– अजिंक्य उजळंबकर
Remembering hindi film actress shobhana samarth who began her career in the early days of talkie movies in the Hindi film industry. हिंदी सिनेसृष्टीत ‘कपूर’ घराण्याप्रमाणेच आणखी एका घराण्याने अभिनयाच्या ‘समर्थ’ परंपरेला ९० वर्षे पूर्ण केली आहेत. नावाप्रमाणेच समर्थ घराणे! ‘शोभना समर्थ’. “१९४० च्या दशकातील हिंदी सिनेमाची सीता” अशी ज्यांची ओळख रसिकांच्या मनात घर करून बसली होती. १७ नोव्हेंबर १९१६ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आई रत्तनबाई शिलोत्री यांनी १९३१ साली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला व त्यांच्याकडूनच मिळालेला हा वारसा पुढे नेणाऱ्या शोभना यांनी वयाच्या १९ व्या वर्षीच म्हणजे १९३५ साली ‘ऑर्फन्स ऑफ सोसायटी’ या सिनेमाद्वारे अभिनयाला सुरुवात केली.

शोभना समर्थ माहेरच्या ‘शिलोत्री’. ‘सरोज शिलोत्री’ हे त्यांचे मूळ नाव. ब्रिटिशकालीन भारतात १९२० च्या दशकात, मुंबईत बँकिंग व्यवसायाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली अशा काही मोजक्या लोकांमध्ये आघाडीचे नाव म्हणजे शोभना यांचे वडील वडील प्रभाकर शिलोत्री. ‘शिलोत्री बँक’ नावाने त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. दुर्दैवाने व्यवसायात नुकसान होऊन दिवाळखोरी घोषित करावी लागली व शिलोत्री कुटुंब बँगलोरला स्थायिक झाले. १९३१ च्या डिसेंबर महिन्यात शिलोत्री यांचे हृदयविकाराने निधन झाले व त्यानंतर शोभना आईसोबत पुन्हा मुंबईत आपल्या भावाकडे परतल्या. त्यांचा भाऊ म्हणजे अभिनेत्री ‘नलिनी जयवंत’ यांचे वडील. आर्थिक विवंचनेत असलेल्या शोभना यांच्या आई रत्तनबाई चित्रपटातून अभिनय करू लागल्या व त्यांच्या मागोमाग शोभना सुद्धा. परंतु शोभना यांच्या चित्रपटात काम करण्याला त्यांच्या मामांचा म्हणजेच ‘नलिनी जयवंत’ यांच्या वडिलांचा विरोध होता. म्हणून रत्तनबाईंनी भावाचे घर सोडले. पुढे १० वर्षांनी याच भावाची मुलगी म्हणजेच नलिनी जयवंत चित्रपटात काम करू लागल्या हे विशेष!

पुढे शोभना शिलोत्री यांचे लग्न झाले ‘कुमार सेन समर्थ’ या दिग्दर्शकासमवेत जे जर्मनीहून सिनेछायाचित्रणाचा विशेष कोर्स करून परतले होते. ‘शोभना यांचा सिनेमा मधील अभिनय प्रवास असाच पुढे चालू राहील’ या अटीवर दोघांचा विवाह झाला. या जोडप्यास तीन मुली व एक मुलगा झाला. अभिनेत्री नूतन व तनुजा या दोन मुली, तिसरी मुलगी चतुरा आणि मुलगा जयदीप. चतुरा व जयदीप या दोघांनी कधीही सिनेमातून काम केले नाही. पुढे नूतन यांची समर्थ अभिनय परंपरा त्यांचा मुलगा मोहनीश बहेल याने पुढे सुरु ठेवली तर तनुजा यांचा समर्थ वारसा चालविला मुलगी काजोलने! काजोल व मोहनीश म्हणजे या घराण्याची अभिनयातील ही चौथी पिढी आहे.

कुमारसेन समर्थ आणि शोभना यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे ती दोघे वेगळे रहात असत. ही फारकत झाल्यावर शोभना व अभिनेते मोतीलाल यांच्यात जवळीक निर्माण झाली. १९५० साली शोभना यांनी नूतन व तनुजा यांना रुपेरी पडद्यावर ब्रेक देण्यासाठी म्हणून ‘हमारी बेटी’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती ज्यात पडद्यावर नूतन व तनुजा यांच्या वडिलांच्या भूमिकेत मोतीलाल होते. त्यानंतर परत एकदा ‘अनाडी’ या ‘राज कपूर-नूतन’ जोडीच्या चित्रपटातही मोतीलाल हे नूतन यांच्या पालकाच्या भूमिकेत दिसले. १९६० साली परत एकदा नूतन-तनुजा यांना घेऊन त्यांनी छबिली या चित्रपटाचे निर्मिती-दिग्दर्शन केले.

१९३५ ते ५० या पंधरा वर्षांमध्ये शोभना यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या. पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली राम राज्य व भरत मिलाप या सिनेमांमधून त्यांनी केलेल्या सीतेच्या भूमिकेमुळे. १९४२-४३ साली आलेल्या या चित्रपटांमधील शोभना यांनी साकारलेली सीता रसिकांना इतकी काय आवडली कि त्याकाळी कित्येक कॅलेंडर्स वर सुद्धा सीतेच्या जागी यांचे छायाचित्र असायचे. १९४१ साली पती कुमारसेन समर्थ दिग्दर्शित मराठी चित्रपट घर जावई मध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती ज्यात त्यांच्यासोबत होते दामुअण्णा मालवणकर.

ज्या काळात चित्रपटात अथवा नाटकात स्त्रियांनी काम करणे निषिद्ध मानले जायचे अशा काळात शोभना यांनी आपल्या आईची अभिनय परंपरा तर पुढे नेलीच पण त्याही पुढे जाऊन आपल्या पुढल्या पिढीतही ती रुजवली. अगदी समर्थपणे.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment