-धनंजय कुलकर्णी, पुणे
अभिनेत्री जया भादुरी (Jaya Bhaduri) आणि डिंपल कपाडीया (Dimple Kapadia) या दोघी पडद्यावर एकत्र कधीच आल्या नाहीत पण सत्तरच्या दशकातील सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाच्या त्या अर्धांगिनी बनल्या. या दोघी एकत्र सिनेमात जरी कधी आल्या नसल्या तरी एकाच सिनेमाकरीता दोघींचा विचार झाला होता!. तो किस्सा खूप मजेदार आहे. गुलजार (Gulzar) यांच्या डोक्यात एक विषय होता ’गुड्डी’ या सिनेमाचा. शाळकरी मुलींना सिनेमाच्या असलेल्या ग्लॅमरचा, आकर्षणाचा. ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) या सिनेमाचे दिग्दर्शन करणार होते.
यासाठी त्यांना नवा फ़्रेश चेहरा हवा होता. एकदा गुलजार एच एस रवैल यांच्या घरी गेले असताना त्यांची भेट चुन्नीलाल कापडीया या रवैलच्या मित्राची झाली. कापडीयांच्या सोबत त्या वेळी त्यांची मुलगी डिंपल देखील होती. तेंव्हा ती १३ वर्षाची शाळकरी मुलगी होती. तिला सिनेमाचे भन्नाट आकर्षण होते. गुलजार साहेबांना ’गुड्डी’ (Guddi) करीता अशीच मुलगी हवी होती. मनोमन त्यांनी डिम्पलला कास्ट करून टाकले आता फक्त ऋषिदांना दाखवून त्यांची मान्यता घ्यायची औपचारीकता बाकी होती.
त्याच काळात ऋषिदा पुण्यात एफ टी आय ला एका महोत्सवाचे ज्युरी म्हणून येणार होते. या वेळी त्यांनी एक शॉर्ट फिल्म बघितली व त्यात काम करणारी मुलगी ऋषिदांना ’गुड्डी’ च्या भूमिकेकरीता आवडली. त्यांनी प्राचार्यांकडे त्या मुलीची चौकशी केली. तेंव्हा त्यांना कळाले हि मुलगी म्हणजे जया भादुरी! तिने या पूर्वी सत्यजित रे यांच्या महानगर मध्ये काम केले होते. मग काय गुलजार यांनी चॉईस केलेल्या डिंपलच्या जागी जया आली!
१५ ऑगस्ट १९७१ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ’गुड्डी’ने अफाट यश मिळविले. काय गंमत असते पहा. ऋषिदा जर पुण्यात गेलेच नसते आणि ’गुड्डी’ ची भूमिका जर डिंपलनेच केली तर ’बॉबी’चे काय झाले असते ? आणि जयाला जर ’गुड्डी’ मिळाला नसता तर ती बंगाली सिनेमात परत गेली असती कां? आणि आणि सगळ्यात महत्वाचं सत्तरच्या दशकातील दोन सुपरस्टारची लग्ने कुणाशी झाली असती? या जर तर चीच मोठी गंमत असते.
आज ९ एप्रिल. अभिनेत्री जया भादुरी यांचा वाढदिवस. तिचं अभीष्टचितंन करताना तिच्या पहिल्या सिनेमाची हि इनसाईड स्टोरी तुम्हाला कशी वाटली?
जया बच्चन (Jaya Bachchan) यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे!!