-© नयना पिकळे

Remembering Music Director Ravi
“चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो…”
जे खरे संगीतप्रेमी आहेत त्यांनी नक्कीच ओळखलं असणार, की मला कोणत्या संगीतकाराबद्दल सांगायचं आहे ते! ह्या संगीतकाराने ‘अजनबी’ व्हायचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, एवढी लोकप्रियता त्याला आपल्या संगीतामुळे लाभलेली आहे. ह्या व अशा अनेक अवीट गोडीच्या गाण्यांना आपल्या सुरेल चालींनी सजवणारे संगीतकार आहेत रवी! त्यांचं पूर्ण नाव रवी शंकर शर्मा. पण ह्या नावाने ते क्वचितच ओळखले जातात.

रवी यांचा जन्म दिल्ली येथे ३ मार्च १९२६ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताचं जबरदस्त आकर्षण होतं आणि म्हणूनच वयाच्या तेविसाव्या वर्षी आपली इलेक्ट्रिशियनची नोकरी सोडून हा उमदा तरुण नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाला. खरं तर त्यांना सिनेसृष्टीत पार्श्वगायक व्हायचं होतं. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी फिल्मिस्तान संस्थेत तबलावादक म्हणूनही काम केल. नंतर त्यांनी सचिनदांचं संगीत असलेल्या ‘नौजवान’ ह्या चित्रपटात ‘झनक झनक झन झन’ ह्या गाण्यात कोरस गायलं. असंच एके दिवशी ‘आनंदमठ’ चित्रपटातील ‘वंदे मातरम्’ गाण्याच्या कोरसमध्ये गात असताना हेमंत कुमारची नजर ह्या तरुणावर पडली व त्यांनी रवीला आपला सहाय्यक म्हणून कामावर घेतल.

हेमंतदांचे सहाय्यक म्हणून त्यांनी शर्त, सम्राट, जागृती, नागीन व इतर अनेक चित्रपट केले. “नागीन” ह्या सुपरहिट चित्रपटाचे संगीत हेमंतकुमारनी स्वतः दिले आहे; पण त्यातील सर्वांत लोकप्रिय झालेले गाणे होते ‘मन डोले मेरा तन डोले’ ह्या एका गाण्याचे संगीत रवी आणि कल्याणजी ह्यांनी एकत्र मिळून दिलेले आहे. ह्या गाण्यात सुरुवातीला वाजणारी व अतिशय लोकप्रिय झालेली जी बीनची धून आहे ती रवींनी हार्मोनिअमवर बसवलेली होती. असं म्हणतात, की ह्या गाण्यासाठी हेमंतदांना जेव्हा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांनी ती ट्रॉफी रवी यांच्याही हातात दिली व म्हणाले, की ह्या पुरस्कारात तुझाही मोठा वाटा आहे. त्यांच्यातील हे गुण हेरूनच हेमंतदांनी रवी यांना स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहित केल.

रवी एक प्रथितयश संगीतकार म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतरचना देखील केली आहे, हे मात्र खूपच कमी जणांना ठाऊक असेल. रवींनी स्वतंत्रपणे सर्वप्रथम राजेंद्र गोयल ह्यांच्या ‘वचन’ ह्या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. त्या चित्रपटातील दोन गाणीही त्यांनीच लिहिलेली आहेत व ह्या चित्रपटातील ‘यूंही चुप के चुप के बहाने बहाने’ हे आशा भोसलेबरोबरचं द्वंद्वगीतही त्यांनी गायलेलं आहे.

‘वचन’मधील त्यांनी लिहिलेलं ‘चंदामामा दूर के, पुए पकाये बुर के’ हे अंगाईगीत आजही अत्यंत लोकप्रिय आहे. ह्यातलंच आणखीन एक गाणं होतं ‘एक पैसा दे दे ओ बाबू’. ह्या गाण्याविषयीचीच एक मजेशीर आठवण रवींनी एका मुलाखतीत सांगितली आहे.

अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांचा सिनेसृष्टीत जम बसला नव्हता, तेव्हाची ही गोष्ट. ते एके रात्री उशिरा गोरेगावहून ट्रेनने मरीन लाइन्सला जात होते. गाडीत डोळा लागला व चर्चगेटला जाग आली. परत उलटं जाण्यासाठी त्यांनी ट्राम पकडली. पण कंडक्टरला पाहताच घाबरले व चालत्या ट्राममधून उतरले, कारण खिशात तिकीट काढायला एकही दमडी नव्हती. मग काय, पायीच चालत चालत मरीन लाइन्सला जाऊ लागले. वाटेत काही जण गरम चहा पीत होते. रवींनादेखील भूक लागली होती. रात्रीची वेळ, बाहेर थंडी पडली होती. गरम चहाची तल्लफ आली; पण करणार काय, खिसा खाली होता. तिथेच त्यांना ‘एक पैसा दे दे बाबू, तेरी जेब रहे न खाली’ हे शब्द सुचले व त्यांनी ते ‘वचन’ मधील गीतात वापरले. हे गीत त्या काळी खूप गाजलं व जवळजवळ प्रत्येक भिकार्‍याच्या तोंडी ऐकू येऊ लागलं. त्यानंतर मात्र रवींना कधीही परत मागे वळून पाहावं लागलं नाही.

Sahir Ludhianvi, Yash Chopra and Ravi
Lyricist Sahir Ludhianvi, Director Yash Chopra and Music Director Ravi

एकामागोमाग एक चित्रपटांना ते संगीत देत गेले व ती गाणी पाहता पाहता लोकांना आवडू लागली. वक़्त, नागीन, अनुराधा, खानदान, एक फूल दो माली, टाॅवर हाउस, भरोसा, आदमी और इन्सान ह्या व अशा असंख्य चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी आपल्या संगीताचा साज चढवला.

वक़्त चित्रपटातील एक अजरामर गीत – ‘ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नाही’! ह्या गाण्याच्या सुरुवातीची तान आणि ‘ओय ओय ओय ओय…’ हे आपल्या बेगमकडे पाहून म्हणायचा बलराज साहनीचा लाजवाब अंदाज आजही डोळ्यांसमोर येतो. साहिरचे बोल, रवीचं संगीत, मन्ना डेंचा आवाज आणि पडद्यावर बलराज साहनीसारखा ताकदीचा अभिनेता ह्या चौकडीने हे गीत इतक्या वरच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे, की हे गीत रवींच्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बहुतेक वेळेला होत अस की एखाद्या चित्रपटातील दोन किंवा जास्तीत जास्त तीन गाणी लोकप्रिय होतात; पण रवी हे अशा फार कमी संगीतकारांपैकी एक आहेत ज्यांनी संगीत दिलेल्या बहुतेक चित्रपटातील सर्वच्या सर्वच गाणी अफाट लोकप्रिय झालेली अहेत. त्यांनी लावलेली साधी, सरळ चाल आणि आपल्या संगीतात फ्लूट, सरोद, सितार, संतूर, शहनाई ह्या भारतीय वाद्यांचा केलेला अप्रतिम प्रयोग हेच त्यांच्या या यशाचं कारण आहे. त्यांच्या दिलखुलास, मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वच निर्माता-दिग्दर्शकांचे आवडते बनले.

खरं तर रवींनी ज्या काळात संगीत दिले तो काळ हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. नौशाद, रोशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, सचिनदा, ओ. पी. नय्यर, खय्याम हे व ह्यासारखे इतर अनेक दिग्गज संगीतकार त्या वेळी होते. पण तरीही ह्या सर्वांमध्ये रवींनी आपले स्वतःचं असं एक खास स्थान निर्माण केलं. त्या काळच्या अनेक गीतकारांसोबत त्यांनी काम केलं. साहीर, शकील बदायुनी, राजेंद्रकृष्ण, मजरूह सुलतानपुरी, असद भोपाली, हसन कमाल ह्या सर्व गीतकारांच्या गाण्यांना त्यांनी एक से बढकर एक चाली दिल्या. पण त्यांची साहीर, शकील बदायुनी व राजेंद्रकृष्णबरोबरची गाणी विशेष लोकप्रिय झाली. साहीर लुधियानवी व रवी या जोडीनं तर अनेक लाजवाब गीतांचा नजराणा रसिकांसमोर पेश केला.

‘वक़्त’ चित्रपटातील सदाबहार गीत ‘ए मेरी जोहराजबीं’ आणि ‘हम जब सिमट के आप की बाहो में आ गये’,


‘गुमराह’मधील ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनों’ आणि ‘आप आये तो खयाल ए दिल ए नाशाद आया’,

‘हमराज’मधील ‘न मूँह छुपा के जियो और न सर झुका के जियो’,

‘काजल’ चित्रपटातील ‘छू लेने दो नाजुक होटों को’,

‘एक महल हो सपनों का’मधील ‘देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से’,

‘आज और कल’मधील ‘इतनी हसीन इतनी जवां रात क्या करे’ अशा अनेक अप्रतिम गीतांची लयलूट ह्या जोडीने केली.

शकील बदायुनींबरोबर रवीने ‘दो बदन’ आणि ‘चौहदवीं का चाँद’ या चित्रपटातील गाण्यांना सुरेख चाली दिल्या आहेत. ‘चौहदवीं का चाँद’ची गाणी जरी शकील बदायुनींनी लिहिलेली असली, तरी ‘चौहदवीं का चाँद हो’च्या शब्दांनी गाण्याची सुरुवात करण्याची कल्पना मात्र रवींचीच होती.

Mohd. Rafi, Shakeel and Ravi
Mohd. Rafi, Shakeel Badayuni and Ravi

‘चौहदवी का चाँद’च्या यशानंतर त्यांना मद्रासच्या चित्रपट निर्मात्यांकडूनही बोलावणी येऊ लागली.
याच सुमारास त्यांनी बी. आर. चोप्रांच्या ‘वक़्त’ ह्या चित्रपटाला संगीत दिलं. ह्यातील सर्वच्या सर्व गाण्यांना अफाट लोकप्रियता लाभली व त्यानंतरच्या बी. आर. चोप्रांच्या प्रत्येक चित्रपटाला रवींनी संगीत दिलेलं आहे. गुमराह, हमराज, धुंद, निकाह, तवायफ या सर्व चित्रपटांच्या यशात यातील गाण्यांच्या संगीताचा सिंहाचा वाटा आहे. बी. आर. फिल्म्सच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला जे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे घोषवाक्य हेमंतकुमारच्या आवाजात ऐकायला मिळतं त्याचं संगीतंही रवींचंच आहे.

तशीच राजेंद्र कृष्ण आणि रवींची नजराना, राखी आणि भरोसा ह्या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली.
नजराना मधील ‘बाजी किसीने प्यार की जिती या हार दी’ आणि ‘बिखर के जुल्फें चमन में न जाना’;
तसेच ‘भरोसा’मधील ‘आज कि मुलाकात बस इतनी’ आणि ‘वो दिल कहाँ से लाऊँ तेरी याद जो भूला दे’ ही गाणी आजही प्रत्येक संगीत प्रेमीच्या तोंडी आहेत.

रवीने संगीत दिलेल्या गीतांमध्ये जी विविधता आहे, ती पहिली की थक्क व्हायला होतं. प्रत्येक शैलीतील गाणे त्यांनी संगीतबद्ध केले आहे व मुख्य म्हणजे ही सर्वच्या सर्व गाणी रसिकांमध्ये सारखीच लोकप्रिय आहेत. संगीताचा कोणताही प्रकार त्यांनी हाताळला नाही असे म्हणता येणार नाही.

आता हेच पाहा ना, त्यांनी स्वतः लिहिलेले आणि संगीत दिलेले पहिलेवहिले गीत ‘चंदामामा दूर के, पुए पकाये बुर के’ हे आजही एक सर्वोत्कृष्ट अंगाई गीत मानलं जात.
‘आदमी सडक का’ ह्या चित्रपटातील ‘आज मेरे यार कि शादी है’ हे गाणं वाजवल्याशिवाय आजही कुणाची लग्नाची वरात जात नसेल. मजेची गोष्ट म्हणजे ह्या गाण्यात महंमद रफीबरोबर रवी स्वतः देखील गायलेत व आपली पार्श्वगायक बनण्याची आवड त्यांनी भागवून घेतली. तसेच ‘नीलकमल’मधील ‘बाबूल की दुवाएँ लेती जा, जा तुझ को सुखी संसार मिले’ ह्या गाण्याशिवाय आजही कुणाची बिदाई होत असेल का, अशी शंकाच आहे.

‘निकाह’ चित्रपटातील कव्वाली ‘चेहरा छुपा लिया ही किसीने हिजाब में’ आणि ‘चौहदवी का चांद’मधील ‘शरमाके ये क्यूं सब परदानशीन आंचल को सवारा करते हैं’ ही लता व शमशादने गायलेली अफलातून कव्वाली!
‘काजल’ चित्रपटातील ‘तोरा मन दर्पण कहलाये’ आणि
‘नरसी भगत’मधील ‘दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अंखियाँ प्यासी रे’ ही भजनं.
आजही २६ जानेवारी व १५ ऑगस्टला आवर्जून लावले जाणारे ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ हे गीत.
‘घराना’मधील ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ हे मिश्किल गाणे.
‘दिल्ली का ठग’मधील ‘C A T कॅट , कॅट माने बिल्ली’ हे उडत्या चालीचं गाणं. ( हे गाणं रवीचं किशोरबरोबरचं पहिलंच गाणं),
‘काजल’मधील ‘ मेरे भैय्या मेरे चंदा, मेरे अनमोल रतन’ हे भावा-बहिणीचं पवित्र नातं दाखवणारं गाणं आणि
ज्या गीताला खऱ्या अर्थाने भिकाऱ्यांचे पहिले वाहिले गीत म्हणता येईल असे ‘गरिबों की सुनो वो तुम्हारी सुनेंगा’ हे गाणे.
ही व अशी अनेक उत्तमोत्तम गाणी रवींनी आपल्याला दिली आहेत.

त्यांच्या अनेक गाण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. पण तरीही अशी खूप गाणी आहेत, की ज्यांना अतिशय सुरेख चाल लावली असूनही ती आज विस्मृतीत गेली आहेत. अशीच काही माझी आवडती गाणी संगीत रसिकांसाठी इथे देत आहे.

‘एक साल’मधील लतानं गायलेलं ‘चले भी आओ, चले भी आओ’ आणि ‘उलझ गये दो नैना’,
मुल्जिम चित्रपटातील रफीचं ‘दिवाना कहके आज मुझे फिर पुकारीये’,
‘अलबेली’ मधील लताचं ‘जा जा रे चंदा तेरी चांदनी जलाये’,
‘अरब का सौदागर’मधील ‘ये मेहफिल सितारों की, रात ये बहारों की’ हे आशा व हेमंत ने गायलेलं युगल गीत.
‘मेहेंदी’ चित्रपटातील लताचं ‘प्यारकी दुनिया लुटेगी हमें’ ही व अशी अनेक सुमधुर गीते आहेत.

१९९० साली प्रदर्शित झालेला ‘औलाद की खातीर’ हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. १९५५ ते १९९० पर्यंत, अशी जवळजवळ पस्तीस वर्षं त्यांनी असंख्य गाण्यांना संगीत दिले आहे. त्यांनी काही मल्याळम व गुजराती चित्रपटांनाही संगीत दिलंय ज्यासाठी त्यांना गुजरात व केरळ सरकारने पुरस्कार देऊन सम्मानित केलेलं आहे . अशा ह्या हरहुन्नरी कलाकाराचा ह्या जगातील सुरीला प्रवास दिनांक ७ मार्च २०१२ रोजी संपला. आज ते जरी आपल्यात नसले तरी ते आपल्या चाहत्यांसाठी अनेक अनमोल रत्ने मागे ठेवून गेले आहेत .

“एक पैसा दे दे बाबू
तेरी जेब रहे ना खाली
तू रोज मनाये दिवाली दिवाली”
असं म्हणत खाली हाताने आपल्या संगीताच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा हा संगीतकार जाताना मात्र प्रत्येक संगीतप्रेमीची जेब एकापेक्षा एक अनमोल गीतरत्नांनी खचाखच भरून गेला. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारे आणि जीवनाची क्षणभंगुरता अधोरेखित करणारे तत्त्वज्ञान मनावर ठसवणारा हा संगीतकार आपल्या
“आगे भी जाने ना तू
पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है”
या गाण्यासोबतच सर्वांच्या मनात अजरामर राहील.

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment