-अशोक उजळंबकर
आर. सी. बोराल व पंकज मलिक यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने सिने संगीताला सुवर्णकाळाकडे नेणारा संगीतकार म्हणून अनिलदांचा उल्लेख करावा लागेल. हिंदी चित्रपटातून संगीत म्हणजेच गाणी सुरू झाल्यापासून तीन वर्षांनी त्यांचं येथे आगमन झालं. रुचकर मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या बांगला देशातील बारीसाल या गावी त्यांचा जन्म झालेला. अनिल विश्वास (Music Director Anil Biswas) यांना लहानपणापासूनच संगीताचं वेड होतं. बारीसाल येथून नशीब आजमविण्याकरिता ते कलकत्ता येथे दाखल झाले. त्यांच्या आईला गायनाचा चांगला सराव होता. लहानपणीच त्यांच्यावर गायन, तबला वादन व अभिनय याचे संस्कार झाले होते. संगीतकार म्हणून त्यांचं या क्षेत्रात आगमन झालं ते 1935 साली.
1935 साली प्रदर्शित झालेल्या ‘धर्म की देवी’ या इटली पिक्चर्सच्या चित्रपटाला त्यांनी सर्वप्रथम संगीत दिलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते हिरेन बोस. त्या काळी संगीतकारदेखील चित्रपटातून अभिनय करीत असत. त्यामुळे या चित्रपटात अनिल विश्वास यांचा अभिनयदेखील पाहायला मिळाला होता. त्या काळातले नामवंत संगीतकार रफिक गजनवी हे देखील यात काम करीत होते. त्यानंतर झंडेखान या नामवंत संगीत दिग्दर्शकाबरोबर त्यांनी काही चित्रपटाला संगीत दिले; परंतु हे करीत असतानाच काही निवडक चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीतदेखील त्यांनी दिलं होतं.
1936 आणि 37 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमबंधन’, ‘शेर का पंजा’, ‘दुखियारी’, ‘जंटलमन’, ‘डाकू’, ‘कोकीळा’, ‘महागीत’, ‘डायनामाईट’, ‘पोस्टमन’, ‘ग्रामोफोन सिंगर’ व ‘हम तुम और वो’ या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिलं होतं. अनिल विश्वास यांना सुरूवातीपासूनच पाश्चिमात्य संगीताचं जबरदस्त आकर्षण होतं. येथे संगीत दिग्दर्शक म्हणून आपले काम सुरू करीत असतानाच त्यांनी काही गोमंतक वादक आपल्याबरोबर आणले होते. त्यावेळी त्यांच्या अंगात नवनवीन प्रयोग करण्याची उर्मी होती व तारुण्याची बेहोशी होती.
बोलपटांचा जमाना जेव्हा सुरू झाला तेव्हा चित्रनिर्मिती संस्थेचे महत्त्व वाढले. आपण ज्याला इंग्रजीत बॅनर व्हॅल्यू म्हणतो तो प्रकार वाढला होता. चित्रपट कोणत्या कंपनीचा आहे याला फार महत्त्व होतं. वर उल्लेख केलेल्या काही चित्रपटांपैकी ‘पोस्टमन’, ‘कोकीळा’, ‘महागीत’ हे चित्रपट सागर मुव्हीटोन या कंपनीचे होते. कलकत्ता येथून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची देखील अनेक बड्या निर्मात्यांशी भेट झाली. त्यापैकी निर्माते दिग्दर्शक मेहबूबखान एक होते. 1940 साली प्रदर्शित झालेल्या मेहबूब यांच्या ‘औरत’ या चित्रपटाला संगीत देण्याची संधी अनिल विश्वास यांना मिळाली. सुरेंद्र, सरदार अख्तर, वत्सला कुमठेकर यांच्याकडून अनिल विश्वास यांनी सुरेख गाणी गाऊन घेतली होती. परंतु त्यांच्याच आवाजातील ‘काहे करता, देर बराती’ याच गाण्याला प्रेक्षकांनी त्या काळी उचलून धरलं होतं. नंतरच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ची मूळ आवृत्ती म्हणजे ‘औरत’. 1940 साली प्रदर्शित झालेला ‘औरत’ म्हणजे संगीताची लयलूटच होती.
त्यानंतर याच महेबूब खान यांच्या ‘रोटी’ या 1942 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची गाणी खूपच गाजली. 1942 सालच्या मेहबुब खानच्या ‘रोटी’ या यशस्वी चित्रपटानेच येथे दर्जेदार चित्रपटांची परपंरा सुरू झाली. याच ‘रोटी’ मध्ये अनिल विश्वास यांनी बेगम अख्तरकडून गाणी गाऊन घेतली होती. ‘रहने लगा है, अंधेरा तेरे बगैर’ ही बेगम अख्तरच्या आवाजातली रचना त्याकाळी सर्वत्र गुणगुणली जात होती. खरं तर बेगम अख्तर यांचा ढंग हा शास्त्रोक्त संगीताचा; परंतु त्यांना चित्रपट संगीतात गायला लावून त्यांच्याकडून एकापेक्षा एक दर्जेदार रचना गाऊन घेतल्या त्या अनिल विश्वास यांनीच. पार्श्वगायनाचा प्रयोग कलकत्ता येथे 1935 साली झाला होता; परंतु मुंबईत यशस्वी करून दाखवला तो अनिल विश्वास यांनी.
‘बॉम्बे टॉकीज’ या मनावंत चित्र निर्मिती संस्थेत अनिल विश्वास यांचं आगमन झालं ते 1942 साली ‘वसंत’ या चित्रपटाकरिता त्यांनी पन्नालाल घोष बरेाबर काम केलं होतं. ‘वसंत’ची बहुतेक गाणी अनिल विश्वास यांनीच केली होती. बॉम्बे टॉकीजच्या ‘किस्मत’ या चित्रपटाला संगीत देण्याची संधी अनिलदांना मिळाली होती. ‘अब तेरे सिवा कौन मेरा किशन कन्हैया, भगवान किनारे से लगा दे मेरी नैय्या’ हे गाणं तर सर्वत्र तुफान गाजत होतं. याशिवाय ‘दूर हटो दूर हटो ऐ दुनियावालों’ व ‘धीरे धीरे आरे बादल’ ही गाणी खूपच गाजली होती. भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ जेव्हा सुरू झाला व ज्या संगीतकाराने आपल्या संगीतातील अनेक गाणी अजरामर करून ठेवली ते सी. रामचंद्र सुरूवातीला अनिल विश्वास यांचे सहाय्यक म्हणून काम करीत होते. शुद्ध भारतीय संगीत देण्याचा वसा त्यांनी अनिल विश्वास यांच्याकडूनच घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या तरुण पिढीला ‘किस्मत’ मधील ‘दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्थान हमारा है’ या गाण्याने खरी प्रेरणा दिली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी ‘चले जाव’ ची घोषणा केली होती.
अमीरबाई कर्नाटकी व अरुणकुमार यांच्या आवाजातील ‘धीरे धीरे आ रे बादल’, या गीताने सर्वांना मोहून टाकलं होतं. पार्श्वगायिका म्हणून अमीरबाई कर्नाटकीच्या आवाजाला खरा आकार मिळाला तो ‘किस्मत’मधील गाण्यानंतरच. ‘किस्मत’नंतर अनिल विश्वास यांच्या कर्णमधूर संगीताचा चित्रपट म्हणजे ‘हमारी बात’. यात राज कपूरने देखील काम केले होते. देविका राणी, जयराज, डेव्हिड, सुरैया यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. 1942 साली प्रदर्शित झालेल्या ‘शारदा’ या चित्रपटाद्वारे सुरैयाने पार्श्वगायिका म्हणून येथे आगमन केले होते; परंतु सुरैया खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली ती ‘हमारी बात’मधील गाण्यांनी. तिच्या आवाजातील ‘बिस्तर बिछा दिया है तेरे दर के सामने’, ‘जीवन अमृता पार मिलेंगे जीवन अमृता पार’ या गाण्यांनी कमालीची लोकप्रियता मिळवली होती. ‘हमारी बात’ नंतर ‘चार आँखे’, ‘मीलन’, ‘ज्वार भाटा’ या चित्रपटांना अनिल विश्वास यांनीच संगीत दिलं होतं. ‘ज्वार भाटा’चा नायक होता दिलीपकुमार. अनिल विश्वास यांची बहीण व त्या काळची नामवंत पार्श्वगायिका पारूल घोषबरोबर अनिलदांचे संगीत सहाय्यक सी. रामचंद्र यांनी गायलेले ‘भूल जाना चाहती हूँ, भूल पायी ही नही’ हे द्वंदगीत त्या काळी बरंच गाजलं होतं.
‘दिल जलता है तो जलने दे, आँसू न बहा, फरियाद न कर’ या ज्या ‘पहिली नजर’ चित्रपटातील गाण्यामुळे मुकेश खरा प्रकाशात आला, त्या ‘पहिली नजर’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते अनिल विश्वास. याच ‘पहिली नजर’च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी येण्यास उशीर झाल्यामुळे अनिलदा यांनी मुकेशच्या श्रीमुखात लगावली होती. हेच गाणं जेव्हा मुकेश आणि सायगल यांचे गुरू पंडित जगन्नाथ प्रसाद यांनी ऐकलं तेव्हा त्यांना तो आवाज सहगलचाच आहे असं वाटलं. अनिल विश्वास यांच्या संगीतातला आणखी एक मुकूटमणी म्हणजे तलत मेहमूद. त्याच्या मखमली आवाजाचा खराखुरा उपयोग त्यांनी आपल्या संगीतात करून घेतला होता. तलतच्या आवाजाच्या मर्यादा, गाताना होणारा कंप आणि भावनांच्या आघाताने मुखर होणारा त्यांचा स्वर याची किमया त्यांना ठाऊक होती. गझलच्या आत्म्याचं सौंदर्य त्यांनी तलतच्या आवाजात शोधून त्याला जिवंतपणा आणला. अनिल विश्वास आणि तलत मेहमूद यांची आठवण झाली की लगेच ओठावर येतात ते सूर ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल, जहाँ कोई न हो’ हेच! ‘आरजु’च्या गाण्यांची गोडी काही औरच होती. अनिल विश्वास यांनी तलतच्या आवाजाचा सुरेख उपयोग करून घेतला होता हे पुढील गाण्यांवरून लगेच लक्षात येईल. ‘सीने मे सुलगते हैं अरमां’ (तराना), ‘राही मतवाले’ (वारीस), ‘कभी है गम’ (वारीस), ‘शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया’ (आराम) ही अगदी बोटावर मोजता येतील इतकीच गाणी; परंतु चित्रपट संगीतास मिळालेली अमूल्य देणगी असाच यांचा उल्लेख करावा लागेल.
तलतच्या आवाजाबरोबरच अनिल विश्वास यांच्या संगीतात अजून एक आवाज त्या काळी दाखल झाला होता व तो आवाज होता लताचा. लताच्या जडणघडणीत अनिलदांच्या संगीताच्या ज्ञानाची बाजी लागली होती. त्यांच्या संगीताची ती एक संजीवनी आहे. लताच्या आवाजाची अमर्याद ताकद त्या आवाजाचं दैवीपण, कोवळीक, संवेदनशीलता अनिलदांच्या संगीतात ऐकायला मिळते. लता सर्वप्रथम अनिल विश्वास यांच्याकडे गायली ती ‘अनोखा प्यार’ या चित्रपटाच्या वेळी. त्यानंतर लताने गायलेलं ‘नाझ’ या चित्रपटातील ‘कटती है अब तो जिंदगी मरने के इंतजार में’ हे गाणं खूपच गाजलं होतं. ‘जानेवाले राही, इक पल रूक जाना’ ही ‘राही’ चित्रपटातील लताच्या आवाजाची साद ज्यांनी ऐकली असेल त्यांना नव्याने सांगायला नकोच. लताकडून शास्त्रोक्त पद्धतीची कित्येक गाणी गाऊन घेऊन अनिल विश्वास यांनी ती लोकप्रिय करून दाखवली होती. त्यापैकी ‘जा मैं तोसे नही बोलू कन्हैया’ (सौतेला भाई), ‘रितू आये रितू जाये’ (हमदर्द), ‘ना जा ना जा बलम’ (परदेस), या गाण्यांत रागरागिण्यांचा वापर वाद्यवृंदातील भारतीय नादांमुळे अधिकच खुलला आहे.
हिंदी चित्रपट संगीतातील लता, तलत, मुकेश यांची गाणी अनिल विश्वास यांच्याकडे जास्त संख्येने पहायला मिळतात. तसे अनिल विश्वास यांनी सितारा देवी, नसिम अख्तर, बेगम अख्तर, सुरेंद्र यांच्याकडून देखील गाणी गाऊन घेतली होती. अनिल विश्वास यांची पत्नी त्या काळची प्रसिद्ध गायिका मीना कपूर यांची काही लोकप्रिय गाणी होती ती अनिल विश्वास यांच्या संगीतामधीलच. ती व लता ‘अनोख्या प्यार’ या चित्रपटाच्या वेळीच अनिल विश्वास यांच्याकडे सर्वप्रथम आल्या. मीना कपूरने अनिलदांच्या संगीतात गायलेली गाणी अगदी निष्ठापूर्वक गायल्यासारखी वाटतात. त्यापैकी ‘छोटी छोटी बाते’ या चित्रपटातील ‘कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की,’ हे गाणं तसंच ‘रसिया रे मन बसिया रे’ हे ‘परदेसी’मधील सुंदर गाणं गायलं होतं मीना कपूर यांनीच. मुकेश व तलत यांच्या तुलनेत महंमद रफी मात्र अनिल विश्वास यांच्या संगीतात अपवादातच ऐकायला मिळाला. अनिल विश्वास ज्या प्रकारची गाणी तयार करीत असत, त्यात रफीचा पहाडी आवाज फिट बसत नसे; परंतु ज्या ठिकाणी त्यांना रफीच्या आवाजाची गरज वाटली तेथे त्यांनी त्याचा योग्य उपयोग करून घेतला होता. अनिल विश्वास यांच्या ‘दो राहा, बेकसूर, हीर’ या चित्रपटांत रफीचा आवाज ऐकायला मिळाला. ‘फरेब’ आणि ‘पैसा ही पैसा’ या दोनच चित्रपटात किशोरकुमार त्यांच्याकडे गायला. त्यापैकी ‘फरेब’ या चित्रपटातील लता सोबत गायलेले ‘आ मुहब्बत की बस्ती बसायेंगे हम’ हे भावपूर्ण प्रेम गीत अगदी अप्रतिम होते.
सुरेंद्र, अमीरबाई कर्नाटकी, बिब्बो यासारख्या जुन्या गायकांचा आवाज अनिल विश्वास यांच्या चित्रपटातून ऐकायला मिळाला होता; परंतु ज्यांना चित्रपट संगितात अगदी प्रथम स्थान दिले जात असे, असे नूरजहाँ व सहगल यांचे स्वर अनिल विश्वास यांच्या संगीतात ऐकायला मिळाले नाहीत. नूरजहाँचे पती शौकत हुसेन हे नूरजहाँ, सहगल यांना घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करू पहात होते व त्यांनी या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अनिल विश्वास यांच्यावर सोपवली होती; परंतु तो चित्रपट सेटवर जाण्यापूर्वीच सहगल निधन पावले व नूरजहाँ फाळणीनंतर पाकिस्तानात गेली. 1962 साली ‘सौतेला भाई’ या चित्रपटानंतर अनिलदांनी चित्रपट संन्यास घेतला होता. 1965 साली प्रदर्शित झालेला ‘छोटी छोटी बाते’ हा चित्रपट त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी स्वीकारला होता म्हणून त्यांनी त्याचे संगीत पूर्ण केले होते. तोपर्यंत भारतीय चित्रपट संगिताचा सुवर्णकाळ ओसरत चालला होता. चित्रपट क्षेत्रातील स्पर्धा जीवघेणी होत चालली होती. कोणत्याही अटीवर काम करणे त्यांना मान्य नव्हते.
चित्रपट संगिताच्या क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर त्यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रावर सुगम संगिताचे प्रमुख म्हणून 1975 पर्यंत काम पाहिले. काही काळ ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संगिताचे अध्यापन करीत होते. नंतरच्या काळात ‘हमलोग’ या दूरदर्शन मालिकेचे संगीत त्यांनीच तयार केले होते. आपल्या कारकीर्दीच्या शेवटापर्यंत अनिल विश्वास यांनी शुद्ध संगिताची एक उज्ज्वल परंपरा येथे निर्माण करून ठेवली होती. कानसेनांना तृप्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या संगीतात होतं. त्यांच्या रचना अप्रतिमच होत्या. आजही लताच्या आवाजातील ‘तुम्हारे बुलाने को जी चाहता है’ या गाण्याची गोडी काही औरच!
खरं तर निवृत्त होण्यापूर्वी त्यांना चित्रपट मिळण्याची शक्यता कमी होती असं नव्हे, परंतु येथल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. चित्रपटसृष्टीच्या संगीताचा हा ‘भीष्माचार्य’ जेव्हा आजचे संगीत ऐकत असेल, तेव्हा त्याला काय वेदना होत असतील हे तोच जाणू शकतो. ‘कटती है अब तो जिंदगी मरने के इंतजार में’ असंच अनिलदा म्हणत नसतील ना?’
लताच्या स्वर्गीय आवाजाचा पुरेपूर उपयोग करून दैवी स्वररचना तयार करण्याचे कौशल्य व क्षमता असलेला पहिला संगीतकार म्हणजे अनिल विश्वास. अनिल विश्वास यांच्या मधुर संगिताची म्हणजे मेलडी स्कूलची परंपरा पुढे चालवली ती सी. रामचंद्र, मदन मोहन व रोशन यांनी. त्यानंतर ही परंपरा खंडित झाली व चित्रपट संगिताची अधोगती सुरू झाली. ही अधोगपती पूर्णतेला पोहोचण्याच्या काळात म्हणजेच 31 मे 2003 रोजी नवी दिल्ली येथे अनिलदांचं निधन झालं.

