-अद्वैत अविनाश सोवळे

गेल्या काही दिवसात प्रसिद्ध कवी आणि गीतकार संतोष आनंद जी यांचा दूरचित्रवाणीवर प्रसारित कार्यक्रमाचा विडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. संतोष आनंद ह्यांनी बरीच गाणी लिहिली त्यातली पूरब और पश्चिम (१९७०), शोर (1972), रोटी कपडा और मकान (१९७४), क्रांती (१९८१), प्यासा सावन (१९८१) आणि प्रेमरोग (१९८२) ह्यातील त्यांची गाणी प्रचंड गाजलीत. ह्या सगळ्या गाण्यात ज्या गाण्याने तत्वज्ञान दिलं त्याचबरोबर रडवल सुद्धा ते सगळ्यात प्रसिद्ध गाणे म्हणजे “एक प्यार का नगमा हैं”. ह्या गाण्याला पन्नास वर्षे झाली तरीही आज सुद्धा ते तितक्याच अवीट गोडीचे वाटते. लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांचे मेलोडी पूर्ण संगीत, ते वायोलिन आणि त्यावर मुकेश चे आर्त आणि लताचे भावगर्भ स्वर. असं रसायन नेहमी नेहमी जुळून येत नाही. असो पण आज मी ना चित्रपटाबद्दल बोलणार आहे आणि नाही गीतकार, संगीतकार, गायक किंवा गायिकेविषयी लिहिणार आहे. आज आपण आठवणार आहोत जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या काही लोकप्रिय गाण्यांविषयी.

हिन्दी चित्रपटांतील अश्या गाण्यांबद्दल ज्या गाण्यांनी आपल्याला जीवनाची वेगवेगळी रुपे दाखविली. ही गाणी केवळ श्रवणीयच नव्हे तर अविस्मरणीय आहेत. आपल्या कुठल्यानं कुठल्या गाण्यांसोबत काही आठवणी जुळल्या असतात. त्या आठवणी प्रसंगानुरूप किंवा त्या गाण्यानुरूप आयुष्यात परत परत भेटत असतात. पण आज आपण ज्या गाण्यांविषयी बोलणार आहोत त्या गाण्यांसोबत आपल्या सगळ्यांच्याच कुठल्या न कुठल्या  आठवणी जुळल्या असतील पण जर का जुळल्या नसतील तरीही ती आपल्या आयुष्याचा भाग होऊन राहिली आहेत.

“एक प्यार का नगमा हैं” जशी संतोषजीनची अजरामर रचना आहे तशी त्यांची आणखीन ही एक रचना आहे. ती म्हणजे “क्रांती” ह्या चित्रपटातील “जिंदगी की न टूटे लडी” ह्या गाण्यात जीवनात प्रेमाचा एक क्षणच किती मौल्यवान आहे हे सांगतानाच एक अतिशय चांगली ओळ लिहिली आहे;

“वो जवानी जवानी नही जिसकी कोई कहानी ना हो”.

एका ओळीत किती मोठी गोष्ट सांगितली आहे की जे काही कर्तुत्व करायचे आहे आणि आपले नाव मोठे करून जायचे आहे ते तारुण्यात नाही केले तर तुमचे तारुण्य तारुण्य कसले.  

 

 

आपण लवकरच मरणार आहोत ह्याची जाणीव असताना जीवन जणू एक कोडं आहे. ते कधी हसवत कधी रडवत पण कळत मात्र नाही. आपण स्वप्न पाहतो पण त्याच्या मागे पळताना मुळात स्वप्नांच्या पुढे कधी निघून जातो ते सुद्धा कळत नाही पण पळणे काही थांबत नाही. हो ! ते गीत आहे “जिंदगी कैसी हैं पहेली” (चित्रपट : आनंद, वर्ष : १९७१, गीतकार : योगेश)  इथे गीतकाराच्या लेखणीतून जीवनाचे एक वेगळे सत्य आपल्याला दिसते.

 

 

आनंद बक्षी जी नी त्यांच्या बऱ्याच रचनांमध्ये आयुष्याच्या वेगवेगळ्या रूपांची पसरण केली. त्यांचीच एक सुंदर रचना आहे. “ये जीवन हैं इस जीवन का यही है” (चित्रपट : पिया का घर, वर्ष : १९७२, गीतकार : आनंद बक्षी) 

जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट काही असेल तर ती प्रेम आहे आणि त्याच्यापुढे काहीच नाही. तुमच्यावर खरं प्रेम करणारं कुणी असेल तर मग आयुष्यात हरणे आणि जिंकणे काहीच अर्थ ठेवत नाही फक्त केवळ प्रेमच शिल्लक राहते कारण तुमच्या श्वासाचे बंधन हे त्या प्रेम करणाऱ्या व्यक्ति सोबत बांधले गेले असते.

 

 

निरनिराळ्या गीतकारांनी जीवनाचे निरनिराळे वर्णन केले. इंदिवर जी लिहितात “जिंदगी का सफर है ये कैसा सफर” (चित्रपट : सफर, वर्ष : १९७० , गीतकार : इंदिवर).

तर दुसरीकडे हसरत जयपुरी म्हणतात “जिंदगी एक सफर हैं सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना“  (चित्रपट : अंदाज, वर्ष : १९७१, गीतकार : हसरत जयपुरी) म्हणजे दोघे ही आयुष्याला प्रवास म्हणतात पण एक म्हणतो हा कसा प्रवास आहे तर दूसरा म्हणतो हा एक छान प्रवास आहे पण अखेरीस दोन्ही गीतकार म्हणतात की त्याबद्दल मात्र कोणालाही काहीही माहिती नाही.

एक गीतात आनंद बक्षी जी “जिंदगी हर कदम एक नयी जंग हैं” (चित्रपट : मेरी जंग, वर्ष : १९८५, गीतकार : आनंद बक्षी) म्हणून आयुष्यातील संघर्षाचा रस दाखवतात तर दुसरीकडे जावेद अख्तर म्हणतात “जिंदगी की यही रीत हैं, हार के बाद ही जीत है” (चित्रपट : मिस्टर इंडिया, वर्ष : १९८७, गीतकार : जावेद अख्तर). आयुष्य म्हणजे युद्ध आहे आणि त्यात हार जीत होत राहणार पण शेवटी लढणे महत्वाचे ठरते.

 

 

१९८३ साली तीन गाणी आलीत जी जीवनाशी जवळीक साधणारी होती. त्यात एक होते ‘सौतन’ चित्रपटातील सावन कुमार ह्यांनी लिहिलेले “जिंदगी प्यार का गीत हैं, इसे हर दिल को गाना पडेगा”  (चित्रपट : सौतन, वर्ष : १९८३, गीतकार : सावन कुमार). सावन कुमार जी ने फार कमी गाणी लिहिली पण मला वाटते हे त्यांचे एक उत्कृष्ट गीत होय. खरचं आयुष्य जगायचे आहे तर मग ते गाण्यासारखे सुस्वर आणि गुणगुणत का जगू नये ?.

 

 

पुढील दोन्ही गाणी आहेत गुलजार ह्यांची. एका गाण्यात ते म्हणतात “तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मै” (चित्रपट : मासूम, वर्ष : १९८३, गीतकार : गुलजार). तर दुसऱ्या गीतात ते थेट “ए जिंदगी गले लगा ले” (चित्रपट : सदमा, वर्ष : १९८३, गीतकार : गुलजार). म्हणत जीवनाला साद घालतात की आता जन्म घेतलाच आहे तर हे आयुष्या तू आम्हाला मिठीत घे कारण तुझे सगळे सुख दुख आम्ही कधीच आमच्या कवेत घेतले आहेत !.

 

 

आयुष्य हा चित्रपट होऊ शकत नाही पण प्रत्येक जण त्यातील गाण्याप्रमाणे ते जगतो किंवा जगू शकतो. अगदी “जिंदगी फरेब हैं” (चित्रपट : चांदतारा, वर्ष : १९४५, गीतकार : रामानंद) ह्या गाण्याप्रमाणे जगणारे लोक आहेत आणि “ये जिंदगी उसीकी हैं” (चित्रपट : अनारकली, वर्ष : १९५३, गीतकार : राजेंद्र कृष्ण) म्हणत जगणारे ही आहेत आणि “ज़िन्दगी ख्वाब है ख्वाब में झूठ है क्या और भला सच है क्या?” (चित्रपट : जागते रहो, वर्ष : १९५६, गीतकार : शैलेन्द्र ) असे ही म्हणत जगणारे आहेत पण “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” (चित्रपट : हम दोनो, वर्ष : १९६१, गीतकार : साहिर लुधियानवी) गुणगुणणारा वेगळा ठरतो हे मात्र खरे!.

शेवटी आयुष्य म्हणजे प्रेम आणि प्रेम गीत म्हणजेच “एक प्यार का नग्मा हैं !”

 

Advait Avinash Sowale
Advait Avinash Sowale
+ posts

Leave a comment