– सुरेश चांदवणकर, मुंबई

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

5 ऑगस्ट 1960 रोजी के. असीफ यांचा ‘मुघल-ए-आझम’ म्हणजेच आपल्या परिचयाचा ‘मुघले आझम’ हा बोलपट भारतात 150 थिएटरांत एकाच वेळी प्रदर्शित झाला. त्या घटनेला आता एकसष्ट वर्षे उलटून गेली. अजूनही हा बोलपट, त्याचं संगीत व त्यातली गाणी ही रसिकांच्या विशेष आवडीची आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करावं असा विचार आहे. साधारणपणे 1944 च्या आसपास दादर परिसरातल्या के. असिफ या तरूणानं ‘सलीम-अनारकली’ च्या कथित असफल प्रेम कहाणीवर एक भव्यदिव्य बोलपट काढायचं स्वप्न बघितलं. त्याही अगोदर शिंपीकाम करणार्‍या या तरूणाच्या लंब्याचवड्या गप्पा व बाष्कळ बाता ऐकून मित्रमंडळी त्याची उघडपणे टिंगलटवाळी करीत असत. त्यात त्यावेळी उमेदवारी करणारे ‘नौशाद’सुद्धा सामील असत. पण पुढं खरोखरच त्या तरूणाचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. इतकंच नव्हे तर त्यानं इतिहास घडवला. त्यात नौशादांच्या संगीताचा वाटा फार मोठा आहे. (Remembering the Making of Evergreen Music of the Greatest Hit film of Hindi Cinema Mughal-E-Azam on its 61st Anniversary)

संगीत दिग्दर्शनासाठी सुरूवातीला पं. गोविंदराम, गुलाम हैदर व अनिल बिश्‍वास यांचा विचार झाला होता. पण 1955 च्या आसपास नौशादनी संगीत द्यायचं हे नक्की झालं. गीतकार म्हणून शकील बदायुनी यांनी नियुक्ती फार आधीपासूनच झालेली होती. बोलपटाचं काम खास आसिफमियाँच्या स्टाईलनं सुरू झालं होतं. चार चार संवादलेखक नेमले होते. पटकथा आकार घेण्यात बरीच मेहनत घेतली जात होती. अनेक फायनार्न्सही झाले. पण शेवटी शापूरजी व त्यांचे चिरंजीव पालनजी ही गुजराथी पिता-पुत्रांची जोडी पैसा गुंतवायला तयार झाली. त्याकरिता ‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि.’ ह्या कंपनीची स्थापना पण झाली. दक्षिण मुंबईत चर्चगेट परिसरात शेकडो देखण्या इमारती बांधण्याचा अनुभव असलेल्या या बापलेकांना मायावी चित्रपटसृष्टीची मात्र काहीच माहिती नव्हती. परिणामी दीडेक कोटी रूपयांहून अधिक रक्कम गुंतवून बनवलेला हा बोलपट आपल्याला भिकेकंगाल बनवणार याची त्यांना खात्री वाटत चालली होती. दरम्यान ह्याच कहाणीवरचा, ‘अनारकली’ ही प्रदीपकुमार व बीना रॉयनं काम केलेला व सी. रामचंद्र यांंच्या संगीतानं नटलेला बोलपट 1953 मध्ये प्रदर्शित झाला. त्यातल्या अवीट गोडीच्या गाण्यांनी लोकप्रियतेचे नवीन उच्चांक निर्माण केले. तरीही के. असीफ अजिबात विचलित झाले नाहीत. ऊलट दुप्पट जोमानं कामाला लागले. संगीताच्या बाबतीत ते स्वतः जागरूक राहून जातीनं लक्ष घालू लागले. ‘अनारकली’तला सलीम गाणं गातो. पण ‘मुघले आझम’ मधला सलीम (भूमिका अगदी दिलीपकुमार करणार असले तरीही) गाणार नव्हता. पार्श्‍वसंगीतात व गाण्यांच्या मधल्या तुकड्यांत (इंटरल्यूड) पाश्‍चिमात्य वाद्यं वाजली तरी चालणार होती. पण गाणी मात्र अभिजात राग रागिण्यांवर आधारित व नृत्याला व भाव प्रकट करायला पोषक अशीच असणार होती. त्यासाठी गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद व बोलपटाचे सर्वेसर्वा के. आसिफमियाँ अहोरात्र मेहनत घेऊ लागले. एकेक शब्द, एकेक ओळ नीट पारखून घ्यायला सुरूवात झाली. बोलपटाची भाषा उर्दू व संवाद काहीसे बोजड असले तरी गाण्याचे शब्द मात्र सोप्या हिंदी भाषेतले व बोली उर्दूतले होते.

अकबर बाहशहाच्या समोर भर दरबारात आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देण्याचा प्रसंग ‘अनारकली’ व ‘मुघले आझम’ या दोन्ही बोलपटांत आहे. पण त्याचं सादरीकरण मात्र निराळं आहे. आज त्याच प्रसंगाच्या चित्रीकरणामुळं व गाण्यामुळं चित्रपट इतका काळ उलटून गेल्यावरही लोकांच्या ध्यानात आहे. ते गीत लिहायला नौशाद व शकील बदायुनी यांनी रात्रभर जागरण केलेलं आहे. गीत रचावं की गझल यावर आधी बराच वेळ विचार झाला. किती तरी मुखडे सुचले. पण पसंत न पडल्याने कागद चुरगाळून फेकून देण्यात आले. मध्यरात्र उलटून गेली. अगदी पहाटे पहाटे हार्मोनियम गाऊ लागले, ‘प्रेम करी, चोरी करी नई’. ते ऐकूनच शकीलना पटदिशी कॅच लाइन सापडली – ‘प्यार किया, कोई चोरी नही की’ मग पुढं ‘प्यार किया तो डरना क्या’ मुखडा व पहिले दोन अंतरे पटापट सुचले.

गाण्याचं तोंड तर फारच छान जमून आलं होतं.
‘‘प्यार किया तो डरना क्या,
प्यार किया कोई चोरी नही की,
चुप चुप आहे भरना क्या.
जब प्यार किया तो डरना क्या’’
गाडी पुन्हा अडकली ती शेवटच्या अंतर्‍यावर, अकबर बादशाहचा मान राखून, सर्वशक्तिमान अश्या खुदासमोर सगळेच समान असल्याची जाणीव त्याला करून द्यायचे मोठं अवघड काम काही ओळींत करायचं होतं. बर्‍याच खटापटीनंतर मनाजोगता अंतरा तयार झाला.
‘आज कहेंगे दिलका फसाना, जान भी लेले चाहे जमाना,
परदा नही जब कोई खुदासे, परदा नही जग कोई खुदासे,
बंदों से परदा करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या.
या ओळी लिहिल्या गेल्या तेव्हा पहाट झाली होती. सर्वांनाच हे गाणं अतिशय आवडलं व त्याच्या चालीवर चित्रीकरणावर चर्चा सुरू झाली. हे गाणं पाण्यासारखा पैसा ओतून उभारलेल्या शीश महालात त्यामुळं ते सर्वांगसुंदर व्हावं याकरिता सगळेच जण मनापासून झटत होते.

नवनवीन कल्पना सुचवत होते. गाणं सुरू व्हायच्या अगोदर अनारकली व सख्या नाचत प्रवेश करत असताना दरबारी रागातलं काही गाणं बजावणं दाखवून वातावरण निर्मिती करावी असा एक प्रस्ताव पुढं आला. त्यात आठ दहा सतार व सारंगीदायक घ्यायचं ठरलं. या वाद्यमेळ्याचं संचालन उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान व पं. राम नारायण यांनी करावं असं ठरलं. त्याकाळचे दिग्गज गवई उस्ताद हाफीज अहमद खान, नियाज अहमद खान व फय्याज अहमद खान यांच्याकडून एकत्र ‘दरबारी कानडा’ हा भारदस्त राग गाऊन घेतला व तो तुकडा गाण्याच्या अगोदर टाकला. त्यात पखवाज वादनासाठी बनारसचे प्रसिद्ध पखवाज वादक राजदासजी यांना पाचारण करण्यात आलं. बरोबर भरपूर वाद्यमेळही वापरली. या तीन महान गायकांच्या ‘दरबारी’ रागाच्या सुरावटींचं चित्रीकरण झाले तेव्हां तिघांनीही सुचवल्यावरून त्यांनाच रंगरंगोटी करून दरबारात बसवण्यात आलं. त्यामुळं प्रसंग उठावदार तर झालाच पण तिघांचीही छबी फिल्मवर कायमची जपली गेली. या अशा धीर गंभीर वातावरण निर्मितीनंतर अनारकलीचं गाणं सुरू व्हायचं होतं. पण हा दरबारी मूड जाऊन नवा बनावा याकरिता गीताच्या पहिल्या दोन ओळी वाद्यामेळ्याशिवाय लता मंगेशकरांच्या आवाजात गाऊन घेण्यात आल्या.
‘इन्सान किसी से दुनियामें, इक बार मुहब्बत करता है,
इस दर्दको लेकर जीता है, इस दर्दको लेकर मरता है,
मग वाद्यमेळाचा एक मोठा तुकडा झाल्यावर गाणं सुरू होतं – ‘प्यार किया तो डरना क्या’, या गाण्याची चाल ‘मेघ’ रागात बांधलेली आहे. तेवढची गुणगुणून बघितली तर ती आजही सपक वाटते. पण त्याच्या आधी एवढी नेपथ्यरचना झाली असल्याने ती उठावदार वाटते. या गाण्यात ‘छूप ना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ है उनका नजारा’ या ओळी दोनदा आल्या आहेत. शीश महालातल्या आरशांमध्ये नाचणार्‍या अनारकलीच्या अनेक प्रतिमा दिसायला लागतात. त्यावेळी एका अनारकलीचा आवाज अनेक जणींचा व्हायला हवा होता. मग त्या ओळी एकदा लता मंगेशकरांच्या आवाजात व पुन्हा कोरससह गाऊन घेतल्या व ही दोन्ही मुद्रणं एकमेकांत मिळसून टाकून हवा तो परिणाम साधला.

त्यावेळी मुंबईत अद्ययावत अशी ध्वनिमुद्रण व्यवस्था व स्टुडिओ नव्हते. दादरच्या रंगमहल स्टुडिओच्या एका मजल्यावर जाड्या भरड्या कांबळ्यांचा शामियाना उभारून त्यात ध्वनिमुद्रणं घेण्यात आली होती. आवाज घुमू नये म्हणून फरशीवर नारळाच्या शेंड्या पसरल्या होत्या. लता मंगेशकरांसाठी खास शामियाना (केबिन) ऊभारली होती. विशेष म्हणजे एक ध्वनिवर्धक (मायक्रोफोन) लताजींसाठी व दुसरा वाद्यमेळ्यातल्या सगळ्या वादकांसाठी वापरून ही ध्वनिमुद्रण केलेली आहेत.

‘प्यार किया तो डरना क्या’ च्या खालोखाल लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे ‘मोहे पनघट पे नंदलाल छेद गयो रे’ जोधा-अकबर या हिंदू-मुस्लिम दांपत्यातल्या अनोख्या सामंजस्याच्या प्रसंगावर हे गाणं रचलेलं आहे. महालातल्या राणीवशात ‘श्रीकृष्ण जन्माचा’ सोहळा सुरू आहे. खर्‍याखुर्‍या सोन्याची, लंगड्या बाळकृष्णाची एक सुबक मूर्ती पाळण्यात ठेवलेली आहे. स्वतः शहनेशाह अकबर चौरंगावर बसून पाळण्यातची दोरी हातात घेऊन झोका देत आहेत. राजपुत्र सलीमही बाजूलाच बसला आहे. महाराणी जोधाबाई हे सगळं मोठ्या कौतुकानं पाहते आहे. अशा वेळी हे गाणं योजलं आहे. पाण्यासाठी निघालेल्या गोपींच्या नटखट श्रीकृष्ण छेडतो आहे. त्यापैकी एक गोपी तोड तक्रार करते आहे.
‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे
मोरी नाजुक कलैय्या मरोड गयो रे’
ही ठुमरी या बोलपटाचे विख्यात नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज यांचे वडील कालका बिंदादीन महाराज यांनी रचलेली होती. ते वाजिद अली शाह यांच्या दरबारी होते. त्यामुळे लच्छू महाराज या गाण्यावर अतिशय खूश झाले होते. त्यानी खूप मेहनत घेऊन मधुबालाला नृत्य शिकवलं. नौशादनी ‘गारा’ या रागात त्याची चाल बांधून लता मंगेशकरांच्या आवाजात मुद्रित केलं. ते ऐकून आसिफसाहेबांनी त्याना गाणं पुन्हा एकदा ध्वनिमुद्रित करायला सांगितलं. पाण्याला निघालेली गोपी एकटी कशी असेल? त्यांनाही या नृत्य प्रसंगात घेणार आहे म्हणाले. मग या गाण्याचं कोरससह पुन्हा मुद्रण करण्यात आलं. या गाण्यानं पण रसिकांना वेड लावलं.

एका खूप जुन्या व पारंपरिक ठुमरीचं यात पुनरूज्जीवन झालं होतं. विशेष म्हणजे सिनेमासारख्या सर्वदूर पोहोचणार्‍या ताकदवान माध्यमातनं ते सादर झालं होतं. गंमत म्हणजे याची गायिका हिंदू तर गाण्याशी संबंधित बाकीची सर्व मंडळी म्हणजे निर्माता, गीतकार, संगीतकार ही मुसलमाान होती. या अगोदर 1935 ते 1940 च्या दरम्यान कलकत्त्याची गायिका मिस इंदुबाला, तसेच मुंबईचे गवई उस्ताद अझमत हुसेन खानसाहेब यांच्या आवाजात हे गाणं दोन स्वतंत्र ध्वनिमुद्रिकांवरती बाजारात आलं होतं. अनुक्रमे एच.एम.व्ही. व कोलंबिया लेबलवर ग्रामोफोन कंपनीनं ‘मोहे पनघट पे नंदलाल’ या शीर्षकानं हे गाणं वितरीत केलं होतं. या दोन्हीही ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या होत्या. लेबवरती गीतकारचं नाव मात्र नव्हतं. त्याच सुमारास ‘दि ट्विन – ढहश ढुळप’ कंपनीच्या पिवळ्या लेबलवर मा. मुकुंद यांच्या आवाजात ह्याच गाण्याची आणखी एक ध्वनिमुद्रिका निघाली. तिच्यावर मात्र कवी-रघुनाथ ब्रह्मभट्ट असं छापलेलं होतं. ही तिसरी ध्वनिमुद्रिका फारशी गाजली नव्हती. ‘मुघले आझम’ बोलपट प्रकाशित झाला, त्यातली गाणी गाजली. पण या ध्वनिमुद्रिकांविषयी काहीच चर्चा उपस्थित झाली नव्हती. पुढं 2004 मध्ये त्याची रंगीत आवृत्ती प्रदर्शित झाली. त्यावेळी रघुनाथ ब्रह्मभट्ट यांचे नातू राज ब्रह्मभट्ट यांनी वाद निर्माण करून हे काव्य माझ्या वडिलांचं असून शकील बदायुनी यांनी उचललं आहे असा दावा करून नुकसान भरपाई मागितली. माध्यमांना काही काळ हा विषय चघळायला मिळाला खरा पण त्यातून काही निष्पन्न मात्र झालं नाही. तोवर या गाण्याशी संबंधित गीतकार, संगीतकार व निर्माता ही सगळीच जण केव्हाचं हे जग सोडून गेलेली होती. उर्दू शेरोशायरीशी परिचित मंडळींना मात्र यात काहीच वावगं वाटलं नाही. कारण या प्रकाराला ‘दूसरोंकी जमीं पर चलना’ असे म्हणतात. त्यामुळं ‘मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे, मोर नाजुक कलैय्या मरोड गयो रे’ हा पारंपरिक मुखडा घेऊन शकील बदायुनींनी पुढचे अंतरे स्वतंत्र लिहिले होते. 

इतर गाण्यांमध्ये, ‘रागेश्री’ (की रागेश्‍वरी?) रागातलं ‘शुभ दिन आयो राज दुलारा, साहिबे-आलम लग उजियारा’ हे तानसेन वर चित्रित झालेलं व ‘प्रेम जोबन बन के, सुंदरी पिया ओर चली’ हे ‘सोहोनी’ रागातलं सलीम अनारकलीच्या प्रणय प्रसंगावरचं अशी दोन गाणी आहेत. तानसेनच्या आवाजासाठी उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गावं असं नौशादना वाटत होतं. पूर्वी असा प्रयत्न ‘बैजू बावरा’च्या वेळी त्यांनी केला होता, पण ते अजिबात तयार झाले नव्हते. म्हणून नौशादना उस्ताद अमीर खान यांच्याकडून त्यावेळी गाऊन घ्यावं लागलं होतं. के. आसिफनी मात्र त्यांच्या खास पद्धतीनं मोर्चेबांधणी केली. त्यावेळी पार्श्‍वगायकाला एका गाण्याचे तीनशेपासून जास्तीत जास्त हजारभर रूपये मिळावायचे. उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांना हे ठाऊक असावं. पण ही ब्याद टळावी म्हणून एका गाण्याची पंचवीस हजार रूपये इतकी बिदागी खानसाहेबांनी मागितली. आसिफ मियाँनी ही अवाजवी बिदागी मान्य तर केलीच पण ‘आम्ही आपल्याला काय बिदागी देणार? आपली योग्यता तर याहून किती तरी अधिक आहे.’ असं अतिशय नम्रपणे सांगून त्यांचं मनच जिंकलं.

अगोदर एकच गाणं घ्यायचं ठरले होतं. पण मग आणखी एक गाण घेऊन खानसाहेबांना एकूण पन्नास हजार रूपये बिदागी दिली. मग मात्र खानसाहेबांनी मनापासून सहकार्य दिलं. तानसेन रियाझ करत असतानांच ‘शुभ दिन आयो, राज दुलारा’ अगदी खानसाहेबांच्या तबियतीप्रमाणं जोरकसपणे ध्वनिमुद्रित झालं. साहोनी रागातल्या ‘प्रेम जोगन बनकर, सुंदरी पियाके ओर चली’ च्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी मात्र नौशादनी आसिफमियाँना बोलावून घेतलं. त्यांनी अत्यंत नम्रपणे खानसाहेबांना हा महत्त्वाचा प्रसंग समजावून सांगितला. म्हणाले, ‘हे गाणं पण तानसेनच्या रियाझाचंच आहे पण तो पडद्यावर दिसणार मात्र नाही. अनारकलीला उपवनात येण्याचा संदेश मिळाल्यावर गाणं सुरू होईल व सलीम अनारकलीच्या प्रणय प्रसंगावर हे गाणं पार्श्‍वभागी वाजत राहील. आता कसं गायचं ते मी तुमच्यावरच सोपवितो’, प्रसंगाची वेळ मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची असल्याने ‘साहोनी’ रागाची योजना करून साजेशी बंदिश लिहून घेतलेली होती. तानसेनच्या महालात रियाझ चालू असतांनाची आलापी थोडीशी ‘नरम’ हवीय म्हटल्यावर खानसाहेबांनी तो प्रसंग बघूनच गायचा आग्रह धरला. मग तशी व्यवस्था करण्यात आली. तो सीन खानसाहेबांनी पडद्यावर अनेक वेळा बघितला. तबला संगतीला उस्ताद निजामुद्दीनखान शेजारीच बसले होते. ‘अमां निजामुद्दीन, कितनी खूबसूरत लौंडिया (दासी) है. खानसाहेबांनी मग सीनची मागणी पाहून मनाशी काही विचार केला. एक रिहर्सल केली व सीन तसाच चालू ठेवायला लावूनच ते गायले. भारतीय बोलपटांच्या इतिहासात शुद्ध शास्त्रीय चीजेवर आधारित तब्बल पाच मिनिटांचं पहिलं प्रणयगीत साकार झालं व ‘मुघले आझम’ बोलपटाचं एक आकर्षण ठरलं. त्याची धुंदी आज पन्नास वर्षांनंतरही तशीच आहे. गंमत म्हणजे खुद्द खानसाहेबच या गाण्याच्या एवढ्या प्रेमात पडले की, आपल्या मैफिलींमध्ये आवर्जून गात असत. आज हे गाणं ‘यू ट्यूब’ मध्ये पाहायला व ऐकायला मिळतं.

खानसाहेबांशिवाय आणखी पुरूष पार्श्‍वगायकांत फक्त महम्मद रफींच्या आवाजातलं ‘अय मुहब्बत जिंदाबाद’ हे एकच गाणं आहे. ते पण नाट्यपूर्ण प्रसंगात वापरलं असून त्यात कोरसचा फार प्रभावी वापर केलेला आहे. खूप उंव आवाजातलं हे गाणं रफीसाहेबांनी फारच छान गायलं आहे. बाकीची सगळी गाणी लता मंगेशकरांच्या आवाजात असून ‘तेरी महफिलमें किस्मत, आजमाके हम भी देखेंगे’ या कव्वालीमध्ये शमशाद बेगम सहगायिका आहेत. बोलपटात ही कव्वाली सातेक मिनिटांची असून तिचं चित्रीकरण आदर्श ठरावं इतकं सुंंदर झालं आहे. शीशमहलमधलं ‘ये दिलकी लगी’ हे कोरसगीत ‘जयजयवंती’ रागात बांधलेलं असून सलीम अनारकलीच्या पहिल्या (व अखेरच्या) रात्री मनोरंजनासाठी योजलेलं आहे. पहाट होताच दोघांची ताटातूट अटळ आहे हे सलीम सोडून सर्वानाच माहीत असत. त्यामुळेच ‘जब रात है ऐसी मतवाली’ रागाच्या सुरांतून यथार्थपणे प्रगट झाली आहे. बेहोश होऊन शुद्ध हरपत चाललेला सलीच बरीच आदळआपट करतो व त्याचवेळी शिपाई अनारकलीला घेऊन जायला येतात. त्या पार्श्‍वभूमीवर ‘यमन’ रागाच्या सुरावटींत बांधलेलं गाणं सुरू होतं –
‘खुदा निगेहबाँ हो तुम्हारा, धडकते दिलका पयाम ले लो
तुम्हारी दुनियासे जा रहे हैं उठो हमारा सलाम ले लो’’

हे गाणं ऐकणं व पाहणं हा एक मोठा अनोखा व रोमांचकारी अनुभव आहे. थिएटरातल्या मोठ्या पडद्यावर पाहताना अक्षरशः अंगावर शहरा येतो. चित्रपटातल्या प्रसंगानुसार पाश्‍चात्य वाद्यमेळ कायम ठेवून त्यात ‘यमन’ रागाचा बाज कायम ठेवण्यात आलेला आहे. यमन हा सदाबहार व सर्व मूडसच्या गाण्यांना पोषक असा राग ! त्याची ताकद या गाण्यात जाणवते. दादरच्या त्या दिव्य स्टुडिओत ‘मुघले आझम’चं ध्वनिमुद्रण झालेलं हे पहिलं गाणं. त्यावेळी आसिफमियाँ उपस्थित नव्हते. गाणं ऐकून ते नौशादना विचारू लागले, ‘आपने इतनी बढिया रिकार्डिंग किस थिएटरमें की?’.

दरबारी रागात बांधलेलं ‘मुहब्बतकी झूठी, कहानी पे रोये’ हे आणखी सुंदर गाणं. त्याचं चित्रीकरण पण लाजवाब असंच झालंय. या बोलपटात लताजींच्या आवाजात ‘इस्लामिक’ म्हणता येईल असं एक गाणं आहे. ते म्हणजे ‘केदार’ रागातलं ‘बेकस पे करम कीजिये, सरकार-ए-मदीना’. खुदाला उद्देशून हे गाणं आहे. अश्या गाण्यांना मुसलमानांच्यात ‘नात’ असं म्हणतात. पुढं हे गाणं 78 गतीच्या ध्वनिमुद्रिकेवर वितरित करायचं ठरलं तेव्हा ते नेहमीच्या ‘कुत्रा’ छाप लेबलकर न करता ‘एंजल’ लेबलकर केलं गेलं. (यात एक छोटा एंजल म्हणजे देवदूत तबकडीवर बसून हातातल्या पिसारच्या टोकानं खाचा पाडतानाचं चित्र आहे.) त्याचं कारण मुसलमानांत ‘कुत्ता’ व त्याचं चित्र निषिद्ध मानतात. ही रेकॉर्ड उत्तरेत उर्दू भाषिकांत ‘इस्लामिक’ म्हणून अफाट खपणार याची खात्रीच होती. त्यामुळेच तिच्या पाठच्या बाजूला ‘खुदा’ शब्द असलेलं गाणं ‘खुदा निगेहबान हो तुम्हारा’ घेण्यात आलं. अपेक्षेप्रमाणं ती रेकॉर्ड तिकडे अगदी तडाखेबंद खपली.

नौशादनी संगीत दिलेली काही गाणी वगळावी लागली, पण चित्रीकरणही झालेली दोन गाणी कठोरपणे काढून टाकावी लागली. ही बाब नौशादांसाठी फारच दुःखदायक होती. पण कथावस्तूच्या प्रवाहीपणाला ती दोन गाणी अडथळा आणत होती. चित्रपटाची लांबी पण फार वाढत चालली होती. शहजादा सलीमच्या मनोरंजनासाठी बहार (निगार सुलताना) यमुना नदीत होड्यांची शर्यत आयोजित करते. त्या होड्यांत नर्तकी गात गात नाच करतात. त्या गाण्यांचे बोल होते ‘हुस्नकी बारात चली मौसमे बहारमे, दिलका चमन होके मगन, झूम उठा बहारमें’. सलीम यमुनेच्या किनार्‍यावर बसून ही शर्यत पाहात असतो. हे गाणं आसिफानी स्टुडिओत व बाहेर असं दोन्ही प्रकारांनी घेतलं होतं. त्याच्या पाठोपाठच अनारकली व बहार यांच्यातला दरबारातला मुकाबला ‘तेरी महफिल किस्मत, आजमाके हम भी देखेंगे’ या कव्वालीतून येणार होता. या दोन्ही पैकी एकच गाणं ठेवायचं असं फायनल ट्रायलच्या वेळी ठरलं. सर्वानुमते कव्वालीच ठेवावी असा निर्णय झाला. दुसरं गाणं रफीसाहेबांच्या आवाजातलं होतं. अनारकलीला सलीमपासून वेगळं केलं जातं त्यावेळी ही गाणं येतं. – ‘अकेला हमको छोडके, हमारा दिल तोडके, कहाँ चले कहाँ चले, असे त्याचे शब्द होते. ते गाणं ध्वनिमुद्रित झाल्यावर ‘सलीम गातो’ हे आसिफ साहेबांना खटकलं व ते गाणं रद्द झालं. आणखी दोन गाणी पण काढून टाकण्यात आली होती, पण चित्रपट सुपर हिट झाल्यावर ती मागाहून समाविष्ट करण्यात आली.

रौप्यमहोत्सव प्रसंगी ‘हमें काश तुमसे, मुहब्बत ना होती’ हे गाणं व सुवर्ण महोत्सवाच्या वेळी ‘ऐ इश्क है यह सब दुनियावाले’ ही लता मंगेशकरांनी गायिलेली दोन गाणी घालण्यात आली. ही दोन्ही गाणी इतर गाण्यांच्या तुलनेत फारच सामान्य होती, पण बोलपटाच्या लोकप्रियतेच्या लाटेत धकून गेली, पण त्यामुळं चित्रपटाचा कालावधी तीन तास सतरा मिनिटं इतका झाला. फिल्मची लांबी 5088 मीटर झाली व वीस रिळांमध्ये ती वितरित झाली.

पुढे 2004 मध्ये हा सिनेमा रंगीत बनवला त्यावेळी ही दोन गाणी पुन्हा काढून टाकण्यात आली. काही प्रसंग छाटले. तरीही कालावधी दोन तास व सव्वीस मिनिटं इतका झालाच. या दोन्ही आवृत्या आज डी. व्ही. डी. च्या माध्यमातून आपण नगण्य किंमतीला विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवू शकतो. मात्र काढून टाकलेली गाणी जर जपून ठेवली असती तर रेकॉर्डवर किंवा सी.डी. वर वितरित करता आली असती. पुढं स्व. कमाल अमरोहींच्या गाजलेल्य ‘पाकिजा’ या बोलपटातल्या मुद्रित पण अप्रकाशित गाण्यांची एक एल.पी. रेकॉर्ड ‘पाकिजा रंगबारंग’ या नावानं निघाली होती. तसंच काहीसं होऊ शकलं असतं. आपली एवढी चांगली गाणी लोकांपुढं येऊ शकली नाहीत याचं नौशादना खूप वाईट वाटलं होतं.

हा 1955-60 चा कालखंड होता व त्यावर पार्श्‍वगायिका म्हणून लताजींचा ठसा निःसंशयपणे उमटलेला होता. सर्वच आघाडीच्या संगीतकारांकडं त्या गात होत्या. त्यात ‘मुघले आझम’ मधली गाणी सर्वांगसुंदर म्हणावी अशीच होती. ती गाजणार याची आसीफना खात्रीच वाटत होती. त्या काळी बोलपट प्रदर्शित व्हायच्या अगोदर त्यातल्या गाण्यांच्या 78 गतीच्या ध्वनिमुद्रिका बनवून थिएटरात मध्यंतरात वाजवीत असत. आगामी बोलपटाचं आकर्षण व मौखिक प्रसिद्धीपण होत असे. रेडिओवरूनही वाजवीत. ‘मुघले आझम’ च्या गाण्यांच्या पण ध्वनिमुद्रिका बनविण्यात आल्या. ती गाणी प्रकाशित करायचा आग्रह नौशादांनी धरला. पण आसिफसाहेबांनी नकार दिला. कारण चित्रपट केव्हां पुरा होईल यांची त्यांनाच खात्री नव्हती. खूप उशीर झाला तर गाणी ऐकून ऐकून जुनी होतील व त्याचा परिणाम चित्रपट प्रदर्शनावर होईल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे चित्रपट ध्वनिमुद्रिकांसुद्धा विकत घ्यायला. रसिकांच्या रांगा लागल्या. पुढं त्यातल्या निवडक गाण्यांची एक ई.पी. व एक एल.पी. रेकॉर्ड वितरीत करण्यात आली. त्या रेकॉर्डवर तर मागच्या बाजूला गाण्यांचा भावार्थ इंग्रजीतून दिला होता. ज्युबिली साजरी झाल्यावर तर त्यातल्या संवाद व गाण्यांच्या तीन एल.पी. रेकॉर्डसचा एक संच प्रदर्शित झाला व खूप खपला. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. हे ‘यू ट्यूब’वर पाहता येतं. या सिनेमाची इंग्रजी आवृत्ती निघाली होती असं म्हणतात. प्रदर्शित झाली होती का ते माहीत नाही. मात्र शोध घेऊनही तिची प्रिंट अद्याप मिळालेली नाही.

तामीळमध्ये डबा झालेली आवृत्ती मात्र ‘अकबर’ या नावानं प्रदर्शित झाली होती. त्यातले संवाद व गाणीह थंबादासकडून अनुवादित करवून घेतली होती. पी. सुशीला यांना लताजींच्या आवाजातली बहुतेक सगळी गाणी गायिली होती. अनारकली व बहारच्या कव्वालीत त्यांना पी.जी. क्रिष्णवेणी (जिक्की) यांनी साथ केली होती. जिक्की या प्रसिद्ध तेलुगू / तामिळ गायक ए.एम. राजा यांच्या पत्नी. ‘आह’ या राज कपूरांच्या बोलपटाच्या तामीळ व तेलगू आवृत्यांच्या गाण्यात दोघं एकत्र गायले व प्रेमात पडून विवाहबद्ध झाले. ‘जिक्की’ कडूनच ‘खुदा निगेहबान तुम्हारा’ या गाण्याची तामिळ आवृत्ती पण गाऊन घेण्यात आली होती. ‘बेकस पे करम कीजिये ‘सरकार-ए-मदिना’तल्या ‘सरकार-ए-मदिना’ शब्दाचं तामिळ भाषांतर होऊच शकत नसल्यानं ते शब्द तसेच ठेवण्यात आले.

‘मुहब्बतकी झूठी कहानी प रोये’ या गाण्याची तामीळ अवतार पी. सुशील यांच्या आवाजात असून ती अद्यापही आपली लोकप्रियता टिकवून आहे. उच्चारांची अडचण असल्याने ‘ए मुहब्बत जिंदाबाद’ हे गाणं महंमद रफी गाऊ शकले नाहीत. ते एका तामिळ गायकाकडून गाऊन घेण्यात आलं. या गाण्यांचही संगीत नौशादांचंच होत. एका गाण्याचं संगीत मात्र एस.व्ही. वेंकटमण यांनी दिलं होतं. व ते विख्यात ‘राधा-जयलक्ष्मी’ या चुलत बहिणींपैकी ‘जय-लक्ष्मी’ यांनी गायिलं होतं. शास्त्रीय रागदारी संगीतावर आधारित हे गाणं बडे गुलाम अली खान यांच्या ‘प्रेम जोगन बनकर’च्या ऐवजी वापरलं होतं. ही सगळी ध्वनिमुद्रणं या मंडळींना मुंबईस बोलावून दादरच्या त्याच खास स्टुडियोत घेण्यात आले होती. तिकडे दक्षिणेत मात्र ‘अकबर’ तामिळपट स्पेशल आपटला. आज तो कुठे धूळ खात पडलाय की नष्ट झालाय कुणास ठाऊक. त्यामुळंच कदाचित नाउमेद होऊन आसिफनी इंग्रजी आवृत्तीचा नाद सोडून दिला असावा. इंग्लंडहून अगदी ‘शेक्सपियरीन’ नट मंडळी डबिंग साठी आणायची त्यांची सगळी तयारी वाया गेली.

2004 मध्ये रंगीत ‘मुघले आझम’ प्रकाशित झाला. 2005 मध्ये त्याची तामिळ रंगावृत्ती ‘अनारकली’ या नावानं बनवली व प्रदर्शित पण झाली. रूबेन राज यांनी त्याला आधुनिक काळाला साजेस संगीत दिलं आहे. 1960 च्या तामिळ ‘अकबर’पेक्षा निराळी गाणी आहेत. बहर व अनारकलीची कव्वाली एकाच गायिकेच्या – स्वर्ण लताच्या आवाजात आहे. पण त्याचं पुढं काय झालं ते कळायला मार्ग नाही. आज त्याची प्रिंट किंवा व्ही.सी.डी. /डी.व्ही.डी. काही उपलब्ध आहे काय याचा शोध घ्यावा लागेल. साठच्या दशकातले हिंदीतून तामिळमध्ये डब झालेले आणखी काही बोलपट ः ‘आन’, ‘उडन खटोला’ व ‘नया दौर’ तेसुद्धा फक्त दिलीपकुमारांचे. त्याचं एक कारण म्हणजे त्यावेळी मद्रास मधूनच ‘आझाद’ बोलपटाची झालेली निर्मिती. त्यात दिलीपकुमार होते व तो बोलपट तिकडेही गाजला होता. अगदी अलीकडे ‘मधुमती’ व ‘नया दौर’ च्या हिंदी व तामिळ रंगीत आवृत्या निघाल्या पण प्रतिसादाअभावी डब्यात गेल्या. मुख्यत्वे गाण्यांकरिताच हे बोलपट रंगविले गेले व तामिळमध्ये डब केले होते. यातली काही थोडीशी गाणी आज इंटरनेटवर ऐकायला मिळतात. ‘प्यार किया तो डरना क्या’ ची तामिळ गाण्याशी रिमिक्स केलेली एका व्हिडिओ क्लिप ‘यू ट्यूब’ वर पाहायला व ऐकायला मिळतात. इतरही बहुतेक सर्व गाणी (कृष्ण धवल व रंगीत) नोटिझन्सनी प्रेमानं भरून ठेवली आहेत.

‘मुघले आझम’ बोलपटानं तिकीट विक्रीचे व उत्पन्नाचे विक्रम केले ते पुढं पंधरा वर्षांनी ‘शोले’ बोलपट येईतो अबाधित राहिले. शापूरजी पालनजींची गुंतवणूक किती तरी पटींनी वसूल झाली. के. आसिफ, नौशाद व लता मंगेशकर यांची नावं या सिनेमाच्या इतिहासात कायची कोरली गेली. सिने जगातातले बहुतेक सर्व मान सन्मान या बोलपटाच्या वाट्याला आले. 1960 चा सर्वोत्तम बोलपट, सर्वात उत्तम छायाचित्रण व सर्वोत्कृष्ट संवादलेखन अशी तीन मानाची फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस ‘मुघले आझम’ ला मिळाली. याला एक गालबोट मात्र लागलं. सर्वोत्तम संगीताबद्दलचे अ‍ॅवॉर्ड व त्यावर्षी ‘दिल अपना और प्रीत परायी’ ला मिळालं. त्यामुळे नौशादांसहस सगळेच जण नाराज झाले. पुढं बर्‍याच वर्षांनी त्यावेळचे ‘फिल्मफेअर’ चे संपादक जे.सी.जैन यांना छेडलं असता त्यांनी मोठं मासलेवाईक उत्तर दिलं. ‘मुघले आझम’चं संगीत ‘इल्मी’ (इंटेलेक्ट्युअल, बुद्धिगम्य) होतं तर ‘दिल अपना और प्रीत परायी’ चं संगीत ‘फिल्मी’ होतं. आज पन्नास वर्षांच्या कालखंडानंतर हे ‘इल्मी’ संगीतच रसिकांच्या मनात कायमचं जाऊन बसलेलं आहे. चिरकाळ तिथंच राहणार पण आहे.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

 

Suresh Chandvankar
Suresh Chandvankar
+ posts

ज्येष्ठ सिने-अभ्यासक व रेकॉर्ड संग्राहक

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.