-© नयना पिकळे

आजपासून बरोबर शहाण्णव वर्षांपूर्वी म्हणजेच १९२४ साली एक गानगंधर्व पृथ्वीवर अवतरला होता. त्याला इहलोक सोडून परत आपल्या लोकात जाऊन सुद्धा चाळीस वर्ष झाली . पण आज चाळीस वर्षानंतरही त्याने इहलोकावर घातलेली मोहिनी तसूभरदेखील कमी झालेली नाही. तो गानगंधर्व होता अर्थातच मोहम्मद रफी. काहीजणांची व्यक्तिमत्त्वंच इतकी उत्तुंग असतात की त्यांच्या कर्तृत्वा पुढे सगळे शब्दच खुंटतात, लेखणी थिटी पडते . मोहम्मद रफी हे असंच एक असामान्य अद्वितीय व्यक्तिमत्त्व. पण शेवटी जिथे श्रद्धा आहे, भाव आहे तिथे हे खुजेपण आडवं येत नाही आणि म्हणूनच ठरवलं आपल्या कुवती नुसार आपल्या गानदैवताला अर्घ्य अर्पण कारायचंच. (remembering the legendary singer of hindi film music mohammed rafi) 

रफीने आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात गुलबलोच (१९४४) नावाच्या पंजाबी चित्रपटाने केली . ह्यातलं
“सोणिये नी हिरिये”
हे रफीने सिनेसृष्टी साठी गायलेलं पहिलं गीत मानलं जातं .
आणि हिन्दी चित्रपटासाठी रफीने गायलेलं पहिलं गाणं होतं “गाव की गोरी”(१९४५) मधलं
“अजी दिल हो काबू में
तो दिलदार की ऐसी तैसी”

पण जुगनू (१९४७) मधलं नूरजहाँन सोबत गायलेलं
“यहाँ बदला वफा का
बेवाफाई के सिवा क्या है”
हे रफीचं पहिलं खऱ्या अर्थाने गाजलेल गाणं .

रफीचं कोणतंही गाणं घ्या . त्यात मध नाही तर मधा पेक्षाही मधुर असा केवळ रफीच्याच आवाजाचा अवीट गोडवा असतो .
मनाला बहरवणारा हा आवाज कधी हलक्या पिसासारखा मृदु मुलायम होतो तर कधी पहाडाहून उत्तुंग , सागराहूनही गहिरा होतो .
कधी मिश्किल बनून मनाला गुदगुल्या करतो तर कधी कारुण्याने काळजाला घरं पाडतो .

आणि बहुतेक रसिकांना परिचयाचं असलेलं रफीच्या बहुतेक गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या अभिनेत्यावर चित्रित असतं तो अभिनेता गाणं ऐकताच आपल्या बंद डोळ्यांसमोर क्षणार्धात अगदी हुबेहूब साकारला जातो .
ही किमया केवळ रफी नमक जादूगारालाच अवगत होती .

देव आनंद , दिलीप कुमार , गुरु दत्त असो की जॉनी वॉकर किंवा मेहमूद . राजेंद्र कुमार असो की शम्मी कपूर ते गीत गाताना रफीने आपल्या आवाजात केलेले काही सूक्ष्म बदल , अभिनेत्यांच्या लकबी नुसार केलेले काही विशिष्ट फेरफार यावरून ते कोणावर चित्रित झालं असावं हे ओळखायला वेळ नाही लागत .

त्या काळच्या जवळ जवळ सर्वच अभिनेत्यांसाठी रफी गायला .
प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही मी अमक्यासाठी गाणार नाही , हे गाणं माझ्या इमेजला शोभत नाही असं कधीच कुणाला अडवून नाही दाखवलं .

राज कपूर , दिलीप कुमार , देव आनंद , गुरुदत्त , राजेंद्र कुमार , धर्मेंद्र , बिस्वजीत पासून अगदी जॉनी वॉकर , मेहमुद , जगदीप आणि आज पूर्णपणे विस्मृतीत गेलेल्या काही अगदीच सुमार अभिनेत्यांसाठी सुद्धा रफी तितक्याच मनापासून गायला .

रागिणी (१९५८) मध्ये तर ओ पी नैय्यर यांनी रफीला ऑल राउंडर किशोर कुमारसाठी सुद्धा “मन मोरा बावरा” हे शास्त्रीय संगीत गायला लावलं आहे .

