-दिपकळी नाईक

विविध भारतीच्या कृपेने ” तेरे नैनोने चोरी किया मेरा छोटासा जिया, परदेसिया, हाये तेरे नैनोने… हया खट्याळ गाण्यातून सुरैयाच्या आवाजाशी गट्टी जमली होती. त्याच वेळी ” वो पास रहे या दूर रहे, नजरोमे समाए रहते है, इतना तो बता दो कोई हमे क्या प्या ssर इसी को कहते है ” यातील प्यार शब्दावरचा तिचा लाडिक ठसका मनावर ठसला होता. आपल्या गायन आणि अभिनयाने एक काळ गाजवणार्या या गुणी सुरैयाची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने तिच्या गाण्याच्या माध्यमातून तिची ही सुरेल आठवण.

संगीतकार हुस्नलाल भगतरामची वरील गाणी अनुक्रमे प्यार की जीत ( 1948) आणि बडी बहन ( 1949) या बाबुराव पै च्या ( फेमस पिक्चरस) मधली. दोन्ही त रेहमान तिचा हिरो होता. दोन्ही चित्रपट चिक्कार हीट गेले. ” जब सारी दुनिया सोती है, हम ता ssरे गिनते रहते है” ही ओळ ही खूप आवडायची. त्या वेळची आठवण म्हणजे “बेला के फूल” मधे रात्रीच्या शांत वेळी हे गाणं हमखास लागायचं. ही आणि अशी गाणी ऐकत ऐकत झोपी जायचा नेम घरोघरी असायचा. ” ओ दूर जानेवाले, वादा न भूल जाना” हया आणखी एका लोकप्रिय विरह गीतातील भाव व्याकुळ सुरय्या जवळची नाही वाटली. ” राते हुई अंधेरी तुम चांद बनके आना” आळवणारी उदास सुरैया ऐकवत नाही. या उलट ( रफी सह) ” आरारी आरारी आरारी ” या गाण्यांतील नटखट अल्लड सुरैया खूप भावते. तिचा बालपणीचा मित्र ( लहानपणी रेडिओवर दोघं कार्यक्रम पेश करत तेव्हा तिच्या सावळ्या रंगा वरून तो तिला कालू म्हणून चिडवत असे) राज कपूर सोबतचे ( दास्तान ) तिचं हे गाणं पडद्यावर बघताना ही मजा येते. रफी सोबत ती गायली ही आहे खूप मोकळेपणे जिवंत पणे. नौशाद ने याची धून पाश्चात्य सुरावटी च्या धर्ती वर बांधली आहे. ” ये सावन रूत तुम और हम तारारारारम तारारारारम तारमपम तारमपम तारारारारम… नंतर च्या कोरस च्या हमिंग ने मस्त परिणाम साधला आहे. पडद्यावर चा उत्स्फूर्त अभिनय, धून सर्व काही मस्त जुळून आलं आहे.

Actress and Singer Suraiya

सुरुवातीला उल्लेख केलेल्या ” तेरे नैनोने ” गाण्याची अजून एक गंमत. या गाण्याच्या दोन कडव्या मधला “म्युझिक पीस” ची धून आणि 1949 मधे आलेल्या बरसात मधल्या ” जिया बेकरार है” च्या आधीचा म्युझिक पीस याची चाल एकच आहे. अर्थात बरसात ची गाणी ही तुफान गाजली. खरं तर तिला बनायचं होतं अभिनेत्री, पण नौशाद ने ” आपकी आवाज बहुत सुरीली है, आप गाओगे तो अच्छा होगा ” असा नुसता सल्ला दिला नाही तर गाणी गायला प्रवृत्त ही केलं. नौशादजीनी गायला लावलं म्हणून मी गायिका बनले, असं ती नेहमी म्हणते. 1942 च्या शारदा मधे ” पंछी जा पिछे रहा है बचपन मेरा ” या गाजलेल्या गाण्यात तिने मेहताब ला उसना आवाज दिला. “अनमोल घडी ” त नूरजहाँ तिची सहनायिका होती. पण ” मै दिलमे, मै दि ssलमे दर्द बसा लायी ” , ” मन लेता है अंगडाई ” या बाळबोध चालीच्या तिच्या एकल गाण्यातून तिनं तिचं असं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं आणि आपली छाप पाडली.

Actress and Singer Suraiya

“दिवाना” मधे “मेरे चांद मेरे लाल रे” ही सुंदर लोरी लतासह गाणारी सुरय्या, “दास्तान” मधलं ” नैनोमे प्रीत है” तसंच ” दिल्लगी ” मधलं “मुरली वाले मुरली बजा” या एकल गाण्यातली तिची निरागसता पहाण्या सारखी आहे. याच सिनेमातल्या घोडयावरून पडण्याचं निमित्त होऊन अपघाती निधन झालेल्या श्याम समवेत चे “तू मेरा चांद मै तेरी चांदनी” यात ती पडद्यावर अवखळ किशोरी सारखी बागडली आहे. ” दर्द ” मधलं “बेताब है दिलदर्दे मोहबतकी असर से जिस दिन से मेरा चांद छुपा मेरी नजर से ” हे उमा देवी बरोबर चे तिचे दोगाने ही खास उल्लेखनीय आहे. रूढार्थानं गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण न घेताही उपजत गात्या
गळयाच्या देणगी वर तिची गाणी उत्तम वठली आहेत. गायनाच्या कसोटी वर उतरून ऐकण्यारयाच्या थेट भावविश्वात घुसणारी आहेत. तिच्या आवाजात कमालीचा गोडवा आहे हे तिचं कुठलंही गाणं ऐकल्यावर लक्षात येतं. मग ते सचिन देव बर्मन यांचं ” अफसर ” मधलं ” नैन दिवाने एक नही माने करे मनमानी माने ना, हुए थे पराए मन हार आये मन का मरम जाने ना, जाने ना, जाने ना ” सारखं मधुर लडिवाळ गीत असो किंवा त्यातलंच ” मनमो sss र ” शब्दा वर ठेहराव घेऊन जणू एकेक पायरी उतरल्या गत हेलकावे घेत झटक्यात खाली येणारा तिचा स्वर “किसने जादू डाला रे किसने जादू डाला , मनमोर हुवा मतवाला “अशीच आपली अवस्था होते. तर ” जब तुम ही नही अपने दुनिया ही बेगानी है, उलफत जिसे कहते है एक झूटी कहानी है ” (परवाना: 1947) व ” परवानो से प्रीत सिख ले शमा से सिख ले जल जाना, फिर दुनिया को याद रहेगा तेरा मेरा अफसाना” ( बिल्वमंगल: 1954 ) ही गाणी त्या त्या काळातील टिपिकल स्टाईल प्रमाणे झाली आहेत.

Actress and Singer Suraiya with Dev Anand
Actress and Singer Suraiya with Dev Anand

 

1954 च्या ” मिर्झा गालिब ” ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यातील “रहिये अब ऐ दिल ” , ” नुक्ता ची ऐ गमे दिल ” , ” ये न थी हमारी किस्मत” ” कहते है के गालिब का ” पासून ” दिले नादा तुझे हुवा क्या है ” पर्यत सर्व च गाणी नुसती सुंदर वठली नाही तर भरपूर गाजली सुद्धा. यातील तिच्या भूमिकेची त्या वेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रशंसा केली. ” माझ्या साठी हा फार मोठा पुरस्कार आहे ” अशा शब्दांत तिने आपली भावना बोलून दाखवली. वरील चित्रपटाचे संगीतकार गुलाम महम्मद यांच्या च ” शमा ” चित्रपटातील ” ” आपसे प्यार हुवा जाता है ” , ” मस्त आखो मे शरारत कभी ऐसी तो न थी” आणि ” धडकते दिल की तमन्नाओ मेरा प्यार हो तुम” ही तिची तिन्ही एकल गाणी अविस्मरणीय अशी आहेत. धडकते दिल की हे गाणं पडद्यावर अभिनेत्री निम्मी वर चित्रीत झालं आहे.

सुरैयाची गायन शैली ला जाणून घ्यायची, तर चालीची विविधता दाखवणारी वेगवेगळया संगीतकाराकडे तिने गायलेली तिची ही खास गाणी हरेक गान रसिकांनी आवर्जून ऐकायला हवीत.

1.(तमन्ना : के.सी.डे )
“जागो जागो आयी ऊषा पंछी बोले”
आ रवींद्र संगीताच्या धर्ती वरचं स्वराशी खेळणारं गाणं.
सहगायक मन्ना डे

2. ( शमा परवाना: हुस्नलाल भगतराम)
“बेकरार है कोई आ ऐ मेरे दिलदार आ” सहगायक रफी
यातील दीर्घ आलाप गाताना तिनं टिकवलेला दमसास , श्वास कुठं सोडला आहे हे अजिबात समजू न देण्यात ती यशस्वी झाली आहे.

3.(खूबसूरत : मदन मोहन)
“ऐ चांद अब तू जा मेरा दिवाना आ गया, ये शम्मा जिस पे जा बसी परवाना आ गया”.

4. ( गजरे: अनिल विश्वास)
” दूर पपीहा बोला रात आधी रह गयी, मेरी तुम्हारी मुलाकात बाकी रह गयी ”

5. अनिल दा चेच वारीस मधलं तलत समवेत “राही मतवाले” हे सदाबहार युगल गीत सिनेमात अनेक आवृती मधे वारंवार ऐकू येतं.

6. (लेख : कृष्ण दयाल)
” बदरा की छाव तले नन्ही नन्ही बुंदिया “,सहगायक मुकेश

7. ( माशुका : रोशन)
“झिलमिल तारे करे इशारे सोजा राजदुलारे ” ही लोरी,
सहगायक मुकेश

8. ( दो दिल: पं. गोविंद राम)
“माटी का बुत भा गया, दिल ही तो है आ गया “, सहगायक मुकेश.

9. ( मि. लंबू : ओ.पी.नय्यर)
” तुम जरा सी बात पे खफा न हो ” सहगायक रफी.

10. ( राजपूत : हंसराज बहेल) “रस्ते पे हम खडे है दिल बेकरार लेकर, गुजरोगे कब इधर से अपनी बहार लेकर”.

Actress and Singer Suraiya

 

deepkali naik
Deepakali Naik
+ posts

Leave a comment