गौरी, मन का मीत या सिनेमात एकत्र काम केले. चित्रगुप्त बरोबर भाभी पासून प्यार का सपना पर्यंत एकत्र काम केले. अनेक अविस्मरणीय गाणी दिली. शंकर जयकिशन टाॅपवर असताना ‘काॅलेज गर्ल’ या एकाच सिनेमात राजेंद्रकृष्ण नी गाणी लिहिली. नंतरच्या काळात सच्चाई, तुमसे अच्छा कौन है, तुम हसीन मै जवां सिनेमासाठी एकत्र काम केले. कल्याणजी आनंदजीं बरोबर ब्लफ मास्टर, घर घर की कहानी, जाॅनी मेरा नाम आणि गोपी सिनेमासाठी एकत्र काम केले.

नौशाद यांच्याबरोबर ‘गंवार’  या एकाच सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहीली. चाळिस वर्षाच्या कारकिर्दीत एच . सी. बाली ते अन्नु मलिक पर्यंत त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर काम केले. शैलेंद्र प्रमाणेच राजेंद्रकृष्ण शीघ्र कवी होते. ‘संजोग’ सिनेमाच्या वेळची गोष्ट राजेंद्रकृष्ण आणि मदनमोहन तळोजा येथे चालले होते. गाडीत मदनमोहन नी सिच्युएशन सागितल्यावर लगेच राजेंद्रकृृृृष्ण नी गाणे लिहीले. चालत्या गाडीत मदनमोहन चाल लावत असताना कागद उडून गेला. मदनमोहन नी गाडी थांबवली. राजेंद्रकृृृृष्ण नी सांगितले नका थांबू . दुसरे गाणे लिहीतो. हे गाणे होते ‘वो भूली दास्तां’.

ओमप्रकाशने अबोला धरल्यावर त्याच्या चेंबूरच्या बंगल्याच्या पोर्च वर बसून त्यांनी लिहीले ‘सपनोमे सजन से दो बाते एक याद रही एक भूल गये’. हे गाणे ‘गेटवे ऑफ इंडिया’ सिनेमात वापरले गेले. वैजयंतीमाला चा पहिला सिनेमा ‘बहार’ त्यांनीच लिहीला. त्यांच्याच सल्ल्यानुसार वैजयंतीमाला ने जाणीवपूर्वक हिंदी पंडीताची शिकवणी लावून आपले उच्चार सुधारले. वैजयंतीमाला शी घरोब्याचे संबंध असतानाही तिने डाॅक्टर बाली शी केलेला विवाह कुटुंबवत्सल राजेंद्रकृष्ण ना आवडला नाही. त्यानंतर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. मदनमोहन च्या मद्यपानावरुन त्यांचे आणि पत्नी शैलाचे खटके उडायचे. राजेंद्रकृष्णनी मदनमोहन ना जबरदस्त सुनावले. कालांतराने मदनमोहनना त्यांचे म्हणणे पटले. मदनमोहन नी त्यांची क्षमा मागितली. दोघे परत एकत्र झाले.

खंडाळ्याच्या बंगल्याचे काम सुरु असतानाच मदनमोहन गेले. रेसचा जबरदस्त नाद असलेल्या राजेंद्रकृष्ण ना ४८ लाखाचा जॅकपाॅट लागला. पण त्याही पेक्षा कितीतरी पट पैसे त्यांनी रेसवर उधळले होते. सप्टेंबर १९८७ ला राजेंद्रकृष्ण आपल्यातून गेले. सुवर्णयुगाचा आणखी एक साक्षीदार निखळला.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.