1985-86 च्या सुमारास संगीताच्या दुनियेत गझलचं पीक भरमसाठ आलं होतं… इतकं  की जणू काही गझलचा जन्म 1984-85 साली झाला. यापूर्वी जणू काही गझल गायिली गेली नव्हतीच. बेगम अख्तर, तलत महमूद, लता, रफी यांनी फिल्मी गायनात व खाजगी रेकॉर्डस्‌साठी इतक्या गझला गायल्या होत्या व त्याची खुमारी काही निराळीच होती. तलत महमूद व लता यांच्या आवाजाचा गझल गाण्याकरिता सुरेख उपयोग करून घेणारा एक गझल सम्राट संगितकार होता. त्याचं नाव होतं मदन मोहन! (Music Director Madan Mohan) एकापेक्षा एक अवीट गोडीची गाणी देऊनदेखील ज्याच्या चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला व त्या अपयशाचं सारं खापर ज्याच्या माथी मारलं गेलं तरी ज्यानं कधी तक्रार केली नाही, असा हा मदन मोहन! आपल्या अल्पशा कारकीर्दीतून असंख्य आठवणी ठेवून गेला. (Remembering the Melodious Musician Madan Mohan)

      देवेंद्र गोयल यांनी 1950 साली ‘आँखे’ या आपल्या चित्रपटाच्या संगिताची जबाबदारी मदन मोहन यांच्यावर सोपवली होती. ‘बरसात’ पासून लताचा आवाज सर्वत्र बहरू लागला होता. व त्यामुळेच मदन मोहन यांनी ‘आँखे’ची गाणी गाण्याकरिता लताला पाचारण केलं, परंतु गैरसमजामुळे लता त्यांच्याकडे गायली नाही. ‘मेरी अटरिया पे कागा बोले’ हे गाणं त्यांनी मीना कपूरकडून गाऊन घेतलं, परंतु नंतर जेव्हा लताला खरी परिस्थिती समजली तेव्हा तिने त्यांची माफी मागितली व ‘मदहोश’ या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटापासून ती त्यांच्याकडे शेवटपर्यंत गात होती. मदन मोहन यांच्या संगिताचा ती प्राण होती. गीतकार राजा मेहदी अली खाँ यांनी गाणी लिहावी, त्यावर मदन मोहन यांनी धुन तयार करावी व लतानी आपल्या सुरेल गळ्याने ती गावी हा सिलसिलाच जणू सुरू झाला. ‘मदहोश’च्या गाण्यापैकी सहा सोलो गाणी लताने गायली. त्यापैकी ‘हमे हो गया तुमसे प्यार बेदर्दी बालमा’ व ‘जब आनेवाले आते हैं फिर आके क्यूँ जाते है’ ही गाणी खास होती. ‘मदहोश’ची गाणी गाजली; परंतु चित्रपट आपटला.

      1952 साली नर्गिस-राज कपूरचा ‘आशियाना’ प्रदर्शित झाला. राजा मेहदी अली यांच्या ऐवजी येथे राजेंद्र कृष्ण गीतकार म्हणून मदन मोहन यांच्या सोबत होते. लताच्या आवाजातील ‘मेरा करार लेजा, मुझे बेकरार कर जा, दम भर तो प्यार करजा’ आणि ‘तुम चांंद के साथ चले आओ, ये रात सुहानी हो जाए’ या गाण्यांनी रसिकांना झपाटून टाकलं होतं. नूतन व सज्जन यांच्या ‘निर्मोही’मधील ‘दुखियारे नैना ढुंढे पिया को निसदिन करे पुकार’ या गाण्यात लताच्या आवाजाची कोमलता, आर्तता शब्दात वर्णन करण्यापलीकडची होती. ‘निर्मोही’ नंतर ‘धुन’, ‘बागी’, ‘एहसान’, ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ हे चित्रपट मदन मोहनना मिळाले, परंतु गाणी बरी जमूनसुद्धा चित्रपट गाजू शकले नव्हते. मदन मोहनच्या अंगी असलेल्या गुणवत्तेनुसार त्याला यश मिळू शकत नव्हतं. हे त्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. एक अपयशी संगीतकार म्हणून मदन मोहनवर शिक्का बसण्याची वेळ आली होती. ए.व्ही.एम.च्या ‘भाभी’ चित्रपटाने चित्रगुप्तला ब्रेक दिला तर याच ए.व्ही.एम.च्या ‘भाई-भाई’ चित्रपटाने मदन मोहनकरिता यशाचे दरवाजे मोकळे करून दिले. सामान्य प्रेक्षकांना गाता येतील व त्याच्या धुनवर ते डोलायला लागतील, अशी गाणी त्यांनी ‘भाई-भाई’करिता दिली.

 

‘भाई-भाई’ चित्रपटाकरिता मदन मोहनने आपल्या शैलीविरुद्ध संगीत दिलं होतं व हे संगीत बाल्कनीतल्या तसेच पिटातल्या प्रेक्षकांना आवडेल असंच होतं. ‘इस दुनिया में सब चोर चोर’, ‘दिल तेरी नजर में अटका रे अटका’, ‘शराबी जा जा जा’, ‘ठंडी ठंडी हवा खाते राजा गया गाँव मे’ ही लताची हलकी-फुलकी गाणी देताना ‘कदर जाने ना, मोरा बालम, बेदर्दी’ सारखं अप्रतिम गाणंही त्यानंच दिलं. किशोरसोबत उडत्या चालीचं ‘मेरा नाम अब्दुल रहेमान’  तर ‘ऐ दिल मुझे बतादे तू किसपे आ गया है हे’ गीता दत्तच्या आवाजातलं गीत यानंच दिलं. ‘भाई-भाई’ रौप्यमहोत्सवी होऊ शकला नाही हे शल्य मदन मोहनला शेवटपर्यंत बोचलं होतं.

आता मदन मोहन करिता सगळे दरवाजे उघडे झाले असं बोलणं सुरू झालं होतं. तोच त्याच्या माथी परत फ्लॉप चित्रपट आले. ‘छोटे बाबू’, ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘समुंदर’, ‘खोटा पैसा’ अपयशी ठरले. ‘गेट वे ऑफ इंडिया’ मधील लताच्या आवाजातील ‘न हँसो हमपे जमाने के हैं ठुकराये हे गाणं गाजलं होते. अनेक निर्माते दिग्दर्शक मंडळींना मदन मोहन हा व्यावसायिक यशस्वी संगीतकार नाही असंच वाटायला लागलं होतं व हा न्यूनगंड मदन मोहनला भेडसावून सोडत होता. त्याच्या मनाची अशी अवस्था असतानाच त्याच्याकडे ‘अदालत’ आला. नर्गिस, प्राण, प्रदीपकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात खरा रंग भरला तो लताच्या आवाजातील दर्दभऱ्या गझलांनी

‘जाना था हमसे दूर बहाने बना लिए’, ‘युँ हसरतोंके दाग मोहब्बत मे धो लिए’, ‘उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते’, ‘अदालत’ रसिकांनी बघितला तो केवळ या गाण्याकरिता, परंतु परत एकवार प्रेक्षक नावाच्या फाटक्या ‘शहनशाह’ने ‘अदालत’ला अव्हेरल. ‘अदालत’ प्रदर्शित झाला त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’मधील लताच्या आवाजातील ‘हम प्यार में जलने वालों को, चैन कहाँ आराम कहाँ’ हे गीत किती उत्कृष्ट होतं, परंतु त्याचं कौतुक झालं नाही. ‘चाचा झिंदाबाद’ करिता लता ‘बैरन निंद न आप, मोहे बैरन निंद न आए’ किती सुरेख गायली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘दुनिया न माने’ या चित्रपटाकरिता अगदी याच लताचा आवाज बहरला होता तो, ‘चल दिलदार वई वई, लेके मेरा प्यार वई-वई, कोई रोके उसे दोके अल्ला मैं मर जाऊंगी’ हे म्हणताना! ‘बाप-बेटे’, ‘मिनिस्टर’, ‘मोहन’मध्ये यश मिळालंच नाही. ‘बहाना’ करिता ‘जा रे बदरा बैरी जा, जा रे, जा रे पिया का संदेसा ला रे, ला रे ला रे!’ सारखी शास्त्रीय संगीताची झालर लावलेली रचना फोल ठरली.

      प्रदीपकुमार व अनिता गुहा यांच्यासारख्या ठोकळ्या कलावंताकरिता मदन मोहनची अप्रतिम गाणी सजली होती ती ‘संजोग’ मध्ये. ‘संजोग’ची ‘चला है कहाँ दुनिया इधर है तेरी’, ‘बदली से निकला है चाँद परदेसी पिया लौट के तु घर आ जा’ आणि ‘वो भुली दास्ता लो फिर याद आ गयी, नजर के सामने घटासी छा गयी’ ही गाणी लतादीदीने गाऊनसुद्धा ‘संजोग’ चालला नाही. ‘भाई-भाई’च्या वेळी जे यश मदन मोहनला मिळालं अगदी तेच यश त्याच्या ‘अनपढ’ या चित्रपटाला मिळालं. लताची सगळी गाणी हिट ठरली व चित्रपटही बऱ्यापैकी चालला. लताच्या आवाजातील ‘है इसी में प्यार की आबरू’, ‘आपकी नजरो ने समझा प्यार के काबील मुझे’, ‘वो देखो जला घर किसी का, जिया ले गयो रे मोरा सावरियाँ’, ही गाणी आजही विसरता येत नाहीत. ‘अनपढ’ बरोबर आलेला ‘मनमौजी’ बरा चालला.

      ‘है सबसे मधुर वेो गीत जिन्हे हम दर्द के सुर मे गाते है’ असं तलत महमुद नेहमी म्हणत असे. त्याच्या आवाजातील हे गाणं ‘पतिता’ या चित्रपटात होतं. अश्रुगीत हेच खरं जीवन संगीत. याच तलतच्या सिद्धांतावर मदन मोहन येथे आयुष्य जगला. तलतच्या कंपभऱ्या स्वरातील सर्व गाणी मदन मोहन यांच्याकडे होती. त्यापैकी ‘मेरी याद में तुम ना आँसु बहाना’ (मदहोश), ‘मैं पागल, मेरा मनवा पागल’ (आशियाना), ‘बेरहम आँसमा’ (बहाना), ‘जिसे दिल में बसाना चाहा था’ (अदा), ‘फिर वही शाम वही गम’ (जहाँ आरा), या गाण्याशिवाय ‘छोटे बाबू’, ‘देख कबिरा रोया’, ‘मोहर’, ‘पॉकेटमार’ यात तलतचा कंप असलेला आवाज बहरला होता. याचं तलतबाबत एकदा तडजोड करण्यास त्यांनी नकार दिला होता. ‘जहाँआरा’च्या निर्मात्याची अशी इच्छा होती की तलत ऐवजी रफीचा आवाज ‘जहाँआरा’मध्ये घेण्यात यावा. ‘जहाँआरा’चा नायक हा हळुवार स्वभावाचा असल्यामुळे तलतचा मृदू स्वरच त्याला योग्य दिसेल असे मदन मोहननी निर्मात्याला सांगितले व त्यांचं हे म्हणणं अगदी सार्थ ठरलं. ‘फिर वही शाम’, ‘मैं तेरी नजर का सुरूर हूँ’, ‘तेरी आँखे के आँसू पी जाऊँ’ ही तलतच्या आवाजातील तिन्ही गाणी रसिकांनी उचलून धरली. ‘जहाँआरा’ व्यावसायिक दृष्टीने बरा चालला.

      आपली सारी हयात मदन मोहननी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत पोहण्यात घालवली, खरं तर या व्यवसायात हे असं आयुष्य जगण्याची त्यांना गरज नव्हती कारण एका धनिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्याचे वडील रायबहादूर चुनिलाल हे सिनेमा धंद्यातील वजनदार व्यक्ती होते. रूपेरी पडद्यावर नायक म्हणूनदेखील ते चमकू शकले असते; परंतु त्यांना हे मंजूर नव्हतं, तरुणपणीच हा युवक फौजेत भरती झाला. 1942 च्या सुमारास जेव्हा दुसरे महायुद्ध संपले तेव्हा अचानक सैन्यातून परत आले व लखनौ येथील आकाशवाणी केंद्रावर त्याने निवेदकाची नोकरी धरली. लखनौ रेडिओवर असताना उस्ताद फैयाज खान, रोशन, आरा बेगम, बेगम अख्तर या संगीताच्या दुनियेतील बड्या मंडळीच्या सहवासात ते आले. संगीताचं कोणतेही शिक्षण न घेता प्रत्येक मैफिलीत हजर राहून त्यांनी शास्त्रोक्त संगीत आत्मसात केले व एकापेक्षा एक गाणी सुंदर दिली.

      ‘जाना था हमसे दूर बहाने बना लिये’ ही गझल शास्त्रीय संगीतावर आधारलेली आहे. अशा कित्येक गझला मदन मोहननी आपल्या संगीतात सादर करून बहार उडवून दिली होती. बागेश्री रागाचा उपयोग त्यांनी ‘अदालत’च्या ‘उनको ये शिकायत है की हम कुछ नही कहते’मध्ये करून घेतला होता तर ‘बहाना’च्या ‘जारे बदरा बैरी जा’ मध्ये यमन कल्याण वापरला. ‘देख कबिरा रोया’च्या ‘तू प्यार करे या ठुकराये’मध्ये मिश्र भैरवी तर ‘आशियाना’च्या ‘मैं पागल मेरा मनवा पागल’मध्ये केदार अचूक वापरला. इतर संगीतकारांच्या तुलनेत मदन मोहनच्या संगीतात वाद्यवृंद कमी असायचा व त्याची गाणी सलग चालीची असायची. लता आणि तलत यांच्या आवाजाचा पुरेपूर उपयोग या संगीतकाराने करून घेतला होता.

      1964 नंतर मदन मोहन यांच्या संगीताचा जोर कमी होत चालला होता तरी पुढील काही गाण्यांच्या ओळी आठवल्या तरी ही गाणी किती अप्रतिम होती, याची प्रचिती येईल. गझलमध्ये ‘नगमा-ओ-शेर-की सौगात किसे पेश करूँ’, ‘हकीकत’मध्ये ‘जरासी आहट होती है तो दिल सोचता है’, ‘वह कौन थी’मधील ‘जो हमने दास्तान अपनी सुनायी’, ‘दुल्हन एक रात की’मधील ‘मैंने रंग ली आज चुनरिया’, ‘मेरा साया’मधील ‘नैनों मे बदरा छाये’ ही लताची गाणी विसरणं कसं शक्य आहे? आपल्या कलेची कदर होत नाही हे लक्षात येताच हे दु:ख विसरण्याकरिता त्यानं मदिरेला जवळ केलं व तिच्याच आहारी तो गेला. जयकिशन ज्या वाटेने गेला तोच मार्ग मदन मोहनने स्वीकारला होता.

      ‘संजोग’, ‘वह कौन थी’, ‘मेरा साया’ असे मोजके 2/4 चित्रपट वगळता बाकी सगळ्या चित्रपटांना व्यावसायिकदृष्ट्या फक्त अपयशच मिळालं. आपल्या चित्रपटांना मिळणारं दुर्मिळ रौप्यमहोत्सवी यश त्याच्या शेवटच्या ‘लैला-मजनू’ या चित्रपटाला मिळालं; परंतु ते पहायला तो थांबला नाही. 14 जुलै 1975 रोजी वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्याने दुनियेस अलविदा केलं.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment