– धनंजय कुलकर्णी, पुणे
हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील विनोदी अभिनेत्यांचा आपण जेंव्हा विचार करू लागतो त्या वेळी जॉनी वॉकरची आठवण प्रकर्षाने येते. ११ नोव्हेंबर १९२६ हा त्याचा जन्म दिवस. त्याचं खरं नाव बद्रुद्दीन काझी. अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत बालपण गेलं. लहानपणी नाशिकमध्ये आइसफ्रूट, भजी, पेपर, बाटल्या विकल्या. पुढे मुंबईत ’बेस्ट’मध्ये ’वाहकाची’ नोकरी केली. (Interesting Facts about the Marriage of an hindi film actor and comedian Johnny Walker)

बेस्ट कंडक्टर बी ९६ हा शर्टावरचा बिल्ला त्यानं खूप वर्ष जपून ठेवला होता. रूपेरी पडद्यावर त्याने एक्स्ट्रा म्हणून एंट्री घेतली. पण पुढे नवकेतन आणि गुरूदत्तच्या संपर्कात आल्यावर त्याला यशचा मार्ग सापडला. जॉनीचा कुठल्याही सिनेमातील अवतार देखणेबल असायचा. वाढलेल्या केसांचा मधोमध पाडलेला ’बंगाली स्टाईलचा भांग’, खोडकर/लब्बाड भाव असलेले डोळे, चालण्याची विशिष्ट ढब आणि पसरट जीवणीतून पिचलेल्या आवाजात ’अबे ’ अरे’ अशी नॉन्स्टॉप बडबड करीत तो वावरायचा. पब्लिक भयंकर खूष असायची जॉनीवर!

त्याच्या लग्नाची गोष्ट फारच धमाल आहे. गुरूदत्तच्या ’आरपार’ या सिनेमात त्याच्यासोबत नूर नावाची अभिनेत्री होती. (अरे ना ना तौबा तौबा कसे होगा हे गीत गाणारी) अभिनेत्री शकीला ची प्रत्यक्ष आयुष्यातील ती सख्खी बहीण होती. सिनेमाच्या शूटींगच्या दरम्यान जॉनी व नूर एकमेकाच्या प्रेमात पडले. तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. पण ’सच्चे प्यार को दुनियाकी कोई भी ताकत रोक नही सकती’ या उक्तीप्रमाणे त्यांनी चक्क पळून जावून लग्न करायचे ठरवले. १६ ऑगस्ट १९५५ हि तारीख देखील ठरली. अगदी पिक्चर स्टाईल मध्ये त्यांनी लग्न करायचे ठरवले. सर्व प्लॅन फिक्स झाला. जॉनीने टॅक्सीने नूरच्या घरी जायचे ; या त्यांच्या टॅक्सी मागे एक कार ज्यात त्याचे काही मित्र त्यांना फॉलो करत जाणार. नूरच्या कुटुंबीयांनी जर पाठलाग केलाच तर या कार मधील मित्र त्यांच्या मदतीला धावून येतील! आदल्या रात्री जॉनीला काही झोप लागली नाही. पहाटे मुंबई जागी झाली ती घोषणा, आंदोलनाच्या आवाजाने. त्या वेळी गोवा मुक्ती संग्राम आंदोलन जोरात चालू होते. जागोजागी निदर्शक रस्ते अडवत होते. दगडफेक, लाठीमार, अश्रूधूर या मुळे आख्खी मुंबई चक्का जाम झाली होती. इकडे नवरदेव कासाविस होत होते आता करायचे तरी काय? पण मागे हटेल तो जॉनी कसला. त्याने आयडीया केली. ’निकाह’ एक दिवस पुढे ढकलला. पण हि बातमी नूरला देणं गरजेच होतं. आता त्याने काय करावे? त्याने चक्क घरातील ग्रामोफोनचे कर्णे घेतले ते टॅक्सीला बांधले आणि ’गोवा किसके बाप का, गोवा तो हिंदुस्तानका’ अशा घॊषणा देत टॅक्सी रस्त्यावर धावू लागली. निदर्शकांना वाटले हा आपलाच माणूस आहे. त्यांनी काही हि गाडी अडवली नाही. तडक आपल्या प्रियतमेच्या घरी पोचला. संकेत, सुचक खुणांनी तिला बाहेर बोलावले व आपल्या निकाहाची तारीख उद्यावर गेल्याचे सांगितले! शांतपणे मग घरी परतला. दुसर्या दिवशी सर्व काही सुरळीत झाल्यावर आपल्या पूर्वीच्या प्लॅन प्रमाणे नूरला घरातून उचलले व त्यांचा निकाह १७ ऑगस्ट १९५५ ला पार पडला! लवकरच त्याने स्वत:च घर घेतलं त्याला नाव दिलं ’नूर महल’

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment