-अशोक उजळंबकर

 

‘बेकरार करके हमे यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए’, असं आपण कितीही म्हटलं तरी हेमंतदा आता येणार नाहीत हे आपल्याला चांगलं माहीत आहे तरी त्यांना परत बोलावण्याचा प्रयत्न आपले रसिक मन करत राहणार. इथं राहूनही ज्यांचं आजच्या संगीतात मन रमू शकत नाही व ज्यांच्या ओठातून त्यांनीच गायिलेल्या 7 ऑगस्ट 1988 रोजी सायंकाळी आनंदात, 25 प्रेसिडेन्सी सोसायटी या त्यांच्या निवासस्थानी जेव्हा मी मन्ना डे (Manna Dey) यांची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी ‘सुर ना सजे क्या गाऊ मैं’ याच सुरात उत्तर दिले. आजकाल आपण चित्रपटातून का गात नाहीत, असा प्रश्‍न जेव्हा मी उपस्थित केला तेव्हा थोडं रागावल्याच्या सुरात हा गायक म्हणाला, गाणं म्हणावं असं काही बंधन आहे? पूर्वीसारखे गीतकार द्या, संगीतकार द्या, मी आजही उत्कृष्ट संगीताची बरसात करुन दाखवितो. आजच्या आओ-गाओ-भागोच्या जमान्यात गाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. आपलं दुःख त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. भारतीय चित्रपट संगीतांत शास्त्रोक्त गाणी ज्यांनी अजरामर करुन ठेवली त्या गायकांत मन्ना डे यांचा क्रमांक अगदी वरचा आहे. संगीतालाच पूजा मानणारा त्यांच्यासारखा गायक आज शोधून सापडणार नाही. (Remembering Iconic Singer Manna Dey)

मन्ना डेंचा जन्म 1 मे 1920 रोजी कलकत्ता येथे झाला. तसे हेमंत कुमारही कलकत्ता येथलेच. मन्ना डे यांचे काका के. सी. डे. हे त्याकाळी नावाजलेले गायक व संगीततज्ज्ञ होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. संगीताचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झाले होते. त्यांच्या वडिलांना मात्र आपल्या मुलाने संगीताकडे पूर्णपणे लक्ष द्यावे हे मंजूर नव्हते; परंतु त्यांच्या आईने त्यांना प्रोत्साहन दिले. वयाच्या 23 व्या वर्षी जेव्हा मन्ना डे मुंबईस आले तेव्हा गायनाचे शिक्षण घेऊनसुद्धा पार्श्‍वगायनाच्या क्षेत्रात उतरण्याची त्यांची इच्छा नव्हती. एका फिल्म कंपनीत त्यांनी सहायक म्हणून नोकरी सुरू केली. एके दिवशी प्रसिद्ध गायक शंकरराव व्यास हे के.सी.डे यांच्याकडे आले, त्यांनी आपल्या ‘रामराज्य’ या चित्रपटाकरिता डे यांच्याकडून एक गीत गाऊन घ्यायचे होते. आपली प्रकृती चांगली नाही त्यामुळे आपण गाऊ शकणार नाही असे के.सी.डे यांनी सांगितले त्यानंतर डे यांच्या सूचनेवरून शंकरराव व्यासांनी मन्ना डेकडून त्या चित्रपटातील गाणे गाऊन घेतले. अशा रीतीने या महान गायकाच्या गायन कारकीर्दीची सुरुवात झाली. भारतीय चित्रपट संगीतात मन्ना डे यांच्या गाण्यांची संख्या इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे; परंतु त्यांच्यासारखाच गाणारा दुसरा आवाज मात्र आजपर्यंत तयार होऊ शकला नाही. यातच त्यांचे यश सामावलेले आहे.

 

महंमद रफीसारखे गाणारे, किशोरची नक्कल करणारे, मुकेशसारखे अनुनासिक स्वरात गाणारे, तलतसारखा मखमली आवाज काढणारे अनेक गायक येऊन गेले व आजही आहेत; परंतु अगदी मन्ना डेसारखी गाण्याची मैफल सजविणारे दुसरे स्वर अजूनपर्यंत तरी कानावर पडलेले नाहीत. एखादे गाणे आपल्याला मिळाले असताना देखील ते मी गाऊ शकत नाही तुम्ही याकरिता दुसरा गायक शोधा असं मोठ्या मनाने म्हणणारा मन्ना डेसारखा गायक वेगळाच म्हणावा लागेल. आपल्याला ज्या गीताची रचना, बोल आवडले आहेत व जे गीत आपण पेलू शकतो तेच गीत मन्ना डे गात असत. मन्ना डे यांच्या गायन कारकीर्दीवर जर नजर टाकली तर कित्येक शास्त्रीय रचना अप्रतिम सुरात गायिलेल्या आपल्याला आढळूून येतील. अहीर भैरव रागात गयिलेलं ‘पूछो ना कैसे मैने रैन बिताई’ हे ‘मेरी सुरत तेरी आँखे’ चित्रपटातील गीत तर अप्रतिमच होते.

राज कपूरच्या आवाजात भैरवीचे स्वर, ‘लागा चुनरीमें दाग छुपाऊ कैसे’ (दिल ही तो है)मध्ये ऐकताना रसिक दंग होऊन जातात. बागेश्री रागाचे सूर ऐकावेत ते ‘कौन आया मेरे मन के द्वारे पायल की झंकार लिये’ हे मन्ना डेच्याच आवाजात. दरबारी कानडा ऐकावा तो ‘झनक झनक तोरी बाजे पायलियाँ’ या ‘मेरे हुजूर’मधील गीतात. या सर्व झाल्या शास्त्रोक्त गाण्यांच्या झलकी. याशिवाय त्यांनी गायिलेली अनेक गीते अप्रतिमच म्हणावी लागतील. बी.आर.चोप्रा यांच्या ‘वक्त’ या चित्रपटातील बलराज सहानीच्या तोंडी असलेले ‘ए मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नही’ हे गीत, ‘तलाश’मधील शाहू मोडक यांच्यावर चित्रित झालेले ‘तेरे नैना तलाश करे’, ‘उपकार’मध्ये प्राणकरिता गायिलेले ‘कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातों क्या’ तर अमिताभच्या ‘जंजीर’मध्ये पुन्हा प्राणकरिता गायिलेले ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ कोणता रसिक विसरू शकेल.

      भारतीय चित्रपटांच्या जवळ जवळ सर्व भाषांतील चित्रपटांत त्यांनी गाणी गायिली आहेत. ‘या मालक’ या मराठी चित्रपटात महेमूदकरिता त्यांनी गाणी गायिल्याचे रसिकांच्या चांगलेच स्मरणात असेल. त्यांनी मल्याळम भाषेत गायिलेल्या एका गाण्याला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी गायिलेले हे पुरस्कार विजेते गीत केरळात घरोघर गायिले जाते. ‘नानक नाम जहाज है’ या पंजाबी चित्रपटातील गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. त्या गाण्याकरिता पंजाबी जनतेने त्यांना ‘तलवार’ सप्रेम भेट दिली होती. अविनाश व्यास यांनी त्यांना गुजराथीमध्ये गायनाची संधी दिली. भारतीय विद्याभवन येथे ‘पिंजरु ते पिंजरु सोसानू के रुपानु’ ही रचना त्यांना गायला लावली. बंगाली चित्रपटात तर त्यांनी गाणी सुरेखच गायिली आहेत.

 

1967 मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांना कालिदास पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांची मुलाखत जेव्हा मी घेतली तेव्हा तो पुरस्कार पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा मन्ना डे यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. बराच प्रयत्न केल्यानंतर त्यांना तो पुरस्कार सापडला. त्यावर बरीच धूळ साचली होती. हा पुस्तकवजा पुरस्कार जेव्हा मी पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यातील त्यांच्या संगीत साधनेचा गौरव करणाऱ्या ओळी पाहिल्या, तेव्हा मन्ना डे म्हणाले हे तर मी पाहिलंच नाही, यात माझा गौरव केला आहे का? त्यावर मी त्यांना प्रतिप्रश्‍न केला, एक लाख रुपयांचा धनादेश तरी आणायचा लक्षात राहिला का? यावर त्यांनी त्वरित हो अशी दिलखुलास कबुली दिली. याच वेळी त्यांनी आजच्या चित्रपट संगीताबाबत अगदी परखड शब्दांत आपले मन मोकळे केले.

“आजच्या चित्रपटांचा जो दर्जा आहे तो पाहता मी गाणारच नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. आजचे कलाहीन संगीत पाहिले तर आपला ‘गळा बंद’ ठेवणं मी पसंत करतो. आमच्या वेळचे संगीतकार आज हयात नाहीत. शंकर-जयकिशन, सी.रामचंद्र, रोशन आज नाहीत. आज संगीताचा निव्वळ बाजार पाहायला मिळतो, बाजार बुणग्यांच्या आजच्या जमान्यात राहण्याची त्यांची इच्छा नाही. चांगली गाणी रचणारे आज उरले नाहीत. संगीताचा रियाझ करुन गाण्याकरिता जाणारे गायक आज हयात नाहीत. आजचे संगीतकार तर निव्वळ ‘आयत्या बिळावरचे नागोबा’ असल्यासारखे वाटतात. तानपुरा व हार्मेानियम जवळ ठेवून रियाझ करणारे गायक आज पाहायला मिळतात का?” 

Manna Dey

 संगीताचे धडे देण्याची त्यांची शेवटपर्यंत तयारी होती. दक्षिण अफ्रिका वगळता जगाच्या सर्व देशांमध्ये त्यांनी आपल्या गायनाचे कार्यक्रम केले. अमेरिकेत तर दहा वेळा जाऊन आले. आपल्या मुलाखतीच्या वेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले, त्यापैकी एक खूपच उल्लेखनीय वाटला. ‘बसंत बहार’मधील ‘केतकी गुलाब जूही चंपक बन फुले’ या गाण्यांचा एक किस्सा ऐकविला. या गाण्यांचे संगीतकार होते शंकर-जयकिशन. या गाण्याच्या रेकॉर्डिगच्या दिवशी शंकर यांनी मन्ना डे यांना अनेक वेळा फोन केला व बोलावले. प्रत्येक वेळा घरी असून देखील आपण घरी नाही असे त्यांनी सांगितले. शेवटी याचा परिणाम असा झाला की काही लोक माझ्या घरी आले व मला घेऊन गेले. तुम्ही हे गाणे गाण्यास का नकार देत होतात? ते गाणे अवघड होते का? असे विचारता ते म्हणाले, गाणं अवघड नव्हतं परंतु ज्याच्याबरोबर हे गाणं गायचं होतं तो दुसरा गायक महान होता. पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर  त्यांना गायच होतं आणि भीमसेनांचा पहाडी आवाज ऐकून मन्ना डे थक्क होत असत. शेवटी संगीतकार शंकर यांनी मन्ना डेकडून भीमसेन यांच्यासोबत हे गाणे गाऊन घेतले. हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यावर स्वतः भीमसेन जोशी यांनीच मन्ना डेची पाठ थोपटली होती.

पूर्वीच्या काळी चित्रपटातील नायकाला समोर ठेवून गायक गाणं म्हणत असत. आपल्या लक्षात येईल शम्मी कपूरकरिता रफीने म्हटलेली गाणी आठवा. राज कपूरकरिता मुकेशने म्हटलेली गाणी आठवा, मीना, नर्गिस यांच्याकरिता लता कशी गायली ते आठवा. आज हे पाहायला मिळत नाही. गाण्याचे स्वर सकाळी दहा वाजता गीतकार लिहून देतो. गायक 11 वाजता आल्यावर ते वाचून घेतो. संगीतकार 12 वाजता थोड्या फार सूचना देऊन दुपारी 2 पर्यंत ते गाणे रेकॉर्ड करुन घेतो व सायंकाळी 7 वाजता या चित्रपटातील गाण्याची ऑडिओ कॅसेट बाहेर पडते. एकेका गाण्याकरिता आठ-आठ दिवस रियाज करुन अप्रतिम धून तयार करणारे गायक नाहीत व त्यांनी तसे गायला लावणारे संगीतकारही आज हयात नाहीत.

      आजही मन्ना डेची आठवण झाली की, ‘अब कहाँ जाये हम’चे आर्त स्वर, ‘तू प्यार का सागर है’ ची हाक आठवते. लतासोबतच्या ‘गीत हमारे प्यार के दोहरायेगी जवानियाँ’ या ओळी आठवतात. ‘ये रात भिगी भिगी’, ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम तुम मिले तो’ या सारखी झपाटून टाकणारी गाणी आठवतात. मन्ना डे यांनी चित्रपट संगीतातून न गाण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच म्हणावा लागेल; परंतु आम्हाला या निर्णयामुळे केवळ त्यांची जुनी गाणी ऐकणे एवढेच उरले आहे. आपली खंत आपल्यालाच ‘सूर ना सजे क्या गाऊं मै, सुर के बीना ये जीवन सुना’ या गाण्यातून व्यक्त करणारा मन्ना डेसारखा कलावंत वेगळाच म्हणावा लागेल. भारतीय चित्रपटांतील शास्त्रोक्त गाण्यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा सर्वप्रथम मन्ना डे यांचेच नाव कोणाच्याही ओठावर येईल हे मी सांगायची गरज नाही.

      “सूर ना सजे क्या गाऊं मैं’, हे गीत ज्यांनी गायिलं त्या गायकाचं नाव सांगण्याची गरज नाही. हे गीत गाणारे मन्ना डे यांची मुलाखत घेण्याची संधी मला 7 ऑगस्ट 1988 रोजी सायंकाळी मिळाली. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याशेजारीच असलेल्या मन्ना डे यांच्या 25 प्रेसिडेन्सी सोसायटीस्थित निवासस्थानी जेव्हा मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो, तेव्हा त्यांनी “सूर ना सजे क्या गाऊं मैं’ असेच उत्तर दिले.

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment