-डॉ. विशाखा गारखेडकर
शेकडो अजरामर गीतांना संगीताचा साज चढविताना ज्यांनी आनंद, दु:ख, विरह, प्रणय, अध्यात्म, उत्कटता आदी नैसर्गिक भावना वाद्दयातून बेमालूमपणे पेरल्या त्या नौशाद यांची २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. एखादा संगीतकार शंभरी नंतरही लक्षात राहतो तो त्याच्या मोठेपणामुळेच. लखनौच्या नवाबी भूमीत जन्मलेले नौशाद संगीतकारांनमधले नवाबच होते.
नन्हा मुन्ना राही हूँ
देश का सिपाही हूँ
हे गाणे ऐकत आजची पन्नाशीच्या पुढची पिढी मोठी झाली. हीच पिढी जेव्हा कॉलेजमध्ये जाऊ लागली तेव्हा एकतर्फी प्रेमात पडली. आजसारखे मोकळे वातावरण तेव्हा नव्हते; त्यामुळे फक्त डोळ्यांची भाषा कळायची तेव्हा दिलीपकुमारच्या अवखळ अदांनी ‘गंगा जमुना’ चित्रपटातील गीताने धुमाकूळ घातला होता.
“नैन लड जाये तो मनवा में
कसक हुई बेकरारी”
या गाण्याच्या ठेक्याने तेव्हा तरुणाईला वेड लावले होते. यातील काहींना जेव्हा प्रेमभंगाचे चटके बसले तेव्हा त्यांना
“जब दिलही टूट गया
हम जी के क्या करेंगे” (शहाजहाँ)
या गीताने आधार दिला. तर काहींना
प्यार किया तो डरना क्या
जब प्यार किया तो डरना क्या
प्यार किया कोई चोरी नही की
प्यार किया…………..(मुगल–ए-आझम)
या गाण्याने प्रेम करायची हिंमत दिली. या व या सारख्या काही गाण्यांची आणि तालांची अनोखी जादू १९५० च्या आसपास सर्वसामान्यांवर पडू लागली होती. गारुड करणे म्हणतात ते कसे हे तेव्हाची ती पिढी अनुभवत होती. संगीताचे हे गारुड करणाऱ्या संगीतकाराचे नाव होते नौशाद! भारतीय संगीतात विशेषतः हिंदी चित्रपटात ज्यांनी असंख्य सांगीतिक प्रयोग केले त्या नौशाद अली यांच्या प्रत्येक गाण्याच्या चाली हृदयात जपून ठेवाव्यात अशा आहेत. आजच्या पिढीलाही त्या भुरळ घालतात, ठेका धरायला भाग पडतात.
मुळात असे अविस्मरणीय संगीत द्यायला जे जिगर लागते तेच मुळात नौशाद यांना लखनौच्या नवाबी भूमिने दिले होते. लखनौ म्हणजे नवाबांचे शहर. गोमती नदीच्या काठावर वसलेल्या लखनौला सांस्कृतिक, राजकीय परंपरा फार मोठी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात नौशाद हे २५ डिसेंबर १९१९ मध्ये जन्माला आले. वडील कोर्टात क्लर्क. त्यामुळे घरी सांस्कृतिक वातावरण वगैरे काहीच नाही. पारंपारीक मुस्लिम परिवार असल्यामुळे संगीताबद्दल आवड असण्याचा प्रश्नच नाही. तरी बाहेर ऐकू येणारे सूर छोट्या नौशादला खुणावत होते. घराशेजारी असलेल्या सिनेमागृहात चित्रपटाचा लाईव्ह पार्श्वसंगीत देतांना ते ऐकायचे आणि आपणही संगितकार होवू असं ते स्वप्न पहायचे. एका वादयाच्या दुकानात त्यांनी काम स्वीकारले. त्या दुकानात मालक नसतांना ते सतार, तबला हे वाद्य वाजवू लागले. हे मोहक स्वर एकदा दुकान मालकाने ऐकले आणि मालक गुरबतअलींनी एक हार्मोनियम त्यांना सप्रेम भेट दिली. गुरबत अलींना कुठे ठाऊक आपण एका सर्वश्रेष्ठ संगीतकाराला मदत करतोय म्हणून.

वडिलांना नौशादच्या संगीत प्रेमाची खबर एव्हाना लागली होती. त्यांनी थेट सांगितलं घरात राहायचे असेल तर संगीत बंद कर. नौशाद कडून ते शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी घर सोडायचा निर्णय घेतला आणि १९३७मध्ये म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. दरम्यान स्वतःचा ऑर्केस्ट्रा उभारला पण फार काळ हा प्रयोग तग धरू शकला नाही. मुंबईच्या मायानगरीत काम मिळावे म्हणून त्यांच्या चकरा सुरु झाल्या. रात्री उपाशीपोटी दादरच्या फुटपाथवर झोपायचे. नशीब साथ देत नव्हते. ‘माला’ हा पहिला चित्रपट त्यांना संगीतकार म्हणून मिळाला खरा, पण लोकप्रियता मिळाली ती ‘रतन’ चित्रपटाच्या गाण्याला दिलेल्या संगीतामुळे. या चित्रपटातील पाच गाणी जोहराबाई यांनी गायिली होती.
नौशाद यांना शास्त्रीय संगीताची अभिजात जाण होती, अभ्यास होता. आपले वेगळेपण राखायचे असेल आणि या बॉलीवूडमध्ये टिकायचे असेल तर इतरांपेक्षा काय वेगळे देता येईल याचा अभ्यास त्यांनी सुरु केला. ‘रुमझुम बरसे बादरवा मस्त हवा’, ‘अखिया मिलाके भरमा के’ , परदेसी बालम आ बादल आया’, किंवा ‘आयी दिवाली आयी’ या सारखी गाणी ऐकल्यावर नौशाद यांनी संगीतात किती नाविण्य त्या काळात आणले याची प्रचिती येते. सुरावटींवर असलेली त्यांची हुकूमत हळूहळू बॉलिवूडला कळू लागली.

तो काळ सैगलचा होता. अनेकांना सैगलच्या आवाजाने वेड लावले होते. नौशाद त्यावेळी नवोदित होते. आपणही कुंदनलाल सैगल कडून एखादे गाणे गाऊन घ्यावे ही त्यांची इच्छा होती, परंतु सैगल हे मद्यप्राशन केल्याशिवाय चांगले गाऊ शकत नाही अशी त्यांची ख्याती होती. १९४७ मध्ये ‘शाहजहान’ चित्रपटात नौशाद आणि सैगल एकत्र आले आणि ‘जब दिल ही टूट गया’ हे अविट आणि अजरामर गीत जन्माला आले. विशेष म्हणजे सैगल यांना मद्यप्राशन न करू देता नौशाद यांनी गाऊन घेतले. हे त्या काळातले एक अदभूत आश्चर्य होते. सैगल यांचा काळजात रुतणारा’जब दिल ही टूट गया’ हा आवाज आजही ऐकल्यावर त्यातील आर्तता, एकटेपण, विरह किती खोल आहे याची कल्पना येते. असंख्य प्रेमवीर प्रेमात अपयश आल्यानंतर रात्रभर हे गाणे वारंवार ऐकतांना पाहिले आहे. आपल्या अंत्ययात्रेच्या वेळी हेच गीत गायले जावे अशी इच्छा खुद्द सैगल यांनी बोलून दाखवली होती. इतका प्राण त्या गाण्यात त्यांनी स्वराद्वारे तर नौशाद यांनी संगीताद्वारे टाकला. सैगल पुढे फार काळ जिवंत राहिले नाही, अन्यथा या दुकालीची असंख्य गाणी ऐकायला मिळाली असती.
नौशाद यांच्या संगीताला शकील बदायुनी यांच्या गीतांची बेमालूम जोड शेवटपर्यंत मिळाली. गीत शकील बदायुनी आणि संगीत नौशाद असे समीकरणच त्याकाळात झाले. या दोघांनी दोनशेपेक्षा जास्त गाणी दिली. गीतांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करून त्याला सुरावट ते ठरवायचे. त्यामुळेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आपल्या संगीतावर अधिक वापर करणारे म्हणून त्यांची ओळख झाली. ‘मुघल-ए-आझम’ मध्ये अभिजात शास्त्रीय संगीताचा वापर केल्यामुळे ती गाणी अजरामर झाली. त्यातील एक एक गाणे म्हणजे खजीना आहे. बॉलीवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात मुघल वैभवाच्या भारदस्तपणा जसा दाखवला तसा सलीम-अनारकली यांच्या प्रेमातील हळवेपणा देखील सुंदरपणे साकारला गेलाय. ‘मोहे पनघट पे नंदलाल’ ही रचना दादरा ठुमरीच्या अंगाने पेश केली. तर ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यासाठी घेतलेली मेहनत थक्क करणारी आहे. या गाण्यातील काही तुकडे त्यांनी दोनवेळा रेकॉर्ड केले. इफेक्टसाठी एक माईक बाथरूममध्ये ठेवला पुन्हा त्याचे मिक्सिंग केले.

शास्त्रीय संगीतातील प्रत्येक रागाचा त्यांनी खुबीने वापर आपल्या संगीतात केला. ‘बैजू बावरा’ मधील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ साठी .राग गारा वापरला तर राग दरबारी कानडा वापरत ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणे पेश केले. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात नूरजहाँ यांच्या सोबत केलेले गाणे मिश्र पहाडी रागावर आधारित ‘जवा है मोहब्बत’ या सारखे गीत किंवा ‘आवाज देsss कहा है’ हे गीत म्हणजे नौशाद यांचे संगीतावरील प्रेमाची अत्युच्य पातळीच. मनासारखी धून जमत नसेल तर ते बेचैन व्हायचे. समाधान झाल्याशिवाय त्यांनी कधीच गीताला चाल दिली नाही. नुरजहाँच्या आवाजातील ‘मेरे बचपन के साथीमुझे भूल ना जाना’ हे गाणे तर वारंवार ऐकावे असे वाटते. ‘दिल दिया दर्द लिया’ या गाण्यात यमन रागाचा केलेला बघून वापर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल. शास्त्रीय संगीतात बाप माणसे समजली जाणारी गायक मंडळीचित्रपटापासून दूर होती. मात्र नौशाद यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद अमीरखा, पं. डी. व्ही. पलुस्कर यांच्याकडून बैजू बावरा, मुगल-ए-आझम साठी गाऊन घेत ही गाणी एका उंचीवर नेली.
नौशाद यांनी अमीरबाई कर्नाटकी, निर्मला देवी, सुरैया, उमादेवी उर्फ नंतरची टूनटून यांना गायिका म्हणून स्थापित करण्यास मोठा हातभार लावला. नव्या गायिकांना ब्रेक देणारे संगीतकार अशी त्यांची ओळख झाली. नौशाद यांनी अनेक प्रयोग केले. पूर्वी संगीतकार हे ठुमरी, दादरा किंवा गझल साठी तबला, हार्मोनियम सोबत पाश्चिमात्य धुनसाठी पियानो सोबत रेकॉर्ड करीत असायचे. नौशाद यांनी बदल केला. ‘बॅकग्राऊंड स्कोर’ असे जे म्हटले जाते ते नौशाद यांनी प्रचलित केले. विशिष्ट दृश्यात ते पार्श्वभूमीसाठी वापरले जाऊ लागले. त्यामुळे हिंदी सिनेमातील ‘गेम चेंजर’ अशीही नौशाद यांची ओळख निर्माण झाली. पियानो वादनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आणि हिंदुस्थानी संगीताची माहिती असल्यामुळे या मिलाफातून त्यांनी बॉलिवूडमध्ये संगीतात जॉनर चा पाया घातला असेही मानले जाते. लोकगीत, पाश्चिमात्य संगीत, सिंफनी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत यांना एकत्रित करून हा नवा ‘जॉनर’ प्रयोग त्यांनी बनविला. लोकसंगीताचा अत्यंत उत्तम वापर त्यांनी मधुबन में राधिका नाचे, मोहे भूल गये सावरिया, मोहे पनघट पे, नैन लड जाये तो यासारख्या गाण्यांमध्ये केलेला दिसतो. तर बैजू बावरातील मन तरपत हरी दरशन को आज’ या गीतातील भजनाचा आपल्याकडे असलेला प्रभाव अत्यंत संयतपणे अधोरेखीत केला आहे.
नौशाद यांच्या धून सामान्यांना सहजपणे गुणगुणता येतात. हे त्यांच्या संगीताचे वेगळेपण / वैशिष्टय आहे. मुकेश, महंमद रफी, लता मंगेशकर यांच्या आवाजाचा वापर कोणत्या गीतासाठी करता येईल याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून गाऊन घेतले. १९५० च्या नंतरचे अनेक चित्रपट हे त्यातील गीत आणि संगीतासाठी ओळखले जातात. मुगल-ए-आझम , मदर इंडिया, दिवाना, दिल्लगी, दर्द, दास्तान, बैजू बावरा, दुलारी, शहाजहा, मेरे महेबुब, साज और आवाज, लीडर, संघर्ष, राम और श्याम, गंगा जमुना, कोहिनूर, सन ऑफ इंडिया, आदमी.अनमोल घडी, बाबुल यासारख्या गाजलेल्या चित्रपटातील गीतांना नौशाद यांनी दिलेले संगीत ऐकल्यावर नौशाद यांचा आवाका आणि त्यातील वैविध्यता किती होती हे कळते.
आज पुरानी राहों से (आदमी), मुझे खो दिया (आन), अब कौन है मेरा, मेरा प्यार भी तू है (साथी), ढूंढो ढूंढो रे साजना (गंगा जमुना), छोड बाबुल का प्यार (बाबुल), भूल जा (साथी), गम का फसाना, मै भवरा तू है फूल (मेला), आज कि रात मेरे दिल की सलामी (राम और श्याम), अशा असंख्य गीतांना नौशाद यांनी दिलेले संगीत अविस्मरणीय आहे. या गीतांना लोकप्रिय करण्यात त्यातील शब्द जसे महत्वाचे आहेत तशा त्या संगीताव्दारे भावना पोहचविण्यात संगीतकारही फार महत्वाचा घटक असतो. नौशाद यांनी असंख्य प्रयोग केले आणि हिंदी चित्रपटाच्या सुवर्णयुगाची सुरवात करून दिली. नवे प्रयोग, सखोल अभ्यास, शास्त्रीय संगीताचा वापर, गरज पडेल तेव्हा पाश्चिमात्य संगीताचा आधार, लोकसंगीताचा योग्य तो संस्कार, यातून नौशाद यांनी आपले अष्टपैलू सिद्ध केले. गाण्याला संगीत देतांना विचार करण्याची प्रक्रिया नौशाद यांनी सुरु केली. शब्दाच्या सामर्थ्याला संगीताचा साज असा काही चढवला की, ते प्रत्येक गीत सुरेल झाले. आज संगीतात आधुनिकता आली असली तरी अविटता, माधुर्य हरवले आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही ते गीत अनेक प्रेक्षकांच्या लक्षात राहात नाही. कारण संगीतातील अस्सलता संपत चालली आहे. जी पूर्वीच्या संगीतकारांमध्ये होती त्यामुळेच या पार्श्वभूमीवर नौशाद यांचे वेगळेपण उठून दिसते. कोणताही सांगीतिक वारसा नसणाऱ्या नौशाद यांनी ६५ पेक्षा जास्त चित्रपटातील गीतांना संगीत दिले. त्यांचा १९९२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने आणि त्याआधी १९८२मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नौशाद यांची १०१ वी जयंती २५ डिसेंबर रोजी आहे. त्यांना आपल्यातून जाऊन १४ वर्षे झाली. त्यांच्या शायरीच्या शब्दात सांगायचे तर ……..
सामने उसके एक भी न चली
दिल में बाते हजार लेके चले
नौशाद गेले असले तरी त्यांची गाणी आपल्या सोबत साथीला आहेत. शांत रात्री एकटेपणात
सुहानी रात ढल चुकी
ना जाने तुम कब आओंगे (दुलारी)
हे दर्दभरे गाणे ऐकत असतांना नौशाद कायम सोबतीला असतात प्रत्येकाच्याच……….
