-अजिंक्य उजळंबकर 

आज मोठा विलक्षण व काहीसा दुर्दैवी योगायोग आहे. आज कथाकार व नाटककार विजय तेंडुलकर यांचा जन्मदिन आहे व सोबतच प्रतिभासंपन्न अभिनेते ओम पुरी यांचा स्मृतिदिन. विजय तेंडुलकरांचा जन्म आजच्या दिवशी १९२८ साली झाला तर ओम पुरी यांचे निधन आजच्या दिवशी २०१७ साली झाले. या दोन महान व्यक्तींच्या करिअरला वळण देणारा एक कॉमन पॉईंट आहे ज्याची माहिती या दोघांचे चाहते वगळता इतर फार मोजक्या लोकांना असावी. तो कॉमन टर्निंग पॉईंट कोणता हे आजच्या दिवशी जाणून घेणे महत्वाचे ठरते. 

विजय तेंडुलकर लिखीत ‘शांतता कोर्ट चालू आहे’ व ‘सखाराम बाईंडर’ या दोन नाटकांच्या यशानंतर १९७२ साली आलेले व तुफान गाजलेले नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. १८ व्या शतकातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या नाटकाने केवळ मराठी नाट्यसृष्टीतच नव्हे तर जागतिक रंगभूमीच्या पटलावर इतिहास रचला. ६००० च्या वर प्रयोग झालेल्या या नाटकाच्या यशामुळे तेंडुलकरांना जवाहरलाल नेहरू फेलोशिप मिळवून दिली जिचा उपयोग तेंडुलकरांनी एका प्रोजेक्टसाठी म्हणून आपल्या शोधनिबंधासाठी केला. जब्बार पटेल दिग्दर्शित या नाटकात रमेश टिळेकर यांनी घाशीराम तर मोहन आगाशे यांनी नाना फडणवीस या व्यक्तिरेखा रंगविल्या होत्या. १९७२ ते ७५ या वर्षांमध्ये घाशीराम कोतवाल या नाटकाने अभिनय, दिग्दर्शन व लेखन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष ना वेधले असते तर नवल! १९७५ साली आणीबाणी लागली. यादरम्यान दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे धडे गिरवून एक विद्यार्थी पुण्याच्या एफटीआय मध्ये दाखल झाला. या विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती एफटीआय मध्ये प्रवेश घेतल्यावर अंगात घालायला थोडाफार धड असा शर्ट पण नव्हता. हा विद्यार्थी म्हणजे ओम पुरी. 

Mohan Agashe and Om Puri in Ghashiram Kotwal film.
Mohan Agashe and Om Puri in Ghashiram Kotwal film. Courtesy-Mubi

आपला मित्र नसिरुद्दीन शाहच्या आग्रहाखातर ओम पुरी यांनी एफटीआय मध्ये प्रवेश घेतला होता परंतु खिशात फीस भरण्याइतके सुद्धा पैसे नव्हते. एफटीआय मध्ये शिकत असलेले व काही शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी मग ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक सिनेमा रूपात आणायचे ठरवले. त्यासाठी ‘युक्त’ नावाची संस्था स्थापन केली ज्यात १६ विद्यार्थी होते. सिनेमाच्या निर्मितीसाठी एका नॅशनलाईज बँकेतून दीड लाखाचे कर्ज काढले. दिग्दर्शनाची जबाबदारी चौघांनी घेतली. के. हरिहरण, मनी कौल, सईद मिर्झा व कमल स्वरूप ही ती चार नावे. यातील के. हरिहरण हे तेंव्हा एफटीआय च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते तर मणी कौल हे त्यांना बरेच सिनिअर होते. हे चौघे जाऊन तेंडुलकरांना भेटले व सिनेमाची पटकथा लिहिण्याची विनंती केली जी तेंडुलकरांनी मान्यही केली. चित्रपटातील दोन प्रमुख भूमिकांपैकी नाना फडणवीस यांची भूमिका मोहन आगाशे यांनाच देण्यात आली व घाशीराम या भूमिकेसाठी ओम पुरी यांचे नाव फायनल झाले. ‘घाशीराम कोतवाल’ चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला खरा परंतु जो इतिहास नाटकाने घडविला त्याची पुनरावृत्ती चित्रपटाला करणे काही जमले नाही. परंतु  १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाद्वारे ओम पुरी या कलाकाराचा मेनस्ट्रीम व्यावसायिक सिनेमा माध्यमात प्रवेश झाला व हिंदी सिनेमास व त्यानंतर जागतिक सिनेमास एक अत्यंत प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र व महान कलाकार ओम पुरी यांच्या द्वारे मिळाला. त्याबद्दल खरंतर तेंडुलकरांचे व चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतलेल्या चौघांचे आभार मानावयास हवे. 

Ghashiram Kotwal film

तेंडुलकरांनी लिहिलेल्या कथा-पटकथेवर आधारित ‘आक्रोश’ (१९८०) व ‘अर्धसत्य’ (१९८४) हे दोन चित्रपट म्हणजे ओम पुरी यांच्या करिअरमधील मैलाचे दगड समजले जातात. आक्रोशने ओम पुरी यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार तर अर्धसत्यने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तर असं हे नातं होतं विजय तेंडुलकर व ओम पुरी यांचे. या नात्याला नाव नव्हते पण जणू काही एक ऋणानुबंध. विजय तेंडुलकर लिखित व ओम पुरी अभिनीत ‘घाशीराम कोतवाल’ सिनेमास व्यावसायिक यश मिळाले नाही परंतु लेखन व अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजही हा सिनेमा दाखविला जातो. अशा दोन महान विभूतींना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन व आदरांजली. 

Aakrosh film posterArdhsatya film poster

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment