-मानसी पटवर्धन

-स्केच सौजन्य: श्रीकांत धोंगडे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘मन तडपत हरी दरसन को आज….’ “बैजू बावरा” मधील हे आर्त भजन ऐकले की आजही मन व्याकूळ होते, डोळे पाणावतात , त्या महान गायकीपुढे, संगीतापुढे, शब्दांपुढे आपण नतमस्तक होतो…!!! अशी काय जादू होती या स्वरात…!!! हा बुलंद स्वर प्रसंगी मुलायम होत असे, रेशमी होत असे, कधी हसवत असे, कधी रडवत असे…!!! केवढे सामर्थ्य होते या स्वरात….!!! मंद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत तो लीलया फिरत असे…! “मालकंस” रागाची सुरावट आर्ततेने छेडणारा हा स्वर होता “मोहम्मद रफी” (Singer Mohammed Rafi) यांचा…!!! दस्तुर खुद्द पंडित जसराज यांनी “दास्तान-ए-रफी “मध्ये म्हटले आहे की या गीतामुळे मैफलीत मालकंस राग गाण्याची फर्माईश होऊ लागली.!! रफी साहेबांना खुदाने मेहेरबान होऊन गगनाला गवसणी घालणारा गळा दिला होता आणि त्याचबरोबर दिले होते दरियादिल….!!!! आपल्या गात्या गळ्याने त्यांनी जगभरात नावलौकिक संपादन केलाच , पण हा खुदाचा बंदा खऱ्या अर्थाने “मानवतेचा पुजारी” होता. “सढळ हस्ते सहाय्य करणे” हा त्याचा स्थायीभाव होता….!!! (परदेशी दौऱ्यावर स्टेज शोसाठी गेले असता घरच्यांना फक्त चॉकलेट्स ची भेट देऊन गोरगरिबांसाठी महागडी वैद्यकीय यंत्रे आणणाऱ्या रफ़िजींना सलाम करावासा वाटतो) त्यांचा स्वर हा ईश्वराने घडविलेला चमत्कार होता…आज त्यांची पुण्यतिथी …आजही त्यांचे जगभरातील चाहते त्यांची आठवण काढतील, डोळ्यातील आसू त्यांच्या गीतात भिजतील आणि म्हणतील “युं तो हमने लाख हसी देखे है, तुमसा नही देखा…!!!! रफीसाहेब अनंत अनंत दंडवत….!!!! (Remembering the Great Singer of Hindi Cinema Mohammed Rafi)

“रफी” नामक सुरांच्या जादूगाराने रसिकांवर घातलेली सुरांची मोहिनी आजही तशीच आहे….!!!! आजही “आप युंही अगर हमसे मिलते रहे ” ऐकले की मन बहरते, “मधुबनमें राधिका” ऐकून मन त्या स्वरांवर हिंदोळू लागते…तो शेवटचा तराणा आणि सतारीचा झाला ऐकला की थक्क होतो आपण….!!!! त्या स्वरांची जादूच तशी होती…!!!! खळाळत वाहणाऱ्या जळासारखा होता तो स्वर…!!! कित्येक नटांची कारकीर्द बहरविली त्यांनी …कव्वाली गाताना हा स्वर एखाद्या निष्णात कव्वाल्याचा वाटे, (तरीही बरसात की रात मधील “ये इष्क इष्क” ही कव्वाली लोकप्रिय झाल्यानंतर ते म्हणतात , ये तो अल्लाताला की देन है…मैं तो अभी संगीत सीख रहा हूँ ।…..नम्रतेची ही कमाल मर्यादा नव्हे का) हाच स्वर भजन गाताना भक्तिरसात चिंब होई, प्रणयभाव फुलविताना गुलाबी रेशमी अनुभूती देऊन जाई… आजही त्यांचे “चौदहवी का चांद” किंवा “खोया खोया चांद “ऐकले की मनात दिवसाही टिपूर चांदणे बरसू लागते…!!! प्रेमाच्या कबुलीने आनंदलेल्या आणि त्या भरात चांदण्यात मुक्तपणे सैर करणाऱ्या देव आनंद यांना सुरांच्या या देवाच्या स्वरात ऐकणे आणि पाहणे हे स्वर्ग सुख नव्हे का…!!!!

अनेकांनी रफी साहेबांच्या आवाजाची नक्कल केली पण त्यातील ओतप्रोत भावना, तो स्वर लगाव पाहिलाच नाही..स्टेज वर गाणे सादर करणारा गायक आणि रुपेरी पडद्यावरील पार्श्व गायक यातील सीमारेषा रफीसाहेबांनी जाणली होती …त्यांच्या मते गायकाने प्रथम नट असायला हवे म्हणजे ज्याच्यासाठी गायचे, त्याच्या लकबी जाणून त्याप्रमाणे गाणे सादर केले की ते पडद्यावर उत्तम वठेल…!!!! या बाबत एक किस्सा आठवतोय…!!! “झुक गया आसमान ” या चित्रपटातील गाण्याच्या वेळची गोष्ट…प्रसिद्ध दिग्दर्शक “श्री लेख टंडन” या गाण्याच्या रेकॉर्डींगला उपस्थित होते…रफी चित्रपटात हे गाणे “शम्मी कपूरवर” चित्रित होणार अशी कल्पना करून गायला लागले तर टंडन साहेबांनी त्यांना सांगितले ,” ये गाना तो राजेंद्रकुमार के उपर पिक्चराईज होगा…” झाले ताबडतोब गायकी बदलली …आणि राजेंद्रकुमारला साजेसे गीत साकारले…ते गाण्याचा मूड, प्रसंग, नट यांच्यानुसार आपली गायकी ठरवत आणि गायकी तर अप्रतिम आणि त्यांचे गीतातील समरसणे, आपले सर्वस्व गीतात ओतून त्यात स्वत:ला झोकून देणे हे खरंच अभिमानास्पद होते….!!! आजही “संगम” मधील “मेंहरबां लिखूँ, हसीना लिखूँ या दिलरुबा लिखूँ हैरान हूँ की आपको इस खत में क्या लिखूँ? “ये मेरा प्रेमपत्र पढकर” ऐकून आपण मोहरून जातो, अंगावर रोमांच येतात, त्या रुपेरी पडद्यावरील प्रणयगीताचे प्रतिबिंब रसिकांच्या मनात उमटते… !!

रफिंची कारकीर्द घडविण्यात “नौशादजींचा” सिंहाचा वाटा….!!!! त्यांच्या उच्चारातील पंजाबी हेल त्यांनी काढून टाकले….!!!! “दुलारी” मधील “सुहानी रात ढल चुकी” ह्यातील विरह वेदना छेडणारा रफिंचा स्वर केवळ अविस्मरणीय आहे…दुलारीतील लताजींबरोबर गायलेली दोन युगलगीतेही तितकीच भावोत्कट आहेत. “रात रंगीली मस्त नजारे”, “मिल मिल के गायेगें” ही ती दोन अवीट गोडीची गीते….यानंतर मात्र नौशादजींच्या संगीतात रफिंचे स्थान अढळ झाले…आणि जन्मली अनेक सुंदर गीते….!!! खर तर शिकस्त, दाग, संगदिल, देवदास, फूटपाथ यातील तलत यांच्या गीतांच्या अफाट लोकप्रियतेने “तलत” हा दिलीपकुमार यांचा आवाज बनला होता…पण नौशादजींनी “दीदार” मध्ये हे समीकरण बदलले..दिलीपकुमार यांच्यासाठी रफिंचा स्वर वापरला…”हुए हम जिनके लिये बरबाद”, “मेरी कहानी भुलने वाले ” या गीतांच्या यशामुळे “रफी” हाच दिलीपकुमार यांचा हुकमी गायक बनला..”आन” मधील “दिल में छुपाकर प्यार का तुफान” ,”मान मेरा एहसान अरे नादान” ही गाणीही खूप गाजली…!!!

”बैजू बावरा” या चित्रपटातील “ओ जी ओssss “ही “तू गंगाकी मौज में “च्या आधीची आर्त साद हृदय भेदून जाते…”झुले में पवन के आई बहार” मध्ये प्रणयरंग उधळले जातात..तर “ओ दुनियाके रखवाले” गीताच्या शेवटी रफींचा गगनाला भिडणारा आवाज ऐकून मन थक्क होते. जातीधर्माच्या कल्पनांना छेद देणारे हे भजन रफीनी जीव ओतून म्हटले आहे…”बैजू बावरा” ने रफिंचे शास्त्रीय गायकीवरील प्रभुत्व सिद्ध केले… या चित्रपटापासून ”रफियुग” खर्या अर्थाने सुरु झाले. कोहिनूर मधील “मधुबन में राधिका ची “गोष्टच काही और…”हमीर” रागाच्या सुरावटीवरील हे गीत ऐकून मन थक्क होते…पण गाणे रागदारीतील असल्याने प्रेक्षक याचा आस्वाद कितपत घेतील अशी शंका “एस यु सनी” या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या मनी आली, रफी आणि नौशाद यांच्या विनंतीवरून त्यांनी हे गाणे चित्रपटात ठेवले (याचे मानधन रफिंनी घेतले नाही) पण गीताने लोकप्रियतेच्या सगळ्या सीमा पार करून रफी आणि नौशाद यांचा विश्वास सार्थ केला..

रफीनी सगळ्या रसातील गीते सादर केली आहेत…ये सावन ऋत तुम और हम, धडक धडक दिल (दास्तान), दिल ए बेताब को सीने से लगाना होगा (पालकी…सुमन ,रफी), तन रंग लो जी आज (कोहीनूर…लता रफी), सावन आये या ना आये (दिल दिया दर्द लिया…आशा ,रफी) लोकसंगीतावर आधारित नैन लड गयी है (गंगा जमुना…रफी) ही त्यांची काही अवीट गोडीची गीते…”नैन लड गयी” चा ठेका आणि रफिंचा स्वर मनात घुमू लागतो….बैजू बावरा, कोहीनूर, अमर, गंगा जमुना , आन ह्या रफि-नौशाद यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील मधुर आठवणी….!!!

शम्मी कपूरची कारकीर्द याच गुणी गायकामुळे फुलली…त्यांच्या लोकप्रियतेत रफीजींचा सिंहाचा वाटा आहे…दोघांचे ट्युनिंग इतके छान जुळले होते, त्याबाबतचा एक प्रसंग…!!! शम्मीकपूर नेहमीच गाण्याच्या रेकॉर्डिंगला हजर असत, पण “आसमान से आया फरीशता” या गीताच्या रेकॉर्डिंग ला ते हजर नव्हते , पण जेव्हा त्यांनी गाणे ऐकले तेव्हा ते थक्क झाले…”मेरे बगैर आपने मैं कैसी एक्टिंग करुंगा ये कैसे सोच लिया, ये तो कमाल हो गया….” एका गायकाला अभिनेत्याने दिलेली ही सुंदर दाद होती.

एकाच चित्रपटात रफिजींचा स्वर वेगवेगळ्या नटांना असे पण टोनल क्वालिटी बदलत असे…उदाहरण द्यायचे तर “मधुमती” चित्रपटातील “टुटे हुए ख्वाबॉं को” हे विरहगीत रफिंनी गायलेले दर्दभरे गीत आहे , तर “जंगल में मोर नाच्या किसिने ना देखा” हे जॉनी वोकर च्या तोंडी आहे , जे रफिंचेच आहे , पण गायकीतील फरक , ढब यात जमीन अस्मानाचे अंतर…!!!!

रफी हे एकमेव गायक ,ज्यांना संगीत सम्राट सैगल यांच्याबरोबर “शहाजहा” चित्रपटातील “मेरे सपनों की रानी रुही रुही” हे गीत गाण्याचा बहुमान मिळाला ..१९३८ मध्ये लाहोरला सैगल साहेबांच्या कार्यक्रम होता, वीज पुरवठा खंडित झाल्याने रफिंना मिळालेल्या गायनाच्या सोनेरी संधीचे त्यांनी सोने केले होते…हा बुलंद आवाज माईक शिवाय रसिकांपर्यंत पोचला आणि तेव्हाच या स्वरातील सुरांचे आकाश सैगल यांनी जाणले होते आणि त्यांनी तोंडभरून रफीना आशीर्वाद दिला होता…तोच आता खरा झाला होता…!!!

गुलबलोच या पंजाबी चित्रपटातील “सोणिये नी हिरिये “त्यांनी झीनत बेगमबरोबर झोकात म्हटले …ज्या शामसुंदर नी लाहोर मध्ये मदतीचा हात दिला त्यांनीच मुंबईतही मदत केली…त्यांच्या ”गाव की गोरी ”या चित्रपटात रफ़िजींना एक गाणे त्यांनी दिले.पण ”पहले आप” हा रफींचा पहिला चित्रपट मानतात. १९४७ मध्ये आलेल्या ”जुगनू”या चित्रपटातील नूर जहाँ यांच्या बरोबर गायलेल्या ”यहा बदला वफाका” या युगलगीताने रफिंना प्रसिद्धीच्या झोतात आणले. १९४८ मध्ये गांधी हत्या झाली आणि राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले ”सुनो सुनो ए दुनियावालो ,बापुकी ये अमर कहानी” हे गीत रफिजींनी गायले आणि” पंडित नेहरू ” यांच्याकडून मेडल आणि शाबासकी मिळविली.

रफीचा स्वर म्हणजे खळाळत्या जळासारखा….. कधी अवखळ, कधी चंचल, कधी मुलायम तर कधी करूण….!!! चंगेजखान मधील “मोहोब्बत जिंदा रहती है , मोहोब्बत मर नहीं सकती” हे त्यांच्या पहाडी स्वराचे प्रत्यंतर देणारे गीत (हंसराज बहल) तर “भिगा भिगा प्यार का समा , बता दे तुझे जाना है कहा” (सावन…रफी,शमशाद) यात त्यांचा मिश्किल स्वर मनाला भावतो…!!!! तसेच रफिजींना पदार्पण करण्यास सहाय्यभूत झालेले शामसुंदर यांच्या “ढोलक” चित्रपटातील “मुझे तुम से प्यार नहीं …नहीं” हे आजच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या बरोबर चे गीतही खूप सुंदर…!!!! तसेच “ए दिल मेरी आहोंमें इतना तो असर आये” हे एक्ट्रेस मधील गीतही गायकीचा बाज पारखण्यासाठी जरूर ऐकावे…!!! “लाल किला” या चित्रपटातील “ना किसीकी आँख का नूर हूँ “आणि “लगता नहीं है दिल मेरा “या बहादूर शहा जफर यांच्या आणि एस एन त्रिपाठी यांच्या संगीताने सजलेल्या दोन गझला ऐकल्या की हृदय पिळवटते,त्याच्या शब्दां शब्दातून झरणारे दर्द मन हेलावून टाकते.

सी रामचंद्र यांनी रफीजींना मोजकीच गीते दिली जी खूप लोकप्रिय झाली…अण्णांच्या “अमरदीप”मधील “देख हमे आवाज न देना “हे अवीट गोडीचे युगलगीत, झुकती है दुनिया (रफी-लता-चितळकर), नमस्ते नमस्ते (पतंगा-मोहनतारा अजिंक्य-चितळकर-रफी) यातील सुरांचा आणि ठेक्याचा सुरेल दंगा ,”नौशेरवान-ए-आदिल” मधील “तारोंकी जुबा पर “आणि “भूल जाये सारे गम ” ही लताजींबरोबरची दोन्ही सुगंधी गीते…जणू हलक्या मंद वात लहरींप्रमाणे अलवार मनात शिरतात आणि त्या अलौकिक स्वर संगीताच्या मोहक दुनियेची सैर करवितात….!!!!!

सचिन देव बर्मन…श्रेष्ठ संगीतकार….!!!! रफ़िजींना त्यांनी ही काही रत्नजडित गीते दिली आहेत… “गाईड” हा चित्रपट त्यांच्या संगीतातील सोनेरी शिरपेच …त्यातील तेरे मेरे सपने, क्या से क्या हो गया,दिन ढल जाये… ही रफिंच्या स्वरातील अनमोल रत्नेच…. “तेरे मेरे सपने’ मधील रोझीला विश्वास देणारा त्यांचा स्वर, “क्या से क्या हो गया” मधील कमालीचे वैफल्य आणि “दिन ढल जाये” मधील प्रेमातील अगतिकता मनाला भिडते, हृदय दुभंगून टाकते याउलट पहिल्या प्रेमाची साक्ष देणारे “दिल का भवर करे पुकार “आणि प्रेयसीच्या आठवणीने व्याकुळ होऊन तिचा वेड्यासारखा शोध घेत म्हटलेले ‘तू कहा ये बता, इस नशिली रात में “(तेरे घर के सामने) हेही तरल , त्यांच्या स्वरातील नशीले गीत, तो प्रेमरंगात भिजलेला अतिशय मृदू, मनावर मोरपीस फिरविणारा रफी यांचा स्वर केवळ अविस्मरणीय….!!!! स्वरांचा खराखुरा जादूगार असल्याची साक्ष देणारी ही मधाळ गीते….!!

याउलट हाच स्वर प्यासा मध्ये “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है” मधील कमालीचे नैराश्य, संताप व्यक्त होतो…शेवटचा अंतरा नितांत सुंदर…

जला दो, इसे फुक डालो ये दुनिया

मेरे सामने से हटा लो दुनिया

तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया…..

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…

या गीतात त्यांच्या स्वरातील संताप,उद्विग्नता पाहून आपण क्षणभर सुन्न होतो…नतमस्तक होतो…!!!!

मदन मोहन यांनीही त्यांच्या स्वराचा चपखल उपयोग केला…गीत गाण्याआधी रफी एक दिवस त्या गीताच्या सान्निध्यात राहत असत…”हिर राँझा” मधील रांझ्याची काळजाला पीळ पाडणारी कैफियत रफिंच्या स्वरात ऐकली की डोळे पाणावतात. “ये दुनिया,ये मैफिल “काय किंवा “तुम जो मिल गये हो” हे गीत काय दोन्ही अवीट गोडीची…!!!! मेरी दुनिया में तुम आई (हिर राँझा… सोबत लताजी), तुमसे कहूं एक बात (दस्तक) यातील त्यांचा पिसाहून हलका स्वर अनुभवावा…

नय्यर आणि रफी हे जणू एकमेकांसाठीच बनले होते, दोघांची गीते, द्वंद्वव गीते ही रसिकांना मेजवानीच असे…जॉय मुखर्जी यांनी “बंदा परवर” अशी साद घातली की तरुणींच्या हृदयाचा ठोका चुके…”पुकारता चला हूँ मैं ” यातील पुकारचा लांबलेला स्वर तरुणाईच्या मनात रुतत असे आणि नय्यर साहेबांची उडत्या ठेक्याची गीते…तौबा तौबा…!!!! “क्या लगाई तुमने ये कसम कसम से” ऐकून मनावर धुंदी चढते…”मेरी जान बल्ले बल्ले”, “अजी किबला मोहतरमा” , “जुबाने यार मन तुर्की” यातला सुरेल धिंगाणा अविस्मरणीय….!!!! किती गाणी सांगायची. “काश्मीर की कली” मधील “तारीफ करू” ची तारीफ काय करावी…”तारीफ” हा शब्द प्रत्येक वेळी वेगळा उच्चारला आहे अगदी शम्मी कपूरच्या स्टाईल ने…”काश्मीर की कली” हा जणू संगीतरुपी नजराणा होता…इशारो इशारो में, दिवाना हुआ बादल ही त्यातील संगमरवरी मधुर शिल्पे होती…..”आप युंही अगर हम से मिलते रहे.”..”बहुत शुक्रियां”,”मैं प्यार का राही हूँ” या अवीट गोडीच्या गीतांचा सुगंध आजही रसिकमनात दरवळत आहे…!!! एक छोट्याशा प्रसंगामुळे ओपी आणि रफी यांचे सांगीतिक नाते तुटले हे रसिकांचे दुर्दैव…!!!

शंकर जयकिशन यांनी रफीजींना वेगवेगळ्या मूड्स मधील गीते दिली…त्यांनी ही स्वरांची “सवा लाख की अनमोल लॉटरी” पारखली होती म्हणूनच “रात के हमसफर “सारखे त्यांच्या खड्या स्वराची पारख करणारे तर “दिल के झरोके में तुझको बिठाकर” सारखे दमसास गीत दिले…प्रेमात पागल झालेल्या नायकातील परिवर्तन त्यांनी “याsssहू चाहे कोई मुझे जंगली कहे” या गीतातून नेमके सांगितले आहे….असली नकली, जब प्यार किसींसे होता है, दिल एक मंदिर, सूरज, ससुरल अशा कितीतरी देखण्या सुरेल चित्रपटातील सगळीच गीते सुंदर….!!!! “बहारों फूल बरसाओ” हे रफिंचे आवडते गीत, त्यांना पुरस्कार मिळवून देणारे…!!!!

“परदेसीयो से ना अंखिया मिलाना ” हे कल्याणजी आनंदजींचे सुंदर गीत त्यांनी तितक्याच नजाकतीत म्हटले आहे..”जानेवालो जरा”, “राही मनवा” अशा गीतांनी त्यांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी झालेली दोस्ती अखेरपर्यंत टिकली…सर्वात जास्त गाणी रफिंनी यांच्याच संगीतात गायली आहेत…आणि “आराधना” नंतरच्या किशोरयुगात पुन्हा रफी साहेबांचे जोरदार आगमन करण्यात लक्ष्मी प्यारे, मनमोहन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता….”परदा है परदा”, “शिर्डीवाले साईबाबा” , “हम को तुमसे हो गया है प्यार” यांनी ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीला चार चांद लागले…त्यांना रफीसाहेबांनी मुद्दाम कौतुकाने सांगितले होते की माझी गीते आपण पडद्यावर उत्तम सादर करता….!!! ऋषीजींच्या मनातही रफ़िजींबद्दल खूप आदर होता…!!! लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि रफी यांचे नातेच वेगळे होते…!!!

संगीतकार रवि यांचे “बाबुल की दुवाए लेती जा” हे गीत आजही डोळ्यात पाणी आणते..त्यांच्या संगीतात “चौदहवी का चांद” रफिंमुळेच चमचमला होता…ज्याने शकील बदायुनी आणि रफिंना पुरस्काराचे मानकरी केले…!!! सावनकुमार यांच्या चित्रपटातील “तेरी गलियो में ना रखेंगे सनम” हे गीत तर परदेशातही स्टेज शो करताना खूप गाजले…!!! “रोशन” यांनीही त्यांना सुंदर गाणी दिली…जो बात तुझ में है,जो वादा किया, मन रे तू काहे न धीर धरे आणि इष्क इष्क सारखी लोकप्रिय कव्वाली…..!!!! “अभी ना जाओ छोडकर”हे गीत जयदेव यांनी दिलेले अप्रतिम युगलगीत…रफिंचा यातील मुलायम स्वर कसा विसरावा….!

रफीसाहेब खरच “परमेश्वराचा दूत” म्हणून इहलोकी अवतरले…”उस्ताद बडे गुलाम अली खा”, त्यांचे धाकटे बंधू उस्ताद ”बरकत अली खा”, वहीद खा”, ”पंडित जीवनलाल भट्ट” यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय गायकीची तालीम घेतली. बालपणीच त्यांना मिळालेल्या फकिराच्या आशीर्वादाने त्यांचे नाव जगभरात रोशन झाले… एवढा जागतिक कीर्तीचा कलावंत पण पराकोटीचा नम्र…मोठ्या स्वरात बोलणे दूर , गाताना सहगायिकेकडे मान वर करून पाहत नसत…!!! किशोर कुमार , महेंद्र कपूर, हेमंत कुमार, मन्ना डे आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल हे सगळे त्यांचे चाहते होते असे खुद्द प्यारेलालजींनीच एक मुलाखतीत सांगितले आहे…!!!! किती वेळा हे गीत किशोरदा माझ्यापेक्षा चांगले गातील असे म्हणून त्यांनी किशोरकुमार यांना दिली आहेत…!!!!! “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया” या गीतातील बेफिकीरी अनुभवण्यासारखी…!!

प्रत्येक भावना, मूड याना अनुसरून समरसून गाणारे रफीसाहेब गाण्याला ईश्वरी देणं मानत… शास्त्रीय संगीत अभ्यासून, रियाज करून अनेक गायक होऊ शकतील, पण अशा सुरेल गायकाला “रफी” म्हणून नावलौकिक मिळवून कीर्तीचा ताज फक्त अल्लाच देऊ शकतो….लोकप्रियतेचे शिखर गाठूनही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले होते…!!! त्यांचे डाव्या हाताने केलेले दान उजव्याला कळत नसे….!!! रफी गायक आणि व्यक्ती म्हणून श्रेष्ठ होते…युगातून एखादाच त्यांच्यासारखा संगीत सूर्य प्रकाशमान होतो…आणि अस्तास जाताना लाखो रसिकांच्या डोळ्यात दु:खाचे आभाळ दाटते….!!! नौशादजींसारखे संगीतकार त्यांच्या जाण्याने स्वत:भोवती दु:खाचा कोष विणतात….आणि जेव्हा वर्तमानात येतात तेव्हा म्हणतात,

कहता है कोई दिल गया, दिलबर चला गया

साहिल पुकारता है, समंदर चला गया

लेकिन जो बात साच है , वो कहता नहीं कोई

दुनिया से मौसीकी का पयंबर चला गया…!!!

एका संगीतमय युगाची सांगता झाली असे म्हणावे का….नाही कारण आजही त्यांच्या गीतांची बरसात रसिक हृदयात होतच आहे….आजही मनामनात रोमान्स फुलतोच आहे….अशा दैवदत्त सृजनाला अंत नसतो…असतो तो फक्त बहर आणि बहरच…..!!!!! 

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Website | + posts

Leave a comment