– द्वारकानाथ संझगिरी

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, असं मानलं जातं. माझ्या ‘मूलभूत गरजा’ इथेच संपत नाहीत. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गरजा त्यात जोडाव्या लागतील. रोज अगदी रोजच टीव्हीवर एखादी क्रिकेटमॅच किंवा सिनेमा पाहिल्याशिवाय मी झोपत नाही. मी पूर्ण सिनेमा पाहतोच असं नाही. काही सिनेमा तर ‘धीरे से आजा रे अँखियन में’ किंवा ‘नन्ही कली सोने चली’पेक्षा चांगली अंगाईगीतं असतात. एका चॅनलवर सचिन तेंडुलकरची खेळी असेल आणि दुसर्‍या चॅनलवर मधुबाला तर माझी चलबिचल होते. कुठे स्थिर व्हावं हे कळत नाही. माझी अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी होते किंवा खरं तर इकडे बायको तिकडे मधुबाला अशी! रात्री थोड्याशा पेंगुळणार्‍या डोळ्यांनी पाहणार्‍या सिनेमात जर कॅटरिना कैफ, प्रियंका चोप्रा किंवा विद्या बालन असेल, तर सहसा मी सिनेमाचा शेवट पाहिल्याशिवाय झोपत नाही. माझी बायको गजानन महाराजांची पोथी वाचूनशांतपणे झोपी जाते. या सुंदरींमुळे तिच्या भाषेत ‘बयेमुळे’ माझ्यावर वाईट परिणाम होणार नाही, याची जबाबदारी ती गजानन महाराजांवर सोपविते. सिनेमाचा पडदा खर्‍या अर्थाने माझा दोस्त बनला शाळेतून कॉलेजात गेल्यावर! आमच्या काळी कॉलेजात तरुण पहिल्यांदा ‘मोकळा’ श्वास घ्यायचा. तिथपासून आजच्या श्वासापर्यंत सिनेमा ऑक्सिजनसारखा माझ्याबरोबर आहे. हवेतला ऑक्सिजन मला जगवतो. सिनेमा नावाचा ऑक्सिजन माझं सांस्कृतिक जगणं सुसह्य करतो. हा लेख त्या सांस्कृतिक जगण्याचा एक भाग आहे.

हे सांस्कृतिक जगणं जगताना काही गोष्टींचा आपोआप अभ्यास होत गेला. ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्या आपण सहसा विसरत नाही. मी कॉलेज जीवनात पाहिलेले सिनेमे जवळपास त्या थिएटर्ससह माझ्या लक्षात आहेत. आजही त्या सिनेमांचे एखादे-दोन सिन्म पाहून मी कुठला सिनेमा आहे हे सांगू शकतो. मी व्यवसायाने इंजिनिअर आहे. कॉलेजात असताना माझा केमिस्ट्री हा विषय चांगला होता; पण मला आज याक्षणी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील काहीही आठवत नाही. अपवाद फक्त मिथाईल अल्कोहोलचा! तोही अपवाद का तर अल्कोहोलमध्ये आठवणी ताज्या ठेवायची गुणवत्ता आहे; पण सिनेमा आठवतात. कारण सिनेमा आपल्याला अभ्यासक्रमाला नव्हते. समजा देवानंद किंवा शम्मी कपूर आपल्याला 20 मार्कांचा असता, तर अभ्यास करून मी 16-17 मार्क मिळविले असते; पण आज मी ते विसरलो असतो; पण परीक्षा नव्हती म्हणून हिंदी सिनेमा आवडला आणि त्याचा खर्‍या अर्थाने अभ्यास होत गेला.

dilip kumar, raj kapoor and dev anand

मी 1968-69 च्या सुमारास कॉलेजात असताना दिलीप-राज-देव जरी सिनिअर हिरो झाले असले आणि धर्मेंद्र, जितेंद्र हे हिंदी सिनेमाच्या पडद्याचे इंद्र असले तरी आमच्या मनात राजधिराज ते तिघंच होते. ते मॅटिनीचे दिवस होते. कॉलेजमध्ये वर्गात शिरायचं की नाही, हे मॅटिनी कुणाचा आहे, त्यावर अवलंबून असायचं. या तिघांमध्येही देवानंदचा सिनेमा हे माझ्यासाठी घरचं कार्य होतं. भावाची मुंज महत्त्वाची की देवानंदचा सिनेमा? (विशेषत: बादबान, तमाशा, किनारे किनारे असा क्वचित लागणारा असेल) हे मला ठरवणं कठीण जायचं; पण तरीही दिलीपकुमारचा ‘देवदास’ पाहताना मी बघता बघता देवदास व्हायचो. (तो इफेक्ट शाहरूख खानचा ‘देवदास’ पाहताना आला नाही. आलिशान सेटस् आणि भपक्याने डोळे दीपतात, मनातल्या भावना उचंबळत नाहीत.) किंवा राज कपूरचा ‘श्री 420’ पाहता अंगावर काटा यायचा. या तिघांच्या ती स्टाईल्स होत्या. दिलीपकुमारला नटश्रेष्ठ, ट्रॅजिडीकिंग वगैरे मानणारा एक मोठा वर्ग होता. एक छोटा वर्ग असाही होता की, ज्यांना वाटायचं की, दिलीपकुमार आपला नेहमी शून्यात पाहतो. डायलॉग पुटपुटतो. जगातलं सर्व दु:ख आपल्याच डोक्यावर आहे, असा वावरतो. तो चांगला नट असेल; पण अभिनयातला शेवटा शब्द वगैरे नाही. नसिरुद्दीन शहा किंवा अमिताभ बच्चन त्याच्यापेक्षा उजवे आहेत. मी या गटातला एक होतो. राज कपूरची शैली ही साधारण भोळ्या माणसाची. (प्रत्यक्षात तो भोळा कधीच नव्हता.) हसता हसता रडवणारा. विनोदाची झालर असलेली चार्ली चॅपलीन शैली. ‘श्री 420’ सिनेमात ही शैली त्याने पूर्णपणे विकसित केली आणि पुढे ती प्रत्येक सिनेमात डोकावत राहिली आणि तिसरा देव आनंद.

पूर्ण स्टाईलला अभिनयाच्या साच्यात बसवणारा एक अफलातून सुंदर चेहर्‍याचा हिरो. त्याला मारामारी करतानाही स्टाईलचा मोह सुटला नाही. या स्टाईलचा बाहेर तो एखाद-दोन सिनेमांत आला. उदा. अर्धा मुनीमजी, अर्धा हम दोनो, पाव गाईड वगैरे; पण एरवी स्वत:च्या स्टाईलच्या तो इतका प्रेमात होता की, तो इतर गोष्टी विसरला; पण त्याची स्टाईल इतकी देखणी आणि मन लुभावणारी होती की, आम्हालाही देवानंद इन्स्पेक्टर असो किंवा लेखक किंवा डॉक्टर तो आधी देवानंद असावा ही अपेक्षा होती; पण एक गोष्ट सांगतो, प्रेम करणारा, रोमान्स करणारा, प्रेयसीची छेडछाड करणारा ‘अभी ना जाओ छोडकर’ म्हणणारा किंवा ‘कैंद मांगी थी रिहाई तो नहीं मांगी थी’ असं प्रेयसीला प्रेमळपणे सुनावणारा देवानंद पाहत रहावास वाटायचा. या तिघांच्या पलीकडे एक स्टाईल होती, ती दिलीपकुमार आणि भारतभूषण (खरं तर भारत भीषण) यांची पुतळा स्टाईल. माशीसुद्धा बसायला कचरेल असा निर्विकार चेहरा. म्युझियममधले पुतळेही जास्त जिवंत वाटले असते; पण गडी नशीबवान. मधुबाला, मीनाकुमारीसारख्या नायिका त्यांना मिळाल्या आणि अगणित गोड, कर्णमधुर गाणी. त्यांच्या गळ्यात सुंदर गाणं आलं किंवा मधुबाला – मीनाकुमारी आल्या की, सौंदर्याला नेहमीच शाप असतो, हे पटायचं.

Dilip Kumar in Devdas
Dilip Kumar in Devdas

पुढे जे हिरो आले ते बहुतेक सर्व या स्टाईलच्या रस्त्यावरून पुढे सरकले. काहींनी स्वत:ला जास्त विकसित करण्याचा प्रयत्न केला. काहींनी या तीन शिलेदारांची कॉपी करण्याचाही प्रयत्न केला; पण झेरॉक्सला प्रतिष्ठा प्राप्त होत नाही, हेही सिद्ध झालं. दिलीपकुमार नसता तर राजेंद्रकुमारने एक तर पंजाबात शेती केली असती किंवा ट्रक चालवली असती. त्याचे लागोपाठ 27-28 चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाले. कारण शंकर-जयकिशन आणि दिलीपकुमारची नक्कल. ते गरिबांचा दिलीपकुमार होता् मनोजकुमारच्या घरची चूलही दिलीपकुमार स्टाईलवर पेटली; पण ती नक्कल राजेंद्रकुमारएवढीही सुसह्य नव्हती. राजेंद्रकुमार हा दारिद्य्ररेषेखालचा दिलीपकुमार होता. पुढे त्यांना गंभीर वाटेवरून जायचं होतं, त्यांच्यात अधूनमधून दिलीपकुमार डोकवायचा. दिलीपचे फॅन अमिताभ बच्चननेही दिलीपची अभिनयाची शैली उचचली असं म्हणतात; पण ते अति झालं. असं म्हणणं म्हणजे लता मंगेशकरने नूरजहाँची स्टाईल चोरली असं म्हणण्यासारखं आहे.

सुरुवातीच्या काळात तुमच्यावर कुणाचा तरी प्रभाव असतोच. तुमचे पाय स्थिरावले की तो प्रभाव निघून जातो. असं काहीसं झाल असेल; पण दिलीपकुमारच्या गंभीर रस्त्यावर अभिनयाची गुणवत्ता थोडीतरी लागतेच. त्यामुळे नुसता सुंदर चेहरा त्या मार्गावरून चालून आपल्या पोळीवर तूप घेऊ शकतोच असं नाही. राजेंद्रकुमार – मनोजकुमारला ते जमलं कारण त्यांना मिळणारे सिनेमा त्या थाटाचे होते. आता हिंदी सिनेमाने एवढी कात टाकलीय की, त्या स्टाईलचे कौतुक फक्त माझ्या पिढीला आहे. देवानंदचा रस्ता हा समावेशक रस्ता होता. त्यावर गोरागोमटा मुलगाही चालू शकायचा. देवानंदची सहीसही केसांच्या कोंबड्यासकट कॉपी करण्याचा प्रयत्न केला जॉय मुखर्जीने; पण कुठे देवानंद आणि कुठे जॉय मुखर्जी! प्रत्येक टीव्ही टॉवर हा लांबून आयफेल टॉवरसारखा दिसला म्हणून त्याला आयफेल टॉवरची शान येत नाही. देवानंदच्या चेहर्‍यात काहीतरी अफलातून वैशिष्ट्यं होतं. अहो, हँडसम माणसं जगात काही कमी नसतात; पण म्हणून कुणी तीन-तीन पिढ्यांना वेड लावत नाही. एकाच घरातली मुलगी, आई आणि आजी देवानंदच्या प्रेमात असल्याची उदाहरणं आहेत. तो मोठा नट नव्हता, त्याला नीट रडता यायचं नाही. त्याला मारामारी जमली नाही; पण तरीही तो लिजंड ठरला. गाणं गाताना काही अतिरेकी अ‍ॅक्शन्स सोडल्या तर देवानंदला पाहत रहावसं वाटायचं. मग ते गाणं ‘सौ साल पहिले’ असो किंवा ‘दिल का भँवर करे पुकार’ नाही तर ‘अरे यार मेरी तुम की हो गजब’. विजय आनंद दिग्दर्शक झाल्यावर त्याने देवानंद स्टाईल जास्त पॉलिश्ड केली. विजय आनंद दिग्दर्शक हंस पक्षासारखा होता. असं म्हणता की, हंस पक्षी हा दुधातलं दूध आणि पाणी वेगळं करतो. विजय आनंदने देवानंद स्टाईलमधलं दूध आणि पाणी वेगळं केलं. त्याने दूध ठेवलं आणि पाणी फेकून दिलं. विजय आनंदच्या दिग्दर्शनाखाली आपल्याला जी देवानंद स्टाईल दिसते, ते देवानंद स्टाईलचं दूध आहे. तुम्ही जर नीट देवानंदला पाहिलंत, तर विजय आनंदच्या दिग्दर्शनाखालाचा देवानंद आणि इतर सिनेमातला देवानंद यात फरक दिसेल.

Dev Anand and Waheeda Rehman in Guide
Dev Anand and Waheeda Rehman in Guide

ज्यांच्याकडे फार मोठे अभिनय गुण नव्हते; पण चांगला चेहरा होता, आकर्षक व्यक्तिमत्त्व होतं, थोडी स्टाईलबाजी होती, त्यांच्यासाठी देवानंदने खोदलेल्या रस्त्यावरून चालणं जास्त सोपं होतं. शम्मी कपूरने देवानंदनंतर तोच मार्ग चोखाळला; पण त्याने देवानंदची कॉपी केली नाही. त्याने स्वत:ची एक वेगळी स्टाईल तयार केली. ती स्टाईल म्हणजे देवानंद स्टाईलचं पुढचं आक्रमक पाऊल होतं. देवानंदने नायिकेबरोबर केला तो रोमान्स होता. तो हळूवार रोमान्स होता. देवानंदने हातात काठी घेतली; पण काठीचा उपयोग केला नाही. देवानंदचा हात जास्तीत जास्त नायिकेच्या पदरापर्यंत गेला. देवानंदच्या रोमान्सने नायिकेला गुदगुल्या व्हायच्या. शम्मी कपूरने हिंदी सिनेमातलं प्रेम हिंसक केलं. त्याने रोमान्समध्ये सेक्सच्युअ‍ॅलिटी आणली. त्याच्या प्रणयाच्या बाबतीत प्रेम कुठे संपते आणि हिंसा कुठे सुरू होते, हे कळत नाही. त्याच्या मारामारीच्या अ‍ॅक्शन्स आणि प्रेमातली अ‍ॅक्शन यात फारसा फरक नसतो. तो ‘तो दिल तेरा दिवाना’मध्ये ‘मुझे इतना प्यार है तुमचे’ म्हणत चालत येतो, तेव्हा प्रेम करायला आलाय की, कानाखाली आवाज काढायला आलाय, की कबड्डी खेळायला आलाय, हे कळत नाही. त्याने प्रणयात रांगडेपणा आणला. प्रेमात हळूवारपणापेक्षा खेचाखेची जास्त होती. थोडक्यात त्याने स्वत:ची शम्मी कपूर स्टाईल तयार केली. त्याचं बीज देवानंद स्टाईलचं होतं. त्याला कलम वेगळं होतं.

शम्मी कपूरने त्याची स्टाईल कुठून आकाशातून आणली नाही. ती त्याच्या अंगातच होती. त्याने तिला खतपाणी घातलं. पहिले अठरा सिनेमे फलॉप झाल्यावर ‘तुमसा नहीं देखा’ या सिनेमात ही स्टाईल त्याने जवळपास पूर्णपणे विकसित केली आणि पुढे देवानंदप्रमाणे ती स्टाईल जास्त पॉलिश्ड केली. एखादी स्टाईल नवीन करायला तुमच्यात गुणवत्ता असावी लागते. ते टेंपरीमेंट असावं लागतं. तेव्हा काहीतरी तयार होतं. पुढे इतरांनी त्याची कॉपी मारली. मी सुरुवातीला म्हटलं आहेच की, जॉय मुखर्जीने आधी देवानंदची स्टाईल मारली. मग तो ‘शागिर्द’पासून शम्मी कपूर स्टाईलकडे वळला; पण नावात जॉय असून तो कुणाला आनंद देऊ शकला नाही. जॉय मुखर्जीचा फॅन सापडणं ही ब्रह्मचारी सापडण्याएवढी कठीण गोष्ट आहे. पुढे विश्वजितने शम्मीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला; पण लवकरच त्याला लक्षात आलं की, आशा पारेखच्या स्टाईल्स मारल्या, तर त्याला जास्त फायदा होईल. कारण शर्टपॅन्टमधली आशा पारेख आणि विश्वजित बरोबर असले की, नेमका विश्वजित कुठला आणि आशा पारेख कुठली हे कळायचं नाही. शम्मीच्या स्टाईलची कॉपी मारणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण शम्मी नुसता मॅन नव्हता, हीमॅन होता. त्याने सुरुवातीला शामळू भूमिका केल्या तरी तो शामळू कधीच नव्हता. तो शिकारी होता. त्याने तीन वाघ मारले आहेत. एकदा शिकार करताना त्याला अस्वलाने जवळ जवळ मिठीच मारली होती. तो वाचला. आजचा शम्मी असता, तर गुदमरून अस्वलं मेलं असतं. तो शिकार करायचा, जंगलात शेकोटी पेटवायचा, त्यावर शिकार भाजायचा, त्याच्यावर ब्रॅन्डी ओतायचा आणि खायचा.

Shammi Kapoor and Saira Bano in Junglee
Shammi Kapoor and Saira Bano in Junglee

शम्मी कपूरचं गाणं आणि नाच यात अस्पष्ट रेष होती. त्याच्या स्टाईलची ती खासियत होती. नाच वेगळं आणि गाणं वेगळं असं नव्हतं. तो नाचता नाचता गाणं म्हणायचा. त्याला कितीही छोटी जागा द्या, तो नाचत गायचा. ‘कश्मिर की कली’ आठवा ना! छोट्या बोटीत उभा राहतो, नाचतो, गातो, सर्व करतो. त्या बोटीवर आयुष्य काढणार्‍या नावाड्यालासुद्धा ते जमलं नसतं. देवानंद सरळ गाणं म्हणताना हवाहवासा वाटायचा; पण नाचला की ऑकवर्ड व्हायचा. दिलीपकुमार हा नैसर्गिक डान्सर नव्हता. त्याला कष्ट पडतायत, असं वाटायचं. मग तो ऑकवर्ड वाटला नाही. राज कपूरच्या अंगात र्‍हिदम होता. त्यामुळे नाचाच्या त्याच्या कुठल्याही स्टेप्स चांगल्या होत्या. राजेंद्रकुमार गाणं म्हणताना एकतरी अंडरआर्म चेंडू टाकायचा. आज नटांचा नाच जास्त सॉफिस्टिकेटेड आहे. कारण नाच शिकवला जातो. व्यायामशाळा ही नटीच्या बेडरूमला आजकाल अ‍ॅटॅच्ड असल्यामुळे त्यांचं शरीरही पीळदार दिसतं. शम्मीच्या काळात नाच शिकवला जायचा नाही. तरीही शम्मीला नाच शिकायची खाज होती. 1950 साली दादरला प्रीतम हॉटेलमध्ये प्रीतम कोहली डान्स शिकवत असे. त्यावेळी तो तासाला 20 रुपये घ्यायचा. 1950 साली 20 रुपये काही मंडळींचा पगार होता. शम्मी त्याच्याकडे जाऊन टॅन्गो शिकला. पडद्यावर नाचताना तो पुढे काय करणार आहे, हे कुणालाच ठाऊक नसायचं. शक्ती सामंतासारखा दिग्दर्शक कोरियोग्राफी शम्मीवर सोपवायचा. तो कॅमेरामनला सांगायचा, तू फक्त शम्मीला फॉलो कर! दिग्दर्शक शम्मीला सांगायचा, ‘कर काहीही पाहिजे ते’ आणि शम्मी पाहिजे ते करायचा आणि तो जे करायचा ते आपल्याला आवडायचं. एक गंमत सांगतो, आशा पारेख ही क्लासिकल डान्सर होती. तरी तिला सिनेमाचा नाच करणं कष्टाचं पडायचं. ‘दिल दे के देखो’ या सिनेमात तिला दिग्दर्शकाने सांगितलं की, शम्मी जसं करतो तसं तू कर!

शम्मीचा नाच आणि प्रेम हा जास्त गतिमान आणि हिंसक जितेंद्रने केला. शम्मी नाचताना या माणसाच्या अंगात हाड आहे यावर ऑर्थोडेन्टिक सर्जननेही विश्वास ठेवला नसता; पण गाणं गाताना, गाणं गात गात पडताना शम्मीची जेवढी हाडं तुटली, तेवढी कुणाचीही नाही तुटली; पण जितेंद्र पुढे जाऊन जंपिंग जॅक झाला. तो शम्मीपेक्षा बांधेसूद होता. त्याने पांढरे बूट, तंग पॅन्टा, तंग शर्टस् वगैरे प्रकार आणला. बहुधा तो मेकअपमनबरोबर एक शिंपीसुद्धा ठेवत असावा. उसवला कपडा की शीव! शम्मीने पडद्यावरचं प्रेम हिंसक केलं, तर जितेंद्र दोन-चार पावलं पुढे गेला. जितेंद्रच्या हिंसेला आपण केवळ सवयीने प्रेम म्हणायचो. त्याचं ते हिरोईनच्या पार्श्वभागावर चापटी मारणं, खसकन खेचणं! या आणि मारहाणीच्या आरोपाखाली तो सहज तुरुंगात जाऊ शकला असता. जितेंद्रची तेवढीच कॉन्ट्रिब्युशन नाही. त्याने गाण्यामध्ये भोगासनं आणली. ‘हम तो आशिक है सदियों पुराने’ या गाण्यात त्याने आणि बबिताने ‘फर्ज’ या चित्रपटात जे केलंय त्याला कपड्यातलं मैथून म्हणायला हवं. रोमान्स हा चिखलात, पांढर्‍या किंवा पिवळ्या कपड्यात लोळून करायचा असतो, हेसुद्धा जितेंद्रनेच आपल्या पडद्याला शिकवलं; पण पुढे गोविंदा-करिश्माने ‘सरकायलो खटिया जाडा लगे’ या गाण्यावर केलेली भोगासनं पाहिल्यावर जितेंद्र मला आद्य रामदेवबाबा वाटायला लागला. आज मागे वळून पाहताना जितेंद्रने जे काही केलं ते ‘योगासन’ या सदरात येतं.

Jitendra and Sridevi in Tohfa
Jitendra and Sridevi in Tohfa

जितेंद्रने त्याच्या स्टाईलमध्ये, विशेषत: गाण्याच्या स्टाईलमध्ये वेग आणला. जास्त मूव्हमेंटस् आणल्या. ती कवायतींची सुरुवात होती. ती दोघांची कवायत होती. त्यानंतर कवायतीचं युग आलं. आता गाणं असं असतं की, एकाला स्वाईन फलू झाला, तर किमान पन्नास जणांना सहज होऊ शकतो. इतका एकमेकाला संसर्ग होऊ शकतो. आता पर्सनलाईज्ड स्टाईलचा जमाना गेला. तो राजेश खन्ना, अमिताभ बच्चनपर्यंत होता. राजेश खन्नाने देवानंदची तिरपी मान जास्त तिरपी केली. स्वत:च्या स्टाईल्स मिळवल्या. (ज्या मला कधी आवडल्या नाहीत; पण आम जनतेला प्रचंड आवडल्या. मी आम जनतेतला नाही. हटके आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न नाही.) अमिताभ माझ्या मते, स्वयंभू आहे. तो दिलीपकुमारच्या साच्यातला आहे, असं दिलीपकुमारच्या चाहत्यांचं आग्रही म्हणणं असतं, तो भाग वेगळा; पण त्यानंतर वैयक्तिक स्टाईल्स लोप पावल्या. हल्ली स्टाईल्स डान्स कोरियोग्राफर, फाईट कॉम्पोझर, फॅशन डिझायनर्स ठरवतात. मला शाहरूख, अक्षयकुमार, गोविंदा, हृतिक वगैरे वगैरे पाहायला आवडतात, नाही असं नाही; पण दिलीप-देव-राज-शम्मी आणि अमिताभप्रमाणे त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही. तो भावनात्मक बॉन्ड माझ्यात अन् त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांच्या स्टाईलचा माझ्यावर प्रभाव नसेलही; पण वर उल्लेखलेल्या नटांच्या युगात माझं तारुण्य गेलं याबाबतीत मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

शेवटी तुमच्या लक्षात आलं असेल की, कॉलेजला दांडी मारून सिनेमा पाहणं अगदीच वाईट नव्हतं. नाही तर हा आनंद कुठे मिळाला असता?

Dwarkanath Sanzgiri
+ posts

3 Comments

 • Anil Boralkar
  On January 11, 2021 9:15 pm 0Likes

  खूपच अभ्यासपूर्ण पोस्ट खूपच आवडली अगदी सगळ मनातल 👌👌👌👌

  • admin
   On January 12, 2021 7:24 am 0Likes

   Thank You for your comment

   • नेहमीप्रमाणे अप्रतिम
    On January 12, 2021 7:49 am 0Likes

    नेहमीप्रमाणे अप्रतिम

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.