जरी सर्वांसाठी रफी गायला असला तरी त्याने देव आनंद , शम्मी कपूर आणि जॉनी वॉकर साठी गायलेली गाणी म्हणजे प्रत्येकी एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे .
ह्या तीनही अभिनेत्यांची रसिकांच्या मनात जी काही स्वत:ची अशी खास प्रतिमा ठसलेली आहे त्यात रफीने त्यांच्यासाठी गायलेल्या गाण्यांचा सिंहाचा वाटा आहे .

देव आनंदच्या एव्हरग्रीन रोमॅंटिक इमेजला साजेशी रफीची गाणी पाहणं आणि ऐकणं म्हणजे रसिकांसाठी अक्षरश: पर्वणी ..
“दिल है आपका हुजूर”
“चांँद जर्द जर्द है”
“अभी न जाओ छोडकर”
“खोया खोया चाँद”
“सुन ले तू दिल की सदा”
“धिरे धिरे चल चाँद गगन मे”
“रिमझिम के तराने लेके आई बरसात”
ही गाणी गाताना रफीचा आवाज इतका मधाळ धुंद झाला आहे की क्या कहने .

शम्मी कपूरचंच बघा ना
“अई अईय्या करू मे क्या सुकू सुकू”
“या हू ssssss चाहे कोई मुझे जंगली कहे”
“ये चांँद सा रोशन चेहरा”
“आई ग आई ग आई ग ये क्या हो गया”
“तुमसे अच्छा कौन है”
“ऐ गुलबदन ऐ गुलबदन”
“बदन पे सितारे लपेटे हुवे”
“आसमान से आया फरीश्ता”
अशी रफीने गायलेली कितीतरी गाणी जर शम्मीच्या खात्यातून वगळली तर उरल काय ?

ह्या प्रत्येक गाण्यात शम्मीने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने पडद्यावर जे काही अचाट अफाट हावभाव करत स्वत:ची छाप पाडली आहे त्यात त्याला रफीच्या आवाजाची पूर्ण साथ लाभली होती हे नाकारता येणं शक्यच नाही .

आणि हिन्दी सिनेसृष्टीतला सर्वोत्कृष्ट विनोदी वीर समजला जाणाऱ्या जॉनी वॉकर साठी गाताना तर रफीच्या आवाजाने कमाल केली आहे ..
“अरे ना ना ना ना ना ना तौबा तौबा”
“अब डर है किसका प्यारे”
“सर जो तेरा चकराये”
“जाने कहाँ मेरा जिगर”
“जंगल मे मोर नाचे”
“मै बंबई का बाबू”

सुरुवातीला केवळ तलतच्या आवाजात गाणाऱ्या ट्रेजेडी किंग दिलीप कुमारला रफीची साथ मिळाली आणि दोघांनी मिळून एक से एक गीतरत्न रसिकांसमोर पेश केली .
“यहाँ बदला वफा का”
“मधूबन मे राधिका”
“दिल मे छुपाके प्यार का”
“ओ दूर के मुसफिर”
“तेरे हुस्न की क्या तारीफ करू”
“मान मेरा एहसान अरे नादान”
“टूटे हुए ख्वाबो ने हमको”
“हमी से मोहब्बत हमी से लडाई”
“मेरे पैरो मे घुंघरू बंधा दे”

अगदी राज कपूर ज्याने आपली बहुसंख्य गाणी मुकेशच्याच गळ्यातून गायली त्याच्यासाठी सुद्धा कमी का होईना पण काही अतिशय सुरेख गाणी रफीच्या नावावर जमा आहेत .
“मै जिंदगी मे हरदम रोता ही रहा हूँ” (बरसात १९४९)
“तारारी आरारी आरारी” (दास्तान १९५०)
“दिल धडक धडक नैन फडक फडक” (दास्तान १९५०) ( ह्यातलं “व्हूप्पी” आणि राजकपूर सुरैय्या दोघांचं धमाल नृत्य आवर्जून बघण्यासारखं)
“तेरा काम है जलना परवाने” (पापी १९५३)
“नजरो के तीर मारे कस कस कस” (दो उस्ताद १९५९)

रफीने असंख्य प्रकारची , असंख्य मूड्स मधली इतकी गाणी , इतक्या अभिनेत्यांसाठी गायली आहेत की त्यांचा नुसता उल्लेख करणं देखील अशक्य .

तरीही मला जशी आठवली व सुचली तितक्या रफीच्या मुडसचा एक छोटासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे . अर्थात तरीही यातून कैक गाण्यांचा उल्लेख राहून जाणारच आहे हे निश्चित .

“उधर तुम हँसी हो ईधर दिल जवाँ है ”
“धिरे धिरे चल चाँद गगन में”
“दिवाना हुआ बादल”
“इशारो इशारो में दिल लेने वाले”
ह्या व अशा अनेक प्रणयगीतातील मधाळ मिठास ऐकून तनामनावर रोमांच येतात . भर उन्हात मन चांदण्यात न्हाऊन निघते .

“है दुनिया उसिकी जमाना उसिका”
“आपके हसीन रुख पे”
या सारखी भावूक गाणी गाताना हाच स्वर विलक्षण हळुवार स्वप्नाळू होतो .
रफीच्या मुलायम रेशमी आवाजातली सिड्यूसींग गाणी ऐकताना तर एक वेगळीच धुंदी चढते .
“ऐसे तो ना देखो के हमको नशा आ जाए”
“छु लेने दो नाजूक होठो को”

सौंदर्याची तारीफ करावी तर रफीनेच
“जाने बहार हुस्न तेरा”
“चौदहवी का चाँद हो”
“ये चाँद सा रोशन चेहरा”
“जो बात तुझ में है”
“ऐ फुलों की रानी बहारों की मलिका”
ही गाणी ऐकताना सर्वगावरून हलकेच मोरपिस फिरल्याचा भास होतो .

“बहारों फुल बरसाओ”
असं आपल्या मेहबूबचं स्वागत करणाऱ्या रफीच्या गंधित स्वरांच्या पायघड्यांपुढे एखाद्या महाराणीचं वाजत गाजत राजेशाही इतमामात होणारं स्वागत देखील फिकं वाटतं .

कधी रफीचा हा आवाज
“जिया ओ जिया ओ जिया कुछ बोल दो”
“तेरे हुस्न की कया तारीफ करू”
म्हणत खट्याळपणे प्रेयसीची छेड काढतो
तर कधी
“जिंदगीभर नाही भुलेगी
वो बरसात की रात”
म्हणत तिच्या आठवणीत स्वप्नाळू होतो .

कधी हा स्वर
“इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार”
म्हणत आपल्या प्रेमाची दिलखुलास कबुली देतो
तर कधी बेदरकारपणे
“आजा आजा मे हूँ प्यार तेरा”
म्हणत आपल्या प्रेमाला साद घालतो .
आणि कधी तर चक्क
“बार बार देखो हजार बार देखो
के देखने की चीज
है हमारा दिलरुबा”
म्हणत बिनधास्त आपल्या प्रेमाचा सर्वांपुढे इजहार करतो .

“नजर बचाकर चले गये वो
वरना घायल कर देता”
ह्यातला आत्मविश्वास तर इतका जबरदस्त आहे की त्या प्रेयसीला “घायल” होऊन सपशेल शरणागती पत्करण्या शिवाय पर्यायच उरत नाही .

कधी रफीचा आवाज फुलपाखराच्या नाजुक पंखासारखा हळुवार मखमली होतो
“ये मेरा प्रेमपत्र पढकर”
“चाँद सा मुखडा क्यु शरमाया”
“मै सोया अँखिया मिचे”

रफीच्या नशिल्या आवाजातली गाण्यांची मोहिनी काही औरच . त्यांची नशा काही केल्या उतरत नाही .
“तू कहाँ ये बता इस नशीली रात में”
“हम बेखुदी में तुम को पुकारे”
एखाद्या आवाजाने आर्जवी तरी किती असावं ?
” अभी न जाओ छोडकर ” ऐकून कोणाचा पाय निघेल ?
आपलीसुद्धा हीच तर गत होते .

रफीची गाणी कितीही ऐकली तरी “अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही ” असच मन मिनतवार्‍या करत राहातं .
पण खरी गंमत तेव्हा येते जेव्हा हाच आर्जवी स्वर
“अच्छा जी मै हारी
चलो मान जाओ ना”
या प्रेयसीच्या आर्जवाला न जुमानता
“देखी सबकी यारी
मेरा दिल जलाओ ना”
म्हणत आखडूपणा करतो . कारण तेव्हाही तो तितकाच हवाहवासा वाटतो .

पण हाच आवाज जेव्हा प्रेयसीच्या आठवणीने व्याकूळ होऊन तळमळतो तेव्हा त्यातला दर्द , ती वेदना ऐकून आपणही कळवळतो .
“सुहानी रात ढल चुकी”
“याद न जाये बिते दिनो की”
“याद मे तेरी जाग जाग के हम”
“वो जब याद आये बहोत याद आये”
“एहसान तेरा होगा मुझपर”
“दिल की आवाज भी सून”
ह्या गाण्यांमधली विनवणी ऐकून तर दगडालाही पाझर फुटावा .

तिन्ही सांजेला भावूक झालेल्या रफीचा भावोत्कट आवाज ऐकून हृदय विदीर्ण होतं .
“हुई शाम उनका खायाल”
“दिन ढल जाये हाये रात न जाये”

कधी रफीचा आवाज
“मन रे तू काहे न धीर धरे”
“राही मनवा दुख की चिंता क्यु सताती है”
म्हणत स्वतः बरोबर आपल्यालाही धीर देतो
तर कधी
“न जा कही अब न जा दिल के सिवा”
“तेरे मेरे सपने अब एक रंग है”
म्हणत आपल्याला स्वतःच्या हृदयात कायमचच सामावून घेतो .

पण जेव्हा ह्या स्वरातून कमालीची निराशा डोकावते तेव्हा त्या आवाजातील वैफल्य मनाला भिडतं , त्यातला एकाकीपणा सलत राहतो .
“ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है”
“क्या से क्या हो गया”
“ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही”
“कभी खुद पे कभी हालात पे रोना आया”
“न किसी की आख का नूर हूँ”
काळजाला पीळ पाडणारी ही अगतिकता पाहून डोळे आपल्याला न जुमानता वारंवार भरून येतात .

विश्वासघात झालेल्या रफीचा उद्विग्न स्वर ऐकून हृदयाची कालवाकालव होते
“मेरे दुश्मन तू मेरे दोस्ती को तरसे”
आणि जेव्हा हाच स्वर
“दिलके झरोखे मे तुझको बीठाकर”
म्हणत त्या बेवफा सनमला माफ करून टाकतो तेव्हा तर त्या आवाजावर जान कुर्बान करावीशी वाटते .

“कोई सोने के दिलवाला”
ह्या गाण्यात
“महफिल ये नही तेरी
दिवाने कही चल”
ह्या ओळी रफीच्या आवाजात ऐकताना वाटतं की हा आपल्या आयुष्यातील काही प्रसंगांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता की काय ?
कारण आपलीच व्यथा आपलेच कटू अनुभव बोलके होऊन आपल्या समोर उभे राहतात हे गाणं ऐकताना ..

कधी रफीचा स्वर आशावादी होऊन समस्त रसिकांना आश्वासक , मार्गदर्शक ठरतो आणि मैत्री आणि प्रेमावरचा आपला विश्वास परत एकदा अढळ होतो .
“कोई जब राह न पाये”
“इन्साफ का मंदिर है ये”
“कहाँ जा रहा है तू ऐ जानेवाले”

कव्वाली , गझल , लोकसंगीत , देशभक्तीपर गीते , भजन सर्वच प्रकारच्या गाण्यांत रफीने बाजी मारली आहे .
“ये इश्क इश्क है इश्क इश्क”
“परदा है परदा”
“है अगर दुश्मन दुश्मन जमाना गम नहीं”
ह्या रफीच्या कव्वाल्या ऐकताना त्याचे अचूक उर्दू उच्चार , कव्वालीच्या बाजानुसार गाण्याचा लहेजा हे सगळंच एखाद्या निष्णात कव्वाल्या सारखंच असल्याचं जाणवतं ..

तर रफीच्या
“ना किसीकी आँख का नूर हूँ”
“कोई सागर दिल को बहलाता नही”
“गुजरे है आज इश्क में”
या गझला ऐकताना त्यातली वेदना आपल्याला अगदी आत आत जाळते .

भजन म्हणताना तर रफीचा स्वर काही वेगळाच लागत असे , भक्तीची परिसीमा गाठत असे . त्या परमात्म्याशी थेट संवाद साधण्याइतकं सामर्थ्य रफीच्या दैवी स्वरात नक्कीच होतं .
“मन तडपत हरी दरसन को आज”
ह्या गीतातील अनुभूतीच अशी आहे की आपण केवळ नि:शब्द नतमस्तक होतो त्या आर्त हळव्या सुरां पुढे .
“दुनिया ना भाए मोहे”
मधली रफीच्या स्वरातील विनम्र याचना ऐकली की मन आपसूक त्या परमात्म्या समोर शरणागती पत्करून विनीत होतं .

तसंच
“ओ दुनियाके रखवाले”
मध्ये शेवटची रखवालेsss रखवालेsss रखवालेsss ही करूण हाक ऐकून मन कावरंबावरं होतं . अतिशय हळुवारपणे छोट्या आलापांनी सुरू होणाऱ्या ह्या भजनाची गती लवकरच वाढते आणि शेवटी शेवटी तर रफीचा उत्तुंग आवाज अक्षरश: परमात्म्याचे चरण स्पर्शच करून येतो .

जो आवाज प्रेमात दीनवाणा होऊन त्या रखवाल्याची करुणा भाकतो तोच आवाज जेव्हा प्रेमात वेडापिसा होतो आणि
“तूने मेरा यार ना मिलाया
मै क्या जानु तेरी ये खुदाई”
असा प्रत्यक्ष खुदाला देखील जाब विचारायला कमी नाही करत .

“नैन लड गयी है
तो मनवा मां कसक हुईबे करी”
ह्या गीतातील अस्सल भोजपुरी मीठास असलेला ठसका तर केवळ लाजवाब .

रफीचा हाच स्वर
“कर चले हम फिदा जान ओ तन साथियो”
“वतन की राह मे वतन के नौजवान शहिद हो”
या सारखी देशभक्तीपर गाणी गाताना , आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व समर्पण करताना निडर , निधडा , कर्तव्यतत्पर झालेला असतो .

“आज कल मे ढल गया
दिन हुआ तमाम
तू भी सोजा सो गई
रंग भरी शाम”
सारखी अंगाई गाऊन हलकेच अस्वस्थ मनाला दुलाईत लपेटणारा रफीचा शांत तलम स्वर असो की
“बार बार दिन ये आये
बार बार दिल ये गाये
तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू
हॅप्पी बर्थदे टू यू”
असं म्हणत दरवर्षी आपल्या वाढदिवशी न विसरता आपल्याला शुभेच्छा देणारा आनंदी स्वर असो .
“आज मेरे यार की शादी है”
म्हणत आपल्या लग्नाच्या मिरवणुकीत दिलखुश होऊन मोकळेपणे नाचणारा रफीचा स्वर असो किंवा
“बाबूल की दुवाये लेती जा”
ह्या बिदाई गीतातील अगदी खाष्ट सासूला सुद्धा रडवायची ताकद असणारा स्वर असो रफी शिवाय आपल्या आयुष्यातील प्रत्येक सण , प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग मग तो सुखाचा असो किंवा दुखाचा अपूर्णच आहे.
बघा ना
“गोविंदा आला रे आला
जरा मटकी संभाल ब्रिजबाला”
ह्या गाण्याशिवाय दहीहंडीचा उत्सव साजरा करण्याची कल्पनाही करवत नाही .

असंख्य गाणी तर रफीने त्यातील केवळ एखाद्या शब्दाच्या खास उच्चारावर गाजवली आहेत . अगदी मोजकी उदाहरणं घ्यायची तर ..
“अपनी तो हर आह इक तूफान है
उपरवाला जान कर अंजान है”(काला बाझार –१९६०)
मध्ये “उपरवाला” ह्या शब्दाच्या केवळ उच्चारावरून कळतं की हा उपरवाला म्हणजे आपला आकाशातला बाप्पा नव्हे तर आपल्या इहलोकीच्या देव(आनंद) ने ट्रेन मधल्या वरच्या “उपरवालीला” (वहिदा ला ) घातलेली प्रेमाची साद आहे .

“ये चाँद सा रोशन चेहरा” (कश्मीर की कली -१९६४)
मध्ये “तारीफ” हा शब्द इतक्या विविध प्रकारे उच्चारलेला आहे की त्याची कितीही तारीफ केली तर कमीच .

“जंगल मे मोर नाचा” (नया दौर -१९५७)
ह्या गाण्यात तर
“हम जो थोडीसी पिके जरा झूमे”
मधलं “झूमे” ऐकताना अशी काही झिंग चढते की अट्टल दारुड्याला देखील कधी एवढी झिंग चढली नसेल .

“मै जिंदगी का साथ
निभाता चला गया” (हम दोनो -१९६१)
ह्या गीताची तर बातच काही और . जे मिळालं ते हसत हसत स्वीकारून जे गमावलं त्यामागे घुटमळत न राहता आयुष्य कसं जगावं ह्याचा कानमंत्रच जणू रफी ह्यात आपल्याला सांगू पाहतो . ह्यातलं
“हर फिक्र को धुएँ मे उडा SSSSS”
हे जे उडा SSSSS…. असं अर्धवट वाक्य सोडलं आहे त्यातून वरवर बेफिकीर वाटणारा पण तटस्थपणे आयुष्याला सामोरा जाणारा रफीचा स्वर समग्र जीवनाचं तत्त्वज्ञान किती सहज उलगडून दाखवतो .

रफीची काही गाणी रफी इतकीच अनोखी आहेत .
“बेकरार है कोई आ SSS
आ मेरे दिलदार आ” शमा परवाना (१९५४)
यात रफीने सुरैय्या सोबत घेतलेला प्रदीर्घ आलाप केवळ अवर्णनीय . ज्या सहजतेने दोघांनी आलाप घेतले आहेत त्यावरून त्यांचं गायनातलं सामर्थ्य सहज लक्षात येतं .

दुसरं गाणं आहे
“लादे मोहे बालमा आसमानी चुडीया” (रेल का डिब्बा-१९५३)
शमशाद बेगम सोबत रफीने गायलेलं हे आणखी एक भन्नाट गाणं . त्या काळातलं अफलातून ब्रेथलेस गाणं .
साधे सरळ शब्द आणि उडती चाल असलेलं गाणं ऐकायला जेवढी मजा येते त्याहून कैकपटीने गायला अत्यंत अवघड आहे हे ऐकतानाच कळतं ….
पण रफी आणि शमशाद दोघांनी हे असं काही हसत खेळत मजेशीरपणे म्हटलंय की ऐकणारा गाण्याच्या प्रेमातच पडतो …..

“थोडा सा दिल लगाकर देख” (मुसाफिरखाना-१९५५) मधल्या ह्या गीतात ओ पी नैय्यर यांनी जी कल्पकता दाखवलिये त्याला खरंच तोड नाही ….
गोड, अवखळ असं हे शमशाद आणि रफीच्या आवाजातलं आणखी एक हलकंफुलकं पण तितकंच आगळंवेगळं गीत .
पण ह्याला गीत म्हणायचं की युगलगीत ?
हीच तर गम्मत आहे ….
ह्या गाण्याची खासियत अशी की ह्या संपूर्ण गाण्यात रफीच्या आवाजाचा फक्त एखाद्या वाद्यासारखा वापर केलेला आहे …….
शमशादच्या प्रत्येक ओळी नंतर रफीचं वेगवेगळ्या लयीतलं “तारा रम पम पम पम पम” ऐकायला इतकं गोड वाटतं ……..
आणि ह्याच मुळे गुणगुणायला सोप्पं साधं असं हे गाणं एका वेगळ्याच पातळीवर जातं …..
श : थोड़ा सा दिल लगा के देख
र : तारा रम पम पम पम पम
श : नैनों से मुस्कुरा के देख
र : तारा रम पम पम पम पम
श : मेरा न बन सके अगर
अपना हमें बना के देख
र : तारा रम पम पम पम पम

“या sssssss हू ssssssss ……….” (जंगली-१९५३)
ही भन्नाट आरोळी तर आपल्या सर्वांच्याच परिचयाची , अगदी जिवाभावाची .
शम्मी कपूरच्या करियरला एक नवी दिशा देणारी , त्याला यशा कडे घेऊन जाणारी . त्याचं अवघं इमेजच आमूलाग्र बदलून टाकणारी .
अगदी सुरुवातीच्या काळातला म्हणजे शमा परवाना , मेमसाहीब या चित्रपटातला लाजरा बुजरा शम्मी ज्यांना आठवत असेल त्यांना हे नक्कीच पटेल .
अगदी हल्लीहल्ली पर्यंत मला वाटलेलं की ही आरोळी रफीचीच ….
पण नाही शम्मी कपूरने एका मुलाखतीत स्वतः सांगितलं की याsss हू sss … रफी ने नाही तर प्रयागराज नावाच्या एका इसमाने म्हटलंय …
पण ज्या तारस्वरात त्या इसमाने ही आरोळी ठोकली बरोबर तिथूनच ते गाणं अचूक पुढे नेणं हे देखील सोप्पं काम नव्हे … आणि त्याचं श्रेय मात्र फक्त रफीचंच…

तर असा होता रफी .
अनोखा असला तरी खऱ्या अर्थाने माणूस होता .
एखाद्यावर अल्लाने किती मेहेरबान व्हावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहम्मद रफी .
माणूस म्हणण्यापेक्षा त्याला देवमाणूस म्हणणं जास्त समर्पक ठरेल . आपल्या आवाजातल्या गोडव्याने रफीने जितकी मन जिंकली त्याच्या कैकपट अधिक मनं रफीने आपल्या हृदयातील गोडव्याने जिंकली . गरीब गरजूंना मदत करणं हे रफीसाठी नित्याचं होत आणि मुख्य म्हणजे त्या गोष्टीची कुठेही दवंडी न पिटता . आपल्या कार्याचा मोठेपणा न बाळगता हे सगळं अतिशय सहजपणे केलं जायचं . आपल्या गायकीचा किंचितही अभिमान न बाळगणारा रफी आपल्या आवाजाला ईश्वरी देणगी मानत असे .

“जानेवाले जरा होशियार
यहाँ के हम है राजकुमार
आगे पीछे हमारी सरकार
यहाँ के हम है राजकुमार” (राजकुमार-१९६४)
राजकुमार ??
छे तो तर सम्राट होता …
दैवी देणगी मिळालेला स्वरसम्राट…
आणि केवळ आगे पीछेच नव्हे तर चहूबाजुंनी त्याचं आणि केवळ त्याचंच सरकार होतं ….
राग यमन – मन रे तू काहे न धीर धरे (चित्रलेखा – १९६४)
राग अडाणा – राधिके तुने बंसरी चुराई ( बेटी बेटे – १९६४)
राग पहाडी – आज की रात मेरे दिल की सलामी ले ले (राम और शाम – १९६७)
राग मालकंस – मन तरपत हरी दर्शन को आज (बैजू बावरा- १९५२)
राग जोगिया – दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर हें-१९६३)
राग दरबारी – ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा- १९५२)
राग हमिर – मधूबन मे राधिका नाचे रे (कोहिनूर – १९६०)
राग भैरवी – कैसे समझाऊँ बडे नासमझ हो ( सुरज – १९६६)
राग झिंझोटी – मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम (मेरे मेहबूब -१९६३)
राग दरबारी कानडा – बस्ती बस्ती पर्बत पर्बत (रेल्वे प्लॅटफॉर्म – १९५५)
सगळे राग त्याच्या पुढे सदैव हात जोडून उभे असत .
त्याचं सरकार त्याच्या पूर्ण आज्ञेत होतं ….
एक सूर कधी इकडचा तिकडे झाला असेल तर शपथ …..
“कुहू कुहू बोले कोयलिया” (सुवर्ण सुंदरी-१९५७)
ह्या सर्वांग सुंदर गीताचे तर चारही अंतरे चार वेगवेगळ्या रागात आहे ( सोहनी , बहार , जौनपुरी आणि यमन )

मोहम्मद रफी आपल्या स्वरातून , आपल्या गीतांतून सदैव आपल्या बरोबर आहे .
जसे सूर्य , चंद्र , तारे तसंच रफीचं गाणं . अनादीकाळा पर्यन्त आपल्या सोबत असणारं .

अशा ह्या अनोख्या गानगंधर्वाचं , सूरसम्राटाचं प्रत्येक गाणं ऐकताना मनाची जी स्थिती होते ना तिचं अचूक रित्या वर्णन करायलाही त्याचंच गाणं मदतीला येतं ….
“नाचे मन मोरा मगन
धिक दा धिकी धिकी
धिक दा धिकी धिकी
धिक दा धिकी धिकी”

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment