-पद्माकर पाठकजी, सातारा

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आठ ते चौदा या वयात जे ऐकले जाते ते दीर्घकाळ स्मरणात राहते असे म्हणतात ! मला याचा एक वेगळाच अनुभव आला आहे, आणि तो म्हणजे मी सातारच्या हत्तीखाना शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. या शाळेच्या इमारतीच्या लगतच चित्रा टॉकीज ची इमारत होती आणि मला आजही आठवते की शम्मी कपूरची प्रमुख भूमिका असलेला राजकुमार हा चित्रपट तेंव्हा चित्रा टॉकीज ला लागला होता. दुपारी तीन ते सहा या वेळातील शो ची गीते जरा कान दिला तर शाळेतही ऐकू येत असत. तीच कथा गबन शिकार या चित्रपटांची आहे. तसेच आमच्या घरात माझ्या मोठ्या बहिणींना व ओघानेच मला पण राजेंद्रकुमार हा त्या काळात आवडत असल्यामुळे, जिंदगी, ससुराल, आई मिलन की बेला हे चित्रपट पाहिले गेले. राजकुमार काय किंवा गबन काय अथवा शिकार काय व राजेंद्र कुमार चे सिनेमे काय ? सगळ्यांनाच संगीत शंकर जयकिशन यांचे होते. (Remembering the Finest Music Director Jaikishan of Shankar-Jaikishan Duo on his 50th Death Anniversary)

आमचे घरात पहिल्यांदा रेडिओ आणला त्यावर ऐकलेले पहिले गाणे, “तेरी प्यारी प्यारी सुरत को….” म्हणजे शंकर-जयकिशनच ! हत्तीखाना शाळेत शिकत असतानाची, “पावसाच्या धारा येती झरझरा…..” ही कविता त्यावेळी वर्गात बसून सर्व मुलांबरोबर मी पण म्हणत असे ! आणि आजही ती कविता पाठ आहे याचे कारण या कवितेची चाल! कोणी कोणास ठाऊक पण त्या कवितेला, “जिया बेकरार है छायी बहार है…….” या ‘बरसात’ मधील गीताची चाल लावली होती, आणि ती चाल एवढी आकर्षक व सुंदर आहे की त्या वयात, ती ऐकलेली व कवितेच्या माध्यमातून म्हणलेली चाल कायमची डोक्यात बसली.

पुढे माध्यमिक शाळेनंतर, कॉलेजच्या विश्वात प्रवेश केल्यावर त्या तारुण्याच्या उन्मादात आईवडीलांच्या आग्रहाखातर राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन ऐकण्यास गेलो आणि तेथे, “विठ्ठल हसला गाली आणि हात कटेच्या खाली …..”हे त्यांनी लिहिलेले भक्ती गीत चक्क, ‘संगम’ चित्रपटातील, “बोल राधा बोल ……” या गीताच्या चालीत ऐकले. बालपणात, तारुण्यात, शाळेत, घरी, कीर्तनात, लग्नसमारंभात, सगळी सगळीकडे शंकर-जयकिशन भरून राहिले होते – हवेतल्या ऑक्सिजन सारखे !

आणि या ऑक्सिजननेच चित्रपट गीतांचा आनंद, जीवनाची ऊर्जा, आम्हाला दिली ! आमचे जगणे सुसह्य व आनंददायी केले. असा आमचा तो बालपणातला, तारुण्यातला तो काळ, ‘सुवर्णकाळ’ बनण्यासाठी ज्यांचे संगीत, ज्यांच्या चाली व ज्यांचे पार्श्वसंगीतही कारणीभूत ठरले त्या शंकर-जयकिशन या संगीत द्वयातील जयकिशन यांच्या गमनाला पन्नास वर्षे झाली हे केवळ कागदावरील नोंदी वाचूनच खरे मानायचे ! कारण शंकर-जयकिशन गेलेत कुठे?

आजही, संगम, आवारा, प्रोफेसर, अनाडी, मेरा नाम जोकर अशा अनेक गीतांच्या संगीतातील अगर त्या चित्रपटांच्या पार्श्वसंगीतातील एखादा तुकडा जरी कानावर आला तर, शरीरावर रोमांच उठतात, “दिल पंछी बन उड जाता है….” ! क्षणात ते काही वर्षे मागे जाते व ते दिवस आठवतात आणि हेही जाणवते की शंकर-जयकिशन इथेच कुठेतरी आपल्या आसपास आहेत.

1971 च्या 12 सप्टेंबरला, आकर्षक चेहरा असलेले, संगीतातील निष्णात, जयकिशन हे या पृथ्वीतलावरून निघून गेले, आणि तेंव्हापासून 12 सप्टेंबर ही तारीख एक वेगळी जखम हृदयाला देऊन गेली. माझे मित्र सुभाष हेंद्रे, माधव खोले, यासारखे जयकिशन चे चाहते, दरवर्षी बारा सप्टेंबरला आम्ही एकमेकांशी संवाद साधून जय किशन च्या आठवणी जागवु लागलो.

आणि आज पन्नास वर्षे जयकिशन यांच्या गमनाला होत आहेत या निमीत्ताने माझे जयकिशन यांचे बद्दलचे विचार व्यक्त करणेसाठी कागद, पेन हातात घेतले तेंव्हा प्रकर्षाने जाणवले की, चालीतील माधुर्य कमी न करता लोकांना सहज गुणगुणता येतील, व लोकप्रिय होतील अशी गाणी देण्याचे काम जय किशन नी केले. अर्थात ते शंकर यांच्यासाथी नेच संगीत देत असल्यामुळे त्यांच्या संगीतातील गाण्यांचे श्रेय हे त्या दोघांना जाते. पण प्रत्यक्षात त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांमधील काही गीतेही एकट्या शंकरांनी संगीतबद्ध केलेली असत तर काही गीते जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली असत. मात्र चित्रपटाचे पार्श्वसंगीत जयकिशन यांचेच असे.

जयकिशन यांचे वैशिष्ट्य हे पण होते की, आपल्या पार्श्वसंगीताच्या रचनेतूनच त्यांनी अनेक गाणी तयार केली. उदाहरणार्थ, “जाने कहा गये वो दिन”, “ओ बसंती पवन पागल,” “दुनिया बनानेवाले”, या गीतांच्या चाली, ‘आह’ चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात ऐकायला मिळतात. “हमारे गाव कोई आयेगा ” हे गीत ‘दिल अपना और प्रीत पराई’ च्या पार्श्वसंगीतात दिसते. जयकिशन यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक गाण्यांचे मुखडे स्वतः लिहायचे, आणि मग उर्वरित गीत ते गीतकारां कडून पूर्ण करून घ्यायचे. जय किशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात वापरलेले, ‘चष्मेबद्दूर’, ‘खुदा खैर करे’, ‘गुलबदन’, ‘सलाम’, ‘सर आँखो पर’, ‘शाहे खुबा’ हे शब्द गीतकारांनी लिहिलेले नसून जयकिशन यांनी स्वतः लिहिलेले आहेत.

जय किशन यांनी आपल्या कलंदर वृत्ती नुसार संगीतकाराच्या भूमिकेतून बाहेर पडून चेहऱ्यावर मेकअप ही चढवला होता. राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटात एक छोटीशी भूमिका त्यांनी केली होती. तो चित्रपट आजही बघताना ते देखणे जयकिशन आपल्याला बघायला मिळतात. पण, ‘बेगुनाह’ चित्रपट मात्र बघण्याचे भाग्य आपल्याला मिळणे शक्य नाही. तो चित्रपट एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की, त्या चित्रपटात जय किशन यांनी पडद्यावर, “ए प्यासे दिल बेजुबाँ……” हे गीत मुकेश यांच्या आवाजात गायले होते.


1971 पर्यंत एकंदर 129 चित्रपटांना शंकर-जयकिशन यांनी संगीत दिले. अनेक वेळा गीतकार शैलेंद्र नी लिहिलेली गीते शंकर यांनी स्वरबद्ध केली होती व गीतकार हसरत जयपुरी यांनी लिहिलेली गीते जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली होती. जयकिशन यांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्ताने शंकर-जयकिशन या संगीतकार द्वयीच्या विषयी अशा अनेक घटना, प्रसंग, त्यांच्या कारकिर्दीतील वैशिष्ट्ये, आठवतात. त्यासंदर्भात अनेकांनी लेखन केलेले आहे, म्हणूनच आज येथे जरा एक वेगळी हकीगत सांगावीशी वाटते, कदाचित ती काही रसिकांना माहितही असेल.

दक्षिण गुजराथ मधील, ‘बासंदा ‘ या गावी जय किशन यांचे बालपण गेले. त्यांचे बालपणीचे नाव, ‘बटुक ‘ होते. त्यांनी त्याच गावातील शाळेत संगीताचे पहिले धडे गिरवले आणि याच, “श्री प्रताप सिल्वर जुबिली गायन “शाळेला जयकिशन हे मोठे झाल्यावरही विसरले नाहीत. लोकप्रिय संगीतकार झाल्यावर जयकिशन आवर्जून बासंदाला गेले. या शाळेसाठी त्यांनी आर्थिक मदत केली .तेथील लोकांनी पण त्यांच्या त्या कृतज्ञतेची जाण ठेवून, ‘जय किशन संगीत निकेतन ‘असे शाळेचे नामकरण केले. जय किशन कलेने जसे मोठे होते तसे मनानेही मोठे होते. ज्या काळात ते कोणीच नव्हते तेंव्हा ज्या गावाने , ज्या शाळेने त्यांना शिक्षण दिले त्या गावाला त्या शाळेला ते मोठे झाल्यावरही विसरले नाहीत.

Music Director Shankar Jaikishan
Music Director Shankar Jaikishan

आज पन्नास वर्षांनी त्यांनी संगीत दिलेली गीते जशी स्मरणात आहेत, तशाच या अशाही घटना त्यांचे चाहते लक्षात ठेवून आहेत. म्हणजे अगदी त्यांनी संगीत दिलेल्या गीतातील शब्दांप्रमाणे सांगायचे तर

” मौत मिटा दे चाहे *हस्ती याद तो अमर है”

हिंदी सिनेमाच्या संगीताविषयी अशाच इतर माहितीपूर्ण रंजक लेखांसाठी क्लिक करा

Padmakar Pathakji
+ posts

Leave a comment