-जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

 

‘ दुनियामें हम आये हैं तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’

     असं म्हणणाऱ्या ग्रामीण स्त्रीचं वास्तव रूप रेखाटून जागतिक महिला वर्षाच्या कित्येक वर्षे अगोदर सबल स्त्रीचं चित्रण करणारे तसेच आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेजगताला ‘मदर इंडिया’ प्रदान करणारे दिग्दर्शक म्हणजे मेहबूब खान (Mehboob Khan). मेहबूबजींनी आपल्या चित्रपटातून आधुनिक धर्मनिरपेक्षतावादी मूल्यांचे चित्रण केलं. मेहबूबजी निर्माते, दिग्दर्शक, स्टुडीओचे मालक आणि स्टारमेकर होते.

 

  मेहबूबजींचा जन्म १ जानेवारी १९०६ चा. बडोद्याजवळचं सरार हे त्यांचं गाव. गुजरातमधील बिलिमोरा या गावातील एका गरीब कुटुंबातील हा मुलगा. या मुलाला मुंबईत जायची इच्छा. तिथे सोन्याच्या विटा मिळतात असे ह्याला सांगण्यात आले होते. तो तास न तास रेल्वे स्टेशनसमोरच्या रुळांकडे पहात बसायचा. या रुळांवरून धावणाऱ्या गाडीत बसून मुंबईला जाण्याचे ह्याचे स्वप्न. बिलिमोरापासून मुंबई फक्त १३५ मैलांच्या अंतरावर. पण हे अंतर कापायचे कसे, या विचाराने ग्रासलेला. त्याने मिळेल त्या तऱ्हेने पैसा गोळा करायला सुरवात केली आणि एकदाचा तो मुंबईला आला. (Remembering Iconic Producer Director of Hindi Cinema Mehboob Khan)

     १९२७ ची ही गोष्ट. त्याच्या खिशात त्यावेळी फक्त तीन रुपये होते. वय वीस-बावीस असेल. त्याला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. तो पत्ता शोधत ‘इम्पिरिअल फिल्म कंपनी’च्या गेटवर पोचला. एक पठाण दरवाजात उभा होता. त्या मुलाला तो आत घेईना. पण हा मुलगा घाबरला नाही. त्याने आपल्या ओळखीच्या रेल्वे अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांची चिट्ठी घेऊन तो दुसऱ्या दिवशी स्टुडीओत गेला आणि त्याला प्रवेश मिळाला.खान बहादूर अर्देशीर इराणी हे त्या स्टुडीओचे मालक होते. हा त्यांना भेटला  त्यावेळी नमाज पढण्याची वेळ झाली होती. मेहबूब म्हणाला, ‘सेठ साहब, मी नमाज पढून येतो आणि तुम्हाला भेटतो.’  त्याच्या या धार्मिक वृत्तीने खानसाहेब खुश झाले आणि त्यांनी मेहबूबला स्टुडीओत ‘एक्स्ट्रा’ म्हणून कामास ठेवले.

     स्टुडीओतील एका दिग्दर्शकाने मेहबूबला आपल्या ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या चित्रपटात एक रोल दिला. मेहबूब आपल्या चेहऱ्याला मेकअप झाल्याचे पाहून खुश झाला. पण तो रोल एका चोराचा होता. दिग्दर्शकाने त्याला एका मोठ्या हंड्यात कोंबले आणि चित्रीकरण संपेपर्यंत त्याला आपला चेहरा कॅमेऱ्याला दाखवताच आला नाही. मेहबूबला दुसरा रोल मिळाला तो होता एका माणसांच्या घोळक्यात उभे राहण्याचा. निदान एकदा तरी कॅमेऱ्याने आपला चेहरा टिपावा अशी तो अल्लाकडे प्रार्थना करत होता. अशा तऱ्हेने काम करण्यात चार महिने गेले. पण त्याचे नाव पे-रोलवर नव्हते. त्याला एक रुपयाही मिळाला नाही. मेहबूब पुन्हा आपल्या रेल्वेतल्या ह्या ओळखीच्या माणसाकडे गेला आणि त्याच्यामार्फत पुन्हा खानसाहेबांना भेटला. एका क्षणात खानसाहेबांनी त्याला महिना ३० रुपये देण्याची आपल्या अकौंटंटला आज्ञा केली. हे पाहून मेहबूब सुखावला. या ३० रुपयांपैकी १० रुपये त्याने गावी असलेल्या म्हाताऱ्या वडिलांना पाठवायला सुरुवात केली आणि २० रुपयांमध्ये तो सुख मानू लागला. त्याला छोटे मोठे रोल मिळू लागले.

     मेहबूब नुसता छोटे मोठे रोल करण्यात मग्न राहिला नाही. त्याला चित्रपटाची कथा, संवाद लिहिण्याची इच्छा होती. जमल्यास दिग्दर्शनही करायचे होते. सेटवर लेखक कसे काम करतात, ते दिग्दर्शकाबरोबर चर्चा कशी करतात, पटकथा कशी फुलते हे बघण्यात मेहबूब रस घेत असे. त्यातून प्रेरणा घेऊन एकदा त्यांने स्वत: कथा विकसित केली. एक कथानक लिहिले. ते कथानक सर्वाना आवडले आणि तो चित्रपट सेटवर गेला. त्या चित्रपटाचे नाव होते, ‘जजमेंट ऑफ अल्ला’. हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे ‘सागर मुव्हीटोन’ साठी मेहबूबने ‘अल हिलाल, मनोमन, जागीरदार, वतन, दी ओनली वे’ आदी चित्रपट बनवले. यानंतर मेहबूब ‘नैशनल स्टुडीओ’ या संस्थेत सामील झाला आणि त्याने ‘औरत’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटाने मेहबूबला अमाप प्रसिद्धी मिळाली. उत्तम दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. मेहबूब हिट दिग्दर्शक होतेच परंतु ‘औरत’ मुळे त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. चित्रपट केवळ भव्य व मल्टीस्टारर होता एवढंच नव्हे तर तो भारतीय ग्रामीण वास्तवाचं विदारक चित्रण करणारा होता. उठावदार प्रसंग, पकड घेणारी पटकथा आणि धरून ठेवणारं संगीत ही मेहबूबजींच्या चित्रपटाची वैशिष्ट्यं.त्यानंतर त्याचा रिमेक १९५७ साली ‘मदर इंडिया’ या नावाने केला. यानंतरचा  त्याचा चित्रपट होता ‘रोटी’.

     पुढे मेहबूब खान यांनी वांद्रे पश्चिम येथे मेहबूब स्टुडीओची निर्मिती केली. आजही या स्टुडीओत चित्रीकरण होते. या स्टुडीओबरोबरच त्यांनी स्वतंत्र चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. या निर्मिती संस्थेचे बोधचिन्ह कोयता आणि हातोडा असे आहे. त्यावरून मेहबूब खान यांची मानसिकता समजते. त्यांनी प्रथम १९४३ साली ‘नजमा’ व ‘तकदीर’ हे चित्रपट केले. ’नजमा’ मध्ये अशोककुमार, वीणा, सितारा, याकुब असे कलाकार होते. तर ‘तकदीर’ मधील प्रमुख कलाकार म्हणजे नर्गिस, मोतीलाल आणि चंद्रमोहन. नर्गिस बेबीचं पडद्यावरचं ‘नर्गिस’ हे नामकरण मेहबूब खान यांनीच केलं. त्यानंतर ‘हुमायूं, अनमोल घडी, ऐलान, अनोखी अदा, अंदाज, आन, अमर, आवाज, पैसा ही पैसा ’ असे चित्रपट त्यांनी निर्माता व दिग्दर्शक म्हणून केले.

       मेहबूबजी निर्माते, दिग्दर्शक, स्टुडीओचे मालक आणि स्टारमेकर होते. १९४० च्या दशकात भारतीय तरुण पाश्चात्यांचं अनुकरण करू लागले होते. इतरांशी वागताना मर्यादेबाहेर मुक्तपणा दाखवू नका. तुम्ही जर कोणाबरोबर आयुष्यभराची साथ देण्याचं वचन दिलं असेल तर इतरांशी अतिमित्रत्वाने वागण्याचे परिणाम वाईट होतात, असे विचार मेहबूबजींनी आपल्या चित्रपटातून मांडले. प्रथितयश कादंबऱ्यावर चित्रपट तयार करण्याची पद्धत बिमलदा व मेहबूब खान यांनी प्रचलित केली. शहरी भांडवलदार, ग्रामीण सरंजामदार यांच्याविरुध्दची विद्रोहाची भावना मेहबूब यांनी आपल्या कलाकृतींतून प्रकट केली. भांडवलशाहीचं विकट रूप आणि आदिम संस्कृतीतील मानवता टिपण्याची दूरदृष्टी मेहबूबजींनी दाखवली. मेहबूबजींकडे दातृत्व व कर्तृत्व होते.

     त्यानंतर मेहबूब खान यांचा चित्रपट म्हणजे ‘हुमायूं’ हा इतिहासपट. शिर्षक भूमिका निभावली होती अशोक कुमारने. या चित्रपटातूनही मेहबूबजींनी हिंदू-मुस्लीम एकतेचा, भ्रातृभावाचा संदेश दिला. तेव्हा देशातील वातावरण भडकले होते आणि फाळणीपूर्व दंगे होत होते. त्यामुळे हा संदेश महत्वाचा होता. या चित्रपटातील युध्द दृश्यं जयपूरमध्ये चित्रित केली होती. त्यासाठी हत्ती, घोडे, सैनिक, शस्त्रास्त्रं सर्व काही जयपूरच्या महाराजांनी पुरवलं. त्यात जयचंदचं सैन्यदल हत्ती, घोडे घेऊन चाल करून येत असताना हुमायूं अचानक दुपारच्या नमाजासाठी घोड्यावरून उतरतो आणि नमाज पठण करू लागतो. हे दृश्यं देणं कठीण होतं कारण दोन्ही बाजूने भरधाव हत्ती-घोडे पळत होते. पण या दृश्यामुळे कथेत नाट्य निर्माण झालं. मेहबूबजींच्या डोक्यातील कल्पना भन्नाट असत. त्याकाळात मुंबईतील चर्चगेटसमोरच्या इरॉस थिएटरात फक्त इंग्रजी चित्रपटच प्रदर्शित होत असत पण ‘हुमायूं’ हा तेथे प्रदर्शित झालेला पहिला भारतीयपट.

     त्यानंतर १९४६ ला ‘अनमोल घडी’ हा सामाजिकपट मेहबूबजींनी हाती घेतला.  ‘अनमोल घडी’ मध्ये नुरजहां, सुरेंद्र, सुरैय्या असे कलाकार होते. नौशाद हिट संगीत देतील असं मेहबूबना वाटल्यामुळेच त्यांनीं नौशादजींना हा चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी दिला. तेव्हा नौशादनी देखील तपशिलाकडे नजरही न टाकता स्वाक्षरी करून टाकली. कारण मेहबूबजींबरोबर काम करायला मिळणे हीच त्यांच्या लेखी मोठी गोष्ट होती. पण ‘अनमोल घडी’ ची गाणी रचली जात असताना एकदा मेहबूबजी रिहर्सल रुममध्ये येऊन मात्रा, ताल आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात काहीबाही सूचना करू लागले. हे पाहून नौशाद वैतागले. थोड्याच दिवसात त्याच गाण्याचं चित्रिकरण चालू  असताना नौशाद सेटवर गेले. तिथे जाऊन कॅमेरा मूव्हमेंट, फ्रेमिंग, सीनमधील नेपथ्य याबद्दल ते मेहबूबजींना सूचना करू लागले. मेहबूबजींचा राग अनावर होऊन त्यांनी नौशादजींचं बकोट पकडलं. ‘तुम यहां से जाओ, गाना बजाना तुम्हारा काम हैं, इसमें दखलअंदाजी मत करोl’  असा इशारा त्यांनी दिला. तेव्हा नौशाद अदबीने उत्तरले, ‘आप के काम में किसी दुसरेकी दखलअंदाजी आपको अच्छी नही लगती. उसप्रकार संगीत बनाना मेरा काम है, उस काममें कोई दुसरा टांग अडाये, वो मुझे कतई पसंद नहीं l’ हे रोखठोक उत्तर ऐकल्यानंतर मेहबूबजींना आपली चूक कळली. तेव्हापासून उभयतांची मैत्री घट्ट झाली. या चित्रपटातील ‘जवां है मुहब्बत हंसी है जमाना’ हे गाणं फार गाजलं.

      १९४९ मध्ये ‘अंदाज’ मधील दिलीपकुमार, राज कपूर, नर्गिस हा त्रिकोण यशस्वी ठरला. तोपर्यंत या तिघांचंही इंडस्ट्रीत नाव झालं होतं. दिलीप हा गुणी नट असल्याचं मेहबूबजींनी तत्काळ हेरलं. या चित्रपटातून दिलीपने शोकात्म नायकाचं नवं पर्व सुरु केलं. दु:खाचं उदात्तीकरण करून दु:ख कुरवाळत जगण्याची वृत्ती दिलीपच्या नायकाने नेमकी पकडली. ‘अंदाज’ मध्ये कूक्कूचे क्लब डान्स, सुटाबुटातले नायक, पियानो, पार्टी सॉंग्ज असं वातावरण होतं. तसंच वागणं, बोलणं, संवादफेक यात एक नैसर्गिकता होती. कंटाळी डॉयलॉग बाजी,पार्श्वसंगीताचा अतिरेक हे यात टाळण्यात आलं होतं. नौशादजींच्या गाण्यांवर तर लोक झूम झूम के नाचले…हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा लिबर्टीबाहेर प्रीमियरला इतकी गर्दी झाली की पोलीस बोलवावे लागले. चित्रपट तुफान चालला. सिनेमातला हा भावनिक गुंता व त्याची मेहबूबजींनी केलेली हाताळणी नवीन व वेधक होती. हा चित्रपट जोरकस कथा तसेच तांत्रिकदृष्ट्यासुद्धा फार गाजला.

मेहबूब खान यांचे नव्या तंत्राकडे लक्ष असे म्हणूनच त्यांनी ‘आन’ हा चित्रपट कोडकक्रोम या रिव्हर्सल १६ एमएम फिल्मवर बनवला. हा चित्रपट प्रोसेसिंगसाठी लंडनला पाठवला आणि त्याची फायनल प्रिंट ३५ एम एम मध्ये ब्लोअप करण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीत हे प्रथमच घडले होते. हिंदी चित्रपटांत फाईट मास्टरला घेण्याची पद्धत ‘आन’पासूनच सुरु झाली. त्याआधी अगदी स्टंटपटांतही दिग्दर्शकच ही दृश्यं घ्यायचे त्यामुळे त्यास लुटूपुटूच्या दृश्यांचं स्वरूप यायचं. ‘आन’ चित्रपटात ‘नादिरा’चं नामकरणदेखील मेहबूबजींनीच केले. या चित्रपटात दिलीपकुमार, निम्मी, नादिरा, प्रेमनाथ असे कलाकार होते. ‘दिलमें छुपाके प्यारका तूफान ले चले’ हे गाणे खूप गाजले. ‘आन’मुळे दिलीपकुमारची शोकविव्हळ नायकाची प्रतिमा बदलली. यात तो एक्शन, कॉमेडी व रोमान्स करणारा होता. लंडनच्या रियाल्टो थिएटरात तीन महिने चाललेला आणि व्यापारी तत्वावर प्रदर्शित झालेला ‘आन’ हा पहिला चित्रपट. तो जपान, चीन, रशिया, इंडोनेशिया, आफ्रिका इ.ठिकाणी प्रदर्शित झाला. मेहबूबजींनी केलेले ते मोठे धाडसच होते. जगातील १७ भाषांत तो उपशीर्षकांसह प्रदर्शित झाला. जेव्हा जागतिकीकरणाचा अर्थच लोकांना ठाऊक नव्हता, अशा काळात मेहबूबजींना जगाचं भान होतं. हिंदी चित्रपटांच्या व्यापारी कक्षा रुंदावण्याचं काम त्यांनी केलं. म्हणूनच त्यांना ‘युगप्रवर्तक दिग्दर्शक’ म्हणतात.

 

मेहबूब प्रोडक्शनचा पुढचा चित्रपट होता ‘अमर’. या चित्रपटात मधुबाला, निम्मी आणि दिलीपकुमार यांच्या अभिनयाची कमाल होती. या चित्रपटाच्या नायकाच्या व्यक्तिरेखेत नकारात्मक छटा होत्या. हिंदी चित्रपटांत नायक बलात्कार करतो असं क्वचितच दाखवलं जातं. ‘आन’ हा पोशाखीपट तर ‘अमर’ हा शोकपट.

     मेहबूब खान यांना ज्या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने नाव मिळवून दिलं तो चित्रपट होता ‘मदर इंडिया’. ‘औरत’ नंतर १७ वर्षांनी ‘मदर इंडिया’ आला. तोवर देश स्वतंत्र होऊन दहा वर्षे झाली होती. पं.नेहरू यांनी कारखाने, धरणे, कालवे यावर भर दिला होता. कूळ कायदा मोडीत निघाला होता व समाजवादी समाजरचना हे देशाचं उद्दिष्ट होतं. या पार्श्वभूमीवर ‘औरत’चा रिमेक करताना त्यात कालोचित बदल करणं अनिवार्य होतं. आपल्याच एका लोकप्रिय चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा विचार ख्यातनाम दिग्दर्शक मेहबूब खान यांच्या मनात आला. असा अनोखा विचार करणारा हा पहिलाच भारतीय निर्माता-दिग्दर्शक असावा. भारतीय चित्रपटांमध्ये दीनवाणी, मुलावर आंधळं प्रेम करणारी, प्रसंगी त्याच्या चुकांवर पांघरूण घालणारी अशी आईची जी प्रतिमा होती, त्या प्रतिमेला ‘औरत’ या चित्रपटानं तडा दिला गेला होता आणि चुकीने वागणाऱ्या या मुलाला बंदुकीची गोळी घालणारी तडफदार आई ‘औरत’ मध्ये दाखवण्यात आली होती. तब्बल १५ वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक करायचा ठरल्यावर मेहबूब खान यांनी ‘औरत’ चे कथा-पटकथा लेखक बाबुभाई ए.मेहता व संवाद लेखक वजाहत मिर्झा यांना बोलावलं आणि त्यांच्याकडून पटकथा व काही व्यक्तिरेखांमध्ये मोठे बदल करवून घेतले. त्यांच्यासह एस.अली रजा यांचीही मदत घेतली.

 

     स्क्रिप्ट तयार होत असतानाच एक दिवस मेहबूब खान यांची भेट अभिनेत्री नर्गिसशी झाली आणि ‘औरत’ या चित्रपटाचा रिमेक होतोय हे कळताच आपण राधाची-आईची भूमिका करणार, हे नर्गिसनी मेहबूब खान यांच्याकडे जाहीर करून टाकले. त्या प्रभावी अभिनेत्री असल्याने राधाच्या भूमिकेला योग्य न्याय देतील याची मेहबूब खान यांना खात्री असल्यामुळे त्यांनी आनंदाने नर्गिसच्या मागणीला होकार दिला. लवकरच पटकथा आणि संवाद तयार झाले आणि मेहबूब खाननी अभिनयसम्राट दिलीपकुमार यांची भेट घेतली. राधाच्या पतीची-शामूची व बिरजूची या दोन्ही भूमिका दिलीपकुमारनी कराव्यात, असं त्यांना वाटत होतं.परंतु दिलीपकुमार यांनी त्यांची पार निराशा केली. शामूची भूमिका छोटी आहे,तर बिरजूची भूमिका फारच नकारात्मक आहे, अशी कारणं सांगत त्यांनी या चित्रपटाचा हिस्सा बनण्यास नकार दिला. परंतु त्यांच्या नकाराचं खरं कारण वेगळंच होतं. चित्रपटात नर्गिसची भूमिका फारच प्रभावी होती, नवरा घर सोडून गेल्यावर ती तडफदारपणे मुलांना मोठं करते, मुलाच्या चुकीसाठी त्याला बंदुकीने मारते, त्यामुळे निश्चितच राधाची भूमिका प्रेक्षकांना आवडेल, हे दिलीपकुमार यांनी ओळखलं होतं. तसंच चित्रपटांच नांवही स्त्रीप्रधान ‘मदर इंडिया’ असं ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे या चित्रपटात हिरो आपण नसून, नर्गिस आहे हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यावर मेहबूब खाननी बिरजूच्या भूमिकेसाठी स्टार अभिनेत्याला न घेता एखाद्या नव्या होतकरू अभिनेत्याला घ्यायचा निर्णय घेतला, न जाणो दिलीपकुमार यांना वाटणारी भीती अन्य स्टार अभिनेत्यालाही वाटू शकेल. या कारणामुळे त्यांनी बिरजूच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न सुरु केला.

     स्क्रीन टेस्ट घेतल्यावर बिरजू या व्यक्तिरेखेसाठी ज्या कलाकाराच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं ते नाव होतं सुनील दत्त. तोपर्यंत सुनील दत्त यांनी दोन-चार चित्रपटांत काम केलं होतं. सुनील दत्त प्रमाणेच राजेंद्र कुमार या नव्यानेच चित्रपटसृष्टीत आलेल्या कलाकाराला राधाच्या मोठ्या मुलाची रामूची भूमिका देण्यात आली. राधाच्या पतीच्या छोट्या, तरीही नगण्य नसलेल्या भूमिकेसाठी मेहबूबनी स्वत: टेस्ट घेऊन कुलभूषणनाथ या तरुणाला शामूचे काम दिले. त्याचे सिनेमासाठी घेतलेले नाव ‘राजकुमार’. ‘औरत’ या चित्रपटातील एकाही कलाकाराला ‘मदर इंडिया’ मध्ये रिपीट करायचं नाही असा निर्णय मेहबूब खान यांनी सुरुवातीलाच घेतला असला, तरी सुखीलाला या सावकाराच्या भूमिकेसाठी कन्हैयालाल यांच्यासारखा सशक्त अभिनेता मिळेना. ‘औरत’ मध्ये कन्हैयालालनी सुखीलालाची भूमिका इतक्या प्रभावीरीत्या साकार केली होती की, अन्य कुठलाही कलाकार या भूमिकेला त्यांच्या इतका न्याय देऊ शकेल, असं मेहबूब खानना वाटत नव्हतं. त्यामुळे सुखीलालाची भूमिका कन्हैयालाल यानांच द्यायची अशा निर्णयापाशी येऊन ते थांबले. बिरजूच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी साजिद या बालकलाकाराला घेण्यात आलं. मेहबूब साहेब एकदा एका कामगाराला रागवत होते तेवढ्यात एक छोटा मुलगा येऊन त्यांच्यावर खास बंबई हिंदीत ओरडला, ‘ तू मेरे अब्बा को क्यूं डांटता है?’ त्याचा अविर्भाव पाहून मेहबूब हसू लागले. त्यांनी त्याला उचलून घेतले आणि लहान बिरजूची भूमिका दिली. त्याच्या सहज-सुंदर अभिनयावर मेहबूब खान इतके खुश झाले की, चित्रपट पूर्ण होता होता त्यांनी साजिदला दत्तक घेतलं.

          पहिलं शुटींग सुरु झालं ते मेहबूब स्टुडीओमध्ये. राधा, सुखीलाला यांच्या घरातील दृश्ये या स्टुडीओमध्ये चित्रित करण्यात आली. नदीला पूर आल्यामुळे गावामध्ये सर्वत्र चिखल झाला आहे व राधाच्या घराची पडझड झाली आहे, हे प्रसंगदेखील याच स्टुडीओत चित्रित करण्यात आले. घरातील धान्य संपल्यामुळे राधा आपल्या मुलांना खायला देऊ शकत नसते,त्यावेळी सुखीलाला येतो आणि मुलांच्या हातावर चणे ठेवतो. या दयेमागे त्याचा हेतू असतो तो राधाला वश करण्याचा, तिच्यावर आलेल्या दारूण प्रसंगाद्वारे तिचा फायदा घेण्याचा. परंतु स्वाभिमानी राधा मुलांना चणे खायला मनाई करते. रागावलेला सुखीलाला निघून गेल्यावर भुकेमुळे छोटा बिरजू बेशुद्ध पडतो आणि राधाला जाणीव होते की,आपल्या अहंकारापायी मुलाचा जीव जातोय. म्हणून ती चिखलामध्ये चणे शोधू लागते आणि चणे न मिळाल्यामुळे स्वत:चाच निषेध करीत तो चिखल आपल्या चेहऱ्याला लावते. मेहबूब स्टुडीओमधील एका शुटींग फ्लोअरवर चिखल तयार करून हा प्रसंग चित्रित करण्यात येत होता. परंतु सतत १०-१२ दिवस जमिनीवर तयार केल्या गेलेल्या चिखलामध्ये बारीक कृमी,कीटक तयार झाले होते आणि चिखलाला उग्र,घाणेरडा दर्प निर्माण झाला होता. मेहबूब खान एका सीनचे वेगवेगळ्या angles नी शॉटस घेत असल्यामुळे व मनासारखा शॉट होईपर्यंत शुटींग करायंचच,या सवयीमुळे मेहबूब खान अनेकवेळा रिटेक करीत होते आणि चिखलाला उग्र दर्प येत असून, त्यात कृमी आहेत हे माहिती असूनही प्रत्येकवेळी नर्गिसजी तो चिखल आपल्या चेहऱ्याला लावत असत.त्या काळामध्ये त्या स्टार अभिनेत्री होत्या. परंतु हा सीन चित्रित होताना त्यांनी कसलेही नखरे केले नाहीत. सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांना त्या बिरजू व शामू या त्यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या नावानेच हाक मारीत असत.ते दोघेही नवकलाकार असल्यामुळे शुटींगदरम्यान आपल्यासमोर बिचकू नयेत याची नर्गिस काळजी घेत असत.

     मुंबईनंतर या चित्रपटांच चित्रीकरण गुजरातमधील सुरत, बिलिमोरा तसंच महाराष्ट्रात कोल्हापूर, इगतपुरी, नाशिक आदी ठिकाणी करण्यात आलं. परंतु शुटींगदरम्यान अनेक अडीअडचणींना व दोन-एक अपघाती प्रसंगांना मेहबूब खानना सामोरं जावं लागलं.बिलिमोरा इथे काही महत्वपूर्ण सीन्स घेताना व ‘होली आई रे’, ‘गाडीवाले गाडी धीरे हाक रे’, ‘दुख भरे दिन बीते रे भैय्या’ ही गीते चित्रित करीत असतानाच काही प्रसंग घडले. दोन झाडांना दोन मोठे झोपाळे बांधले होते.एका झोपाळ्यावर कॅमेरामन, त्याचा सहाय्यक व अभिनेत्री कुमकुम होते, तर दुसऱ्या झोपाळ्यावर अभिनेता राजेंद्र कुमार उभे होते. कॅमेरा फ्रेममध्ये येणार नाही अशारितीने कॅमेरामन झोपाळ्यामध्ये बसून उंचावर हिंदोळणाऱ्या झोपाळ्यासह वर-खाली होणाऱ्या कुमकुम व राजेंद्र कुमारना कॅमेऱ्यामध्ये चित्रित करीत होते, परंतु चित्रीकरण सुरु असतानाच अचानक कुमुकुम, कॅमेरामन व त्याचा सहाय्यक खाली पडले. कॅमेरा तुटलाच;परंतु तिघेही जखमी झाले. कॅमेरा तुटल्यामुळे पुढील शूटींग होणं शक्यच नव्हतं. शेवटी नवा कॅमेरा खरेदी करण्यासाठी मेहबूब खानना मुंबईला जावं लागलं. त्या काळामध्ये भारतीय बाजारपेठेत मिशल नावाचा आधुनिक तंत्राचा कॅमेरा आला होता. तो खरेदी करून मेहबूब खान पुन्हा बिलिमोराला परतले व तिथलं अन्य शूटींग पार पडलं.

     चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. एका रात्री बिरजू सावकाराला म्हणजेच सुखीलालाला मारण्यासाठी त्याच्या घरात घुसतो.परंतु सुखीलाला मोठ्या शिताफीने त्याला चकवतो व बिरजूला मारण्याचा कट रचतो. हे राधाला कळल्यावर ती बिरजूला सुकलेल्या पेंड्यामध्ये लपवते तोच सुखीलाला आपली माणसं घेऊन बिरजूला मारण्यासाठी येतो. तो सापडत नाही म्हणून सुखीलाला माणसांकरवी पेंड्यांना आग लावतो हे पाहताच राधा आग लावलेल्या पेंड्यांमध्ये बिरजूला शोधू लागते. या प्रसंगाचं चित्रीकरण सुरु झालं, आग लागलेल्या पेंड्यांमध्ये नर्गिस शिरल्या आणि अचानक वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे आगीने आक्राळ रूप धारण केलं. त्यामुळे नर्गिसना आगीतून बाहेर पडता येईना. आगीने चहुबाजूने पेट घेतल्याकारणाने पेटत्या ज्वाळांमध्ये शिरून नर्गिसना बाहेर काढण्याची हिंमत युनिटमधील कुणाला होईना. शेवटी हे धाडस केलं सुनील दत्त यांनी. स्वत:च्या जीवाची परवा न करता ते बेधडक आगीमध्ये शिरले आणि त्यांनी नर्गिसना बाहेर आणलं. नर्गिससह तेही थोडे भाजले होते. मनासारखे सीन्स होईपर्यंत होत असलेले अनेक रिटेक्स, जीवावर बेतणाऱ्या दुर्घटनांमुळे पुन्हा करावं लागणारं चित्रीकरण यामुळे चित्रपट पूर्ण होण्यास तब्बल २ वर्षे लागली. त्याचा परिणाम असा झाला की, ठरवलेल्या अंदाजापेक्षा अधिक पैसा खर्च करावा लागला व त्यासाठी मेहबूब खानना स्टुडीओ, बिलिमोरामधील आपले घर गहाण ठेवावे लागले.

     अखेर २५ ऑक्टोबर १९५७ रोजी मुंबईतील लिबर्टी थिएटरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात ‘मदर इंडिया’ प्रदर्शित झाला आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मेहबूब खान यांची अल्लाहवर नितांत श्रद्धा होती. म्हणूनच त्यांनी चित्रपटावर घेतलेली मेहनत पाहून अल्लाह त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्याच वर्षी कर सवलत योजना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जाहीर केली. या योजनेंतर्गत प्रेक्षकाने खरेदी केलेल्या तिकीटातल्या ७५ टक्के मनोरंजन कराच्या भागामध्ये सरकारतर्फे एक रुपया जमा करून तो कर निर्मात्याला देण्यात येणार होता.या योजनेमुळे मेहबूब खानना फायदा झाला आणि चित्रपटासाठी घेतलेलं सर्व कर्ज ते सव्याज फेडू शकले.

     ‘मदर इंडिया’ इतकी सहनशील तरीही तडफदार, धाडसी व प्रेमळ तरीही तत्ववादी व वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या आईची व्यक्तिरेखा गेल्या साठ वर्षांत भारतीय  चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. समीक्षकांनी ‘मदर इंडिया बिकम्स द प्राइड ऑफ इंडिया’ या शब्दांत त्याची प्रशंसा केली. हा चित्रपट गंभीर,तेवढाच करमणूकप्रधानही. बैलगाडीच्या चाकाबरोबर काळ पुढे चालल्याचं दाखवून प्रपंचातील मुलांची वाढती संख्या मेहबूबजींनी समर्थपणे दाखवली. पावसाची प्रतीक्षा करणारे, आकाशातील मेघांकडे चातकाप्रमाणे पाहणारे शामू व राधा आणि त्याचवेळी तराजूची दांडी लालसेने न्याहाळणारा दुष्ट सावकार सुखीलाला, अशी एकापाठोपाठ एक दृश्यं दाखवून त्यांनी कॉन्ट्रास दाखवला. यात शेतीतल्या कामातले बारीकसारीक तपशील यथार्थपणे दाखवण्यात आले. गाण्यांत नि पार्श्वसंगीतातही  नौशादनी उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचा अतिशय उत्तम वापर केला. ‘दुखभरे दिन बितेरे भैय्या, अब सुख आयोरे, रंग जीवनमें नया लायो रे’ या गाण्यातील अर्थाप्रमाणे त्यांना ‘मदर इंडिया’ या चित्रपटाने अविस्मरणीय केले.      

     चेकोस्लोव्हेकिया कार्लीव्ही व्हेरी महोत्सवात नर्गिसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाबरोबरच ‘मदर इंडिया’ ला राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. ‘मदर इंडिया’ सारखा भव्य,खर्चिक चित्रपट निर्माण केल्यानंतर मेहबूबखान यांना ‘द डेमिल ऑफ इंडिया’ असं नामाभिधान प्राप्त झालं. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीसाठी या चित्रपटाला नामांकन प्राप्त झालं. परंतु दुर्दैवाने केवळ एका मताने हा पुरस्कार हुकला गेला. देशाला पहिल्यांदा सर्वाधिक विदेशी चलन मिळवून देणारा चित्रपट होता ‘मदर इंडिया’. १९५८ ला ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा तो प्रथम भारतीय चित्रपट. ऑस्कर सोहळ्यासाठी मेहबूब व सरदार अख्तर या उभयतांना निमंत्रण मिळालं. १९५७ ला ‘मदर इंडिया’ साठी सर्वोत्तम फिल्म तसेच सर्वोत्तम दिग्दर्शक हे फिल्मफेअर पुरस्कारही  मिळाले. हा चित्रपट आशियाच्या पाचव्या फिल्मोत्सव समारंभात दाखवला गेला. १९६३ साली भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री ’ देऊन मेहबूबजींना देऊन सन्मानित करण्यात आले.

     त्यानंतर मेहबूबजींनी ‘सन ऑफ इंडिया’ चित्रपट केला. या चित्रपटातील ‘नन्हा मुन्ना राही हूं तसेच दिल तोडनेवाले तुझे दिल ढूंढ रहा है’ या गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले.यात मा. साजिदच्या आईचं काम कुमकुमने केलं.मेहबूबजींची पंतप्रधान पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाईंशी मैत्री होती. बोलपटसृष्टीला १९५६ मध्ये २५ वर्षे झाली तेव्हा ‘सन ऑफ इंडिया’ चा त्यांनी पं.नेहरूंसाठी स्पेशल शो केला. त्या सोहळ्यात मेहबूबजींनी पं. नेहरूंचा गौरव करणारं भाषण केलं. चित्रपटाचा विषय भ्रष्टाचार,काळा बाजार, बदमाश राजकारणी हा होता. जलाल मसिहाबादी, रमाशंकर चौधरी व डॉ.सफदर ‘आह’ यांनी मिळून चित्रपटाची पटकथा, संवाद लिहिले होते.

जयंत, कुमार, कन्हैय्यालाल हे त्यावेळचे दिग्गज कलाकार या चित्रपटात होते आणि संगीत होतं नौशादचं. त्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राज कपूर, राज कुमार यांच्यावर देशभक्तीपर गीतं चित्रित करून मेहबूबजींनी ती ‘सन ऑफ इंडिया’ समवेत दाखवली होती. चित्रपट सिनेमास्कोपमध्ये असल्यामुळे व त्याची सोय देशात फार कमी थिएटर्समध्ये होती म्हणून  सिनेमास्कोप निगेटिव्हवरून ३५ मि.मी.च्या प्रिंट्स काढण्यात आल्या. त्या सदोष निघाल्या. मग मेहबूबजींनी त्या अडगळीत टाकल्या व देशातील मुख्य थिएटरात सिनेमास्कोप सुविधा निर्माण करण्याचा आदेश दिला. पण यामुळे त्यांनी ‘मदर इंडिया’ चित्रपटात कमावलेले ‘सन ऑफ इंडिया’त गमावले. पैसा परी पैसा गेला नि हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचा हा सम्राट रंक झाला.

     १९६३-६४ साली मेहबूब यांनी आपले स्नेही मोरारजी देसाई यांच्या अधिपत्याखाली एक ट्रस्ट स्थापला. मेहबूब स्टुडीओची जागा कुणालाही विकता येणार नाही, अशी तरतूद केली. परिस्थितीतून झगडत दिगंत कीर्ती संपादन करणारा हा माणूस. त्यांच्या कंपनीत हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदत. त्यांनी भारतीयांमध्ये सहिष्णुता रुजवली. राज कपूर, ख्वाजा अहमद अब्बास, चेतन आनंद, बलराज सहानी, बी.आर. चोप्रा, गुरुदत्त, कैफी आझमी आणि मेहबूब खानसारख्या चित्रपटकर्मीनी गांधी-नेहरूंनी सुद्धा त्यांच्या त्या कार्यात साथ दिली!

     भारतीय स्त्रियांबद्दल मेहबूबजींना सहानुभूती होती. गरिबीबद्दल त्यांना आस्था होती. कारण मेहबूबजीं गरिबीतूनच वर आले होते. त्यांच्या चित्रपटांतील स्त्रिया वीरमाता असत आणि चित्रपटांत गरीबांचा विजय होत असे. हिंदी चित्रपट उद्योगात  ‘संघटनात्मक एकजूट’ निर्माण करण्यात मेहबूब यांची कामगिरी मोठी होती. ‘ऐलान’मध्ये त्यांनी मुस्लीम स्त्रियांना साक्षर करण्याची गरज प्रतिपादन केली. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी कलाकार तडफडत असत कारण अगदी मनापासून काम करणारे ते दिग्दर्शक होते. मधुबाला, मीनाकुमारी आणि नूरजहांचे करिअर करण्यात मेहबूबांचा खूप मोठा वाटा होता.

२८ मे १९६४ रोजी मेहबूब खान पैगंबरवासी झाले. मेहबूबजींना ५८ वर्षाचं आयुष्य लाभलं. ज्यांनी स्वतंत्र भारताच्या चित्रपट इतिहासावर आपली मुद्रा कोरली, त्यांना दीर्घायुष्य काही लाभलं नाही. विख्यात निर्माते-दिग्दर्शक मेहबूब खान यांनी कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नव्हते, तरीपण त्यांची चित्रपट माध्यमावर पकड होती हे त्यांच्या सर्व चित्रपटांवरून दिसून येते.

     ‘ भारतीय सिनेमा के अग्रणी निर्माता-निर्देशक,हिंदी सिनेमा जगतके युगपुरुष मेहबूब खान l जिन्होने उच्च स्तर के चलचित्रोंका निर्माण किया और क्लासिक फिल्मोंका तोहफा दिया l भारतीय इनपर गर्व करते है और करते रहेंगे l

              

 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.