-अजय पुरोहित

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering India’s Legendary Singer Actor Kishore Kumar. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. देव-राज-दिलीप पासून ते राजेश खन्ना, अमिताभ बच्चन सारखे स्टार तर अशोक कुमार, मोतिलाल, बलराज सहानी यांच्या सारखे कुशल अभिनेते. चार्ली, गोप, याकूब पासून ते जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ ते अगदी अलीकडच्या काळातील जॉनी लिव्हर यांच्यासारखे विनोद वीर. सहगल, मुकेश, तलत, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार सारखे यक्ष गंधर्व तर अनिल विश्वास, सी.रामचंद्र, मदन मोहन, रोशन, सचिन देव बर्मन,नौशाद, ओ.पी.नय्यर, शंकर-जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि असे अनेक सुरेल संगीतकार ही होते. अनेक निर्माता निर्देशकांनी आपलं कौशल्य वापरून जोखिम स्विकारून आपल्याला सुंदर सुंदर चित्रपट दिले आहेत. एका गोष्टीचा आपण विचार कधी केलाय का की, या सगळ्या भूमिका एकट्याने चोख बजावणारा एक अवलिया कलाकारही चित्रपट सृष्टीने आपल्याला दिला होता, तो म्हणजे किशोर कुमार.

अभिनय, संगीत यांचं कुठलंही अधिकृत शिक्षण न घेता किशोरकुमार सर्वच क्षत्रांत अगदी सहजपणे, आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे वावरला. खंडव्यासारख्या चित्रपट आणि संगीत यांच्याशी काहीही नातं नसलेल्या शहरात जन्माला येऊन किशोरकुमार एकलव्यासारखा कुंदनलाल सहगल यांना गुरू मानून त्यांची नक्कल करत करत गाणं शिकला. त्याला आयुष्यभर सारेगमप, राग रागिणी, ताल याचं पुस्तकी ज्ञान कधीच नव्हतं. अभिनयातही त्याचा गुरू कुणीच नव्हता. तो पाहून पाहून ऐकूनच शिकला, किंबहुना त्याला शिकायची गरजच नव्हतं असं म्हणता येईल. त्याच्यात ते जन्मत:च ते होतं. देवानं किशोरच्या रूपानं एक कम्प्लीट पॅकेजच चित्रपट सृष्टीत अलगद सोडून दिलं होतं.

मोठा भाऊ अशोक कुमार सुपरस्टार असल्याचा थोडाफार फायदा किशोरलाही झाला. अशोक कुमार हिरो असलेल्या शिकारी (1946) या चित्रपटात त्याला दोन ओळी गायल्या मिळाल्या शिकारीचे संगीतकार होते सचिनदेव बर्मन. त्यांचा हा पहिला चित्रपट. खेमचंद प्रकाश हे एक संगीतकार होते ज्यांना किशोरचं गाणं आवडत होतं. बॉम्बे टॉकिजच्या जिद्दी (1948) या चित्रपटात त्यांनी किशोरकडून दोन गाणी गाऊन घेतली. मरने की दुवाये क्यूं मांगू हे सोलो आणि ये कौन आया हे लता सोबतचं ड्युएट. हे किशोरचं लता सोबतचं पहिलं द्वंद्वगीत. दोन्ही गाणी गाजली आणि किशोरची गाडी मार्गी लागली. याच चित्रपटात एक छोटी भूमिकाही करायला मिळाली. अभिनयाबाबत किशोर कधीही गंभीर नव्हता. त्याला वेड होतं गाण्याचं. 1947 साली आलेल्या शहनाई मध्ये नासीरखान-रेहाना ही जोडी होती. किशोरकुमारने यात एका पोलिस इन्सपेक्टरची भूमिका केली होती पण संगीतकार सी.रामचंद्र यांनी किशोरकडून एकही गीत गाऊन घेतलं नव्हतं. यासाठी शहनाईला ऐतिहासिक चित्रपटच म्हणावं लागेल. पुढे रीमझिम या चित्रपटात खेमचंद प्रकाश यांनी किशोरकडून जगमग जगमग करता निकला चाँद पूनम का प्यारा हे अप्रतिम गीत गाऊन घेतलं. इतरही 2 ड्युएट्स होती किशोरची यात. या प्रारंभीच्या काळात किशोरकुमारवर सहगल यांचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. त्या काळात सहगल साहेब कुणाचं दैवत नव्हतं? एक तलत वगळता रफी, किशोर, मुकेश वगैरेंवर सहगलचा प्रभाव होताच. या खेमचंद प्रकाश यांचा सहाय्यक भोला श्रेष्ठ (गायिका सुषमा श्रेष्ठ उर्फ पूर्णिमा हीचे वडील) हा किशोरचा जिवलग मित्र झाला. पुढे रुमादेवी सोबत लग्नासाठी याचा त्याला फयदा झाला. भोला श्रेष्ठ हा रूमादेवींचा मानलेला भाऊ. त्यांनी सांगितलेली एक गंमतीशीर गोष्ट आहे. राखी पौर्णिमेला भोला किशोर सोबत रूमादेवींकडे गेला पण किशोर बाहेरच थांबला. आत गेल्यावर रूमादेवींनी विचारलं, आपके दोस्त नही आये क्या? यावर भोला उत्तरले, वो नीचे खडा है पर कहता है मुझे नहीं राखी-वाखी बांधनी. या एका वाक्यातच किशोरचं मानस व्यक्त झालं होतं. त्यांचा एक ग्रूप होता त्यात या तिघांसह कॅमेरामन आलोकदास गुप्ता देखिल होते. अजूनही बरीच मंडळी होती. पुढे 1950 मध्ये यथोचित किशोर-रूमादेवी दोघांचा विवाह देखील झाला. हा विवाह दुर्दैवाने 1958 पर्यंतच टिकला. दरम्यान 1952 मध्ये त्यांचा पहिला मुलगा अमितकुमारचा जन्म झाला.

1950 साली आलेला राज कपूर-नर्गीसचा प्यार हा हा खऱ्या अर्थाने गायक किशोर कुमारचा फुल फ्लेज पहिला चित्रपट. यात किशोरकुमारची 2 सोलो आणि 3 द्वंद्वगीतं होती. आजवर या एकमेव चित्रपटात राज कपूरसाठी किशोरकुमारचा आवाज वापरला गेला आहे. संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्याकडे किशोर प्रथमच गायला पण किशोर कुमारने त्याच्या एका मुलाखतीत बहार (1951) चं कुसूर आपका हुजूर आप का हे त्याचं सचिनदांकडचं पहिलं गीत आहे असं सांगितलंय. कदाचित हे गीत आधी रेकॉर्ड झालं असावं.

1950 सालीच आलेला मुकद्दर हा सज्जन, नलिनी जयवंत या जोडीचा पहिला चित्रपट. यात किशोरला पडद्यावर मोठी भूमिका होती. मुकद्दरमध्येच आशा भोसले सोबत किशोरकुमार प्रथमच गायला. गाणं होतं, आती है हम को याद जनवरी फरवरी. या गीतातूनच किशोरकुमारने पहिल्यांदा यॉडलिंगचा वापर केला. या व्यतिरिक्त अजून 3 गाणी आशा सोबत होती. नलिनी जयवंतनंही यात 3 गाणी गायली आहेत, सर्व सोलो. या चित्रपटाचे 3 संगीतकार होते- खेमचंद प्रकाश, भोला श्रेष्ठ आणि जेम्स सिंह. 1951 साली आलेला आंदोलन नायक म्हणून किशोर कुमारचा पहिला चित्रपट म्हणावा लागेल, नायिका होती मंजू. या चित्रपटात किशोरनं मन्ना डे यांच्या सोबत प्रथमच एक गीत गायलं. आता किशोर अभिनयातच गुंतत चालला होता. गायक अभिनेता असल्यामुळे पार्श्वगायक म्हणून इतर संगीतकारांकडे किशोरला फारशी गाणी मिळत नव्हती. गायक म्हणून त्या काळी तलत मेहमूद, मुकेश, रफी हे टॉपचे गायक झाले होते, शिवाय मन्ना डे आणि हेमंतकुमारही होते. त्यात किशोरला गाणी मिळणं अवघडच होतं. तो नायक असलेल्या चित्रपटांमध्येच त्याची गाणी असायची. ती देखिल किशोर अगदी तन्मयतेने गात असे. ती गाणी देखिल छानच असायची. 1952 साली आलेल्या छम छमा छम किशोरची 7 गाणी होती पण सगळी ड्युएट्स, संगीतकार ओ.पी.नय्यर. नायिका होती रेहाना. तमाशा या 1952 च्याच चित्रपटात अशोक कुमार सोबत किशोर प्रथमच पडद्यावर दिसला. देव आनंद-मीना कुमारी ही जोडी होती तमाशामध्ये. छम छमा छम आणि तमाशापासूनच किशोरची विनोदी नट अशी प्रतिमा तयार होऊ लागली होती. फरेब (1953) मध्ये अनिलदांनी किशोर कडून 2 अप्रतिम गीतं गाऊन गेतली. एक लता सोबत आ मुहब्बत बस्ती बसायेंगे हम आणि हुस्न भी है उदास उदास. नायिका होती शकुंतला.

अभिनय करणं हे आता बंधनकारक झालं होतं किशोरकुमारसाठी. पडद्यावर तो असला तरच त्याला गाणी मिळत. काही अपवाद असायचे. वानगी दाखल काफिला (संगीतकार हुस्नलाल भगतराम), माशुका (संगीतकार रोशन), अदा, आशियाना (मदन मोहन) आणि बाजी (देव आनंदसाठी), एक नजर मध्ये गोपसाठी तर नौजवान मध्ये प्रेमनाथसाठी (सचिनदेव बर्मन) आणि हमारी शान, मनचला (चित्रगुप्त) आणि शमशीर, परिणीता (अरूणकुमार). काफिलामध्ये अशोक कुमार आणि नलिनी जयवंत ही जोडी होती तर माशुका मध्ये मुकेश आणि सुरैया. वो मेरी तरफ यूं चले आ रहे है आणि लता सोबत लहरों से पूछ लो या किनारों से पूछ लो ही 2 अप्रतिम गाणि काफिलात होती तर माशुकामध्ये ये समां हम तुम जवां हे मीना कपूर समवेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये पडद्यावर किशोर कुमार नव्हता. काफिला चित्रपट कालौघात नष्ट झाल्यामुळे लहरोंसे पूछ लो हे किशोरचं सुंदर गीत अशोक कुमारच्या तोंडी होतं का हे कळायला मार्ग नाही. 1952 च्या नजरियाचा संगीतकार होता भोला श्रेष्ठ म्हणजे किशोरचा मित्रच. त्याने आपली यारी निभावली, किशोरला तो पडद्यावर नसतानाही चक्क 4 गाणी दिली.

किशोर कुमार आता आघाडीचा नाही म्हटलं तरी एक यशस्वी अभिनेता म्हणून स्थिरावला होता. त्या काळच्या काही अपवाद वगळता सर्व आघाडीच्या नायिकांसोबत किशोरकुमारने नायकाच्या भूमिका केल्या होत्या. बीना रॉय (मदभरे नैन), मीना कुमारी (इल्जाम, रुखसाना, नया अंदाज, मेमसाहिब, शरारत), रेहाना (छम छमा छम), कामिनी कौशल (आबरू), निम्मी (भाई भाई, दाल में काला), चाँद उस्मानी (बाप रे बाप), श्यामा (बंदी, लहरें, चार पैसे), शीला रमाणी (नौकरी), माला सिन्हा (पैसा ही पैसा, चंदन, जालसाझ, बंगाली चित्रपट लुकोचुरी, बॉम्बे का चोर), अधिकार, धोबी डॉक्टर (ऊषा किरण), शकिला (पैसा ही पैसा, बेगुनाह), नूतन (चंदन, दिल्ली का ठग, कभी अंधेरा कभी उजाला), अनिता गुहा (बंगाली चित्रपट लुकोचुरी, चाचा झिंदाबाद), वहिदा रेहमान (गर्ल फ्रेंड), शशिकला (करोडपती), जमुना (एक राज, मिस् मेरी). नर्गीस आणि नलिनी जयवंत बरोबर तो नायक म्हणून कधी आला नाही. नलिनी जयवंत बरोबर तो मुकद्दरमधे होता पण नायक म्हणून नाही.

1956 च्या दरम्यान किशोरकुमारची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्याचा फायदा घेण्यासाठी निर्माता बिमल रॉय यांनी त्याला परिवार चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून चमकवलं. किशोरनंही कुवे में डूब के मर जाना यार तुम शादी मत करना सारखं भन्नाट विनोदी गाणं पडद्यावर सादर करून धमाल उडवून दिली होती. किशोरकुमार हा विनोदी अभिनेता असला तरी जॉनी वॉकर, मेहमूद वगैरेंप्रमाणे दुय्यम अभिनेता नव्हता. ही मंडळी लोकप्रिय झाल्यावर काही चित्रपटांमध्ये नायक म्हणून आली पण किशोरकुमार आधी नायक होता नंतर विनोदी अभिनेता. वरवर विनोदी वाटत असलेला किशोरकुमार वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत प्रतिभाशाली, संवेदनशील आणि अंतर्मुख होता. त्यामुळेच तो पुढे चालून नौकरी, मुसाफिर, भाई-भाई, बंदी, दूर गगन की छांव में, दूर का राही या सारख्या चित्रपटांमधून गंभीर भूमिका देखिल प्रभावीपणे करून गेला.

नायक म्हणून किशोरकुमारने सर्वात जास्त चित्रपट केले ते मधुबाला आणि वैजयंतीमाला सोबत. मधुबाला सोबत त्याचा पहिला चित्रपट होता ढाके की मलमल तर वैजयंतीमाला सोबत लडकी (1953). मधुबाला सोबत ढाके की मलमल, हाफ टिकट, चलती का नाम गाडी, महलों के ख्वाब, झुमरू आणि सुहाना गीत (अपूर्ण) तर वैजयंतीमाला सोबत लडकी, पहली झलक, न्यू देल्ही, मिस माला, आशा, रंगोली अशा चित्रपटांमध्ये त्याने नायक रंगवला. वैयक्तिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या मधुबालाला स्वच्छंद स्वभावाचा किशोर आवडू लागला आणि 1958 साली त्यांनी लग्न केलं. वैजयंतीमाला एक नृत्यांगना होती आणि किशोर कुमार जन्मजातच तालात होता. किशोर सारखे जात्याच तालात असणारे राज कपूर, शम्मी कपूर, मेहमूद आणि ऋषी कपूर हे मोजकेच अभिनेते होते. त्यांच्या हालचाली अगदी नैसर्गिक आणि सफाईदार असत. त्यामुळे वैजयंतीमालाला किशोर सोबत काम करायला आवडत होतं असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. किशोरकुमारच्या अभिनयावर हॉलिवूडच्या डॅनी केचा खूप प्रभाव होता. डॅनी के हा एक उत्कृष्ट गायक आणि विनोदी अभिनेता होता. त्याचे नॉक ऑन वूड, द इन्सपेक्टर जनरल, ऑन द रिव्हिएरा वगैरे चित्रपट खूप गाजले होते. अगदी लता मंगेशकरही किशोरकुमारला भारताचा डॅनी के म्हणत असे.

पुढच्या काळात किशोर कुमारने नंतरच्या पिढीच्या नायिकांसोबतही काम केलं. जबीन जलील (रागिणी), अपना हाथ जगन्नाथ (सईदा खान), मनमौजी (साधना), नॉटी बॉय, प्यार किये जा (कल्पना), हम सब उस्ताद है (अमिता), बागी शहजादा, हाये मेरा दिल, गंगा की लहरें, मि.एक्स इन बॉम्बे, श्रीमान फंटुश (कुमकुम), लडका लडकी, प्यार दिवाना मुमताज (लडका लडकी, प्यार दिवाना), दो दुनी चार, दूर का राही (तनुजा), अकलमंद (सोनिया सहानी), पायल की झंकार (राजश्री, साऊथची), दूर वादियों में कहीं (श्यामली) या नवीन नायिकांसोबतही किशोर कुमारनं कामं केली. ही सगळी जंत्री मांडायचं कारण म्हणजे इतकं करूनही किशोरला त्याच्या पूर्ण कारकीर्दीत अभिनयासाठी कधीही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. प्यार किये जा, पडोसन सारख्या अप्रतिम विनोदी भूमिका करूनही किमान कॉमेडियनसाठी असलेला फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्याला मिळू शकला नाही. 1960 नंतरच्या पिढीला तर किशोरकुमार हा गायक म्हणूनच जास्त माहित आहे. अभिनेता म्हणून त्यानं केलेलं प्रचंड काम सर्वांच्या विस्मृतीत गेलं. आजही उत्कृष्ट अभिनेत्यांची नावं घेतली जातात ती देव-राज-दिलिप, गुरूदत्त, मोतीलाल, बलराज सहानी आणि नंतरच्या काळात संजीवकुमार, ऋषी कपूर आणि  राजेश खन्ना यांची. किशोरकुमारला अभिनेता म्हणून कुणी मोजतच नाही.

किशोरकुमारनं निर्माता म्हणून प्रथम लुकोचुरी हा एक बंगाली चित्रपट निर्मिला होता. त्याचे दिग्दर्शक होते कमल मुजुमदार. माला सिन्हा आणि अनिता गुहा यात नायिका होत्या. हा चित्रपट सुपर हिट राहिला. यातलं शिंग नेई तोबू नाम तर शिंगो हे गाणं आजच्या पिढीला देखिल माहित असावं. नुकतच हे गीत एका उत्पादनाच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलं इतकं ते लोकप्रिय आजही आहे. याच चालीवरचं एक गीत बाप रे बाप या चित्रपटातही होतं. मुळात ही दोन्ही गीतं डॅनी के च्या एका इंग्रजी गाण्यावर आधरित होती. याच चित्रपटात किशोरकुमारनं रुमादेवी सोबत दोन ड्युएट्सही गायली होती. ही गाणीही तुफान गाजली. लुकोचुरीच्या कमाइतूनच किशोरकुमारनं मुंबईला आपल्यासाठी घर विकत घेतलं. नंतर त्यानेच निर्माण केलेला चलती का नाम गाडी (दिग्दर्शक सत्येन बोस) हा चित्रपटही तुफान हीट होता. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपचे जे 2 विनोदी चित्रपट समजले जातात ते दोन्ही किशोरकुमारचेच आहेत, चलती का नाम गाडी आणि पडोसन. यातच तो किती मोठा कलाकार होता हे दिसून येतं. या नंतर किशोरची निर्मिती असलेला झुमरू (दिग्दर्शक शंकर मुखर्जी) देखिल तुफान चालला. चलती का नाम गाडीचे संगीतकार होते सचिनदेव बर्मन तर झुमरूचे स्वत: किशोरकुमारच. दोघांनीही किशोरकुमार नावाच्या अभिनेता आणि गायकाचा पुरेपूर वापर केला. चलती का नाम गाडीला तरी काही कथा होती, झुमरूला ना कथा ना संवाद, नुसता वात्रटपणा होता पण हा वात्रटपणा देखिल सुखावह होता. गाणी कहर होती. झुमरूत होती तशी गाणी यापूर्वी हिंदी सिनेमानी कधी पाहिली होती ना ऐकली होती. किशोरकुमारचा चित्रिकरणाच्या वेळी चालणारा विक्षिप्तपणा, निर्मात्याकडून पैसे वसूल करण्याच्या त्याच्या विविध हिकमती यामुळे लोक त्याला विदुषक समजत होते पण किशोर तसा नव्हता. त्यानं ओढून घेतलेलं ते एक सोंग होतं. त्यामुळ किशोरनं त्याच्या चाहत्यांना धक्का द्यायचा ठरवलं. त्यानं पुढचा चित्रपट घोषित केला दूर गगन की छांव में. आपल्या मुक्या मुलाने बोलावं ही आत्यंतिक इच्छा बाळगणाऱ्या संवेदनशील, प्रेमळ पित्याची भूमिका किशोरनं केली होती तर मुक्या मुलाच्या भूमिकेत त्यानं आपल्याच मुलाला, अमितकुमारला चमकवलं होतं.

किशोरकुमार कंजूस असल्याबाबतचे बरेच किस्से आहेत. एकदा किशोरकुमारने आपल्या जवळच्या 12 कुटुंबांना अजिंठ्याला सहलीला नेऊन आणलं. प्रवास खर्च, तिथे राहायचा खर्च सगळं किशोरनच केलं. आल्यानंतर दादामुनींना विचारलं की, सांगा आता मी कंजूस आहे का? सत्यजित रे यांच्या पथेर पांचालीला अत्यंत बिकट वेळी आर्थिक मदत किशोरनच केली होती. पुढे सत्यजित रे यांनी त्यांच्या 2 चित्रपटांसाठी किशोरकुमार कडून 4 गाणी गाऊन घेतली पण मोबदला म्हणून एकही पैसा घेतला नाही असं स्वत: सत्यजित रे यांनीच सांगितलं होतं. मला तर वाटतं की ज्या स्वार्थी लोकांना किशोरकुमारचे पैसे बुडवावे वाटत होते त्यांनीच तो कंजूस असल्याबाबतच्या वावड्या उठवल्या असाव्यात. एक तर किशोरकुमारला त्याच्या चित्रपटांसाठी इतरांच्या तुलनेत जास्त मेहनत घ्यावी लागत होती. कारण तो अभिनेता असलेल्या चित्रपटातली त्याची गाणी त्यालाच गावी लागायची. त्यासाठी त्याला वेगळा मेहनताना मिळत नव्हता. मग त्यानं इतरांसाठी पैसे का सोडून द्यावेत? शिवाय तो गायक-नायक असल्यामुळे त्याला सचिनदा सोडल्यास पार्श्वगायनासाठी फारसं कुणी बोलवतही नव्हतं. सचिनदा मात्र त्याला बऱ्याच वेळेस देव आनंदचा आवाज म्हणून काही गाणी देत असत.

फंटुश, पेईंग गेस्ट या चित्रपटांमधली चित्रपटातली सर्व गाणी किशोर कुमारचीच होती. नऊ दो ग्यारह मध्ये हम है राही प्यार के आणि आँखों में क्या जी, रुपहला बादल ही 2 हिट गाणी होती. परंतु याच सचिनदांनी काला पानी, काला बाजार, सोलवां साल आणि तेरे घर के सामने मध्ये किशोरला एकही गीत दिलं नाही. हाऊस नं.44 आणि सोलवां साल मध्ये तर सचिनदांनी देव आनंदसाठी हेमंतकुमारचा आवाज वापरला होता. कदाचित अभिनेता म्हणून किशोरची व्यस्तता हे कारण देखिल असू शकतं. 1960 च्या किशोरच्याच अपना हाथ जगन्नाथ मध्ये किशोरची पाच गाणी होती, संगीतकार होते सचिनदा. पुढे संगीतकार हेमंतकुमार यांनी दो दुनी चार, खामोशी आणि राहगीर मध्ये किशोर कडून हवाओं पे लिख दो हवाओं के ना आणि वो शाम कुछ अजीब थी सारखी अप्रतिम गाणी गाऊन घेतली, स्वत: गायक असूनही. 50 च्या दशकात किशोर आणि मीना कुमारी यांच्या रुखसाना चित्रपटाचे संगीतकार होते सज्जाद हुसैन आपल्या विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सज्जाद यांनी किशोर कडून तेरे जहांसे चल दिये सारखं अप्रतिम गाणं गाऊन घेतलं होतं. याचाच अर्थ गाटक म्हणून किशोरकुमार इतरांपेक्षा कुठेही कमी नव्हता परंतु तो अभिनेता असल्यामुळे त्याचा पार्श्वगायक म्हणून कुणी विचारच करत नव्हतं.

किशोर कुमारनं 1957 च्या पेईंग गेस्टनंतर तब्बल 8 वर्ष देव आनंदसाठी एकही गाणं गायलेलं नव्हतं. मात्र एकदा देव आनंदनं किशोरला अक्षरश: पकडून सचिनदां समोर उभं केलं. सचिनदांनी अत्यंत प्रेमानं त्याची विचारपूस केली आणि त्याच्या कडून एक गीत रेकॉर्ड करून घेतलं ते होतं तीन देवियांचं ख्वाब हो तुम या कोई हकिकत. दरम्यान गाईडचं चित्रिकरण होऊन तो रिलिजसाठी सज्ज होता. गाईडची सर्व गाणी रफीच्या आवाजात होती पण देव आनंदला मात्र किशोरचा त्याच्या या ड्रीम प्रॉजेक्टमध्ये थोडा तरी सहभाग हवा होता. त्यामुळे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतरही शैलेंद्रला बोलावून घेऊन तातडीने एक गीत लिहून घेतलं गेलं. नंतर हे गीत किशोर-लता यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतलं गेलं आणि चित्रपटात खास सिच्युएशन तयार करून अक्षरश: घुसवलं गेलं. लता-रफी यांच्या क्लासिक गाण्यांच्या स्पर्धेत लता-किशोरचं हे गीत गाईडचं सर्वात हीट गाणं ठरलं.

पंचमनं किशोरकुमारची एक छान आठवण सांगितली होती. भूतबंगला या आपल्या दुसऱ्या चित्रपटात पंचमने मेहमूदसाठी किशोरकुमारचा आवाज वापरायचं ठरवलं. हे गीत होतं जागो सोनोवालो. कम्पोझ केलेलं गीत किशोरकुमारला ऐकवल्यानंतर गाण्याच्या कडव्यासाठी किशोरकुमारनं काही विधायक सुचना केल्या त्या पंचमला आवडल्या. गाणं रेकॉर्ड झालं. किशोरकुमारचा भरदार आवाज, कोरसचा अभिनव आणि कल्पक वापर यामुळे गाणं खूप गाजलं. यावरून एक कलाकार म्हणून किशोरकुमारचा कामाला संपूर्णपणे वाहून घेण्याचा एक गुण समोर येतो. पंचम –  किशोरकुमार जोडीचं हे पहिलं गीत. 70 च्या दशकात आरडीने जे 10 चित्रपट केले. त्यात अवघी 3 गाणी किशोर कुमारच्या वाट्याला आली होती. कारण तिसरी मंझिल, प्यार का मौसम या चित्रपटांमध्ये किशारचा आवाज वापरायचं स्वातंत्र्य नवोदित आरडीला नव्हतं. तरीपण प्यार का मौसमची सर्व गाणी रेकॉर्ड झाल्यावर तुम बीन जाऊं कहां हे रफीच्या आवाजातलं गीत किशोरकडूनही गाऊन घ्यायचं पंचमनं ठरवलं. हिरो शशी कपूरला तर रफीचा आवाज होता. हेच गाणं रफीच्या आवाजात 2 भागात रेकॉर्डही झालं होतं. मग शेवटी गाण्यासाठी तडजोड म्हणून ते वयस्क भारतभूषणवर चित्रित केलं गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किशोरचं तुम बीन जाऊं कहां हे प्यार का मौसमचं सर्वात हिट गाणं ठरलं. ते कुणावर चित्रित झालं आहे याचा रसिकांवर काहीही परिणाम झाला नाही. आराधना नंतर आलेल्या आँसू और मुस्कानमधे ही कल्याणजी आनंदजींनी एक गाणं असंच घुसवलं. किशोरकुमार वरच चित्रित झालेलं गुणीजनों रे भक्त जनों हे गीत त्या चित्रपटाचं स्टार गीत ठरलं. तो चित्रपट जो थोडा फार चालला तो या गीतामुळेच. 1970 साली आलेल्या होली आई रे चित्रपटातील वात्रट महर्षी राजेंद्रनाथ वर चित्रित ओ हसिनो तुमने सदियों आशिक को तडपाया हे गीतही त्या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरलं. किशोरकुमारची लोकप्रियता आता वाढू लागली होती.

एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत चालली होती ती म्हणजे नवीन पिढीला आता तलत, रफी, मुकेश, मन्नाडे, महेंद्र कपूर यांच्या ऐवजी कुणी तरी वेगळा पण ताजा आवाज हवा होता. पंचम आणि सचिनदा सोडून इतरही संगीतकार हळूहळू अल्प प्रमाणात का होईना पण एक पार्श्वगायक म्हणून किशोरकडे वळू लागले होते. आँसू बन गये फूल – जाने कैसा है मेरा दिवाना, खिजा के फूल पे आती कभी बहार नहीं – दो रास्ते, जिंदगी क्या है बोलो – सत्यकाम (संगीत – लक्ष्मीकांत-प्यारेलाल), आ मेरे सपनों की रानी – तीन बहुरानियाँ, अरे ओ रे धरती की तरह तू दुख सह ले – सुहाग रात, बच्चे में है भगवान – रफी आणि मन्ना डे सोबत – नन्हा फरिश्ता (कल्याणजी आनंदजी), आ जरा आज तो मुस्कुरा ले – मन्ना डे सोबत भाई बहन मध्ये (शंकर जयकिशन), तू भी नंबर एक है – पैसा या प्यार (रवी) इत्यादी. शिवाय कल्याणजी आनंदजी यांनी महल आणि जॉनी मेरा नामसाठी किशोरकडून गाऊन घेतलेली गाणी खूप लोकप्रिय झाली होती.

आराधना पर्यंत किशोरनी स्वत: आणि देव आनंद वगळता इतरांसाठी काही अपवाद वगळता आवाज दिलाच नव्हता. आराधना पर्यंतच्या त्याच्या गाण्यांची संख्या मर्यादित असली तरी ही एकेक गाणी म्हणजे एकेक बहुमोल रत्न होती. गीतांचा दर्जा संख्येवर अवलंबून नसतो. त्या कालात किशोरकुमारचे चित्रपट फारसे चालत नव्हते. त्यातच 1968 मध्ये मधुबालाचं निधन झाल्यामुळे तो अगदी सैरभैर झाला होता, उद्वीग्न झाला होता. असं असूनही किशोरच्या स्वत:च्या चित्रपटातली आणि देव आनंदसाठी गायलेली गाणी मात्र गाजतच होती. अशातच पंचमनं आराधना चित्रपटासाठी किशोरला पार्श्वगायनासाठी गळ घातली. किशोरकुमारनं विचारलं, हिरो कोण आहे. उत्तर आलं, एक नवीन पोरगा आहे राजेश खन्ना त्याचं नाव. किशोरकुमारनं पंचमला सांगितलं की  त्याला माझ्या घरी पाठवून दे. नवीन असल्यामुळे फारसे आढेवेढे न घेता राजेश खन्ना किशोरकुमारच्या घरी गेला. किशोर कुमार त्याच्याशी तासभर गप्पा मारत बसला. नंतर त्याला शुभेच्छा आणि चहापाणी देऊन ही बैठक संपवली. आराधनाच्या रिलिज नंतर काही दिवसांनी किशोरदांनी सांगितलं की, मला राजेश खन्नाची बोलायची पद्धत, आवाज याचा अभ्यास करायचा होता म्हणून मी राजेशशी बोलत बसलो होतो. मेरे सपनों की रानी कब आयेगी तू हे गाणं जेव्हा राजेश खन्नानं ऐकलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की, गाणं पाहून असं वाटलं की पडद्यावर मी स्वत:च हे गाणं गात आहे. आराधनातील किशोरचा आवाज राजेश खन्नाला अगदी फिट बसला. किशोरची 3 ही गाणी सुपर डुपर हिट झाली आणि एक गायक म्हणून किशोरकुमारचा पुनर्जन्म झाला. त्यानंतर तर किशोर कुमार आणि राजेश खन्नाची जोडीच जमली. या 3 गाण्यांनी किशोरनं पार्श्वगायकांची संपूर्ण स्पर्धाच मोडीत काढली. राजेश खन्ना आणि किशोरकुमार तर दो जिस्म एक जान झाले होते जणू.

आराधना प्रदर्शित झाला त्यावेळी कारवां चित्रपटही तयार होत होता. जितेंद्रला रफीच्या आवाजाची योजना होती. गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर किशोरच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी हम तो है राही दिल के हे गाणं किशोरकुमारच्या आवाजात त्वरित रेकॉर्ड करून त्याचं चित्रिकरण करून ते चित्रपटात जोडलं गेलं. रफीच्या आवाजात 4 गीतं रेकॉर्ड झाल्यावर मेहबूब की मेहंदी मध्ये किशोरचं मेरे दिवानेपन की भी दवा नही हे गीत असंच नंतर जोडण्यात आलं. एक नजर मध्ये जोडण्यासाठी प्यार को चाहिये क्या एक नजर हे गीत तयार केलं पण चित्रपटात सिच्युएशन नसल्यामुळे हे गीत चक्क टायटल्सवर दाखवलं म्हणण्यापेक्षा ऐकवलं असंच म्हणावं लागेल. किशोर कुमारची लोकप्रियता अशी सातवें आसमान पर थी.

किशोरकुमार हा पंचमचा आणि सचिनदांचा आवडता गायक. आराधनाच्या वेळी सचिनदा आजारी असल्यामुळे गाण्यांच्या रेकॉर्डिंग्जची जबाबदारी पंचमवरच असायची. आराधनातील किशोरच्या गाण्यांनी धूम केली. किशोरकुमारच्या आवाजाची मागणी अचानक वाढली. त्यातच राजेश खन्नाचा आवाज म्हणजे किशोरकुमारचा आवाज हे ठरून गेलं होतं. आता सर्वच संगीतकार चढाओढीने किशोरकडून गाणी गाऊन घेऊ लागले. शशी कपूर, अमिताभ बच्चन, संजीवकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र हे त्या काळचे आघाडीचे नायक आता किशोरकुमारच्या आवाजात गाऊ लागले होते. अगदी दिलिपकुमार सारख्या रफीप्रेमी हिरोलाही सगिनामध्ये किशोरकुमारचा प्लेबॅक घ्यावा लागला होता.

राजेश खन्ना-राहुलदेव बर्मन-किशोरकुमार या त्रयीचे पुढे येऊ घातलेले चित्रपट म्हणजे चित्रपट संगीताला पडलेलं एक सुरेल स्वप्न म्हणावं अशी सुरेख गाणी या तिघांनी दिली. काही गाणी वानगी दाखल पाहूया. प्यार दिवाना होता है, ये जो मुहब्बत है, ये शाम मस्तानी, आज ना छोडेंगे बस हमजोली (कटी पतंग), जिंदगी का सफर, जीवन से भरी तेरी आँखें (सफर), चिंगारी कोई भडके, ये क्या हुवा, कुछ तो लोग कहेंगे (अमर प्रेम), रोना कभी नहीं रोना, सुन चंपा सुन तारा, कजरा लगा के गजरा सजा के (अपना देश), दिवाना लेके आया है, ओ मेरे दिल के चैन, चला जाता हूं किसी के धून में, कितने सपने कितने अरमां लाया हूं मै (मेरे जीवन साथी), दिये जलते है, मै शायर बदनाम, नदियां से दरिया (नमक हराम), मै इक चोर तू मेरी रानी (राजा रानी), हम तुम गुमसुम रात मिलन की (हमशक्ल), मेरे नैना सावन भादो (मेहबूबा), समय तू धिरे धिरे चल (कर्मा) आणि झुक गई आँखे तेरी राहों पे (भोलाभाला).

पंचम आणि इतर संगीतकारांनी किशोरकडून विविध अभिनेत्यांसाठी 70 च्या दशकात काही अप्रतिम गाणी गाऊन घेतली आहेत. 1955 ते 1961 या काळात ज्यांचा जन्म झाला त्यांच्यासाठी किशोरकुमारनं गायलेली ही गाणी मर्मबंधातली ठेव आहेत. ही बऱ्याच जणांना अतिशयोक्ती वाटेल पण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. ही गाणी एकूनच आमची पिढी वाढली. ही गाणी आम्ही विसरू शकत नाही. यात काही सोलो तर काही द्वंद्वगीतं आहेत.

यहां वहां सारे जहां मे तेरा राज है, अच्छा तो हम चलते है (आन मिलो सजना), कोई माने या ना माने (अधिकार), ओ मेरी गोरी गोरी जां (ऐसा भी होता है-यॉडलिंग सह), ऐ मेरे दिल मत कर किसी पे ऐतबार (अलबेला), जिंदगी एक सफर है सुहाना (अंदाज), रातकली एक ख्वाब में आयी, भली भलीसी एक सूरत (बुड्ढा मिल गया), हे रे कन्हैया (छोटी बहू), जिन्ना जिनजिन जिन्नारा, बेकरार दिल तू गायेजा, पंथी हूं मैं उस पथ का (दूर का राही-संगीतकार स्वत: किशोरकुमार), सांझ सवेरे नैन तेरे मेरे (दुनिया क्या जाने), सच्चाई छुप नहीं सकती (दुष्मन), कैसा है मेरे दिल तू खिलाडी, दिल आज शायर है, चुडी नहीं मेरा दिल है (गॅम्बलर), सुन जा आ ठण्डी हवा, दिलबर जानी (हाथी मेरे साथी), देखो ओ दिवानो, कांची रे कांची रे, फूलों का तारों का (हरे रामा हरे कृष्णा), दो बातों की मुझ को तमन्ना, प्रिय प्राणेश्वरी (हम तुम और वो), जाने अंजाने लोग मिले (जाने अंजाने), भंवरे की गुंजन है मेरा दिल (कल आज और कल), चंदा ओ चंदा, जोगी ओ जोगी (लोखों में एक), हल्का हल्कासा रंग गुलाबी सा (खोज), गीत गाता हूं मै (लाल पत्थर), मुझ को ठंड लग रही है (मै सुंदर हूं), जादूगर तेरे नैना (मन मंदिर), चुप के से दिल दे दे (मर्यादा), रूत है मिलन की (मेला), कोई होता जिसको अपना (मेरे अपने), तू प्यार तू प्रीत (पराया धन), सिमटी सी शरमाई सी (परवाना), खिलते है गुल यहां, कैसे कहें हम (शर्मिली), बस अब तरसाना छोडो (संसार), हे मैने कसम ली, जीवन की बगिया महकेगी (तेरे मेरे सपने). ही झाली केवळ 1970-71 ची गाणी. अशी किती गाणी सांगावीत? आता पुढील वर्षांचा थोडक्यात आढावा घेऊ.

गुजर जाये दिन, ओ मेरी प्राण सजनी (अन्नदाता), आई घिर घिर सावन की (अनोखा दान), हमारे सिवा, तुम मिले प्यार से (अपराध), अभी तो दुवा देके बचपन गया है (बीस साल पहले), देखा ना हाये रे सोचा ना (बॉम्बे टू गोवा), पुकारो मुझे फिर पुकारो (बुनियाद), मै तो चला जिधर चले रस्ता (धडकन), काली पलक तेरी गोरी (दो चोर), एक बार मुस्कुरादोची सगळीच गाणी, क्या जानूं तुम बिन थी, जिने का दिन (गोमती के किनारे), जवानी दिवानीची सर्व गाणी, हां तो नैनों में निंदिया है (जोरू का गुलाम), तुम कितनी खुबसूरत हो (जंगल में मंगल), मुसाफिर हूं यारों (परिचय), ये जीवन है (पिया का घर), अब मै जाऊं (प्यार दिवाना), जानी ओ जानी (राजा जानी), गुम है किसी के प्यार में (रामपूर का लक्ष्मण), दिल की बातें दिल ही जाने (रूप तेरा मस्ताना), जाने जाना (समाधी), हवा के साथ साथ, कोई लडकी मुझे (सीता और गीता), गोरी गोरी गांव की छोरी रे (ये गुलिस्तां हमारा) आणि आँखें तुम्हारी दो जहां (जमीन आसमान, संगीतकार किशोर कुमार). ही झाली 1972 ची गाणी.

स्वत:ची चित्रपटात कोणतीही भूमिका नसताना संगीतकार असलेला किशोरकुमारचा एकमेव चित्रपट, जमीन आसमान. या व्यतिरिक्त किशोर कुमारनं झुमरू, दूर गगन की छांव में, हम दो डाकू, दूर का राही, शाब्बास डैडी, चलती का नाम जिंदगी, बढती का नाम दाढी, ममता की छांव में, दूर वादियों में कहीं या चित्रपटांना संगीत दिलं. 8 चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. आ चल के तुझे मै लेके चलूं (दूर गगन की छांव में), गेले जरा टिंबकटू (झुमरू), मै इक पंछी (दूर का राही) या सारखी गाणी लिहिली. शाब्बास डैडी मध्ये 3 गाणी, बढती का नाम दाढी मध्ये 4 गाणी किशोरकुमारनं लिहिली आहेत. त्याच्या बऱ्याच चित्रपटांच्या पटकथाही किशोर कुमारनच लिहिल्या आहेत.

या शिवाय 1963-64 च्या सुमारास किशोरकुमारने सुहाना गीत हा चित्रपट निर्माण केला होता. शास्त्रीय संगीतावर आधारित 11 गाणी गाऊन रेकॉर्डही केली होती. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शक होते तर मधुबाला नायिका. 4-5 रिळं चित्रिकरण झाल्यावर मधुबाला आजारी पडली आणि चित्रपट डब्ब्यात गेला. 1980 च्या सुमारास लिना चंदावरकरला घेऊन प्यार अजनबी है हा चित्रपट किशोरनं सुरू केला होता पण दुर्दैवानं तो पूर्ण झालाच नाही.

1973 च्या आ गले लग जाच्या वेळचा किस्सा आहे. किशोरचा मित्र भोला श्रेष्ठची लहान मुलगी सुषमा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगला गेली असताना किशोरकुमारनं तिला विचारलं की तू रेकॉर्डिंगसाठी आली आहेस का? तिने सांगितलं की, ती डबिंगला आली आहे. हे गाणं नंतर दुसऱ्या गायिकेच्या आवाजात रेकॉर्ड होणार आहे. तेव्हा किशोरकुमारनं पंचमला सांगितलं की, पंचम डबिंग वगैरा कुछ नहीं, इसी के आवाज में गीत फायनल कर दो, ये बहुत अच्छा गाती है. पंचमनं किशोरची सुचना टाळली नाही. किशोर सुषमाला म्हणाला बेटा जम के गा आज अपनी इज्जत का सवाल है. सुषमा किशोरकुमार सोबत उत्तमच गायली. ते गीत होतं तेरा मुझ से है पहले का नाता कोई. हे गीत चित्रपटातलं सर्वात लोकप्रिय गीत ठरलं. ही घटना एका विक्षिप्त मुखवट्या मागची माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवून जाते.

मीत ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन की ये रैना (अभिमान), मेरी भिगी भिगी सी (अनामिका), हाल क्या है दिलों का (अनोखी अदा), देखो ये मेरे बंधे हाथ (बंधे हाथ), पल पल दिल के पास (ब्लॅकमेल), धिरे से जाना खटियन में (छुपा रूस्तम), मेरे दिल में आज क्या है (दाग), हर कोई चाहता है (एक मुठ्ठी आसमान), हिरा पन्नाची सर्व गाणी, मेरे प्यासे मन की बहार, जीवन है एक सपना (हनीमून), चंदा की किरणों से (इंतजार), अब के सावन में जी डरे (जैसे को तैसा), क्या नजारे (झील के उस पार), किसका रस्ता देखे (जोशिला), गिर गया झुमका (जुगनू), अरे रफ्ता रफ्ता (कहानी किस्मत की), जितना जरूरी है मन का मिलन (कशमकश), गम का फसाना (मनचली), यहां नही कहूंगी, ना सोयेंगे (मि.रोमिओ), जाना है हमें तो जहां, जीना तो है (पांच दुष्मन), समझौता गमों से कर लो (समझौता), हर हसीन चीज का मै तलबगार हूं (सौदागर), तेरे सौ दिवाने (शरीफ बदमाश), ओ मेरी सोनी, लेकर हम दिवाना दिल आप के कमरे में (यादों की बारात). ही झाली 1973 ची गाणी.

आता 1974. जिंदगी के सफर में आणि इतर 4 ड्युएट्स (आप की कसम), इक अजनबी हसीना से, भीगी भीगी रातों में, हम दोनो दो प्रेमी (अजनबी), लेडीज अँड जंटलमेन (अमीर गरीब), उल्फत में जमाने की (कॉल गर्ल), घुंघरू की तरह (चोर मचाये शोर),  सुन नीता (दिल दिवाना), जाने चमन जाने बहार (दुल्हन), तुम को कितना प्यार है (गूंज), रूक जाना नहीं (किशोर कुमार), मुझ को अगर इजाजत हो (इष्क इष्क इष्क), जीवन में तू डरना नहीं (खोटे सिक्के), आ री आ जा (कुंवारा बाप), कसम खाओ तुम एक बार (मदहोश), कभी सोचता हूं (मजबूर), आया हूं मै तुझ को ले जाऊंगा (मनोरंजन), जा मुझे ना अब याद आ, ये लाल रंग (प्रेम नगर), यार हमारी बात सुनो (रोटी), साला मैं तो साब बन गया (सगिना), ओ हंसिनी (जहरिला इन्सान).

ये मौसम आया है (आक्रमण), इस मोड से जाते है, ते रे बिना जिंदगी से, तुम आ गये हो (आँधी), दिल ऐसा किसी ने, ना पुछों कोई हमें (अमानुष), तेरे चेहरे में (धर्मात्मा), चलो भूल जाये (दो झूठ), देखा है जिंदगी को (एक महल हो सपनों का), मैं प्यासा तुम सावन (फरार), दिल क्या करें (ज्यूली), बम चिक बूम चिक (कहते है मुझ को राजा), एक मैं एक तू, आये लो प्यार के दिन आये (खेल खेल में), ओ मांझी रे अपना किनारा (खुशबू), मैने कुछ खोया है (मेरे सजना), आए तुम याद मुझे, बडी सूनी सूनी है (मिली), ये बिरहा की आग (पोंगा पंडित), दो पंछी दो तिनके, जो राह चुना तूने (तपस्या), अपने जीवन की उलझन को (उलझन), रुक जाना ओ जाना (वॉरंट), तुम भी चलो, फुलों के डेरे है (जमीर), नौशाद यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दित एक मात्र गाणं किशोरकुमारला दिलं, सुनहरा संसार (1975) मध्ये. क्या हाल है, बडा बुरा ये साल है हे ते आशो सोबतचं ड्युएट. दुर्दैव म्हणजे हे एक गाणं देखिल चित्रपटातून वगळलं गेलं होतं.

दिल मेरा उडा जाए (अर्जुन पंडित), मतलब जो समझे (बारूद), रंग ले आयेंगे (भंवर), जब तुम चले जाओगे (बुलेट), चलते चलते मेरे ये गीत (चलते चलते), चल सपनों के शहर (दिवानगी), बरसों पुराना ये याराना (हेराफेरी), प्यार कर लिया तो क्या, तेरे चेहरे से (कभी कभी), दिल मचल रहा है (खलिफा), मेरा जीवन कुछ काम ना आया (मेरा जीवन), सावन का महिना आ गया (नहले पे दहला), वादा करो जानम (सबसे बडा रुपय्या), ओ दिल जानी (उधार का सिंदूर), हम तुम, तुम हम हम तुम (त्याग).

राही नये नये, सारा प्यार तुम्हारा (आनंद आश्रम), अभी तो जी ले-शीर्षक गीत, तू लाली है सवेरे वाली (अभी ते जी ले), देख के तुम को दिल डोला है (अमर अकबर अँथनी), आते जाते खूबसूरत, मेरे दिल ने तडप के, जब दर्द नहीं था (अनुरोध), आप सा कोई हसीं, सोचा था मैने तो ऐ जान मेरी (चाँदी सोना), ना जाने दिन कैसे (चला मुरारी हिरो बनने), ऐसे ना मुझे तुम देखो (डार्लिंग डार्लिंग), क्या मौसम है, आओ मनायें जश्ने मुहब्बत (दुसरा आदमी), बचना ऐ हसिंनों, आ दिल क्या महफिल, मिल गया हम को साथी (हम किसीसे कम नहीं), थोडा है थोडे की जरूरत है (खट्टा मिठा), बनी रहे जोडी (खून पसिना), जाने क्या सोच कर (किनारा), कोई रोको ना (प्रियतमा), राही था मै आवारा (साहिब बहादूर)या दों में वो (स्वामी).

काश ऐसा होता (आहुती), ए जी कहो क्या हाल है (अनपढ), गुमसुम सी खोई हुई (बदलते रिश्ते), प्यार मांगा है तुम्ही से (कॉलेज गर्ल), नजराना भेजा किसीने प्यार का, तू पी और जी (देस परदेस), चाँद चुरा के लाया हूं, गुलमोहर गर तुम्हारा नाम होता (देवता), मै हूं डॉन, खई के पान बनारस वाला (डॉन), फिर वहीं रात है, आप की आँखों में (घर), रोते हुवे आते है सब, ओ साथी रे (मुकद्दर का सिकंदर), ना आज था ना कल था (पती, पत्नी और वह), मै तेरे प्यार में पागल (प्रेमबंधन), कसमे वादे निभायेंगे हम, आती रहेगी बहारें, हम बेवफा हरगीज ना थे (शालिमार), जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल).

कितने रांझे तुझे देख कर (अहसास), सुनिये कहिये, कहां तक ये मन को (बातों बातों में), सजी नहीं बारात तो क्या (बिन फेरे हम तेरे), एक ऋतू आये (गौतम गोविंदा), आनेवाला पल (गोलमाल), पहले पहले प्यार की मुलाकातें (द ग्रेट गॅम्बलर), अच्छा चलो जी बाबा माफ कर दो (हमारे तुम्हारे), ओ मेरी जान (जानी दुष्मन), जीवन के हर मोड पर (झूठा कहीं का), इक रास्ता है जिंदगी (काला पत्थर), चाहिये थोडा प्यार (लहू के दो रंग), रिमझिम गिरे सावन (मंझिल), परदेसिया (मि.नटवरलाल), पल्लो लटके (नौकर), मैने प्यार किया तो ठीक किया (सुरक्षा).

ऐ खुदा हर फैसला तेरा (अब्दुल्ला), मेरे होश ले लो (बंदिश), कहो कहां चले (बुलंदी), तुने अभी देखा नहीं, मेरी जिंदगीने मुझ पे (दो और दो पाँच), बहुत खुबसूरत जवां एक लडकी, दिल्लगी ने दी हवा (दोस्ताना), पैसा ये पैसा, मेरी उमर के नौजवानों (कर्ज), मै अकेला अपनी धुन में मगन (मनपसंद), संग मेरे निकले थे साजन (फिर वही रात), अच्छआ कहो चाहे बुरा कहो, यार की खबर मिल गई (राम बलराम), तेरे बिन जिना क्या (रेड रोज), जानूं मेरी जान (शान).

1981-1987 आँखों में हमने आप के, हजार राहें मुड के देखीं (थोडीसी बेवफाई), मिल गई अचानक मुझे (अग्नीपरीक्षा), अपने प्यार के सपने (बरसात की एक रात), वक्त से पहले (बिवी ओ बिवी), तुम्हे छोड के (बसेरा), चाँदनी रात में (दिल ए नादान), कभी पलकों पे आंसू है, ये रूत है हसीन (हरजाई), जहां तेरी ये नजर है (कालिया), कब के बिछडे (लावारिस), ओ मेरी छम्मक छल्लो (प्यासा सावन), हमें तुमसे प्यार कितना (कुदरत), हम तुम से मिले (रॉकी), जिंदगी मिल के बितायेंगे, प्यार हमें किस मोड पे (सत्ते पे सत्ता), देखा  एक ख्वाब, सर से सरकी (सिलसिला), सारा जमाना, छू कर मेरे मन को (याराना), एक रोज मै तडप कर (बेमिसाल), आ हमसफर (चटपटी), यूं निंद से वो जाने चमन (दर्द का रिश्ता), तुझ संग प्रीत, तुमसे बढ कर दुनिया में (कामचोर), थोडी सी जो पी ली है, पग घंघरू बांध (नमक हलाल), रासलिला चल रही है (प्रतिशोध), जाने कैसे कब कहां (शक्ती), तू तू है वही, इश्क मेरे बंदगी (ये वादा रहा), हमें और जिनें की (अगर तुम ना होते), कहीं ना जा (बडे दिल वाला), निले निले अंबर पर (कलाकार), बच के रहना रे (पुकार), जिंदगी प्यार का गीत है, शायद मेरी शादी का खयाल (सौतन), मेरे लिये सुना सुना (आनंद और आनंद), कैसी लग रही हूं मै (झूठा सच), मुझे तुम याद करना (मशाल), मंझिलें अपनी जगह, इंतेहा हो गई (शराबी), मैने दिल दिया (जमीन आसमान), कभी बेकसी ने मारा (अलग अलग), मेहमान नजर की बन जा (पाताल भैरवी), आज तू गैर सही (उंचे लोग), तेरी मेरी प्रेम कहानी (पिघलता आसमान), चेहरा है या चाँद खिला है, सागर किनारे (सागर), जब चाहा यारा तुमने (जबरदस्त). 1970 नंतरच्या कालावधीत गुलझार आणि पंचमसाठी किशोरकुमारनं गायलेली गाणी अप्रतिम होती. आँधी आणि घर या चित्रपटांची गाणी म्हणजे अनमोल रत्न आहेत. यावर पुन्हा कधी लिहावं इतका तो विषय मोठा आहे, गाणी मोजकीच असली तरी.

1970 चं दशक गायक किशोरकुमारनं अगदी राज्य केलं. तरी देखिल आपल्या गायक सहकाऱ्यांबद्दल त्याला प्रचंड आदर होता. महंमद रफीनं तर किशोरला काही वेळेस प्लेबॅकही दिला होता. रफीला किशोर सर्वश्रेष्ठ गायक मानत होता. रफीच्या आकस्मिक मृत्यूमुळे किशोरला धक्का बसला होता. कितीतरी वेळ तो रफीच्या पार्थिवापाशी बसून होता. पंचम, कल्याणजी आनंदजी सारखे कलाकार त्याचे जवळचे मित्र होते. सचिनदा तर त्याचे गॉडफादरच होते.

सुरेश वाडकर, अभिजीत, अमित कुमार, शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, महंमद अजीझ यांच्या सारखे नवीन गायक आल्यामुळे किशोर कुमारला 1980 च्या दशकात फार कमी गाणी मिळाली. कदाचित चित्रपट निर्मिती, लीना चंदावरकर सोबतचा संसार आणि प्रकृतिच्या तक्रारी यामुळे किशोरकुमारने स्वत:च कमी गाणी स्विकारली असतील. शिवाय तो स्टेज शोंमधअयेही व्यस्त असायचा. शेवटच्या 7 वर्षांमध्ये त्याने 4 चित्रपट निर्मित केले. चलती का नाम जिंदगी, ममता की छांव में, दूर वादियों में कहीं आणि प्यार अजनबी है. त्यापैकी शेवटचा पूर्ण झालाच नाही. यात लीना नायिका होती. संगीतकार किशोरकुमारनं सुंदर गाणी कम्पोझ केली होती. यातली प्यार अजनबी है आणि जुनून ए इष्क में ही दोन गाणी युट्यूबवर सहज सापडतील.

विनोदी तसंच गंभीर अभिनय करणारा, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा, पटकथा लिहिणारा, गाणी लिहून संगीतबद्ध करणारा तसेच सुनिल दत्त, कल्याणजी आनंदजी यांच्या सोबत स्टेज शो करणारा, चित्रपट सृष्टीतील बहुतांश आघाडीच्या नायिकां बरोबर नायक म्हणून उभा राहणारा इतका हरहुन्नरी, अष्टपैलू कलाकार पुन्हा कधीही होणे नाही. किशोरला जन्माला घातल्यानंतर परमेश्वराने तो साचाच मोडून टाकला असेल. पाश्चात्य देशात किशोर असता तर जगभर त्याला प्रसिद्धी मिळाली असती, तो सुपरस्टार झाला असता पण भारत सरकारने त्याला साधी पद्मश्री देखिल दिली नाही. आज विचार करायला गेलं तर दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी किशोरकुमार इतका लायक दुसरा उमेदवार नसेल. फिल्मफेअरही लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार किशोरकुमारला प्रदान करू शकते. मरणोपरांत का होईना सरकारने किशोरकुमारला राजमान्यता द्यावी असं त्याच्या असंख्य चाहत्यांना वाटत असतं. याच असंख्य चाहत्यांचं प्रेम हेच किशोरकुमारला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार!

असो, 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरकुमार दूरच्या प्रवासाला निघून गेला, आपल्या असंख्य चाहत्यांना हुरहूर लावून.

हिंदी चित्रपट संगीतावर आधारित इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा

ajay purohit
Ajay Purohit
+ posts

Leave a comment