– धनंजय कुलकर्णी, पुणे
‘माझा आवाज चांगला आहे आणि मी कोणत्याही प्रकारचे गाणे गावू शकते याचा मला आत्मविश्वास आहे. जर आपण मला गायची संधी नाही दिली तर मी समुद्रात उडी मारून माझं जीवन संपवून टाकेन!’ एक नवोदित गायिका चाळीसच्या दशकात संगीतकार नौशाद यांना अशी धमकी वजा आज्ञा करीत होती. नौशाद मियां चपापले. त्यांच्या नावाची शिफारस घेवून उत्तर प्रदेशातून हि मुलगी घरातून पळून आली होती. प्रसंग बाका होता पण नौशाद यांनी तो संयमाने हाताळला. त्यांनी तिला शांत केले. तिला समजावले. तिच्या आवाजाची चाचणी घेतली आणि तिला गायची संधी दिली. पहिल्याचं गाण्याने ती देशभरात पोचली. गाणं होतं ’अफसाना लिख रही हूं दिले बेकरार का..’ या गायिकेचं नावं होतं उमा देवी. (Remembering Hindi Cinema’s popular Singer Actress Uma Devi aka Tun Tun)
नूरजहां, राजकुमारी, जोहराबाई अंबालीवाला, खुर्शीद या तिच्या समकालीन गायिका. याच सिनेमातील ’आज मची है धुम धुम मची है धुम ’, ये कौन चला’ गाण्याबरोबरच सुरैया सोबत तिने गायलेलं ’बेताब है दिल दर्दे मुहोब्बत के असरसे जिस दिन से मेरा चांद छुपा मेरी नजरसे’ ची जादू आजही रसिकांच्या दिलात कायम आहे. या सिनेमातील गाण्यांनी उमादेवी एकदम चोटीची गायिका बनली. ए आर कारदार यांनी तिच्याशी गाण्यासाठी करार केला. अनोखी अदा, नाटक या सिनेमातून गाता गाता तिला मद्रासच्या एस एस वासन यांच्या ’ चंद्रलेखा ’ या भव्य बिग बजेट सिनेमातील सातही गाणी गायची संधी मिळाली. तिच्या आवाजावर फिदा होवून दिल्लीच्या एका युवकाने तिला मागणी घातली व तिच्याशी लग्न केले. स्वातंत्र्यानंतर हिंदी सिनेमा संगीतात मन्वंतर घडलं. मंगेशकर भगिनींच्या आगमनाने ’सारेच दीप मंदावले आता अशी अवस्था झाली. उमादेवी ला देखील गाणं मिळणं बंद झालं. उणीपुरी तीन वर्षाची तिची पार्श्वगायनाची कारकिर्द. वयाच्या पंचविशीतच तिची गायनाची इनिंग संपुष्टात आली. तिच्या पहिल्याच गाजलेल्या गाण्याची जादू एवढी होती की १९७५ साली आलेल्या ’जय संतोषी मॉं’ या सिनेमातील ’करती हूं तुम्हारा व्रत मै स्विकार करो मां..’ हे गाणं याच गाण्याच्या तंतोतंत चालीचं होतं!
पण तिने स्वत:ला बदललं. ती आता चांगलीच गरगरीत झाली होती. सेटवर तिच्या गमती जमती, नकला नौशाद यांनी पाहिल्या होत्या. नौशाद त्यावेळी ’बाबुल’ ला संगीत देत होते. त्यांनीच उमादेवीला आता गाणं विसरून अभिनयाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. आणि भारतीय सिनेमातील पहिल्या हास्य अभिनेत्रीचा जन्म झाला. उमादेवी हे नाव पुसून ती टूनटून या नावाने अभिनयाच्या मैदानात उतरली. १९५० ते १९९० तब्बल चाळीस वर्षे ती विनोदी भूमिका करीत होती. आपल्या कडे विनोदी अभिनयाला फारसं गांभीर्याने कुणी घेत नाही. तरी गुरूदत्त ने आरपार, मि अॅन्ड मिसेस ५५, प्यासा या सिनेमातून तिला चांगल्या पध्दतीने पेश केलं. लठ्ठपणा हेच तिच्या विनोदाचं भांडवल होतं. मिळेल ती भूमिका ती करत राहिली. एकेकाळची ती गायिका होती हे ती पण विसरून गेली. तिच्या अडीचशे सिनेमातील भूमिकांपेक्षा रसिकांना तिच्या अडीच सिनेमातील साताठ गाण्यांनी आयुष्यभर पुरेल इतका आनंद दिला आहे.
हेही वाचा – तेरे बिना जिंदगी से कोई…संजीव कुमार
