-धनंजय कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

When Singer Mahendra Kapoor Sings in Russian Language. पन्नासच्या दशकात देशातील वातावरण पं नेहरूंच्या विचाराने भारावलेले होते. रशिया सारखा एक सक्षम मित्र आपल्याला लाभला होत त्यामुळे दोन देशातील सांस्कृतिक आदान प्रदान मोठ्या प्रमा्णावर होवू लागलं. आर के चा ’आवारा’ जितका आपल्या देशात लोकप्रिय ठरला तितकाच तो रशियात देखील! त्यातील गाण्यांनी रशियात कहर लोकप्रियता मिळवली.आर के च्या नंतरच्या ’श्री चारसो बीस’ने  ’आवारा ’ चीच पुनरावृत्ती केली. त्यातील  ’मेरा जूता है जापानी’ या गाण्याने इकडे बिनाका गीत मालाच्या कार्यक्रमात पहिला क्रमांक मिळविला आणि तिकडे रशियात ’सरपे लाल टोपी रूसी’ या ओळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. राज कपूर या निमित्ताने कायम रशियाला जात असे. तिथे त्याला हि आणि भारतीय सिनेमातील इतर गाणी  गायल्या शिवाय कोणत्याही कार्यक्रमातून सुटका होत नसे. हा सिलसिला अनेक वर्षे चालू होता.

१९६० साली तो अशाच एका सांस्कृतिक मैफली साठी रशियात मोठ्या वाद्यवृंदासहीत गेला होता. त्या वेळी त्याच्या सोबत गायक महेंद्र कपूर देखील होता. महेंद्र कपूर त्या काळी नवोदितच होता. त्याचा ’नवरंग’ नुकताच प्रदर्शित झाला होता. रशियात मास्को आणि लेनिनग्राड मध्ये मोठ्या संख्येने लोक या मैफलीला आले होते. प्रेक्षकांनी आल्या आल्या राजच्या नावाचा जयघोष करीत त्याला गायला व्यासपीठावर बोलावले त्यावेळी राज आपल्या हातातील माईक महेंद्र कपूरच्या हाती देत म्हणाला  ’आज मी माझ्यापेक्षा खूप चांगलं गाणार्‍या गायकाला आपल्या समोर आणतोय तो नक्कीच तुमचे मनोरंजन करील.’ पुढचे दोन तास महेंद्र गात होता आणि लोक प्रचंड आनंदात होते. ते त्याच्या सोबत गात होते नाचत होते. राज कपूरला मात्र हा काय प्रकार चालला आहे हे कळेचना. एक तर त्याला महेंद्रची भाषाच कळेना. गाण्याची चाल, संगीत नेहमीचेच पण गाण्याचे शब्द वेगळे! राजने रशियन वकिलातीतील आपल्या भारतीय राजदूताला (जे त्यांच्या शेजारीच बसले होते) विचारले ’ हा नेमकं गातोय तरी काय?’ त्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून राज थक्कच झाला. महेंद्र कपूर ती सर्व गाणी रशियन भाषेत गात होता!  श्रोत्यांना त्यांच्या मातृभाषेत हि मैफल ऐकता येत असल्याने ते थांबायचे नाव घेत नव्हते. एका मागोमाग एक अशा फर्माईश चालूच होत्या.

रात्री उशिरा हॉटेल मध्ये गेल्यावर राजने महेंद्र कपूरला विचारले ’अरे बाबा तू रशियन भाषा कधी शिकलास?’ त्यावर तो म्हणाला ’राज साब तुमची रशियातील लोकप्रियता मला माहित होती. या दौर्‍याचे जेंव्हा ठरले त्या दिवसापासून मी आपली सर्व गाणी रशियन भाषेत भाषांतरीत करून घेतली व सराव सुरू केला! ’ राजने त्याला विचारले ’ पण यातून तुला काय मिळणार होते?’ त्या वर महेंद्रचे उत्तर होते ’रशियन जनता तुमच्यावर आणखी भरभरून प्रेम करेल आणि तुमच्या डोळ्यातला तो आनंद मला पहायचा होता. जो आज मी स्वत: अनुभवला.’ राजच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागली. तो म्हणाला ’यार महींदर तुने आज मुझे खरीद लिया. मेरी अगली पिक्चर मे तुम जरूर गाऒगो.’  महेंद्रला वाटलं हि मोठी माणसं माझ्या सारख्याला काय लक्षात ठेवणार?  पण राजने आपले वचन पाळले त्याच्या पुढच्या ’संगम’ सिनेमाची जेंव्हा सुरूवात झाली तेंव्हा त्याने महेंद्रला आवर्जून बोलावून गाणं दिलं ’हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा….’

महेंद्र कपूर एका talent hunt मधून संगीताच्या दुनियेत आला होता. अतिशय गुणी अशा या गायकाचा आर के मधील गाण्याची हि कथा…

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment