कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना  

© विवेक पुणतांबेकर

‘मेरा नाम जोकर’ रिलिज झाल्याला आज पन्नास वर्षे झाली. त्याच्या निर्मितीची ही कहाणी.

या सिनेसृष्टीची एक गंमत आहे अनेकदा कलात्मक महत्वाकांक्षी सिनेमांनी निर्मात्यांचा घात केलाआहे. काही सिनेमे कालांतराने यशस्वी होतात. यातलाच एक मेरा नाम जोकर. राज कपूर वर चार्ली चॅप्लिन चा प्रचंढ प्रभाव होता. चार्लीची विदूषकाची भारतीय प्रतिमा राज कपूर नी अनेक सिनेमातून साकारली. १९५२ साली चार्ली चा सिनेमा द लाईम लाईट रिलिज झाला. या सिनेमाने भारावलेल्या राजकपूर नी यावर हिंदीत सिनेमा निर्माण करायचा विचार केला. अर्थातच नायिका असणार होती नर्गीस. पण हा विचार मागे पडला. मग नर्गीस आर.के.फिल्मस् मधून बाहेर पडली. जिस देशमे गंगा बहती है च्या यशानंतर परत या सिनेमाचा विचार सुरु झाला.

के.ए.अब्बास नी कथा पटकथा पण लिहीली. तेव्हड्यात इंदर राज आनंद ची पटकथा घरोंदा वाचनात आली आणि जोकर चा विचार मागे पडला आणि संगम चा मुहुर्त झाला. त्याच वेळी सरदार चंदुलाल शहांनी बहेरुपिया या विदूषकाच्या  जीवनावर आधारित सिनेमात राज कपूर ना नायकाची भुमिका ऑफर केली. राज कपूरनी स्वीकारली. शूटींग सुरू झाले. सहा रीळे तयार झाली. शेअर बाजारात आलेल्या मंदीचा फटका चंदुलाल शहांना बसला आणि सिनेमा निर्मिती बंद पडली. या अर्धवट राहिलेल्या सिनेमातले गाणे नाचे गाये झुमके फिल्म ही फिल्म सिनेमात वापरले गेले तसेच यु ट्युबवर पण पहायला मिळते. इकडे संगम च्या निर्मितीत राजकपूर गुंतले. संगमच्या भव्य यशानंतर राजकपूर नी मेरा नाम जोकर च्या निर्मितीला सुरवात करायचे ठरवले.

mera naam joker

लेखक दिग्दर्शक के.ए.अब्बास ना पटकथेत सुधारणा सुचवल्या. हे साल होते १९६३. मात्र याच साली दोन घटनांनी राज कपूर अतिशय हादरले. संगम च्या वेळची वैजयंती माला बरोबर ची त्यांची जवळीक कृष्णा कपूर ला अस्वस्थ करुन गेली. त्यातच मीठ मसाला लावून परदेश दौर्‍यातल्या तथाकथित कथा कृष्णाकपूर च्या कानावर पडतील याची व्यवस्था काही विघ्नसंतोषी मंडळींनी केली. संगम च्या बंगलोर प्रिमीयर शो च्या नंतर संतप्त कृष्णा कपूर मुलांसकट घर सोडून नटराज हाॅटेल (आताचे अॅम्बॅसिडर हाॅटेल ) मधे रहायला गेल्या. या घटनेने राजकपूर खचले. पिणे अतोनात वाढले. रोज पृथ्वीराज कपूर, मुकेश, दिलिप कुमार, विश्व मेहरा आणि कपूर परिवारतली सर्व मंडळी त्यांची समजूत घालून परत येण्याची विनवणी करत होती. सहा महिन्यानंतर कृष्णा कपूर घरी परतल्या. या आपत्तीतून राज कपूर बाहेर पडले तेव्हढ्यात इन्कमटॅक्स ची धाड आर.के.स्टुडियो आणि राजकपूर यांच्या घरावर पडली. बेहिशोबी चाळिस लाख रुपये सापडले. आपल्या राजकीय ओळखीचा वापर करुन राज कपूर कसेतरी या प्रकरणातून बाहेर आले. त्याच वर्षी पुण्याजवळ लोणी काळभोर ला १०२ एकर जमीन राजकपूर नी विकत घेतली. याच जागेवर आपले फार्म हाऊस राजबाग तयार केले.

mera naam joker

 

सबंध आर.के. टिम समोर मेरा नाम जोकर च्या पटकथेचे वाचन राजबागेत झाले. राजकपूर ना हा सिनेमा तीन भागात काढायचा होता. सर्कस ची पार्श्वभुमि होती साहजिकच भव्य सेटस् लागणार होते शिवाय सर्कशीचा सहभाग हवा होता. कमीत कमी सहा महिने तरी शूटींग चालणार होते. शिवाय जगातल्या भव्य अश्या रशियन सर्कस चा सहभाग घ्यायची संकल्पना राजकपूर नी सुचवली. अपुर्‍या परकीय चलनामुळे रशियात जाऊन शूटींग करणे शक्य नव्हते. रशियन सर्कस आशिया  दौर्‍यात भारतात येणार होती. त्यांच्या बरोबर एकत्र काम करायला जेमिनी सर्कस च्या मालकांनी होकार दिल्यावर कलाकारांची निवड सुरु झाली. छोट्या राजू चा रोल ऋषिकपूर ला दिला. अचला सचदेव ‘सिम्मी गरेवाल मनोजकुमार, राजेंद्रकुमार, दारासिंग यांची निवड झाल्यावर सर्कस मॅनेजर चा रोल राज कुमार ला आॅफर केला. आधी त्याने होकार दिला पण काही दिवसातच त्याचे नखरे सुरु झाले, मग त्या ऐवजी धर्मेंद्र ची निवड झाली. तिसर्‍या नायिकेचा रोल पद्मिनी ला दिला. दुसरी नायिका शोधायला सुरुवात झाली. रशियन दौर्‍यात राज कपूरना ती सापडली. किस्ना रुबिनकिना ही बॅले डान्सर माॅस्कोच्या बोलशाॅई थिएटर मधे काम करत असे. तिची आई आणि बहिण पण बॅले डान्सर होत्या. दुभाष्या मार्फत राजकपूरनी तिच्याशी संर्पक साधला. तिने काम करायला होकार दिला.

mera naam joker

१९६६ च्या डिसेंबर महिन्यात राजकपूर चा जीवलग मित्र आणि आर.के.फिल्मस् चा आधारस्तंभ शैलेंद्र गेला. हा पण मोठा आघात होता. जबरदस्त मेंटल ट्युनिंग असलेले हे दोन मित्र होते. राज कपूर च्या यशात शैलेंद्र चा वाटा निश्चितच मोठा होता. दोन गाणी आणि अपुरे थीम साॅंग लिहिल्यावर शैलेंद्रची साथ संपली. पद्मिनी लग्न करुन अमेरिकेत स्थायिक होणार होती म्हणून तिसरा भाग आधी चित्रीत केला. तरी सुध्दा काही भागाचे चित्रण परत करावे लागले त्या साठी पद्मिनी अमेरिकेतून मुद्दाम आली. पहिला भाग उदी च्या स्काटीश स्कूल परिसरात आणि सिमला इथल्या टाॅय ट्रेन परिसरात चित्रीत केला गेला. आता मुख्य सर्कसीचे शूटींग बाकी होते. रशियन सर्कस चे येणे लांबले. १९६७ च्या हिवाळ्यात येणारी रशियन सर्कस १९६८ च्या उन्हाळ्यात आली. इथेच अडचणी वाढल्या. एकतर हा उन्हाळा रशियन कलाकारांना सहन होईना. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. इथले अन्न त्यांना पचेना. हे सगळे मार्गी लागे पर्यंत दोन महिने फुकट गेले. सर्कसचा तंबू एयर कंडिशन करावा लागला. यात खर्च वाढत गेला. सर्कसचे खेळ सुरु असताना शूटींग करणे अशक्य होते.या साठी सगळ्या युनिटला पहाटे तंबूत जाऊन शूटींग उरकावे लागे. इनडोअर शूटींग दुपार नंतर आर.के.स्टुडियोत होत असे. त्यात रशियन अस्वलांचे डोके फिरले. ती वेड्यासारखे करु लागली. शेवटी मुंबई फायरब्रिगेडला बोलावून पाण्याचे जोरदार फवारे मारल्यावर ती शांत झाली. या अस्वलांची कितीतरी गमतीदार दृश्ये संकलनात कापावी लागली. रशियन कलाकार मग चित्रणात रंगून गेले. चित्रण संपता संपता मोडके तोडके हिंदी बोलायला शिकले. ट्रॅपिझ चे चित्रण करताना फोटोग्राफर राघू कर्मकार ना खूप मेहनत घ्यावी लागली. एका वेळी दोन युनिटस् शूटींग करत. दुसर्‍या युनिटचे आणि जेमिनी सर्कस च्या मुंबईतल्या मिरवणुकीचे शूटींग के.ए.अब्बास यांनी केले.

शैलेंद्र गेल्यावर हसरत जयपुरींच्या जोडीला नीरज पहिल्यांदाच आर.के.फिल्म मधे सामिल झाले. राज कपूरनी नीरज ना राजबागेत बोलावले. तिथे नीरज नी दोन गाणी लिहिली तितर के दो आगे तितर आणि कहता है जोकर. अनेकदा राजकपूर मध्यरात्री नीरज ना उठवायचे आणि राजबागेत फिरत गाण्यांची चर्चा करायचे. नीरजना सापांची खूप भिती वाटायची. घाबरलेले नीरज साप दिसतो का हे भीत भीत पहात राज कपूर बरोबर चालत रहात. यातूनच नीरज ना सुचले ए भाई जरा देखके चलो. हसरत नी दाग ना लग जाये आणि काटे ना कटे रैना ही दोन गाणी लिहिली. रोज घरी येणारे राज कपूर यायचे बंद झाल्यावर दुखावलेल्या हसरतनी लिहिले जाने कहा गये वो दिन. मूळ चार कडव्यांचे गाणे होते. सिनेमात फक्त दोन कडवी वापरली आहेत. प्रेम धवन नी एक गाणे लिहीले सदके हीर. रफी च्या आवाजात रेकाॅर्ड झालेले हे गाणे कालांतराने लांबी कमी करताना कापले गेले. हल्ली यु ट्युबवर संपूर्ण लांबीचा सव्वा चार तासाचा प्रिंट आला आहे. त्यात हे गाणे आहे. थीम साॅंग च्या चार ओळी शैलेंद्रने लिहिल्या होत्या. हे अर्धवट गीत अनेकांकडून राज कपूरनी लिहून घेतले पण मनासारखे जमेना. शैलेंद्रच्या मोठ्या मुलाने लिहिलेल्या ओळी कल खेल मे हम हो न हो राज कपूर ला खूप पसंत पडल्या आणि जीना यहां मरना यहा गाणे पूर्ण झाले. बंडखोर रुमानियन संगीतकार ईवानेच ने तयार केलेली धून आर.के.फिल्मस् च्या अनेक सिनेमात वापरली होती. त्याचा वापर करुन जीना यहां मरना यहां संगीतबध्द केले. शिवरंजनी रागात जाने कहां गये वो दिन तयार केले.

mera naam joker

आम्रपाली च्या वेळी कंपोझ केलेली धून राज कपूरना आवडल्यामुळे मेरा नाम जोकर मधे वापरुन काटे ना कटे रैना गाणे तयार केले. द लाॅंगेष्ट डे मधले थीम साॅंग विश मी लक गुडबाय पहिल्या भागात वापरले. मेरा नाम जोकर ची गाणि म्हणायला लताबाईंनी नकार दिला. त्यामुळे आशाबाईंना बोलवावे लागले. मेरा नाम जोकरचे पार्श्वसंगीत शंकर जयकिशन नी फक्त चार दिवसात बाॅम्बे फिल्म लॅबमधे तयार केल्याची आठवण प्रसिध्द व्हायोलिन वादक कै. नंदू चवाथे यांनी सांगितली होती. या पार्श्वसंगीताची एक रेकाॅर्ड एच.एम.व्ही.ने काढली होती. सिनेमा तयार झाल्यावर राज कपूरना जाणवले की हा गंभीर प्रेक्षकांना फारसा आवडणार नाही, सुपर हिट होणार नाही पण अगदीच पडेल नसेल. अनेक वितरकांनी दिलेला अॅडव्हांस परत करायची तयारी दाखवली. पण वितरकांनी नकार दिला. संकलन करताना तीन वेगळे सिनेमे न करता एकत्र करायचा राज कपूर यांचा निर्णय चुकला. संकलनात सिनेमा घसरला. पहिले दोन भाग सरस होते. तिसरा भाग कंटाळवाणा झाला. १८ डिसेंबर १९७० ला मेरा नाम जोकर रिलीज झाला.

mera naam joker

 

इंडस्ट्रीमधल्या घाणेरड्या राजकारणाने हा सिनेमा मुद्दाम वाईट माउथ पब्लिसिटी करुन हा सिनेमा साफ पाडला. सर्वस्व पणाला लावलेल्या राजकपूरना ६८ लाखाचा फटका बसला. आपल्या प्रचंढ अहंकारामुळेच राज कपूर परत उभारी घेऊ शकले. दुसरा कोणी कायमचा संपला असता. मेरा नाम जोकर च्या ओवरसीज रिलिज ने राज कपूरना चांगला हात दिला. लॅटीन अमेरिकेत पन्नास आठवडे , ईस्रायल मधे पंचवीस आठवडे आणि रशियात चाळीस आठवडे चालला. १९८० च्या दशकात काटछाट केलेला मेरा नाम जोकर गर्दी खेचू लागला. आर.के. फिल्मस् ला आतापर्यंत जास्तीत जास्त पैसा मेरा नाम जोकर ने दिल्याची कबुली रणधीर कपूर ने मागच्या वर्षी दिलेल्या मुलाखतीत दिली होती. मेरा नाम जोकर च्या अपयशानंतर राज कपूर हिरो म्हणून संपले. या नंतरच्या कल आज और नंतर शंकर जयकिशन ची आर.के.फिल्मस् ची मोनापली संपली. राज कपूर चे दर्जेदार सिनेमे संपले. उरले ते फक्त शोमन. आता तर आर.के.स्टुडियो, कृष्णा कपूर, मोठी मुलगी रितु नंदा आणि ऋषिकपूर पण इतिहासजमा झाले. एका पर्वाचा शेवट झाला. संपले. 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment