-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

साठच्या दशकातील सुपरस्टार राजेंद्र कुमारला (Actor Rajendra Kumar) खरं तर अभिनेता व्हायचं नव्हतं; त्याला दिग्दर्शक व्हायच होतं! फाळणीनंतर तो जेंव्हा महानगरीत आला त्या वेळी दिग्दर्शक एच एस रवेल  यांच्याकडे त्याने सहायक म्हणून काम सुरू केले. पतंगा, सगाई, पॉकेटमार या सिनेमांकरीता दिग्दर्शन सहाय्य करताना केदार शर्मा यांनी ‘जोगन’ सिनेमात एक छोटी भूमिका दिली. या सिनेमाचा नायक दिलीपकुमार होता. ही भूमिका बघून देवेंद्र गोयल यांनी १९५५ साली ‘वचन’ सिनेमात मोठी भूमिका दिली. (हा संगीतकार रवि यांचाही पहिला हिट सिनेमा ठरला) यात त्याच्या सोबत गीताबाली होती पण ती त्याच्या बहिणीच्या भूमिकेत होती. या सिनेमाकरीता त्याला पंधराशे रूपये मानधन मिळाले होते. सिनेमा सिल्वर ज्युबिली हिट झाला. ‘अ न्यू स्टार इज बॉर्न’ अशी बाबूराव पटेलांनी त्याची प्रशंसा केली. (Remembering Hindi Cinema’s Jubilee Star from Golden Era Rajendra Kumar) 

पण राजेंद्र कुमार अजूनही सेफ गेम खेळत होता. त्याने रवेल यांची साथ सोडली नाही. तो असं का वागत होता? याचे कारण त्याने ऐश्वर्य आणि त्यानंतरची गरीबी दोन्ही अनुभवले होते. त्याच्या वडीलांचा कराचीला टेक्सटाईलचा मोठा उद्योग होता. तिथे त्यांची मोठी प्रॉपर्टी होती. पण फाळणीने सारेच चित्र बदलले. सर्व मालमत्ता सोडून त्यांना भारतात परतावे लागले होते. श्रीमंती नंतरची गरीबी जास्त पीडादायक असते. या काळाने राजेंद्र कुमारला वयाच्या मानाने अधिक प्रौढ, विचारी बनवले. १९५६ साली व्ही. शांताराम यांच्या ‘तूफान और दिया’ या लो बजेट सिनेमाने मोठे यश मिळविले. हा सिनेमा पाहूनच मेहबूब खान यांनी राजेंद्र कुमारला ‘मदर इंडिया’त मुख्य भूमिकेत घेतले. या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टार बनवले. यानंतर त्याच्या हीट सिनेमांचा रतीब सुरू झाला. अल्पावधीतच त्याला मिडीयाने ‘ज्युबिली कुमार’ हे नाव दिले.

हीट सिनेमांची भली मोठी रांगच त्याने उभी केली. त्याच्या स्वभावाला अनुकूल असलेल्या आदर्श मुलाच्या, प्रामाणिक प्रियकराच्या, समंजस कुटुंब वत्सल व्यक्तीच्या भूमिका त्याला मिळत गेल्या. गूंज उठी शहनाई, ससुराल, आई मिलन की बेला, कानून, प्यार का सागर, घराना, धर्मपुत्र, आस का पंछी, मेरे मेहबूब, दिल एक मंदीर, संगम, आरजू, सूरज, झुक गया आसमान, साथी, तलाश…. या सर्व चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवी यश मिळविले. समीक्षकांनी मात्र कायम त्याची दिलीप कुमारची भ्रष्ट नक्कल म्हणून संभावना केली. त्याच्यावर दिलीपच्या अभिनयाचा पगडा होताच. (संगम करीता राज कपूरची पहिली पसंती दिलीपच होता.) राजेंद्र कुमारच्या भावस्पर्शी भूमिका काही कमी दर्जाच्या नव्हत्या. ‘मीना कुमारी सोबत राजेंद्रकुमार ही पडद्यावरची सर्वात परफेक्ट पेअर होती’ असा कबुली जबाब दस्तुरखुद्द कमाल अमरोही यांनी दिला होता. कितीतरी म्युझिकल हिट सिनेमांचा तो नायक होता.

विशेषतः प्रेमाच्या त्रिकोणी कथानकावर आधारीत त्याचे सिनेमे प्रचंड गाजले. बी. सरोजा देवी, कुमकुम ते वैजयंती माला, वहिदा, हेमा, रेखा हा त्याचा नायिकांबाबतचा चढता आलेख होता. सत्तरच्या दशकात मात्र त्याची जादू ओसरू लागली. त्याने त्याचा ‘डिंपल’ नावाचा कार्टर रोड वरील अलिशान बंगला राजेश खन्नाला विकला. (हा बंगला त्याने भारत भूषण कडून विकत घेतला होता) आणि राजेशचे नशीब फळफळले. त्याचा भाऊ नरेशकुमार आणि मेव्हणे ओ पी रल्हन यांच्या सिनेमातून तो कायम पडद्यावर येत राहिला. सावनकुमार यांच्या ‘साजन बिना सुहागन’ पासून चरीत्र अभिनयात त्याने रंग भरायला सुरूवात केली. आपल्या मुलाचे करीयर घडविण्यात मात्र तो यशस्वी झाला नाही. दिलीप-राज-देव या सदाबहार त्रिकूटाची कारकिर्द बहरात असताना १९५७ ते १९६७ हे दशक राजेंद्रने गाजवले.

हेही वाचा – जिंदगी का सफर है ये कैसा सफर…..राजेश खन्ना

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.