जुन्या जमान्यातले सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते ‘जीवन’ (Actor Jeevan) यांचा आज स्मृतिदिन. ओंकारनाथ केदारनाथ दार तथा ‘जीवन’ या कलावंताची कारकीर्द देखील प्राण प्रमाणे तिहेरी प्रकारच्या व्यक्तिमत्वाची असली तरी त्याचा खलनायकीच्या भूमिकांचं पारडं खचितचं जड होतं. त्याने जवळपास 50 ते 60 चित्रपटातून नारदाची भूमिका केली. नारद तसा कळलाव्या वृत्तीचा म्हणजे खलनायकच ! त्यामुळे पौराणीक चित्रपटात नारद म्हटलं, की जीवन डोळ्यापुढे येतो. ‘जीवन यांच्या बोलण्याचा स्वतःचा एक वेगळा अंदाज होता. ६० आणि ७० च्या दशकात जीवन हे आपल्या खलनायकी रूपात जास्त दिसले. (Remembering One of the Most Popular Villain of Hindi Cinema Jeevan)

संतज्ञानेश्‍वर’ (1964) या चित्रपटात तो विसोबा खेचर बनला तर ‘महाभारत’ (1965) या चित्रपटात शकुनीमामा ! त्याच्या कितीतरी भूमिका चित्रपटाच्या यशाला हातभार लावणाऱ्या होत्या. त्यांच्या अभिनयात बऱ्यापैकी नाटकीपणा होता; परंतु आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा टाळून त्याचे हेल काढून बोलणे, संवाद फेकीतील उपरोधिकता, दुष्टावा, डोळ्यांतील वासना, विकार, मिस्कीलता याचे बेमालूम मिश्रण, सदैव हॉलीवूड स्टाईलचे उंची सूटस्‌, चिरूट यामुळे तो व्हिलनच्या व्याख्येत फीट बसायचा व पाहता पाहता चित्रपटात भाव खाऊन जायचा.

नर्गीसच्या ‘आधी रात’ (ज्यासाठी नर्गीसला मानाचा पुरस्कार मिळाला) चित्रपटातील त्याचे बेवडेबाज, छचोर मिल कामगाराची भूमिका, ‘फागुन’ मध्ये मधुबालाला छळणारा जिप्सी, ‘नागीन’ मधील टोळीवाला, या जीवनच्या भूमिका आजही चटकन आठवतात. अभिनयातील गिरिशिखर दिलीपकुमार सोबत ‘मेला’, ‘शबनम’, ‘हलचल’, ‘तराना’, ‘उडनखटौला’, ‘नया दौर’, ‘कोहिनूर’ हे चित्रपट तूफान गाजले. विशेषत: ‘कोहीनूर’ चित्रपटांतील दिलीपसोबतचा आरशासमोरचा शॉट लाजवाब होता.

देवआनंद सोबत ‘नौ दो ग्यारह’, ‘डार्लींग डार्लींग’, ‘जॉनी मेरा नाम’ वगैरे चित्रांतून तो दिसला. 1970 च्या ‘जॉनी’ने सिनेमाचा ट्रेंड बदलून टाकला. स्मगलींग, आंतरराष्ट्रीय टोळीयुद्ध, काळे गॉगल्स, गोळ्यांचा खणखणाट, सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या यामुळे जीवन व अजित या काळात तुफानी गाजू लागले. पुढे अमिताभसोबत विशेषत: मनमोहन देसाईच्या चित्रातून जीवन याच प्रकारचे रोल करू लागला.

‘अमर अकबर अँथनी’तील त्याचा रॉबर्टस, प्राणला जेव्हा स्कॉच बुटावर टाकून म्हणतो, ‘जूते ऐसे चमकाओ की तुम्हारी सूरत उसमे नजर आनी चाहिए’ त्यावेळी पेक्षागृहात त्याच्याविषयी चीड निर्माण होते ! ‘धरमवीर’, ‘सुहाग’, ‘चाचा-भतीजा’, ‘लूटमार’, ‘देसपरदेस’ यात त्याची हीच भूमिका होती. जीवनाचे डॉयलॉग हा देखील आर्केस्ट्रावाल्यांना आकर्षित करणारा असाच आहे. दीर्घ संवादातील त्याचे पॉझेस, खुनशीपणा टेरिफीक असायचा. ‘जॉनी’मध्ये तो म्हणतो ‘काम तो हो गया, लेकीन हिरा पकडा गया’ त्याच्या उच्चारातला पाश्चात्य टोन स्मगलरच्या लकबीला साजेसा होता. ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ चित्रपटातील त्याचा एक लांबचलक डॉयलॉग पहा ‘हाँ हाँ ठाकूर साब, ये दिल के मामले बडे संगीन होते है, गोला बारुद से भी भडक उठते है, और फिर लोग तो यही कहेंगे की जब ठाकूर की चोरी पकडी गयी तो अपनी दिल की प्यास बुझाकर गरीब ननीया का घर ही उजाड दिया’ या दीर्घ संवादात ठासून भरलेला खुनशीपणा, बेरकीपणा, आवाजातील चढउतार सारंच जबरदस्त होतं.

त्याची गुर्मी, समाजाकडे तुच्छतेत पाहण्याचा अभिनय, उभा चेहरा, सरळ नाक, खुनशी डोळे त्याच्या खलत्वाला अमरत्व देणारेच होते. ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटींवरून बनलेल्या ‘तीन चोर’ चित्रपटात त्याने आय. एस. जोहर, ओमप्रकाश सोबत काम केले; पण पेक्षकांना त्याच्यातील रूचीबदल रुचला नाही व अखेरपर्यंत तो परत खलनायकीच करीत राहीला. त्याचा मुलगा किरण कुमार देखील सुरुवातीला नायक व नंतर जवळपास दहा-बारा वर्षांच्या गॅपनंतर खलनायक म्हणून पुढे आला !

जीवन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment