नौशाद आणि रफी : सुहानी रात ढल चुकी….

-धनंजय कुलकर्णी

शास्त्रीय संगीता सोबतच लोकसंगीताचा अचूक वापर करून सिने संगीतात कमालीचा गोडवा आणि गेयता निर्माण करणारे महान संगीतकार नौशाद आणि आपल्या स्वराने अमल दुनियेत जादू पसरणारे गायक महंमद रफी या गुरू शिष्याचे जन्म दिनांक लागोपाठ आहेत. रफीचा २४ डिसेंबर तर नौशाद यांचा २५ डिसेंबर रोजी. या स्वर-सूरांच्या युतीने तब्बल वीस वर्ष अधिराज्य गाजवले. रफीने नौशाद यांच्याकडे ४१ चित्रपटातून १४९ गाणी गायली त्यातील ८१ हि सोलो स्वरूपाची होती तर ६० युगल गीते होती.

रफीने पहिले गीत श्यामसुंदर कडे गायले असले तरी ’पहले आप’ हा नौशाद यांनी संगी्तबध्द केलेला चित्रपट आधी झळकला. यातील रफीच्या गीताचा किस्सा मनोरंजक आहे. ’हिंदोस्ताके हम है हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत गाण्यासाठी त्यांनी रफी सोबत श्यामकुमार आणि अल्लाउद्दीन यांना देखील बोलावले. या गाण्यात जोष निर्माण व्हावा म्हणून नौशाद यांनी या तीनही गायकांना लष्करी बूट पायात घालायला दिले. आणि हे बूट घालून लेफ्ट राईट करीतच हे गाणे गायला लावले. यातील ‍र्‍हिदमने गाण्याला वेगळाच रंग आला व तरूणाईत बेहद लोकप्रिय ठरलं. या दोघांच्या एकत्रित कर्तृत्वाचा पहिल्यांदा बिगुल वाजला १९५० साली. चित्रपट होता ’दुलारी’ पहाडी रागावर आधारीत ’सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आऒगे’ या बेहतरीन गीताची खुमारी आज पन्नास वर्षाहून अधि काळ गेला तरी तसूभरही कमी होत नाही.  दिलीपकुमार करीता रफी हे कॉम्बीनेशन जन मानसात रूजवलं नौशाद यांनीच. कारण तोवर तलतचा स्वर दिलीप साठी प्रामुख्याने वापरला जायचा.

Mohd. Rafi with Music Director Naushad
Mohd. Rafi with Music Director Naushad

१९५१ सालच्या दीदार पासून याची सुरूवात झाली. ’मेरी कहानी भुलने वाले तेरा जहां आबाद रहे’, हुए हम जिनके लिए बरबाद, नसीब दरपे तेरी आजमाने आया हूं या गाण्याच्या लोकप्रियते नंतर या त्रयीची गाणी अफाट गाजू लागली. आन, अमर, उडन खटौला, कोहिनूर, मुगल-ए – आजम, गंगा जमुना, लिडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष, आदमी पर्यंत हा सिलसिला जारी राहिला. दिलीप शिवाय देखील या जोडीचे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले.  रफी आणि नौशाद यांचा सुरेल सिनेमा ’बैजू बावरा’ १९५२ साली प्रदर्शित झाला. याचा नायक भारत भूषण होता. यातील मन तडपत हरी दर्शन को आज हे गीत आजही काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पहाटे लावलं जातं या गीताच्या ध्वनीमुद्रणाचा किस्सा खुद्द नौशाद यांनीच सांगितला होता. त्यांनी सर्व वादकांना रेकॉर्डींगच्या दिवशी शुचिर्भूत होवू यायला सांगितलं. सकाळी कृष्णाच्या मूर्तीची मनोभावे पूजा झाली. हार, उदबती, कापूर याने वातावरण प्रसन्न व भक्तीमय बनलं. त्यात रफीने स्वर लावला ’हरी ओम,हरी ओम…’ मालकंस रागातील हे गीत आणखी शंभर वर्षांनी देखील ऐकले जाईल इतकी ताकत या गाण्यात होती.

दरबारी रागावरील ’ ओ दुनियाके रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले ’या गाण्याला तर तोड नाही. १९६३ साली आलेल्या ’मेरे मेहबूब’ या चित्रपटातील गाण्यांनी दिलीपशिवाय देखील हि जोडी रसिकांना अपील होवू शकते यावर शिक्का मोर्तब झालं. यातील सगळीच गाणी रसिकांना बेहद आवडली. साठच्या दशकाच्या शेवटी नौशादच्या संगीताची जादू कमी होवू लागली. साथी, गंवार, तांगेवाली वरून ते सिध्दच झालं. सत्तरच्या दशकात रफी- नौशाद क्वचितच एकत्र आले. ’धरम कांटा’ हा सुलतान अहमदचा सिनेमा १९८२ साली प्रदर्शित झाला पण त्यात रफीचे ‘ये गोटेदार लहंगा निकलू जब डालके’ हे गीत होते दुर्दैवाने या जोडीचे हे शेवटचे लोकप्रिय गीत ठरले.

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment