-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Remembering one of the finest Music Director from Golden Era of hindi films Vasant Desai ‘कभी तनहाईयोंमे यूँ हमारी याद आयेगी’ हे मुबारक बेगमच्या  आवाजातील स्नेहल भाटकरांचं एकच गाणं गाजलं व त्याची लोकप्रिय गीतांमध्ये नोंद झाली. पण भाटकरांबरोबर आलेला दुसरा महाराष्ट्रीयन माणूस मात्र या क्षेत्रात गाजला! तो म्हणजे वसंत देसाई (Music Director Vasant Desai). पण देसाईंना देखील तशी कमीच संधी मिळाली. परंतु एका संधीत देखील त्यांनी मान्यता मिळवून दाखविली. वसंत देसाई यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत फार तर 50 चित्रपटांना संगीत दिले होते पण बोटावर मोजता येतील इतक्याच चित्रपटांनी त्यांना लौकीक मिळाला. 

      वयाच्या आठव्या वर्षी त्यांना वडिलांच्या मायेपासून वंचित व्हावे लागले. त्यांच्या भावांनी व आईने त्यांना वडिलांची कमी कधीच जाणवू दिली नाही. कोकणामधील मालवण गावी वसंतरावांचे आजोबा होते व ते कीर्तनकार होते. घरात आईला नेहमीच भजन व ओव्या म्हणायची सवय होती. भक्तीसंगीताचे बाळकडू लहानपणापासून मिळाले होते. कुडाळ येथे शिक्षण घेत असतानांच ते पेटी वाजवण्यास शिकले. त्या काळी खेड्यापाड्यात सणाच्या दिवसांत नाटकं होत असत. अशाच नाटकांमधून अभिनय व संगीत याचं जणू शिक्षणच त्यांनी लहानपणी घेतले होतं. त्यांना संगीताची व अभिनयाची आवड आहे हे पाहून त्यांच्या चुलत भावाने त्यांची रवानगी प्रभात फिल्म कंपनीत केली. व्ही. शांताराम यांच्याकडे त्यांनी त्यांना नोकरीला लावले.

      प्रभात मध्ये वसंतरावांचे काम तर सुरू झाले; परंतु पगार कवडी देखील मिळत नव्हता. त्यांना अभिनय येतो हे पाहून 1930 साली ‘खुनी खंजर’ या मुकपटात त्यांना काम मिळाले. हे त्यांचे सर्वात पहिले काम होते. 1931 साली बोलपटाची सुरवात झाली. 1932 साली प्रदर्शित झालेल्या ‘अयोध्या का राजा’ या चित्रपटातील ‘जय जय राजाधिराज’ हे गाणं वसंत देसार्इंनी गायलं होतं. प्रभात कंपनीत संगीत विभागात काम करीत असतानांच ‘अमृत मंथन’, ‘अमरज्योती’, ‘वहाँ’ इत्यादी चित्रपटात त्यांनी गाणी म्हटली होती व त्या गाण्यांना त्या काळी बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. गाण्यांच्या सरावाबरोबर शास्त्रीय संगीत शिकण्याचे त्यांनी ठरवले व उस्ताद आलमखान व इनायत खाँ यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. संगिताची साधना करीत त्यांनी आपले अभिनय करणे चालूच ठेवले होते. याच सुमारास रंगभूमीकडे त्यांचे लक्ष गेले. व त्यांनी काही नाटकातून काम करायला सुरूवात केली. ‘खरा ब्राह्मण’, ‘आंधळ्याची शाळा’ ही त्यांनी भूमिका केलेली नाटके चांगलीच गाजली. 1939 सालानंतर त्यांनी अभिनय पूर्णपणे बंद करून आपले सगळे लक्ष संगितावर केंद्रित केले.

      प्रभात कंपनी पुणे येथे आल्यानंतर त्यांनी केशवराव भोळेे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम सुरू केले. केशवरावांनी देखील त्यांना उत्तम मार्गदर्शन केले. पण वसंतरावांचा मुक्काम फार काळ प्रभातमध्ये राहू शकला नाही. व्ही. शांताराम यांच्या सोबतच वसंत देसाई यांनी देखील प्रभातला रामराम ठोकला. व्ही.शांताराम यांची मुंबईत आल्यानंतर चित्रपट बनविण्याची योजना चालू होती. या दरम्यान देसाईंना देखील काम नव्हते. पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी मग ऑर्केस्ट्रा सुरू केला व त्याचे प्रयोग सुरू केले. मुंबईत त्यांना नामवंत निर्माता दिग्दर्शक जे.बी.एच. वाडीया यांनी आपल्या चित्रपटाचे संगीत दिले. वाडीया ब्रदर्सच्या या चित्रपटाचे नांव होते. ‘शोभा’ या अगोदर त्यांनी 1936 साली एका चित्रपटास संगीत दिले होते. त्याचे नांव होते ‘छाया’. संगीत देऊन देखील ‘छाया’ चे श्रेय ते आपल्याकडे घेऊ शकले नाहीत. याचे कारण असे होते की त्यावेळी ते ‘प्रभात’चे नोकर होते व त्या करारानुसार त्यांना बाहेरील काम स्वीकारण्याची परवानगी नव्हती. ‘छाया’ चे निर्माते होते मा. विनायक. त्यांची इच्छा होती की ‘छाया’ ला वसंतरावांनीच संगीत द्यावं. नावाची अजिबात फिकीर त्यांनी केली नाही व ‘छाया’ ला संगीत दिले. श्रेय नामावलीत संगीतकाराचे नावच नव्हते.

      वाडीया ब्रदर्सच्या ‘शोभा’ ला रसिकांनी पसंद केले व त्यामुळे  ‘आँख की शर्म’ आणि ‘मौज’ या दोन चित्रपटांचे संगीत त्यांनाच मिळाले. व्ही. शांताराम यांची राजकमल कलामंदिराची स्थापना व्हायला 1942 साल उजाडावे लागले. राजकमल कलामंदिरातर्फे ‘शकुंतला’ ची निर्मिती सुरू झाली. तेव्हा संगीताची जबाबदारी वसंत देसाई यांच्याकडेच आपोआप आली. शांतारामबापूंचा वसंतरावांवर खूपच विश्‍वास होता. शांतारामबापूंचा ‘शकुंतला’ हा चित्रपट 1943 साली प्रदर्शित झाला व त्याला व्यवसायिक दृष्ट्या खूपच यश मिळाले. मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहात तब्बल 104 आठवडे या चित्रपटाने मुक्काम केला होता. या चित्रपटाची गाणी खूपच गाजली व रेकॉर्ड्‌स हातोहात खपल्या. ‘शकुंतला’ मुळे वसंत देसाई संगीतकार म्हणून नावारूपास आले.

      व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरचे संगीतकार म्हणून वसंत देसाई यांना काम मिळण्यास सुरवात झाली. ‘परबत पे अपना डेरा’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, ‘जीवनयात्रा’, ‘अंधो की दुनिया’, ‘मतवाला शायर राम जोशी’, ‘दहेज’ या सर्वच चित्रपटांना वसंत देसाई यांनीच संगीत दिलं. व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक चित्रपटात एक नाविन्य होतं. एक वेगळेपणा होता. त्या नाविन्याला साजेल असे कर्णमधूर संगीत वसंतरावांनी तयार केलं. प्रत्येक गाणं नाविन्यपूर्ण होतं, तर संगिताची शैली वेगळी होती. पार्श्‍वसंगीत देखील उत्कृष्ट होतं. व्ही. शांताराम यांनी वेगवेगळे संगीत प्रयोग वसंत देसाई यांच्याकडून करून घेतले होते. गाण्यांमधून प्रतिध्वनींचा प्रयोग ‘परबत पे अपना डेरा’ मध्ये त्यांनी केला होता. तर चिनी स्वरांचा उपयोग ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ मध्ये केला होता. याच चित्रपटाचे संगीत तयार करण्याकरिता देसाईंनी दोन वर्षापर्यंत चिनी संगितावर अभ्यास केला होता. या चित्रपटाची नायिका जयश्री हिने गायलेले ‘नयी दुल्हन नयी दुल्हन’ हे गाणं चिनी लोकसंगितावर आधारित होतं. हे गाणं खूप लोकप्रिय झालं.

      स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हिचा वसंत देसाई यांच्याकडे प्रवेश झाला तो ‘जीवनयात्रा’ या चित्रपटापासून. लताच्या आवाजात, ‘चिडिया बोले चूँ चूँ चूँ’ हे गाणं ध्वनिमुद्रित केलं होतं. व चित्रपटात देखील ते लतावरच चित्रीत करण्यात आलं होतं. व्ही. शांताराम यांनी वसंत देसाई यांच्यावर ‘प्रभात’ प्रमाणे बंधने घातली नव्हती. त्यामुळे वसंत देसाई यांना बाहेरील निर्मात्यांकडे काम करता येत असे. मा. विनायक यांच्या ‘सुभद्रा’ व ‘मंदीर’ या दोन चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले. या दोन्ही चित्रपटांची गाणी गाजली व लोकांना ती खूपच आवडली.

      1950 पासून वसंत देसाई यांच्या संगिताचा नावलौकीक सर्वत्र झाला होता व रसिकांनी त्यांना आपल्या पसंतीची पावती अनेकदा दिली होती. राजकमलमध्येच काम करायचे वसंतरावांनी ठरवले होते. कारण त्यांच्या मनात व्ही.शांताराम यांच्याबद्दल आदर होता. ‘प्रभात’ पासूनच त्यांचे व्ही. शांताराम यांच्याशी स्वर जुळले होते. शांताराम बापुंशीच बांधिलकी स्वीकारल्यामुळे अनेक चांगल्या निर्मात्यांचे चित्रपट त्यांच्याकडून निघून गेले; परंतु त्यांना त्याचे काहीच वाटले नाही. ‘हिंदुस्थान हमारा,’ ‘शीश महल’, ‘आनंद भवन’ या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले होते. 1952 च्या ‘हैद्राबाद की नाझनीन’ या चित्रपटात जाओ चमका सुबह का तारा व क्या क्या न लोग, चल बसे (लता) नजरों में समानेसे करार आ न सकेगा (राजकुमारी) निगाहे लडते ही (शमशाद) आणि कहरही है रात अंधेरी (तलत) अशी अप्रतिम गाणी वसंत देसाईंनी दिली होती, परंतु निगार सुल्ताना व मनहर देसाई अशी विजोड जोडी असलेला हा चित्रपट आपटला. ‘जाओ चमका’ हे लताच्या टॉपच्या गाण्यात जागा मिळवेल इतकं सुंदर होतं. 1953 च्या ‘धुआ’ची एक सोडून सर्व गाणी धनीराम यांची होती. केवळ एक गाणं ‘मै सागर की मस्तं लहर (लता) वसंत देसाईंच होतं. आज ‘धुआ’ची इतर गाणी आठवणारही नाहीत पण ‘मै सागरकी मस्त लहर’ विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. हे सर्व चित्रपट राजकमल बाहेरचे होते. राजकमल 1943 साली सुरू झाली होती व तेव्हापासून वसंत देसाईच संगीतकार होते. तशी शांताराम बापूंच्या चित्रपटातील सर्व गाणी गाजली; परंतु 1955 साली प्रदर्शित झालेला ‘झनक झनक पायल बाजे’ खूपच उल्लेखनीय ठरला. ‘झनक झनक पायल बाजे’ गोपीकृष्ण-संध्या नाचे या ओळी आजही लिखाण करतांना लगेच लेखणीत येतात. खरोखरच ‘झनक झनक पायल बाजे’ही शांताराम बापूंची सर्वात यशस्वी कलाकृती म्हणावी लागेल.

      ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये तब्बल 13 गाणी होती व त्यापैकी लताच्या आवाजात सहा गाणी होती. त्यापैकी ‘कैसी यह मुहोब्बत की सजा हाय दी है कैसी’ आणि ‘जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू रे’ खूपच गाजली. खाँ साहेब उस्ताद अमीरखान यांच्या आवाजातील ‘झनक झनक पायल बाजे’ हे गीत आजही स्मरणात राहते. हेमंतकुमार-लता यांचं ‘नैनसो नैन नाही मिलाओ’ खूप लोकप्रिय झालं. हा चित्रपट मुंबई येथे 75 आठवडे मुक्काम करून होता. 1955 नंतर लगेच 1956 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुफान और दिया’ ला घवघवीत यश मिळालं होतं. राजेंद्र कुमारच्या कारकीर्दीला याच चित्रपटामुळे खरा ब्रेक मिळाला. मन्ना डे यांच्या स्वरातील ‘निर्बल से लढाई बलवान की, ये कहानी है दिये की और तुफान की’ हे गाणं ‘मास्टर पीस’ होतं.

 

व्ही. शांताराम आपल्या प्रत्येक चित्रपटात कांहीतरी वेगळं दाखवीत असत, असे मी अगोदरच सांगितले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट काहीतरी आदर्श, काही तरी तत्वे घेऊन येत असे. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘तुफान और दिया’ नंतर यशाची ‘हॅट ट्रिक’ वसंत देसाईंनी साधली. या दोन चित्रपटानंतर आलेल्या ‘दो आँखे बारह हाथ’ ला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. ‘दो आँखे बारह हाथ’ ची सगळी गाणी लतादीदीच्या आवाजात होती. परंतु एक गाणं त्यांनी मन्नाडे यांच्या युगल स्वरात होतं, ‘सैयाँ, झुठों का बडा सरताज निकला, मुझे छोड चला’, या गाण्याला आजही तेवढीच लोकप्रियता आहे. लताच्याच आवाजातील लोरी, ‘मैं गाऊ तु चूप हो जा, मैं जागुं रे तू सो जा’ खूपच गाजली. ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे भजन तर आजही तितकेच लोकप्रिय आहे.

      ही ‘हॅटट्रिक’ साधल्यानंतर राजकमलच्या पुढच्या चित्रपटांचे संगीत मात्र त्यांनी दिले नव्हते. दिग्दर्शक विजय भट्टच्या ‘गुंज उठी शहनाई’, या चित्रपटानं अमाप लोकप्रियता मिळवली. वसंत देसाई यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरावा ‘गुंज उठी शहनाई. ‘प्यार की प्यास’, ‘आशिर्वाद’, ‘गुड्डी’ हे चित्रपट  पुढे गाजले. ‘दो आँखे…’ करिता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘गुंज उठी…’ त शहनाई’चा सुरेख वापर केला होता. ‘गुड्डी’त वाणी जयराम ही नवी गायिका त्यांनी सादर केली. तर ‘आशीर्वाद’ मध्ये अशोककुमारला ‘रेलगाडी’ हे अप्रतिम बोलगाणं गायला दिलं. ‘आशिर्वाद’ मधलीच लताची ‘झीर झीर बरसे सावनी अखियाँ’ आणि ‘इक था बचपन’ ही गाणी विसरता येत नाहीत. 1950-51 मध्ये ‘अपना देश’ व ‘शीशमहल’ या चित्रपटांमध्ये पुष्पा हंस या पंजाबी गायिकेला त्यांनी संधी दिली होती.

      मराठी चित्रपटांना त्यांनी यशस्वी संगीत दिलं होतं. ‘अमर भूपाळी’ ची गाणी सर्वात जास्त गाजली. आचार्य अत्रे यांच्या ‘श्‍यामची आई’ ला त्यांनीच संगीत दिलं होतं. मराठी नाटकांनाही वसंतरावांनी संगीत दिलं होतं.

      वसंत देसाई हे एक आकर्षक व्यक्तिमत्व होतं. 1975 मध्ये अचानक लिफ्टमध्ये अडकून त्यांचं दुर्दैवी निधन झालं.

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment