-जयश्री जयशंकर दानवे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘मैं ख्वाबोंकी शहजादी, मैं हूं हर दिलपे छाई’ असं म्हणत सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी हवाहवाई म्हणजे श्रीदेवी. आपल्या अभिनय आणि नृत्याविष्काराने रसिकांवर मोहिनी घालणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी. सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्व अशा तिन्ही पातळ्यावरची सकस कामगिरी बजावणारी अभिनेत्री म्हणून जिचा लौकिक आहे ती श्रीदेवी. बॉलीवूडची ‘रूप की रानी’. श्रीदेवीने आपल्या सशक्त अभिनयाने आणि आपल्या खास नृत्यशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कमालीचे बोलके डोळे आणि शांत, स्निग्ध सौंदर्य यांच्यामुळे प्रत्येकाला मोहवणारी, अभिनयाचा आदर्श निर्माण करणारी  ‘बॉलीवूडची एकमेव स्त्री सुपरस्टार’ असं बिरूद लागलेली श्रीदेवी. अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत तिने स्वत:चे स्थान निर्माण केले. श्रीदेवीने बॉक्स ऑफिसवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. नटखट, खटयाळ मुलगी, खोडकर सौंदर्यवती आणि अप्रतिम नृत्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. (Remembering Lady Superstar of Hindi Cinema Sridevi on her Birth Anniversary) 

     जन्माने दाक्षिणात्य असूनही हिंदी चित्रपटसृष्टीत नामांकित झालेल्या अनेक तारका आहेत त्यापैकी श्रीदेवी ही एक होती. अभिनय, सौंदर्य, कलानिपुणता यांचा अनोखा त्रिवेणी संगम असलेल्या अभिनेत्री श्रीदेवीने खऱ्या अर्थाने रुपेरी पडद्याला ऐश्वर्य मिळवून दिले. भारतीय चित्रपटसृष्टीची ‘क्वीन’म्हणजे श्रीदेवी. महिला कलाकार केवळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असताना, ‘सिनेतारका’ म्हणून सर्वसामन्यांच्या मनावर राज्य करण्याचा पहिला मान श्रीदेवीला मिळाला. हे ‘स्टारडम’ तिने दिलखेच अदाकारी, नृत्यकौशल्य व दमदार अभिनयाच्या जोरावर मिळविले.

     श्रीदेवी हिचा जन्म १३ ऑगस्ट, १९६३ रोजी मद्रास येथील शिवकाशीमध्ये झाला. तीचे मूळ नांव अम्मा यंगर अय्यपन. श्रीदेवीचे वडील वकील होते. श्रीदेवीला एक बहिण आणि दोन सावत्र भाऊ होते. १९६७ मध्ये वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ‘थुनैवन’ या तामिळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने सुरुवात केली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे आपल्या अभिनयाचा करिश्मा तिने वयाच्या चौथ्या वर्षीच दाखविला. इतक्या लहान वयात नुसती लोकप्रियता मिळविली नाही तर बालकलाकार म्हणून १९७१ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळवला. १९७५ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी ‘ज्युली’ या बॉलीवूडपटातून बालकलाकार म्हणून तिने पदार्पण केले. १९७६ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ‘मूंदू मुदिचू’ हा तामिळी चित्रपट केला. प्रौढ कलाकार म्हणून श्रीदेवी हिचा हा पहिला चित्रपट होता. वयाच्या १५ व्या वर्षी अमोल पालेकर बरोबर १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोलवा सावन’ या पहिल्या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये तिने पदार्पण केले. यापूर्वी तामिळी, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटात तिने अभिनय केला होता. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीला फारसे यश मिळाले नाही.

     श्रीदेवी खऱ्या अर्थाने नावारूपाला आली १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मतवाला’तून. या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तिला ग्लैमर मिळाले. हा श्रीदेवीचा पहिला हिट चित्रपट. भप्पी लहरींची एकापेक्षा एक सुंदर उडत्या चालीची गाणी यात होती. ‘नैनो में सपना,सपनों में सजना’ या गाण्याला तिने जितेंद्र बरोबर केलेले नृत्य तिच्यातल्या नृत्यांगनाचा परिचय देऊन गेले. यांची जोडी हिट ठरली. या उभयतांनी मिळून तब्बल सोळा चित्रपट केले. त्यापैकी तेरा सुपरहिट ठरले. १९८३ ते १९८८ पर्यंतचा काळ या जोडीने गाजवला. ‘मवाली, मकसद, जस्टीस चौधरी, जानी दोस्त, तोहफा, अकलमंद, बलिदान, सुहागन, घरसंसार, औलाद, सोने पे सुहागा, सरफरोश, आग और शोला, हिम्मत और मेहनत’ असे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट तिने दिले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.राजेश खन्नाबरोबरही  तिची जोडी छान जमली. ‘नया कदम (१९८४), मकसद (१९८४), मास्टरजी (१९८५), नजराना (१९८७) अशा चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले.

      कमल हसनसोबत ‘सदमा’ या चित्रपटातल्या श्रीदेवीच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची चोख पावती मिळाली. या चित्रपटातील तिच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना श्रीदेवीचे वेगळे रूप पहायला मिळाले. शरीर वीस वर्षाचे आणि बुद्धी मात्र सहा-सात वर्षाच्या मुलीची. ही अतिशय अवघड भूमिका होती. यात कमल हसनचीही कमाल होती. इलिया राजाचे संगीत आणि सुरेश वाडकरचा आवाज यामुळे गाजलेल्या ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ या गाण्यावेळचा श्रीदेवीचा अभिनय कोण विसरेल? वयाने वाढलेल्या पण एका धक्क्याने मोठेपण गमावलेल्या मुलीची तिची भूमिका म्हणजे तिच्या अध्ययन आणि निरीक्षणशक्तीची कमाल म्हणावी लागेल. यात तिच्या अभिनयाची वेगळी छाप पडली आणि एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून तिचे हिंदी जगतात स्वत:चे स्थान निर्माण झाले. ‘सदमा’ हा हिंदी शब्द आहे. दु:खद घटनेचा तीव्र धक्का असा त्याचा अर्थ आहे. बॉलीवूड मधील उत्तम चित्रपटात त्याची गणना होते. कमल हसनबरोबर २७ चित्रपटात तिने काम केले.

      ‘मि. इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज’ यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत श्रीदेवीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हा तर लहान मुलांनी डोक्यावर घेतलेला चित्रपट. फैंटसीच्या अंगाने जाणारा हा चित्रपट जितका मनोरंजक तितकाच कलात्मक होता. ‘कहते है मुझको हवाहवाई’ या गाण्यावर श्रीदेवीने केलेला डान्स जसा गाजला तशीच पार्श्वगायिका म्हणून कविता कृष्णमुर्तीही गाजली. याच चित्रपटातील ‘काटे नहीं कटते, ये दिन ये रात’ हे गाणे श्रीदेवीला आगळावेगळा पुरस्कार देऊन गेले. या चित्रपटानंतर तिला ‘हवा हवाई गर्ल’ म्हणून संबोधले गेले. साडीतून सर्वाधिक सुंदर सेक्सी गाणे साकार करणारी अभिनेत्री असा पुरस्कार तिने पटकावला. लहान मुलांचा दंगा सहन न होणे आणि शांत महिला पत्रकार मुलांच्या गराड्यात अडकल्यावर कसा तीळपापड होतो हे दाखवावे तर श्रीदेवीने. यात मुलांचा फूटबॉल तिने जप्त केल्यानंतर मुलांनी गायिलेल्या दंगलगाण्यात तिने दाखविलेला वैताग बघण्याजोगा होता आणि शेवटी जेंव्हा ती अंगात आल्याप्रमाणे घुमू लागते तेंव्हा तर टाळ्याच पडत. अदृश्य मिस्टर इंडियाशी तिने साधलेला संवाद आणि त्याच्याबरोबरचा प्रणय हे श्रीदेवीच करू जाणे.

       ‘नगिना, चांदनी’ चित्रपटातून ऋषी कपूर-श्रीदेवी जोडी लोकांना भावली. त्यावेळी तिची प्रमुख स्पर्धा होती ती रेखा, जयाप्रदा, मीनाक्षी शेषाद्री या दाक्षिणात्य अभिनेत्रींशी. ९० च्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात चढाओढ होती. पण श्रीदेवीने आपले नंबर वनचे स्थान कायम अबाधित ठेवले. श्रीदेवीने दाक्षिणात्य चित्रपटात बाल कलाकार म्हणून जयललितासोबतही काम केले होते. पिता पुत्र धर्मेंद्र आणि सनी या दोघांबरोबर नायिका होण्याची संधी प्रथम श्रीदेवीला मिळाली.

      ती उत्कृष्ट नृत्यांगना असलेने अनेक चांगली नृत्यगीते तिच्या वाटयाला आली. ‘चांदनी’ मधील ‘मेरे हाथोमें नौ नौ चूडीयां है’ हे त्यापैकीच एक गाणे. यश चोप्रानी तिच्या अभिनयाचा आपल्या अनेक चित्रपटासाठी चांगल्या रितीने उपयोग करून घेतला. यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी, लम्हे’ चित्रपटातून श्रीदेवी हिने नृत्यकौशल्य आणि सौंदर्य यातून रसिक मनावर मोहिनी घातली. ‘मोरिनी बागामा बोले, मेरे हाथोंमें’ ही गाणी तिच्यावर चित्रित करण्यात आली. या गाण्यातील तिचे नृत्य आजही प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालते. यश चोप्रांनी सर्वप्रथम श्रीदेवीला वजन निम्म करायला लावून, पांढऱ्या व सौम्य रंगाचा शालीन पोषाख देऊन तिला ‘ती फुलराणी’ बनवलं. ‘लम्हे’ चित्रपटात काम करण्यापूर्वी तिचे वजन ७५ किलो होते. ते तिने ५७ किलोपर्यंत कमी केले. अभिनयाप्रति समर्पित असे फार कमी कलाकार असतात. तिच्या व्यक्तिमत्वाचा हळुवार, संवेदनशील पैलू चोप्रानी उजागर केला. जितेंद्रच्या चित्रपटातील लाऊड नायिकेच्या प्रतिमेतून ‘चांदनी’ने तिची सुटका केली. आणि तिला क्लास मिळवून दिला.

     यशजींच्या ‘लम्हे’ चित्रपटाने श्रीदेवीला चांगले यश मिळवून दिले. आपल्यापेक्षा मोठया वयाच्या पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या एका नवयुवतीची ही व्यक्तिरेखा होती. नेहमीची हसरी, बोलकी, खोडकर श्रीदेवी यात होती. पण प्रेमात पडल्यावर ती परीपक्व होते आणि आपलं हक्काचं प्रेम मिळविते. यश चोप्रानी हा चित्रपट छान हाताळला होता. शिव-हरीनी श्रीदेवीच्या आवाजात जॉली मुखर्जी समवेत या चित्रपटाचे ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ हे शीर्षक गीत गाऊन घेतले.या चित्रपटात प्रियकरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमिकेची भूमिका श्रीदेवीने बखूबी निभावली. ‘नगिना’चित्रपटातील ‘मै तेरी दुश्मन’ या लतादीदीनी गायलेल्या गाण्यावरचे नृत्य गीत तिला सर्वोत्कृष्ट नृत्यांगनेचा पुरस्कार देऊन गेले. या चित्रपटात तिने इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती.

     अनिल कपूरसोबत श्रीदेवीचे अनेक चित्रपट आले. हे चित्रपट सुपरहिट ठरले. ‘मि.इंडिया, लम्हे, रूप की रानी चोरोंका राजा, जुदाई’ आदी चित्रपटांचा यात समावेश आहे. ‘जुदाई’ मध्ये तिने उर्मिला मातोंडकर बरोबर पडदा शेअर केला होता. खरं तर उर्मिला व तिच्यात वयाचा मोठा फरक होता. पण पडद्यावर हा फरक दिसू न देणं हे आव्हान तिने लिलया पेललं. आपला धाकटा दीर अनिल कपूर समवेत तिचे छान सूर जुळले. सद्गुणी स्त्रीचं काम करणाऱ्या उर्मिलाचा अभिनय सुरेखच आहे पण भांडेवालीला जुने कपडे विकावे तशा सहजतेने नवरा विकणारी आणि आलेल्या पैशातून हाय सोसायटीतल्या स्त्रीप्रमाणे जगणारी उथळ श्रीदेवी हा चित्रपट आपल्या नावावर करून गेली. ‘जुदाई, लाडला, सुहागन’ यासारख्या चित्रपटातून श्रीदेवीनं ऐंटी हिरोईनला हिंदी चित्रपटात रूळवल. तिची नायिका आधुनिक पोषाख घालणारी परंतु आतून परंपरेची पाईक असणारी, क्षणिक मोहाला बळी पडणारी अपरिपक्व होती. त्यामुळे तिच्या चुकांचा राग न येता तिची किव येते. तिने काही वेळा तिच्या प्रतिमेला विनोदाची डुबही दिली आहे.

    बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोबत ‘खुदा गवाह, आखरी रास्ता, इन्कलाब’ अशा चित्रपटात तिने काम केले. ‘लम्हे, खुदा गवाह’ या चित्रपटात श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारल्या. ’खुदा गवाह’ मध्ये तिने अमिताभ सोबत साकारलेली बेनझीर अजरामर ठरली. त्यानंतरच्या संजय दत्तबरोबरच्या ‘गुमराह’ मधील तिची भूमिका तिच्यातील अभिनयगुण सिद्ध करणारी ठरली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम अवतार’ मधील अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासोबतच्या प्रेमाच्या त्रिकोणात तिची होणारी घुसमट प्रेक्षकांना अस्वस्थ करून गेली. १९८९ मध्ये ‘चालबाज’ चित्रपटात श्रीदेवी हिने दुहेरी भूमिका केली. या रोलमध्ये तिने पारंपारिक, सोशिक आणि फटाकडी, फटकळ व बेदरकार अशा दोन भिन्न व्यक्तिरेखा साकारल्या. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत सोबत काम केले.रजनीकांत समवेत तिने २० चित्रपटात काम केले. यात प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. म्हणून तिला ‘दक्खनची राणी’ सुद्धा म्हणतात. ‘चालबाज’ मधील श्रीदेवीचे ‘ना जाने कहां से आयी है’ हे गाणे खूप गाजले. या चित्रपटातील लोकप्रिय ‘रेन डान्स’ तिने ज्याप्रकारे साकारला ते अजिबात सोपे नाही.

     श्रीदेवी ही ऐन भरात असताना बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीशी तिने केलेला पहिला विवाह अवघी तीन वर्षे टिकला. त्या दोघांनी ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटात काम केले होते. या दोघांनी १९८८ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर १९९६ मध्ये बॉलीवूडच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना श्रीदेवीने निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांचेशी विवाह केला. त्यानंतर ‘जुदाई’ चित्रपट पूर्ण करून तिने मोठया पडद्यावरून रजा घेतली. घरसंसारात ती रमली. हे बोनी यांचे दुसरे लग्न होते. श्रीदेवी यांना जान्हवी आणि ख़ुशी या दोन मुली आहेत. बोनी कपूरसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर चित्रपटाऐवजी टीव्ही शोचे कार्यक्रम करणे श्रीदेवीने पसंत केले. तिने छोटया पडद्यावर  ‘मिसेस मालिनी अय्यर’ ही मालिका केली. तसेच टीव्ही शो ‘दस का दम’ मधूनही ती दिसली.

      मुले, घर यातून मोकळीक मिळाल्यावर तिने सेकंड इनिंगमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून पुन्हा बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. या चित्रपटात तिने साकारलेली शशी गोडबोले या मराठी गृहिणीची भूमिका कौतुकाचा विषय ठरली. ही भूमिका करण्यासाठी तिने मराठी महिलांची जीवनशैली कशी असते याचे  बारीकसारीक तपशील समजून घेतले होते. मराठी मध्यमवर्गीय गृहिणी आणि तिच्या व्यक्तीमत्वात झालेल्या बदलांचा प्रवास हे एका ताकतवान अभिनेत्रीला शक्य आहे. ‘मॉम’ चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये श्रीदेवीने साकारलेली आई आतापर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळ्या धाटणीची होती.प्रथम प्रेमळ आणि नंतर कणखर बनलेल्या आईची भूमिका तिने समर्थपणे साकारली. शाहरुख खानसमवेत तिने ‘आर्मी’ हा एकमेव चित्रपट केला.

     श्रीदेवी ही कटाक्षाने राजकारण, गॉसिप व अन्य उद्योगापासून दूर राहिली होती. व्यक्तिगत आणि फिल्मीजीवन यांच्यात तिने नेहमीच अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आयुष्यात अनेक वादळे येऊनही तिने त्याचा परिणाम आपल्या फिल्मी करिअरवर होऊ दिला नाही.त्यामुळे तिच्या यशाचा आलेख चढता राहिला. कोणत्याही वादात, वादंगात ती कधीही सहभागी झाली नाही. ती मिडिया पासून दूर असे. ज्या दैनिकाला मुलखात द्यायला कोणताही स्टार नकार देत नाही त्या बडया इंग्रजी दैनिकालाही तिनं आपल्या बहराच्या दिवसात मुलाखत दिली नाही. तिचा आगळा वेगळेपणा इथंही दिसला. ती जन्मजात स्टार होती. स्टारसारखी जगली आणि स्टारसारखी गेली. विवाहानंतर स्वखुशीने पडद्याआड गेली आणि वीस वर्षे कौटुंबिक जीवनाचा आनंद घेतला. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तिच्याकडे पाहिले जाई. केवळ चित्रपटसृष्टी, अभिनय, नृत्य, कुटुंब असे स्वत: भोवती रिंगण आखून या रिंगणात तिने अव्वल कामगिरी केली.

     हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक डब्बल रोल करण्याचा मान श्रीदेवीकडे जातो. यासाठी तिला विशेष पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या श्रीदेवीने अभिनयातील प्रत्येक पैलूला स्पर्श केला. केवळ अभिनेत्यांचा कथेभोवती फिरत राहणाऱ्या चित्रपटांच्या जमान्यात तिने सशक्त अभिनयाने व नृत्याने अशी मोहिनी घातली की, नायिकाप्रधान चित्रपट बनू लागले. ती परफेक्शनिस्ट होती. ती संपूर्णतेची स्वाक्षरी होती. तिने स्वत:शीच स्पर्धा केली.तिच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा अभिनयाचा तोच दर्जा, तेच ग्लैमर होते याची प्रचीती ‘इंग्लिश विंग्लिश किवा मॉम’ चित्रपटातून येते. श्रीदेवी ही टिपकागदासारखी होती. तिला सांगितलेली कोणतीही गोष्ट किंवा इतरांचा अभिनय पाहून ती फारच वेगाने नवीन गोष्टी शिकून घेत असे आणि सहजतेने अंगी बाणवत असे. हिंदी चित्रपटसृष्टीने दिलीपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शाहरुख खान असे पुरुष सुपरस्टार पाहिले मात्र श्रीदेवी हिची ओळख अभिनेत्रीमधील पहिली सुपरस्टार अशी झाली होती.

       श्रीदेवीने नवीन असताना रेखाकडून प्रथम हिंदीचे धडे गिरविले. सुरुवातीला श्रीदेवीचा आवाज तिच्या अशुद्ध हिंदी उच्चारामुळे डब करण्यात येत असे. त्यावेळी रेखाने तिला आवाज दिला आहे. श्रीदेवीची ताकद सामावली होती ती तिच्या मोहक चेहऱ्यावर उमटणाऱ्या आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या विविध छटामध्ये. कमालीचे सुंदर डोळे असणाऱ्या श्रीदेवीने त्या डोळ्यांचा तितक्याच खूबीने वापर केला.तिचा अभिनय जितका रसरशीत तितकाच सखोल आहे हे तिच्या डोळ्यामधून उलगडत असे. प्रत्येक भावनेचा अविष्कार प्रथम डोळ्यामध्ये होतो नंतर चेहरा बदलतो आणि शब्द सर्वात शेवटी प्रतिक्रिया देतात.शब्द हा भावनेचा अंतिम आविष्कार असतो. आधी ती भावना डोळ्यामध्ये उमटावी लागते. श्रीदेवीच्या अभिनयात हा क्रम नेहमी दिसून आला.   

     रात्रीच्या अंधारात मोहरलेल्या आकाशगंगेतून एखादी ‘चांदनी’ निखळून पडावी तशी श्रीदेवी २५ फेब्रुवारी, २०१८ रोजी सर्वांना सोडून गेली. २५ फेब्रुवारीची सकाळ भारतीय सिनेसृष्टीवर दु:खाची काळी किरणे घेऊन उगवली. विचित्र योगायोग असा की, ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी, १९८३ रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला ३५ वर्षे पूर्ण होत असतानाच नेमकी श्रीदेवीच्या जाण्याची बातमी आली. अवघे ५४ वय हे जग सोडून जायंच नव्हे. वय वर्ष ५४ व ४० वर्षाची कारकीर्द हे गणित कोणालाही सुटणार नाही. श्रीदेवी दुबई येथे एका कौटुंबिक विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेली असतानाच तिचे निधन झाले. याच विवाहसमारंभात तिने पती बोनी कपूर यांच्यासोबत शेवटचा डान्स केला. खरं तर श्रीदेवीची दुसरी इनिंग सुरु झाली होती आणि तिची कन्या जान्हवी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत होती. अशावेळी हा सदमा बसला तो तीव्र, अकाली आणि चटका लावणारा होता. जान्हवी चित्रपटात येणार म्हणून ती खुश होती. पण काळाला ती ख़ुशी सहन झाली नाही. मुलीचा चित्रपट पाहण्याअगोदरच तिने अचानक एक्झिट घेतली आणि चित्रपट रसिकांना व बॉलीवूडला मोठा धक्का बसला.

     चित्रपटसृष्टी ही अथांग आणि चमचमती आहे. या सृष्टीत येणे, संधी मिळविणे, नांव करणे आणि आपला ठसा उमटवणे सोपे नाही. त्यासाठी कसच लागतो. ती वयाच्या चौथ्या वर्षी या जगतात आली आणि पन्नास वर्षे टिकून राहिली. श्रीदेवीने अनेक भाषातील सुमारे ३०० चित्रपट केले. श्रीदेवी हे करू शकली त्यामागे तिची प्रचंड मेहनत, अभिजात अभिनय आणि नृत्य यासाठी केलेली साधना महत्वपूर्ण आहे. ती वन टेक आर्टिस्ट होती. ‘ए जिंदगी गले लगा ले’ असं म्हणत ती या सृष्टीत वावरली.  

‘चालबाज’ आणि ‘लम्हे’ या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तिच्या नावावर फिल्मफेअरचे सात अवार्ड आहेत. सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे तिला मिळालेले रसिकांचे उदंड प्रेम. रसिकांनी तिला दिलेला ‘लेडीज सुपरस्टार’ हा मान दुर्मिळच. तो तिची या क्षेत्रातील कामगिरी दाखवतो त्याचबरोबर योगदानही अधोरेखित करतो.भारत सरकारने २०१३ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने तिला सन्मानित केले. श्रीदेवी हे चित्रसृष्टीला पडलेलं सुरेख स्वप्न होतं. या चतुरस्त्र अभिनेत्रीबद्दल म्हणावंस वाटतं…….

वो ‘चांदनी’ ना रही, गहरा ‘सदमा’ दे गयी

जिंदगी बहोत ‘चालबाज’ निकली, सबसे ‘जुदाई’ दे गयी

बहोत ‘लम्हे’ जीने बाकी थे, बडी जल्दी ‘आखरी रास्ता’ से चली गयी

काश कोई ‘मिस्टर इंडिया’ आये, और वो ‘नगिना’ लौटा दे….. 

     श्रीदेवीचा अभिनय, तिचे चित्रपट तिची आठवण जिवंत ठेवणारा आहे. ‘लम्हे’ मधील या गीताप्रमाणे…..

       ‘ये लम्हे,ये पल हम बरसों याद करेंगे

       ये मौसम चले गये तो हम फरियाद करेंगे

       इन सपनों की तस्वीरों से,इन यादों की जंजीरों से

       अपने दिल को कैसे हम आझाद करेंगे’

बॉलिवूडच्या ९० त्यापुढील दशकातील लेखांसाठी क्लिक करा 

बॉलिवूडच्या ७० व ८० च्या दशकातील लेखांसाठी क्लिक करा

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.