– जयश्री जयशंकर दानवे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘ मैं शकील, दिल का हूं तरजुमा कि मोहब्बतों का हूं राजदां

मुझे फख्र है मेरी शायरी, मेरी जिन्दगी से जुदा नहीं ’

(तरजुमा=अनुवाद, राजदां=मर्मज्ञ, फख्र=अभिमान)

खरंच या ओळी शकीलांच्या काव्यजीवनातील समाधानाची जाणीव करून देतात. कोणत्याही कवीला अगदी हेवा वाटावा असेच होते हे शायर शकील बदायुनी (Shakeel Badayuni). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात शायर (Shayar/Urdu Poet) आणि गीतकार (Lyricist) म्हणून शकील बदायुनी या नावाला एक वेगळंच वलय आहे. अनेक अजरामर गाणी लिहून या गीतकाराने आपला एक स्वतंत्र ठसा रसिकांच्या मनावर उमटविला आहे. ३ ऑगस्ट १९१६ ला उत्तर प्रदेशातील ‘बदायूं’ (Badayun) मध्ये जन्मलेल्या शकील अहमदना लहानपणापासूनच साहित्यसहवास मिळाला. घरीच अरबी, फारसी, उर्दूचं शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांच्या वडिलांनी केली होती.बदायूं हे एक असं शहर होतं की, तिथल्या लोकांवर लखनवी शायराना अंदाज फिदा होता. घराघरांत काव्यासंदर्भात चर्चा व्हायची, त्यामुळे शकील यांच्यावर या गोष्टींचा खूप प्रभाव पडला. शिक्षणाच्या निमित्तानं शकील अलीगडला आले. इथं त्यांचा परिचय जानीसार अख्तर व अनेक शायर-कवींशी झाला. कॉलेजात असताना त्यांनी मुशायऱ्यांत भाग घेण्यास सुरुवात केली. शायरीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिकही मिळायला लागली. हळूहळू त्यांच्या कवित्वावर गझलेचा शिक्का बसायला लागला. (Remembering the Popular Lyricist of Hindi Cinema Shakeel Badayuni)

सामाजिक विषयांवर कवित्व न करता शकीलनी आपल्या शब्दांतून प्रेमविषयक भावना दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला. मुशायऱ्यांच्या निमित्तानं शकीलनी देशभरातल्या अनेक प्रमुख शहरांना भेटी दिल्या. आपल्या शायरीचा दर्जा राखून त्यांनी लोकप्रिय रचना करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला; पण लोकप्रियतेच्या आहारी जाऊन आपल्या काव्याचा दर्जा कधीच कमी होऊ दिला नाही. यांचं आयुष्य मुख्यत: चार ठिकाणी आकाराला आलं. त्यांचं बालपण बदायूं या साहित्यप्रेमींच्या गावात गेलं. शिक्षण अलिगढ विद्यापीठात झालं. नोकरी अन शायरी केली दिल्लीत अन शेवटी गीतकार म्हणून नावारूपाला आले ते मुंबईत. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी लखनौ येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. तेव्हा शकील यांची कवी नीरज, जीगर मुराराबादी यांच्याशी भेट झाली. या दिग्गजांकडून त्यांनी शायरीचे ज्ञान संपादन केले. त्यानंतर ते दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेले असताना एकदा मुशायरा निमित्ताने मुंबईत गेले.त्यावेळी नामवंत निर्माता- दिग्दर्शक ए. आर. कारदार एका चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यांना शकीलांच्या रचना ऐकायला मिळाल्या. त्यांनी आपल्या स्टुडिओमध्ये बोलावून नौशादजींची (Naushad) भेट घडवली आणि दर्द चित्रपटासाठी गीतलेखनाची शकीलना विनंती केली.

१९४६ ला मुशायऱ्यांसाठी आलेल्या शकीलांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. शकीलना चित्रपटक्षेत्रात आणण्याचं श्रेय संगीतकार नौशादनांच जातं. दिल्लीत मुशायरे गाजवणाऱ्या शकीलनी मुंबईच्या चित्रपट जगतात पाऊल टाकलं नसतं तर एक शायर म्हणूनही त्यांना नांव मिळालंच असतं. मुशायरा गाजवलेल्या शकीलना ‘दर्द’ चित्रपटासाठी संगीतकार नौशादनी गीतकार म्हणून आणलं. १९४७ च्या ‘नाटक’ साठी नौशादनी शकील यांचेकडून केवळ दोन गाणी घेतली अन त्याच वर्षातल्या ‘दर्द’ मधली सर्वच्या सर्व गाणी त्यांना लिहायला दिली. इथूनच सुरू झाली शकीलांची चित्रपट कारकीर्द.

 ‘दर्द’ पासून नौशाद-शकील ही जोडी नौशादांच्या ‘संघर्ष’ चित्रपटापर्यंत अखंडीत राहिली. नौशादजींचे नाव घेतले की, चटकन ओठावर नाव येते ते शकील बदायूनी यांचे. संगीतकार आणि गीतकार असे घट्ट नाते या दोघांमध्ये निर्माण झालेले होते. जवळ जवळ ६४ चित्रपटांना संगीत देणाऱ्या नौशादजींनी ३० चित्रपटांसाठी शकील बदायूनी यांच्याकडूनच लिहिलेली गाणी हे शकीलांच्या कारकिर्दीचा मुख्य अध्याय ठरला. हिंदी चित्रपट संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या हृदयावर मात्र नौशाद-शकील हीच जोडी कोरली गेली आहे. कारण शकीलजींच्या अर्थपूर्ण काव्याला तेवढेच दर्जेदार संगीत व उच्चतम श्रेणीची चाल नौशादजींनी दिलेली आहे.

शकीलांच्या दर्द या पहिल्याच चित्रपटातलं उमादेवी (टूनटून) च्या आवाजातलं

‘अफसाना लिख रहीं हूं दिले बेकरार का आंखोमें भरके रंग तेरे इंतजार का’ (afsana likh rahi hoon dil e beqaraar ka..Dard1947)

हे गाणं दणकून गाजलं. अगदी सोप्या भाषेत प्रेमाचं रूप उलगडून दाखवण्याचं कसब शकीलना चांगलं जमलं. कठीण गोष्टी सोप्या करून सांगण्यातलं मर्म त्यांना उमजलं. त्याकाळात या गाण्याने एकच धूम माजवली आणि रसिकांनी नौशाद-शकील जोडीवर पसंतीची जबरदस्त मोहर उमटवली जी चिरकाल टिकलेली आहे.

या चित्रपटाची एक खासियत होती की, यातील सर्व गाणी महिला गायिकांनी म्हंटली होती. पुरुष गायकाला संधीच नव्हती. ‘दिल धडके आंख फडके’ हे सुरैय्याच्या आवाजातील गीत आणि ‘हम दर्द का अफसाना दुनियाको सुना देंगे’ हे शमशादजींचे कोरस गीत खूप गाजले. एकंदरीत काय शकील बदायूनी का बम्बई मकाम तय हो गया और वो वापस दिल्ली गये ही नहीं.

प्रथम चाल आणि नंतर काव्य हा प्रकार नौशादजींना कधीच भावला नाही. कवीने संपूर्ण गाणे लिहिल्यानंतर आणि त्यातील काव्य त्यांच्या पसंतीस उतरल्यानंतरच ते त्या काव्याला सुरांची महिरप बसविण्याच्या मागे लागत. ‘बाबूल’ या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा या बाबतीत खूप काही सांगून जातो. या चित्रपटासाठी शकील बदायूनींनी गाण्याचा मुखडा लिहिला.

‘मिलते ही नैना दिल हुआ दिवाना किसी का’

हे गाणं नौशादजींच्या पसंतीस उतरलं, पण त्याला चाल लावताना त्या मीटरमध्ये ‘नैना’ हा शब्द काही फिट बसत नव्हता आणि त्याच्या जागी दुसरा शब्द दोघानांही सुचत नव्हता.नौशादजी व शकील हे दोघेही अस्वस्थ झाले.पण गाण्याला काही चाल बसेना. तेवढ्यात शकील डोळे चोळू लागले. कारण त्यांच्या डोळ्यात अचानक काहीतरी गेले होते. नौशादजीचं त्याकडे सहज लक्ष गेले व चटकन शकील बदायूनीना म्हणाले, ‘ये आपकी आंखों को क्या हुआ’ शकील बदायूनी पटकन चमकले. मघापासून पडलेला पेच अचानक सुटला. त्यांनी ‘नैना’ ऐवजी ‘आंखे’ हा शब्द वापरला. तो शब्द नौशादजींच्या मीटरमध्ये अचूक बसला आणि एका सदाबहार गाण्याचा जन्म झाला. हे गाणे गायले होते तलत मेहमूद आणि शमशाद बेगम यांनी.  या महान जोडीने अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीत मोठ्या उस्तादांच्या बैठकीतून घराघरांत अलगदपणे नेऊन पोहोचविले. अनेक रागदारीत बांधलेली त्यांची मधाळ गाणी

रसिकांच्या थेट हृदयास भिडली. उदा: ‘बेकस पे करम किजीये (मुगल-ए-आजम, राग-केदार), प्रेम जोगन बन जाऊं (मुगल-ए-आजम, राग-सोहनी), ये दिलकी लगी क्या कम होगी (मुगल-ए-आजम, राग-जयजयवंती), ओ दुनियाके रखवाले (बैजू बावरा, राग-दरबारी कानडा), आज गावत मन मेरो झूमके (बैजू बावरा, राग-देसी), मोहे भूल गये सावरियां (बैजू बावरा, राग-भैरव), मन की बीन मतवारी बाजे (शबाब, राग-बसंत बहार), न मिलता गम तो (अमर, राग यमन कल्याण) अशी अनेक रागदारीत बांधलेली व आजही लोकप्रिय असलेली गाणी सांगता येतील.

कोणत्याही धर्माला जातीचे लेबल लावणे चूक होय.सर्व धर्मात ईश्वराचीच आराधना केली जाते. मग तो अल्ला असो की ईश्वर. संगीत जाती-धर्माच्या भिंती कशा तोडून टाकतात याचे बोलके उदाहरण म्हणजे १९५२ मधील ‘बैजू बावरा’ तील  या भक्तीगीताचे देता येईल.

       ‘मन तरपत हरी दर्शन को आज, मोरे तुम बिन बिगरे सगरे काज होss बिनती करत हूं रखियो लाज ’ (man tarpat hai hari darshan ko aaj.. Baiju Baawra1952) 

काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सकाळच्या प्रहरी दररोज हे भक्तीगीत लावले जाते. या भक्तीगीताशिवाय काशी विश्वेश्वराला जग येत नाही असे गंमतीने म्हंटले जाते. हे गाणे गाणारे मोहम्मद रफी, गीत लिहिणारे शकील बदायूनी व संगीतकार नौशाद हे तिघेही धर्माने मुस्लीम; पण त्यांनी निर्माण केलेल्या ह्या भक्तीगीताने जाती-धर्माच्या सगळ्याच रेषा पुसून टाकल्या आहेत.

शकीलनी लिहिलेल्या गाण्याला नौशादजींचं संगीत लाभावं, ते रफींनी गावं अन पडद्यावर

दिलीपकुमारनी साकारावं असा ‘चौरस’ योग जुळून आला तेव्हा तर बहारच. ही ‘चतुरंगी’ मैफल जुळून आली तेव्हा ‘मेरी कहानी भूलनेवाले (दीदार), दिल में छुपा के प्यार का (आन), मुहब्बत की राहों में (उडन खटोला), मधुबन में राधिका (कोहिनूर), नैन लड जइहे (गंगा जमुना), मुझे दुनियावालो (लीडर), दिलरुबा मैने तेरे प्यार में (दिल दिया दर्द लिया), आज की रात मेरे दिल की (राम और श्याम), जब दिल से दिल टकराता है (संघर्ष)’ यांसारखी कोरीव लेणी मनाला आनंद देऊन गेली.

     उत्तर प्रदेशी लोकसंगीतावर आधारित ‘दुखभरे दिन बीते रे भैया’, बोलीभाषेचा बाज असलेले ‘नैन लड जइहे तो’ आणि ‘मोहे भूल गये सांवरिया’, ‘आवन कह गये अजहुं न आये’ यांसारख्या गीतांमधून त्यांनी आनंद आणि आर्तता यांची अनुभूती दिली. ‘मधुबन में राधिका नाचे रे’ मधून त्यांनी राधा-कृष्णाची प्रतिमा सुरेख गुंफली; तर ‘बैजू बावरा’तील ‘मन तरपत हरि दर्शन को आज’ हे गीत प्रत्येकाच्या घरात प्रार्थनारुपी झाले. एका होळीच्या सणावरच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलंय त्याचं प्रत्यंतर ‘होली आई रे कन्हाई (मदर इंडिया), तन रंग लो जी मन आज रंग लो (कोहिनूर), खेलो रंग हमारे संग (आन), लायी है हजारो रंग होली (फूल और पत्थर) यासारख्या गाण्यातून येतं. उर्दूवर हुकमत असलेल्या शकीलनी ‘मोहे पनघट पे नंदलाल, आज गावत मेरे मन मेरो झुमके’ अशा अस्सल  हिंदी रचनाही केल्या. त्यांनी भारतीय संस्कृती जपण्याचे काम देव-देवतांची गाणी लिहिताना अचूक केले. उदा: ‘ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा), मेरी पत राखो गिरिधारी (घुंघट), सुन ले पुकार आयी आज तोरे द्वार (फूल और पत्थर), जय रघुनंदन जय सिताराम (घराना), मनमोहन मनमें हो तुम्ही (कैसे कहूं) ही सर्वच गाणी ईश्वरभक्तीत न्हाऊन निघणारी आहेत. शकील यांच्यासारख्या मुस्लीम परंपरा असलेल्या घरातल्या गीतकाराच्या या रचना ऐकताना असे वाटते की, कसला धर्म आणि कसली जात.  

     आपल्या हयातीत संगीतकार नौशादसाठी भरभरून गीतलेखन करणाऱ्या शकील बदायूनीबाबत हेच म्हणता येईल. शकीलनी तशी अनेक संगीतकारांकडे गाणी लिहिली. पण त्यांचा विषय सुरु होतो अन संपतो तो नौशादजींच्या गाण्यांच्या आठवणींनी. एखादा गीतकार आपल्या गीतामधून माझ्या जीवनाच्या प्रवासानंतरसुद्धा तुम्हाला माझी आठवण येत राहिलं असं सांगून जातो.तो प्रयत्न शकीलनी १९४९ साली आलेल्या ‘मेला’ या चित्रपटात केला. या चित्रपटाकरिता रफी साहेबांनी गायलेली एक रचना

‘ये जिंदगी के मेले, दुनिया मे कम न होंगे, अफसोस हम ना होंगे’ आजही विसरता येत नाही. (ye zindagi ke mele duniya me kam na honge)

नौशाद यांच्याकडे काम करताना इतर संगीतकारांकडेही शकील साहेबांचे शब्द जुळले. त्यांनी इतर संगीतकारांसाठी तेवढीच दर्जेदार गाणी लिहिली. गुलाम मोहम्मद यांच्यासोबत त्यांचे काही चित्रपट गाजले. १९४९ साली प्रदर्शित झालेला ‘शायर’ हा चित्रपट हा एक वेगळाच त्रिकोण होता. या चित्रपटाचा नायक होता देव आनंद तर नायिका सुरैय्या व कामिनी कौशल.या चित्रपटाकरिता मुकेश-सुरैय्या यांच्या आवाजातील…..

       ‘ये दुनिया है यहां दिल का लगाना किसको आता है

        हजारो प्यार करते है, निभाना किसको आता है’

असं अप्रतिम ट्युनिंग जमलं होतं. तर याच गुलाम मोहम्मदांच्याकडे अन्य काही गाणी गाजली. त्यापैकी काही गाणी …‘जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनिया से दिल भर गया’ (दिले नादां) चल दिया कारवां, लुट गये हम यहां (लैला मजनू) याशिवाय ‘परदेस, नाजनीन, शीशा, गौहर, मिर्जा गालिब, कुंदन, सितारा, मालिक, हलचल,’ या चित्रपटांसाठी शकीलनी उत्तम गाणी लिहिली. हे चित्रपट गाजले. गुलाम मोहम्मद हे नौशाद यांचे शागीर्द त्यामुळे दोघांच्या संगीतात शकील यांची गाणी फिट बसत होती. गुलाम मोहम्मद यांच्या किमान वीस चित्रपटांत शकील यांची गाणी होती. ‘दिल की लगी ने हमको (पारस-रफी), जो ख़ुशी से चोट खाये (दिले नादां-तलत), हम तुम ये बहार (अंबर-रफी,लता), तारा रारा रम (हूर-ए-अरब-लता), मन धीरे धीरे गाये रे (मालिक-तलत, सुरैय्या)’. ‘मिर्झा गालिब’ मधली सगळी गाणी गालिबची असतानाही गुलाम मोहम्मदनी या चित्रपटासाठी दोन गाणी शकीलांच्याकडून घेतली अन गुलाम मोहम्मद यांचच संगीत असेलल्या ‘पाक दामन’ मधल्या एका मुशायराच्या दृश्यात स्वत: शकील शायरी पेश करताना दिसले.

संगीतकार हेमंतकुमार व शकील बदायुनी यांची जोडी जमली ती ‘बीस साल बाद’ या चित्रपटापासून. यातील सर्व गाणी शकील यांचीच होती व ती अविस्मरणीय ठरली.

‘कहीं दीप जले कहीं दिल जरा देख ले आकर परवाने, तेरी कौनसी है मंझील’

‘जरा नजरों से कहदो जी निशाना चूक ना जाये’

‘बेकरार करके हमे यूं ना जाईये, आपको हमारी कसम लौट आईये’.

तसेच हेमंतदांचे संगीत असणाऱ्या गुरुदत्त यांच्या ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटातील गाणी शकील यांचीच होती. आशा भोसले यांनी गायलेली

‘मेरी बात रही मेरे मन में, कुछ कह ना सकी उलझनमे’

‘भंवरा बडा नादान है, बगीयन का मेहमान हैं’

‘साकीया आज मुझे नींद नही आयेगी’

ही तीन गाणी लोकप्रिय झाली तर गीतादत्तच्या आवाजातील

‘न जाओ सैंय्या छुडाके बैंया कसम तुम्हारी मैं रो पडूंगी’

‘पिया ऐसे जिया मे समाय गयो रे’… ही गाणी ऐकताना मीनाकुमारीचा चेहरा नजरे समोरून जात नाही. याशिवाय हेमंतकुमार यांच्याकडे त्यांनी ‘बिन बादल बरसात’ या चित्रपटाकरिता गाणी लिहिली…..

‘इक बार जरा फिर कह दो, मुझे शरमा के तुम दीवाना’

‘जब जाग उठे अरमां तो कैसे नींद आए’

       एस.डी. बर्मनदांच्यासाठी ‘कैसे कहूं’, सी. रामचंद्र यांचेसाठी ‘जिन्दगी और मौत’ असे चित्रपट शकील यांनी केले. त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची गझल असायची. ती चित्रपटाच्या विशिष्ट सुरात बांधायचं कसब त्या त्या संगीतकाराचं होतं. म्हणूनच शकीलनी चित्रपटांसाठी गीतरचना करतानाही गझल डोळ्यांसमोर ठेवूनच त्याची रचना केली. ‘कोई सागर दिल को बहलाता नहीं’ (दिल दिया दर्द लिया) आणि ‘दिल लगा कर हम ये समझे, जिंदगी क्या चीज है’ (जिन्दगी और मौत) ही त्यांची गाणी खास शायराना अंदाजातली वाटतात.

संगीतकार रवी आणि गीतकार शकील ही भट्टी देखील चांगलीच जमली.१९६० साली आलेल्या गुरुदत्त फिल्मच्या ‘चौदहवी का चांद’ चित्रपटाला शकील बदायुनी यांचीच गाणी होती. शकील म्हणजे ‘सुंदर’. सौंदर्याचा उपासक असलेल्या शकील यांचे शब्द चित्रपटाच्या टायटल सॉंगमध्ये नायिकेच्या सौंदर्याचे वर्णन करताना किती अप्रतिम उतरले होते पहा.

‘चौदहवी का चांद हो या आफताब हो,जो भी हो तुम खुदाकी कसम लाजवाब हो’

रफी साहेबांचा आवाज आणि वहिदा रहेमानचे सौंदर्य व गुरुदत्त सारखा देखणा नायक त्यामुळे या गाण्याला ‘चार चांद लग गये’.तसंच…

‘मिली खाक में मोहब्बत जला दिल का आशियाना, जो थी आज तक हकीकत वहीं बन गये फसाना’ (Mili Khaak Mein Mohabbat – Guru Dutt, Mohd. Rafi, Chaudhavin Ka Chand) 

हे मोहम्मद रफी यांचे करुण गीतही तितकेच सुंदर होते. ‘घुंघट’ या कौटुंबिक चित्रपटाकरिता लतादीदींच्या आवाजातील ‘मोरी छम छम बाजे पायलिया, लागे ना मोरा जिया’. तसेच ‘घराना’ चित्रपटाकरिता गायलेलं बालगीत ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ ने धमाल केली तर रफी साहेबांच्या आवाजातील ‘हुस्नवाले तेरा जबाब नहीं’ या गाण्याने पारितोषिक मिळवले. ‘गहरा दाग’ हा राजेंद्रकुमार-मालासिन्हाचा स्मृतीआड गेलेला चित्रपट परंतु या चित्रपटाकरिता रफी यांनी गायलेले  ‘भगवान एक कसूर की इतनी बडी सजा’ , ‘आज उडता हुआ एक पंछी’ आणि युगलगीत ‘तुम्हे पाके हमने जहां पा लिया है’ लक्षात राहते.

‘दो बदन’ या चित्रपटाचा नायक मनोजकुमार होता. यातील रफींनी गायलेली गाणी अप्रतिम होती.

‘नसीब में जिसके जो लिखा था वो तेरी महफिल में काम आया’

‘रहा गर्दीशो मे हर दम मेरे इश्क का सितारा’

‘भरी दुनिया मे आखिर दिल को समझाने कहां जाये’

‘जरा सून हसीना (रफी- कौन अपना और कौन पराया), जिंदगी के सफरमें अकेले थे हम (रफी- नर्तकी), नारी जीवन झूले की तरह इस पार कभी उस पार कभी (लता- औरत), जाने तेरी नजरोंने क्या कर दिया (लता- रफी, गृहस्थी), जा जा रे जा दिवाने जा मैंने जो चाहा तुझको (आशा-रफी, गृहस्थी), जबसे तुम्हे देखा है (आशा भोसले-घराना), खिले हैं सखी आज फुलवा बनके (लता-आशा-उषा – गृहस्थी), दुनिया में मुहब्बतवालों की (आशा- प्यार किया तो डरना क्या) ही शकील-रवी जोडीची गाणी कोण विसरणार आहे? या गाण्यांची मोहिनी त्यावेळी लोकांवर जबरदस्त पडलेली होती आणि आजही ती मोहिनी शिल्लक आहे.एकूणच रवींनी शकील बदायूनी यांच्याबरोबरच जास्त चित्रपट केले. संगीतकार रवी यांनी शकील बदायूनींच्या बरोबर ‘दूर की आवाज,फूल और पत्थर असेही आणखीन काही चित्रपट केले. फूल और पत्थर मधील….

       ‘शीशे से पी या पैमाने से पी, या मेरी आंखों से मैखाने से पी’

       ‘जिंदगी से प्यार करना सीख ले,जिसको जीना हो मरना सीख ले’

       ‘लायी है हजारो रंग होली,कोई तन के लिए कोई मन के लिए’

 अशी चित्रपटांतील हलकीफुलकी गाणी म्हणजे संगीतकार रवींच्या यशाची सुवर्णकिनार होती. शकीलनी प्रत्येक गाण्यावर आपली मोहर उठवली. शायरीत पारंगत असूनही त्यांनी आपल्या गीतांमध्ये जसा बोजडपणा येऊ दिला नाही तसा गाण्यांचा दर्जाही कधी घसरू दिला नाही.

हर्ष-खेद, लोभ-द्वेष या भावना व्यक्त करताना त्यांची लेखणी कधी विखारी बनली नाही.

‘जिंदगी के आईने को तोड दो …इस में अब कुछ भी नजर आता नहीं’ (कोई सागर-दिल दिया दर्दलिया) या ओळीतली प्रतिमा हृदयाला भिडते. याच धर्तीवर ‘तस्वीर-ए-मुहब्बत थी जिसमें, हमने वो शीशा तोड दिया’ (संघर्ष) असं ते सहजतेनं लिहून जातात. प्रेमभंगाच्या दु:खात होरपळणारा हा नायक जेव्हा ‘ओ बेवफा तेरा भी यूं ही टूट जाए दिल, तू भी तडप तडप के पुकारे कि हाय दिल’ अशी शापवाणी उच्चारतो तेव्हा शकीलांच्या लेखणीचा हा आविष्कारही थक्क करून जातो. ‘खामोश जिंदगी को एक अफसाना मिल गया, भंवरे को फूल शमा को परवाना मिल गया’ (दिले नादां) अशी सरळ साधी रचना करणारे शकील. म्हणूनच स्वप्नसृष्टी उद्ध्वस्त झालेल्या ‘बैजू बावरा’च्या नायकानं ‘महल उदास और गलियां सूनी चूप चूप है दिवारें’ (ओ दुनियाके रखवाले) असा आकांत मांडला तेव्हा शकीलांच्या या शब्दांनी अनेकांचं हृदय दु:खावेगानं भरून आलं.

जीवनाचा आनंद भरभरून लुटायचा असेल तर सारं काही झुगारून प्रेम करायला हवं, हा विचार मांडताना ते म्हणतात, ‘जिंदगी से प्यार करना सीख ले, जिसको जीना हो मरना सीख लें’ (फूल औरपत्थर). प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द त्यांनी दिलेला विद्रोहाचा इशारा खऱ्या अर्थानं प्रकटला तो ‘मुगल-ए-आजम’ मधल्या अनारकलीच्या मुखातून.

‘पर्दा नही जब कोई खुदा से, बंदों से पर्दा करना क्या’

या शब्दांमधील विद्रोहाची धग हे गाणं पूर्णत: समजून घेऊन ऐकतानाच जाणवू शकेल. जीवनाच्या प्रत्येक रंगावर शकील यांनी आपल्या गीतामधून प्रकाश टाकला. चित्रपट गीत लेखनाकरिता लागणारी सगळी गुणवत्ता त्यांच्यात होती. संगीताकडे लक्ष देऊन गीत रचना, चित्रपटातील प्रसंगानुरूप गाणी हे सर्व त्यांना सहज जमत होते. चौदहवी का चांद मधील शीर्षक गीत आणि प्यार किया तो डरना क्या हे मुगल-ए-आजम मधील गीत म्हणजे हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात थोर अशी प्रेमगीतं मानावी लागतील.

(C A T Cat, Cat Maane Billi – Kishore Kumar, Asha Bhosle @ Dilli Ka Thug)

प्रेमातील अनेक छटा व्यक्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. तरीही ‘सीएटी कैट माने बिल्ली’ (दिल्ली का ठग) अशीही भाषा गाण्याच्या सोयीसाठी वापरली. तसेच शुद्ध उर्दूचा आधार घेत आपल्या गाण्यातून त्या भाषेचा आणि शब्दसंपदेचा वारंवार वापरही केला. मुशायरा या कार्यक्रमातून दाखल झालेले हे शायर केवळ गझल पुरतेच मर्यादित राहिले नाहीत. शकील जेंव्हा चित्रपट गीत लेखनाकडे वळले तेंव्हा त्यांनी त्यात खूप बदल केले. अवघड मर्म सोपं करून दाखविण्याचं काम त्यांनी आपल्या गीतांमधून केले. खरंतर गझलची निर्मिती करणाऱ्या कवीच्या लेखणीवर फारसी शब्दांचा प्रभाव असतो परंतु शकील यांच्या गीतांकडे पाहताना हा प्रभाव दिसून येत नाही. त्यांचं गीत हे एक सामान्य माणसाची व्यथा सांगणारच आहे असं वाटतं. शकील यांच्या गीतातील दर्द अवर्णनीय आहे. सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या तोंडी गीतं लिहिताना तरुण मनात दडलेली उत्सुक आंदोलनं टिपत त्यांनी बळ दिलं.कौटुंबिक,सामाजिक मर्यादांचे पारंपारिक काच सहन करत जगणाऱ्या सोशिक तरुण वर्गाचं जगणं त्यांच्या गीतांनी सुसह्यच नव्हे तर सुंदर केलं. एवढेच नव्हे तर ‘प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की’ असा संदेश देत ठणकावून या धाडसाला नैतिकतेचं अधिष्ठान दिलं. भावनिक परिवर्तनाचं हे सुतोवाच होतं.

शकील बदायुनी यांची किती म्हणून गाणी सांगावी. चित्रपटाकरिता गीतलेखन करताना अन्य काव्य लेखनाकडे शकील बदायुनी यांचे दुर्लक्ष झाले असे म्हणता येणार नाही. त्यांनी शायरीच्या क्षेत्रात अफाट किर्ती कमावली. त्यांचे ‘रानाईयां, सनमो-हरम, रैगिनीयां शबिस्तां’ ही काव्याची पुस्तके प्रकाशित झाली व लोकप्रिय ठरली. चित्रपटगीतं लिहूनही त्यांनी केलेल्या गैरफिल्मी कामगिरीची दखल जाणकारांनी खुल्या दिलानं घेतलीय. गीतलेखनाच्या धबडग्यात काव्यगुण कोमेजू न देणाऱ्या कवींच्या प्रभावळीत साहिर, कैफी आझमी यांच्याप्रमाणे शकील यांचं नावही अग्रस्थानी येतं. तलत मेहमूदनी गायलेल्या ‘गमे आशिकी से कह दो, रंग लाए गमे दौरां,चंद लम्हे तेरी महफिल में, तुमने ये क्या सितम किया, दिल के बहलाते की तदबीर, मेरे साकिया मेरे दिलरुबा’ या गैरफिल्मी रचना शकीलांच्या काव्यप्रतिभेची साक्ष पटविण्यास समर्थ आहेतच. बेगम अख्तर यांना शकील बदायुनींच्या रचना आवडत असत. कवी शैलेंद्र हे शकील बदायूनीनींचे चाहते होते. ‘दुनियामें हम आये है’ (मदर इंडिया) हे शैलेन्द्रांचे फार आवडते गाणे होते. असे अर्थपूर्ण गाणे आपल्याला लिहिता आले नाही, अशी खंत शैलेंद्रनी व्यक्त केली होती.

 शकील अत्यंत लोकप्रिय शायर होते, त्यामुळं इतर शायरही त्यांच्या शायरीला मनमुराद दाद द्यायचे. ‘ऐ मुहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ या गझलेने साहिर लुधियानवी इतके प्रभावित झाले की, ‘हम दोनो’ मध्ये त्यांनी यासारखंच एक गीत लिहिलं. ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया’ एखाद्या शायरच्या कलमातून उतरलेल्या ‘ऐ मुहब्बत’ वरून दुसऱ्या शायरनं एखादं गीत लिहावं यासारखी कलावंताला दाद कुठली असू शकते? बेगम अख्तरांचा जीवघेणा दर्दभरा आवाज आणि शकील बदायुनींचे काळजाला घरं पाडणारे शब्द..एवढंच या गझलेला रसिकमान्यतेचा पुरावा म्हणणं पुरेसं आहे.

गाजलेल्या कवितेची पहिली ओळ निवडून त्याच तोडीची दुसरी रचना करणं या प्रकाराला उर्दू काव्याच्या परिभाषेत ‘उसकी जमीनपर चलना’ असं संबोधलं जातं. साहिरनी आपल्या ‘ताजमहल’ या गाजलेल्या कवितेत ‘एक शहेनशाह ने बनवा के हंसी ताजमहल,हम गरीबों की मुहब्बत का उडाया है मजाक’ असं जळजळीत भाष्य केलं होतं. शकील बदायूनींनी साहिरांची हीच ओळ घेऊन ‘लीडर’ मधलं गाणं लिहिलं,

‘एक शहेनशाहने बनवाके हंसी ताजमहल सारी दुनिया को मुहब्बत की  निशानी दी है !’ (Ek Shahenshah Ne Banwa Ke Haseen Taj Mahal)

     फिल्मी दुनियेत काम करताना त्यांना सलग तीन वेळा फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार मिळाला. अन्य कोणाही गीतकाराला साधता न आलेली ही ‘हैटट्रिक’ शकीलच्या ज्या तीन गाण्यांनी साधली त्यातलं एकही गाणं नौशादनी संगीत दिलेलं नव्हतं हे विशेष. १९६० सालचा ‘चौदहवी का चांद’ चित्रपटातील ‘चौदहवी का चांद हो’ या गाण्यासाठी, १९६१ साली ‘घराना’ चित्रपटातील ‘हुस्नवाले तेरा जवाब नहीं’ या गाण्यासाठी, १९६२ साली ‘बीस साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल’ या गाण्यासाठी. गंमत म्हणजे पहिल्या दोन गाण्यांचे संगीतकार होते रवी आणि तिसरं होतं हेमंतकुमारांच. याउलट नौशादना त्यांच्या आयुष्यातलं एकमेव ‘फिल्मफेअर’ मिळवून देणाऱ्या ‘बैजू बावरा’ची गाणी मात्र शकील यांचीच होती.

     शकीलांच्या कारकीर्दीच्या अखेरीस संगीताचा नवा प्रवाह आला होता. चित्रपट बदलला, गाणी बदलली, व्यावसायिकता आली. २० एप्रिल १९७० रोजी या महान गीतकाराने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्याच गीतामधून त्यांना श्रद्धांजली देताना त्यांच्याच शब्दात थोडा फरक करून म्हणूया ……

‘शकील साहब, ये जिंदगी के मेले, दुनिया में कम न होंगे, अफसोस तुम न होंगे’   

 

शकीलनी मृत्युपूर्वी कितीतरी वर्षं आधी लिहून ठेवलं होतं…

       ‘ जिन्दगी देने वाले सुन, तेरी दुनिया से जी भर गया’

स्वत:च्या कवितेबद्दल शकीलनी म्हटलंय, ‘जो नक्श-ए-खुर्दा-ए-पा न हो उसी रहगुजर की तलाश है’ (इतरांच्या पदचिन्हांनी रुळलेली जी वाट नसेल तिच्या शोधात मी आहे.) कोणाच्याही प्रभावाखाली न येता शकीलनी कविता आणि चित्रपटगीतं लिहिली. गालिबच्या परंपरेशी नातं सांगणारा शकील बदायूनींचा ‘अंदाज-ए-बयां’ और होता यात शंका नाही. शेवटी म्हणावं वाटतं …..  

‘ वही कारवां,वही रास्ते, वही जिंदगी, वही मरहले

  मगर अपने अपने मुकामपर कभी तुम नही कभी हम नही ’

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment