– अशोक उजळंबकर
हिंदी चित्रपट संगीतात गायनाच्या क्षेत्रात नायिका गायिका म्हणून आघाडीवर राहण्याचा मान नूरजहाँ ला मिळाला. परंतु फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा तिचा निर्णय आत्मघातकीच  ठरला. कारण पाकिस्तानात स्थलांतर केल्यावर तिला फारसा मान मिळाला नाही.  भारतात असेपर्यंत तिच्या अगोदर असलेल्या अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, राजकुमारी, खुर्शीद  यांना तिने केव्हाच मागे टाकले होते. ज्यावेळी नूरजहाँची हुकुमत येथे होती तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, सुरैय्या यांच्या गायन कारकीर्दीचा श्रीगणेश झाला नव्हता.  
नूरजहाँचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी पंजाब प्रांतामधील कसूर गावात आला. नूरजहाँ चा परिवार खूपच मोठा होता. तिचे वडील मदद अली व आई फतेहा यांची ही तेरावी संतान.  म्हणजे तिला तब्बल बारा बहीण- भाऊ होते. एवढ्या मोठ्या घराचा गाडा चालवायचा म्हणजे प्रत्येकाला कमाई करणे गरजेचे होते. त्याचा परिणाम असा झाला ही वयाच्या चौथ्या वर्षी म्हणजे १९३० मध्येच  नूरजहाँ ला बाल कलावंत म्हणून मूकपटात काम करावे लागेल.  १९३१ च्या दरम्यान एका गायन मैफिलीत  गायिका म्हणून तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मौलवी साहेबांनी ‘ही उद्याची सर्वश्रेष्ठ गायिका होईल’ असा आशीर्वाद दिला.  वयाच्या सतराव्या वर्षीच  तिने निर्माता-दिग्दर्शक शौकत रझवी सोबत प्रेम विवाह केला.  चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका करीत असताना शौकत साहेबांनी तिला ‘खानदान’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. त्यापूर्वी नूरजहाँ चे ‘गुल ए बकावली’ आणि ‘यमला जट’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. यमला जट्ट मध्ये प्राण हा नायक होता.  ‘खानदान’ या चित्रपटाला गुलाम हैदर यांनी संगीत दिले होते.  त्या चित्रपटातील ‘तू कौनसी बदली में मेरे चांद है आजा’, शोख सितारों से हिल मिलकर खेलेंगे हम आँख मिचौली’, ‘मेरे लिए जहां में चैन ना करार है’ ही नूरजहाँने गायलेली गाणी गाजली. अभिनय व गायन या दोन्ही क्षेत्रात तिने बाजी मारली होती.  ‘खानदान’ नंतर नूरजहाँ चा अभिनय ‘नादान’ या चित्रपटात पाहायला मिळाला. जिया सरहदी यांच्या नादान मध्ये नूरजहाँ सोबत मसूद, मायादेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘दोस्त’ या चित्रपटाकरिता  नूरजहाँ च्या आवाजातील ‘बदनाम मोहब्बत कौन करे’ हे गीत गाजले. संगीतकार होते सज्जाद हुसेन. ‘नादान’ चित्रपटातील ‘दिया जला कर आप बुझाया’ हे गीत लोकप्रिय झालं. या चित्रपटामुळे संगीतकार के दत्ताच्या नावाचा सर्वत्र बोलबाला झाला. तसं चित्रपटक्षेत्रात आल्यापासून नूरजहाँ चे पहिले प्रेम गायन कलेवर होते व त्यानंतर अभिनय. अभिनयाकरिता म्हणजेच नायिकेकरिता लागणाऱ्या सर्व सौंदर्य खुणा घेऊनच ती जन्माला आली होती. तिच्या जवळ खानदानी मुस्लिम सौंदर्य होते. तिचा चेहरा गोल होता तर डोळ्यात भावदर्शीपणा पाहायला मिळत होता. थोडक्यात मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब म्हटलं तर चुकीचे होणार नाही.  
singer and actress noor jahan
वयाच्या सहाव्या वर्षीच तिने संगीताची शिकवणी सुरू केली होती.  उस्ताद गुलाम मोहम्मद यांच्याकडे तिचा बारा बारा तास रियाझ चालत असे.  नूरजहाँ जेव्हा या क्षेत्रात दाखल झाली तेव्हा शमशाद बेगम या गायिकेचा प्रवेश झाला होता. या दोघींचा आवाज खणखणीत होता म्हणून या जोडीला त्यावेळी रसिक ‘चांदी-सोना’ म्हणून संबोधायचे. शमशाद च्या आवाजाला चांदीच्या कलदार रुपयाची बरोबरी होती, तर नूरजहाँ चा आवाज बावनकशी सोन्याची मोहोर असल्यासारखा होता. नूरजहाँ- सुरेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्त’ चित्रपट खूपच चालला. त्यामधील नूरजहाँ ची गाणी कर्णमधुर होती.  विनोदी कलावंत याकूब- कन्हैयालाल ही जोडी त्यामध्ये होती. ‘लाल हवेली’ चित्रपटाचे संगीत मीर साहेब यांचे होते. सहाय्यक म्हणून सी रामचंद्र यांनी कामगिरी बजावली होती.  ‘दोस्त’ मधील नूरजहाँ च्या आवाजात ‘बनती नजर आती नही तदबीर हमारी’ आणि ‘तेरी याद आये सावरिया, जिया घबराये’ ही गाणी लोकप्रिय झाली.  नूरजहाँ सुरेंद्र यांच्या आवाजातील द्वंद्व गीताचे बोल होते ‘मोहनिया सुंदर मुखडा खोल’, आणि ‘दिल लेकर मुकर ना जाना, नाजूक बहोत है जमाना’. दोस्त ची गाणी रसिकांच्या ओठान्वर असतानाच ‘झीनत’ प्रदर्शित झाला.  या चित्रपटात नूरजहाँच्या अभिनयाचे दर्शन झाले.  ‘झीनत’ हा एक मुस्लिम मुस्लिम सामाजिक चित्रपट होता.  गुजरातच्या ‘वेणी’ तर्फे देण्यात येणारे वेणी स्वर्ण-चंद्रक’ पारितोषिक ब्लिट्झ चे संपादक आर. के. करंजिया यांच्या हस्ते तिला देण्यात आले. ‘झीनत’ या चित्रपटास मीर साहेब, हाफीज खान आणि रफिक गझनवी यांनी संगीत दिले होते. या  चित्रपटाच्या सुरुवातीसच नूरजहाँच्या आवाजातील ‘नाचो सितारो नाचो, अब चांद निकलने वाला है’ रसिकांना खूपच भावलं. चित्रपटाच्या कथानकात तिच्या पतीचे निधन होते तेव्हा तिच्या दर्दभऱ्या आवाजातील ‘बुलबुलो मत रो यहां आसू बहाना है मना, इन कफन के कैदियों को गुल मचाना है मना’ या गीताने रसिकांना नूरजहाँ च्या आवाजातील दर्द ऐकायला मिळाला. 
Singer Noor Jahan and Surendra
याशिवाय झीनत मधील ‘आँधीयां गम की यूं चली बाग उजड के रह गया’ या गीताने रसिकांच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली.  परंतु झीनत गाजला तो यामधील कव्वाली मुळे.  श्यामा, नूरजहाँ, शशिकला या नायिकांवर वर चित्रीत झालेली व कल्याणी, जोहराबाई व नूरजहाँ यांनी गायलेली ‘आहें न भरी, शिकवे ना किये, कुछ भी ना जुबां से काम किया, फिर भी मोहब्बत छुप ना सकी, जब तेरा किसी से नाम लिया’ ही  कव्वाली कव्वालीच्या गायन क्षेत्रात अतिशय गाजलेली पहिलीच कव्वाली म्हणावी लागेल. 
‘गांव की गोरी’, ‘बडी माँ’, ‘भाई जानल है’, ‘नूरजहाँ’ हे चित्रपट एकाच वर्षी प्रदर्शित झाले.  या सर्व चित्रपटातील नूरजहाँ ची गाणी गाजली.  त्यांचा साधा उल्लेख केला तर रसिकांना आनंद होईल.  ‘दिया जला कर आप बुझाया’ (बडी माँ),  ‘तुम हमको भुला बैठे हो’ (बडी माँ), ‘किस तरह भुलेगा दिल उनका खयाल आया हुआ’ (गाव की गोरी), ‘ ये कौन हंसा, किसने सितारो को हसाया’ (भाई जान), ‘बैठी हू तेरी याद का लेकरके सहारा, आजा ओ के चमके मेरी किस्मत का सितारा’ (गाव की गोरी) 
१९४६ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या एक वर्ष अगोदर नूरजहाँ चा ‘अनमोल घडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. संगीतकार नौशाद यांनी नूरजहाँ च्या आवाजाचा सुरेख उपयोग करून घेतला होता.  तिच्या आवाजातील या चित्रपटाची सर्व गाणी गाजली.  त्यापैकी ‘आवाज दे कहाँ है’,  ‘मेरे बचपन के साथी मुझे भूल न जाना’, ‘क्या मिल गया भगवान तुम्हे दिल को दुखाके’, ‘आजा मेरी बर्बाद मोहब्बत के सहारे, है कौन जो बिगडी हुई तकदीर सवारे’ नूरजहाँ ची नंतरच्या दिल, जुगनू, या चित्रपटातील गाणी गाजली. ‘जुगनू’ मधील रफी सोबतचे द्वंद्व गीत आजही लोकप्रिय आहे. ‘यहां बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है’ तर तिच्या सोलो आवाजात ‘हमें तो शामे गम मे काटनी है जिंदगी अपनी’ खरोखरच स्वातंत्र्यपूर्व काळात लताच्या आगमनापूर्वी सर्वत्र नूरजहाँ च्या आवाजात दबदबा होता. स्वातंत्र्यानंतर तिने आपला मुक्काम पाकिस्तानमध्ये हलविला व आपण एका गायिकेस हरवून बसलो.
Noor Jahan with Lata Mangeshkar
लता देखील यांच्या आवाजाची चाहती होती. ‘जुगनू’ या  चित्रपटावर फिल्म इंडिया चे संपादक बाबूराव पटेल यांनी बंदी आणण्याची मागणी केली होती व काही  काळ या चित्रपटावर बंदी लागू होती. संगीतकार नौशाद, शामसुंदर, गुलाम हैदर, सज्जाद यांना  नूरजहाँच्या आवाजाचा पल्ला ठाऊक होता.  त्यांनी आपल्या चित्रपटाकरिता तिच्या आवाजाचा सुरेख उपयोग करून घेतला. भारतीय शास्त्रीय संगीताचा तिने चांगला अभ्यास केला होता.  तिचा सहकारी गायक, नायक सुरेंद्र तिच्या आवाजाचा एवढा चाहता होता की आपल्या द्वंद्व गीतात आपल्याच ओळीत तो हरवून जायचा. नूरजहाँच्या आवाजाकडे लक्ष देण्यात तो बेभान व्हायचा. मीनाकुमारी सोबत विवाह करण्यापूर्वी कमाल अमरोही नूरजहाँ वर आशिक झाला होता, परंतु शौकत हुसेन यांनी ती संधी त्यांना मिळू दिली नाही. मध्यंतरी ८० ते ९० च्या दशकात तिचा  भारत दौरा खूपच गाजला.  मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात तिचा मोठा सत्कार करण्यात आला तेव्हा सुरेंद्र प्रेक्षकात बसला होता. अनमोल घडीच्या गीताच्या तारा जेव्हा नूरजहाँ ने छेडल्या तेंव्हा सुरेंद्र ने त्यात साथ दिली. लता व नूरजहाँ यांची शेवटपर्यंत दूरध्वनीवर भेट होत असे. २३ डिसेंबर २००० रोजी नूरजहाँ ने या जगाचा निरोप घेतला.
तिच्या निधनानंतर भारतात दूरदर्शन वर तिच्या गीतांचे दर्शन रसिकांना झाले. तिच्या गीतांच्या आठवणीत रसिक आजही दंग होतात व असंच म्हणतात, 

“बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा, आजा ओ के चमके मेरा किस्मत का तारा”

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment