-डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.

Remembering one of the finest actress of hindi cinema Smita Patil. आज 13 डिसेंबर मराठी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री स्व. स्मिता पाटील यांचा स्मृतिदिन दिन..स्मिता पाटील म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला पडलेले एक सुखद स्वप्नच म्हणावे लागेल. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ती एक गुणी अभिनेत्री. 17 आँक्टोंबर 1955 चा जन्म. वडील शिवाजीराव पाटील, महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री,आई श्रीमती विद्याताई. धुळे शिरपूर येथे स्मिता पाटील यांच्या नावाने शाळा आहे. 
*यशस्वी अभिनेत्री*
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील जन्म. तेथेच बालपण. तद्नंतर तारुण्यात थिएटर अकादमी, एफटीआय परिसर येथे बहरलेली नाट्यकला पुढे मुंबई येथे स्थलांतर, दूरदर्शन मध्ये वृत्तनिवेदिका आणि मग चित्रपट सृष्टी असा स्मिता पाटील यांचा प्रवास.
     कला आणि व्यावसायिक म्हणजे आर्ट फिल्मस् आणि कमर्शियल फिल्मस् या दोन्ही प्रकारच्या चित्रपटातून यशस्वी झालेले काही ठराविकच कलावंत. त्यात स्मिता यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अतिशय मेहनतीने स्मिता पाटील यांनी आपल्या क्षेत्रात काम केले आणि यशाच्या ऊंच शिखरावर जाऊन पोहोचल्या. ऐशीच्या दशकात आजी, माजी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांचीही हिरॉईन म्हणून स्मिता यांनी काम केले. त्या काळातील चित्रपट हे मोठ्या प्रमाणात नायकप्रधान चित्रपट होते पण स्मिता पाटील यांच्या भूमिकेला या चित्रपटातून न्याय मिळाला. किंबहुना त्यांच्या भूमिका या सर्वार्थाने दखलपात्र ठरल्या. अगदी उल्लेखच करावयाचा ठरल्यास आपणास शक्ती, नमक हलाल, आखिर क्यो?, अमृत या चित्रपटाची नावे घ्यावी लागतील. आपल्या सहज, सुलभ व भावोत्कट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडले. 
 
ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या समवेत स्मिता पाटील यांनी सामना, जैत रे जैत, उंबरठा, सुबह हे चार चित्रपट केले. तर श्याम बेनेगलजी यांच्या समवेत चरणदास चोर, निशांत, मंथन, भूमिका, कोंडुरा, अनुग्रहम् हे सहा चित्रपट केले. साधारणतः  74  ते  80 दरम्यान या दोन्ही प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या चित्रपटातून  स्मिता पाटील यांच्या आभिनयाचे विविध पैलू आपणास दिसले. अगदी सामना चित्रपटातील छोटीशी भूमिका ते जैत रे जैत, उंबरठा, सुबहची मुख्य नायिका तसेच चरणदास चोर मधील राणी ते कोंडुरा मधील पार्वती ही भूमिका .. या चित्रपटांत स्मिता नावाच्या हिरा विविध पैलू पडून तो अधिक तेजस्वी झाला.
*भावोत्कट अभिनय*
  डॉ. जब्बार पटेल हे स्मिता पाटील यांचे एक आवडते दिग्दर्शक. जैत रे जैत या चित्रपटात स्मिता यांनी आदिवासी तरुणीची भूमिका केलेली आहे. प्रेमा करिता आपले सर्वस्व पणाला लावणारी एक तरुणी त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटाच्या उत्तुंग यशाला स्मिता यांच्या भूमिकेने निश्चितच मोठा हातभार लावला यात शंका नाही. त्यानंतर आलेल्या उंबरठा व सुबह या चित्रपटातून देखील स्मिता यांच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रेक्षकांनी चर्चा केली. त्यांची या चित्रपटातील सुलभा महाजन ही भूमिका खूप गाजली. स्त्री मुक्ती चळवळीवर आधारित असलेली ही भूमिका होती.
    समांतर अथवा आर्ट फिल्म बद्दल तर काही बोलायलाचं नको! कारण त्या चित्रपटातून केलेल्या स्मिता पाटील यांच्या भूमिका पाहताना त्यांनी अभिनयाची गाठलेली ऊंची लक्षात येते. कोणतीही भूमिका, त्यात समरस होऊन पूर्णपणे ती जिवंत करण्याचे कसब स्मिताजी मध्ये होते, म्हणूनच त्यांची प्रत्येक भूमिका लक्षणीय वाटते. चक्र आणि आक्रोश या जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर निर्माण झालेले चित्रपट. या दोन्ही चित्रपटातून स्मिता यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. चक्र मधील त्यांची भूमिका उघड्यावर केलेले आंघोळ, त्याकाळी खूप गाजली. टीकाटिप्पणी झाली. तसेच आक्रोश मधील ओम पुरी सोबतचे प्रणयप्रसंग देखील त्याकाळी गाजले. केतन मेहता यांच्या मिर्च मसाला  या चित्रपटातील क्रांतिकारी शेतकरीण ही भूमिका स्मिता यांनी साकारली. या भूमिकेचे देखील रसिकांनी कौतुक केले.
 
स्मिता यांनी  बऱ्याच व्यावसायिक चित्रपटातून काम केले. अगदी कसम पैदा करने वाले की व डान्स डान्स सारखे डिस्को डान्स प्रधान चित्रपट तसेच घुंगरू हा एक चित्रपट त्यांचे विशेष नृत्य असलेला चित्रपट. अमृत मधील त्यांची वयस्कर भूमिका त्याकाळी खूप गाजली. मंडी या चित्रपटातील खट्याळ खोडकर बन्नो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. समांतर चित्रपटांमध्ये त्यांची तुलना अथवा प्रतिस्पर्धी म्हणून शबाना आझमी यांचे नाव आघाडीवर होते. कोण श्रेष्ठ? हा भाग वेगळा. पण स्मिता पाटील यांनी मोठ्या प्रमाणात त्याकाळात समांतर चित्रपटातून शह दिला हे नाकारता येणार नाही. असो.
    1974  ते 1986 या कालावधीत त्यांनी जवळपास 70 चित्रपट केले. यात मराठी हिंदी, गुजराती, तेलगु, अशा विविध भाषिक चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात वारिस हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट सृष्टीत उंच शिखरावर असतानाही त्यांनी नाटकाला प्राधान्य दिले होते. छिन्न हे वामन तायडे लिखित नाटक त्यांनी आय.एन.टी.साठी केले होते. या नाटकात आशालता, सदाशिव अमरापुरकर, दिलीप कुलकर्णी हे कलावंत होते. 
 
     आपला सह अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत चित्रपटातून काम करत असताना त्यांच्याशी अधिक जवळीक निर्माण झाली. प्रेम झाले आणि त्यांनी विवाह केला. हा विवाहदेखील त्याकाळी खूप गाजला होता. प्रतीक या आपल्या छोट्या बाळाला जन्म देऊन अवघ्या दोन दिवसात स्मिता यांनी आपली इहलोकीची यात्रा 13 डिसेंबर 1986 ला संपविली. तमाम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. एका गुणी अभिनेत्री चा दुखद अकाली अंत झाला.
*पद्मश्री आणि पुरस्कार*
      स्मिता पाटील यांना अभिनयासाठी चे राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा मिळाले. 1977भूमिका,1980 चक्र. पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा सत्कार चौपाटीवर करण्यात आला. ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. वयाच्या  31 व्या वर्षी त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार प्राप्त झाला होता.तसेच जैत रे जैत व उंबरठा साठी मराठी फिल्म फेअर आणि चक्र साठी हिंदी फिल्मफेअर अवॉर्ड ही त्यांना मिळाले. तीन-चार वेळेस त्या फिल्मफेअर साठी नॉमिनेट देखील झाल्या होत्या.
 *स्मिता पाटील यांचे चित्रपट* 
   वारीस, गलियों का बादशाह, राही, ठिकाना, डान्स डान्स, आवाम, नजराणा, तिसरा किनारा, अनोखा रिश्ता, दहलीज,दिलवाला, अमृत, सूत्रधार, देब शिशु, अंगराय, आप के साथ, मेरा घर मेरे बच्चे, सितम, आखिर क्यो?, जबाब, चिदंबरम, कसम पैदा करने वाले की, रावण, आनंद और आनंद, शपथ, गिध, तरंग, फरिश्ता, आज की आवाज, हादसा, घुंगरू, अन्वेशाने, गुलामी, कांच की दिवार, चटपटी, कयामत, अर्धसत्य, दर्द का रिश्ता,  मेरा दोस्त मेरा दुश्मन, बदले की आग, नमक हलाल, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है?, भवनी भवाई, अंधेर नगरी, नक्शलाईटस्, सर्वसाक्षी, बाजार, अर्थ, मिर्च मसाला, चक्र , पेट प्यार और पाप, अंगारे, गमन, राजा शिवछत्रपती, अभिनेत्री ही सत्यजित रे यांची हिंदी टीव्ही सिरीयल.
(स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे)
……………………………….
raju patodkar
Dr Raju Patodkar
+ posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.

शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.

पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)

भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.

Leave a comment