-© विवेक पुणतांबेकर

 

है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सुर मे गाते है

पतिता मधले हे दर्दभरे गाणे लागले की आवर्जून डोळ्यासमोर येतात मखमली आवाजाचे तलत मेहमूद. आज त्यांचा जन्मदिवस . हिदी सिनेसंगीताच्या सुवर्ण युगात अनेक गुणी, महान गायक होऊन गेले. त्यातलेच एक तलत मेहमूद. लखनौच्या कर्मठ मुस्लिम घराण्यात २४ फेब्रुवारी १९२४ ला त्यांचा जन्म झाला. ही सहा भावंडे होती. तलतना मात्र लहानपणापासून गाण्याची अत्यंत आवड होती. लहानपणी लखनौच्या सांगितिक वातावरणात अनेक दिग्गजांच्या मैफिली ऐकायला ते जात. नंतर काही काळ लखनौच्या मारिस संगीत महाविद्यालयात संगीत शिक्षण घेतलेले तलत वयाच्या सोळाव्या वर्षापासून गालिब, मीर, दाघ यांच्या रचना गात असत. त्या लोकप्रिय झाल्या. १९४१ साली एच.एम.व्ही.ने त्यांची पहिली रेकाॅर्ड बाजारात आणली. हे गाणे होते ‘सब दिन एक समान’. ही गझल खूप लोकप्रिय झाली. त्यावेळी तलतना कल्पना नव्हती की भविष्यात ते गझल सम्राट म्हणून ओळखले जातील. १९४४ साली त्यांची दुसरी रेकाॅर्ड ‘तसवीर तेरी दिल मेरा बहना सकी’ सबंध देशभर लोकप्रिय झाली. आजही त्यांच्या चाहत्यांची ही आवडती गैरफिल्मी रेकाॅड आहे. या कालखंडात ते तपन कुमार नावाने कलकत्ता आकाशवाणीवर गात असत. सिनेमाचे विश्व त्यांना खुणावत होते.

सिनेमातला त्यांचा प्रवेश गायक अभिनेता म्हणून झाला. एकूण तेरा सिनेमात त्यांनी अभिनय केला. त्यातल्या राजलक्ष्मी, तुम और मै आणि संपती या सिनेमांची निर्मिती कलकत्ता येथे झाली. कलकत्ता येथली सिनेनिर्मिती बंद झाल्यावर १९४९ साली तलत मुंबईत आले. मुंबईत पार्श्वगायक म्हणून त्यांचे पहिले गाणे ‘ऐ दिल मुझे ऐसी जगा ले चल’ अनिलदां नी कंपोझ केले आणि दिलीपकुमार वर चित्रीत झाले. हा सिनेमा होता आरझू. फिल्मी गझल लोकप्रिय होण्याची ही सुरुवात होती. ए.आर.करदार यांनी दिले नादान सिनेमात तलत ना नायकाची भुमिका दिली. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत नूतन, माला सिन्हा, सुरैय्या, शामा, नादिरा या अभिनेत्रींबरोबर काम करुनही अभिनय क्षेत्राला रामराम करुन पार्श्वगायन आणि गझल गायकीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले. गझल सम्राट म्हणून ओळखले गेले.

गायक म्हणून तलत लोकप्रिय झाले. शंकर जयकिशन, नौशाद, एस.डी. बर्मन, मदनमोहन आणि इतर अनेक संगीतकारांनी त्यांच्या मखमली आवाजाचा वापर केला. मराठीत वसंत प्रभु आणि वसंत देसाईंना पण हा आवाज वापरावा असे वाटले. गायिका सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीची सुरुवात तलत मेहमूद यांच्या बरोबरच्या दरवाजा सिनेमातल्या युगल गीताने झाली. तलत मेहमूद आणि मदनमोहन यांची ओळख लखनौ पासून ची. मदनमोहननी वचन दिले होते की मी मुंबईत गेल्यावर तलत चा आवाज नक्कीच वापरीन. त्या प्रमाणे त्यांनी तलत यांचा आवाज वापरुन जहांआरा, मदहोश, आशियाना, हकिकत या सिनेमात अविस्मरणीय रचना दिल्या. आयुष्यभर या दोघांची मैत्री कायम राहिली. तलत ना असलेल्या धूम्रपानाच्या नादामुळे संगीतकार नौशाद यांनी नंतर त्यांना घेतले नाही. असे असूनही १९८१ साली इंडियन एक्सप्रेस ला दिलेल्या मुलाखतीत नौशाद यांनी कबुली दिली की असा आवाज फार कमी जणांना लाभतो. सुरुवातीच्या कालखंडात तलत ना आपल्या आवाजातल्या कंपाबद्दल न्यूनगंड होता. पण संगीतकार अनिल विश्वासनी त्यांना समजावले आवाजाताला कंप हेच तलत यांचे वैशिष्ठ आहे. यानंतर तलत यांचा आत्मविश्वास वाढला. नसरीन बरोबरचा त्यांचा आंतरधर्मिय विवाह यशस्वी झाला. त्यांचे सुपुत्र खलिद मेहमूद नामवंत गझल गायक आहेत.

Talat Mahmood

तलतनी अनेक वादकांना मदत केली होती. इनाॅक डॅनियल, हरि प्रसाद चौरासिया या वादकांचे पहिले गाणे तलत मेहमूद बरोबरच रेकाॅर्ड झाले होते. तलत ना सिगारेट आवडायची. ५५५ स्टेट एक्सप्रेस ने त्यांचा उपयोग भारतीय जाहिरातीसाठी करुन घेतला होता. त्यांना मोटारीचा पण खूप शौक होता. माॅरिस, हिलमन. अंबॅसिडर, मारुती सियालो अश्या उत्तमोत्तम गाड्या त्यांच्याकडे होत्या आणि त्यातून स्वतःड्रायव्हिंग करायला त्यांना खूप आवडायचे. अनेकांचा असा गैरसमज आहे की शम्मीकपूरना पहिला प्लेबॅक रफिंनी दिला. तसे नाही. ठोकर, मेमसाहिब, नकाब, सिपाह सरकार, मेहबूबा, लैला मजनू या सिनेमात प्लेबॅक तलत नी दिला होता.

Talat Mahmood with Shammi Kapoor at a film premiere
Talat Mahmood with Shammi Kapoor at a film premiere

महाराष्ट्र सरकारनी सर्वोकृष्ट गायकाचा पुरस्कार सुरु केला तेव्हा सगळ्यात पहिला मान तलत ना मिळाला होता. हे गाणे होते पुत्र व्हावा ऐसे मधले यश हे अमृत झाले. ही बातमी सगळ्यात आधी लतादिदींनी तलत ना कळवल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले. परदेशी दौरे करणारे तलत अनेक देशात लोकप्रिय होते. १९६१ च्या कराची दौर्‍यात ५८ हजार श्रोते हजर होते. हे समजल्यावर नूरजहांने लाहोरला आपल्या मैफिलीचे आमंत्रण दिले. तलतनी नकार कळवला. नूरजहांनी कोरा चेक पाठवला. पण मुंबईला रेकाॅर्डिंग असल्याचे सांगून नम्रपणे नकार दिला. या घटनेचा उल्लेख नूरजहांने १९८२ च्या भारत भेटीत केला होता. याच वर्षी तलतला पद्मविभूषण सन्मान भारत सरकारने दिला.

Talat Mahmood while receiving Padmabhushan from President of India Shri Venkataraman
Talat Mahmood while receiving Padmabhushan from Then President of India Shri Venkataraman

६० च्या दशकात ट्रेंड बदलत चालल्यावर तलतनी पार्श्वगायन बंद केले. परदेश दौरे सुरु असत. शेवटी प्रकृती बिघडल्याने आवाजावर पण विपरित परिणाम झाला. ९ मे १९९८ साली तलतनी या जगाचा निरोप घेतला.असा मखमली आवाज परत होणार नाही. 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment