– स्वप्निल पोरे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Revisiting the musical journey of one of the finest music directors of hindi cinema, O.P. Nayyar on his death anniversary. तालाचा बादशहा ही ओ.पी. नय्यर यांना मिळालेली सार्थ उपाधी! २००७ मध्ये ते गेले. त्याही आधी कितीतरी वर्ष हिंदी चित्रपट क्षेत्रापासून ते दूर होते. आज दीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांच्या संगीत रचना ताल धरायला लावतात हा चमत्कार म्हणावा लागेल! त्यांच्या तोडीचा संगीतकार आधी आणि नंतर झाला नाही हे म्हणणे तसे अतिशयोक्तीचे ठरेल. पण मग त्यांच्या संगीतरचना आजही का खिळवून ठेवतात? त्याच पुनः पुन्हा रसिक श्रोत्यांना का साद घालतात? या प्रश्नाचे एकच एक आणि साचेबद्ध उत्तर देता येणे अवघड आहे.

त्यांच्यानंतर आलेले अनेक संगीतकार लोकप्रिय झाले, श्रोत्यांच्या पसंतीला उतरले, पण…‘तुम सा नही देखा…’ हेच खरे! पंजाबच्या रक्तात भिनलेला जल्लोष, जीवनासक्ती, आव्हाने- अडीअचणींनी भरलेले जीवन आनंदाचे करण्याची धडपड ही सारी वैशिष्ट्ये नय्यर यांच्या संगीतात प्रगट झाली होती. ते म्हणायचे- हे संगीत मी दिलेले नाही. ते निसर्गातून आलेय आणि म्हणूनच ते आणखी शंभर वर्षे टिकून राहणार आहे. ओपींची गाणी आज देखील साद घालतात त्याचे उत्तर बहुधा हेच आहे! आणि ते स्वतः ओपींनीच दिले असल्याने मान्य करायला हरकत नसावी.

पहिल्या हिंदी बोलपटापासून आतापर्यंतच्या चित्रपटांच्या प्रवासात एकच साम्य आहे. ते साम्य म्हणजे सतत होणारा बदल! काळानुसार तंत्र बदलते, पिढ्या बदलतात, आवडी -अभिरुचीत बदल होतो. बदल हाच स्थायीभाव…सादरीकरणामध्ये तो आहे, कथा- पटकथांमध्ये तो आहे आणि अर्थात संगीतामध्येही! मास्टर गुलाम हैदर यांनी चित्रपट संगीताचा बाज बदलला. पहिला बोलपट ‘आलमआरा’ १९३१ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर काही वर्षातच आलेल्या सैगलयुगाने तेव्हाच्या पिढीला झपाटून टाकले. सैगल यांच्या स्वरामुळे चित्रपट संगीत सुप्रतिष्ठित झाले. मास्टर गुलाम हैदर यांनी ‘खजांची’द्वारे चित्रपट संगीत आणखी मुक्त केले. म्हणजे चित्रपट संगीताला प्रारंभ झाल्यावर बरोबर दहा वर्षांनी या संगीताने मोठा बदल अनुभवला. ‘रतन’मधून नौशाद देशातील सामान्यांपर्यंत पोहोचले. तो १९४४ चा चित्रपट. आणखी दहा वर्षांनी ओ.पी. नय्यर यांनी स्वतःच्या शैलीतून ‘आरपार’द्वारे पुन्हा एकदा चित्रपट संगीतामध्ये नवे वारे आणले. अर्थात ‘रतन’नंतर पाच वर्षांनी आलेल्या ‘बरसात’मधून शंकर – जयकिशन यांनी जे घडविले ते नवे मन्वंतरच होते. त्या मन्वंतराचेही महत्त्व कमी नाही! वेळोवेळी या मोठ्या, प्रतिभावान संगीतकारांनी बदल घडवून आणले म्हणूनच चित्रपट संगीत लाखो श्रोत्यांकरता त्यांच्या जीवनाचा भाग बनले ही वस्तुस्थिती.

नौशाद, अनिल विश्वास, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, शंकर- जयकिशन यांसह अनेक दिग्गज तळपत असताना केवळ पुढे येऊन लोकप्रिय होणे एवढेच नव्हे तर स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण करणे आव्हानाचे होते. त्यात ओ.पी. यशस्वी झाले. वर्षानुवर्षे त्यांचे स्थान अबाधित राहिले. कालच सरदार मलिक यांचा स्मृतीदिन होता. ‘लैला मजनू’ चित्रपटातील त्यांची गाणी अनेक व्हॉटस अ‍ॅप समूहांवर दर्शन देत होती. तलत मेहमूद यांच्या आर्त स्वरात पडद्यावर गाणारा शम्मी कपूर, हे सत्य स्विकारणे पुढच्या काळात त्याची बनलेली प्रतिमा पाहता अनेकांसाठी अवघड. संगीतरचनेचा प्रश्नच नाही. ती मनाला स्पर्शणारी होतीच. तलत यांच्या स्वराबद्दल तर काय बोलायचे? तो मखमली स्वर, त्यातील आर्तता केवळ अतुलनीय. पण अमिताभचे ‘जंजिर’च्या आधीचे बरेच चित्रपट पाहणे जरा कठिण होते, तसाच शम्मी कपूरच्या बाबतीतला प्रकार! त्याला ‘तुमसा नही देख’ चित्रपटातून स्वतःची प्रतिमा गवसली आणि त्यात ओपींच्या संगीताचा सर्वात मोठा वाटा होता. झिंग आणणारे संगीत आणि त्याला साजेशी अदाकारी यातून हिंदी पडदा रसरशीत झाला.

स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या स्वराशिवाय एखाद्या संगीतकाराने कारकीर्द घडवणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे. ते ओपींनी पेलले. आधी संगीतकारांकडून गायकांच्या कारकीर्दीला आकार मिळत होता. मात्र लतादीदींच्या अलौकिक स्वराने, प्रतिभेने अनेक समज, समीकरणे आणि व्याख्या पार बदलून टाकल्या. संगीतरचनांमध्ये त्यांचा स्वर हा कोणाही संगीतकारासाठी यशाचा आधार ठरला होता. त्यांच्या स्वरातील गाणी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्याची जादूची किल्ली ठरली होती. अशावेळी नय्यर यांचे वेगळेपण जाणवते. ‘आसमान’ हा ओपींचा पहिला चित्रपट. तो १९५२ मध्ये प्रदर्शित झाला. नासिरखान, श्यामा वगैरे कलाकार. जब से पी संग नैना लागे…हे त्यातील गाणे ओपींनी राजकुमारी यांच्याकडून गाऊन घेतले. खडा स्वर असलेल्या गायिकांचा बोलबाला असताना स्वरातून शांत रसाची पखरण करणार्‍या राजकुमारी वेगळ्या ठरल्या. अशा राजकुमारींची केवळ त्या गाण्यासाठी ओपींना आठवण येण्याचे कारण काय? या गाण्यासाठी त्यांच्यासमोर लतादीदींचाच स्वर होता हे उघड आहे. काही संभ्रम, गोंधळ झाला आणि समज- गैरसमजातून हे दोन कलाकार कधीच एकत्र आले नाहीत. मंगू आणि मेहबूबा या दोन चित्रपटांमध्ये आधीचे संगीतकार बदलून ते चित्रपट ओपींकडे आले. गायक कलाकार आणि संगीतकारांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली. ‘आरपार’नंतर ओपी सुसाट सुटले. त्यानंतर कधी त्यांच्या संगीतात लतादीदींचा स्वर ऐकू येईल याची अपेक्षाच संपली. ते आपल्या मार्गाने पुढे जात राहिले.

जब से पी संग…आधी लता मंगेशकर गाणार होत्या, पण ते गाणं माझ्याकडे आलं, असं राजकुमारी यांनी जाहिरपणे सांगितलं. ओपींनी ते मान्य केलं नाही. माझी शैली लता मंगेशकर यांच्या स्वराला साजेशी नाही, हे त्यांचं म्हणणं. हा जरा विवाद्य मुद्दा! त्यांच्या दृष्टीतूनच ते समजून घेता येईल! ‘प्रीतम आन मिलो…’ ही आर्त रचना करणारे ओपीच होते की! सी.एच. आत्माला याच गाण्याने ओळख दिली. दलसुख पांचोलींचा ‘आसमान’ चित्रपट याच गाण्याच्या लोकप्रियतेतून आणि लाहोरच्या संदर्भामुळे ओपींना मिळाला. जी- जी गाणी दर्दी श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून गेली त्यात प्रीतम आन मिलो…हे गाणे आहे. संगीतरचना ओपींची एवढेच नव्हे तर हे आशयघन गीतही त्यांच्याच लेखणीतून उतरलेले. संगीताचे ज्येष्ठ आणि मर्मज्ञ अभ्यासक, कोशकर्ते आणि लेखक विश्वास नेरुरकर यांना – आपणच ते गीत लिहिल्याचे ओपींनी स्पष्ट सांगितले होते. पुढेही आर्त भावना व्यक्त करणार्‍या कितीतरी संगीतरचना ओपींनी केल्या. ‘सोने की चिडिया’ चित्रपटातील- प्यार पर बस तो नही हैं… या गाण्याचेही उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. म्हणजेच गीत अवखळ आहे, उडत्या चालीचे आहे की गंभीर… ही अडचण नव्हतीच. मात्र दोन कलाकार कधीही एकत्र आले नाहीत हे खरे. भांडण नव्हतं. मोकळेपणाने मोठेपणा मान्य करण्याची मानसिकता होतीच होती. आकाशवाणीवरील ‘जयमाला’मध्ये लतादीदींच्या स्वरातील – तुम क्या जानो तुम्हारी याद में…हे गीत ओपींनी ऐकवले तर दीदींनी आशा भोसलेंच्या स्वरातील ओपींची रचना! शेकडो वर्षात लता मंगेशकर यांच्यासारखा स्वर एकदाच निर्माण होतो, ही ओपींची प्रतिक्रिया.

मदमस्त करणारा ठेका ओपींची खासियत होती. ‘आरपार’मध्ये सर्वात गाजले ते शमशाद बेगम यांच्या स्वरातील शीर्षक गीत. या चित्रपटाने ओपींना यशस्वी संगीतकारांच्या पहिल्या पंक्तीत आणून बसवले. ‘आसमान’ पडला, ‘छमछमाछम’ने हात दिला नाही, ‘बाज’ला यश मिळाले नाही. गाशा गुंडाळावा लागणार ही चिंता होती. अशावेळी गीता दत्तने मदत केली आणि तिच्या शब्दामुळे गुरुदत्तचा आरपार चित्रपट ओपींकडे आला. शमशाद बेगम यांच्या स्वराची जादू पुन्हा श्रोत्यांना अनुभवायला आली. बाबूजी धीरे चलना…, ए लो मैं हारी पिया…अशा गाण्यांमधून गीता दत्तचा स्वर श्रोत्यांच्या मनात ठाण मांडून बसला. मग ओपींना मागे वळून पाहावे लागले नाही. ठंडी हवा काली घटा…गाणारी गीता आणि प्रीतम आन मिलो…ही देखील तिच्याच स्वरातील आळवणी. पुढे ‘हावडा ब्रिज’मधील- मेरा नाम चीन चीन चू…या क्लब सॉँगने धुमाकूळ घातला! गीताचे अष्टपैलूत्व ओपींनी कितीतरी गाण्यांमधून दाखवून दिलं. अनेकांना ओपींच्या संगीतामुळे यश गवसले. त्यात गुरुदत्त, शम्मी कपूर आहेत, आशा भोसले आहेत. सीआयडी, मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह, तुमसा नही देखा, छू मंतर, फागुन, हावडा ब्रिज, काश्मीर की कली, सावन की घटा, मेरे सनम असे त्यांनी संगीत दिलेले असंख्य चित्रपट प्रेक्षकांसाठी, श्रोत्यांसाठी पर्वणी ठरले. नायक- नायिका कोणीही चालतील, संगीतकार म्हणून ओपीच हवेत, हा अनेक निर्मात्यांचा आग्रह सुरु झाला. ज्यांच्याकडे दुसरे संगीतकार होते अशा निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचं संगीत चालेल की नाही याची काळजी! बाकी कुछ नही करना…बस नय्यर को काटना हैं…हा बर्‍याच निर्मात्यांचा आपापल्या गोटातील संगीतकारांकडे तगादा! त्या दबावातून भलेभले संगीतकार नय्यर शैलीतील गाणी देण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांच्यासारख्या रचना करणे कोणालाच शक्य झाले नाही.

‘नया दौर’ हे ओपींसाठी शिखर. याच चित्रपटातील गाण्यांमुळे आशा भोसले यांच्या कारकीर्दीला झळाळते वळण मिळाले. सहनायिका, दुय्यम व्यक्तिरेखा यांच्यासाठी गाण्यात अडकून पडलेला त्यांचा स्वर खळाळत्या झर्‍यासारखा वाहू लागला. शर्मिलाची अवखळ अदा आणखी खुलवण्यासाठी तो सुयोग्य वाटू लागला, मधुबालाचे सौंदर्य या स्वराने तेवढेच फुलते हा शोध अनेकांना लागला! एकाहून एक सरस गाणी साकार झाली. रफींच्या स्वरात ओपींनी दिलेल्या गाण्यांनी श्रोत्यांना मुग्ध केले, रफींबरोबरची गीता दत्त आणि आशा भोसलेंची द्वंद्व गीते त्यांच्या ओठावर बसली. बूझ मेरा क्या नांव रे…, आज सुहानी रात रे…, रेशमी सलवार कुर्ता जाली का…आणि कजरा मोहब्बतवाला…अशा गाण्यांमधून शमशादच्या स्वरातील नखरा सर्वांसमोर येत राहिला. ही ओपींची किमया.

कलाकारांचा इगो एकमेकांना दुखावणारा आणि श्रोत्यांचे नुकसान करणारा असतो. ‘प्यासा’नंतर सचिन देव आणि साहिर यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. ‘नया दौर’नंतर साहिर – नय्यर यांचे बिनसले. साहिर यांची आत्मगौरवाची वृत्ती नय्यर यांना आवडली नाही. पुढे रफी आणि ओपींमध्ये दुरावा आला. मग त्यांच्या संगीतात महेंद्र कपूर यांचा प्रवेश झाला. बदल जाए अगर माली…यासारखी त्यांच्या स्वरातील ओपींची गाणी श्रवणीय होतीच, पण रफींची उणीव या स्वराने काही भरुन निघाली नाही. ती बोच ओपींना होती. पण त्यांच्या रचना निभावून गेल्या. मात्र आशा भोसले यांचा स्वर बाजूला गेल्यावर हे निभावणे झाले नाही. पूछो न हमें हम उनके लिए क्या क्या नजराने लाए हैं…अशा अविस्मरणीय रचना हा इतिहास बनला! ओपींमुळे जशी आशा भोसले यांची कारकीर्द बहरली तशीच त्यांच्या संगीतरचनाही आशा भोसलेंच्या चैतन्यमय स्वरामुळे अधिकाधिक समृद्ध झाल्या, आशयघन ठरल्या. ‘आरपार’नंतरचे ओपी आणि आशा भोसलेंचा स्वर त्यांच्या रचनांमध्ये अपरिहार्य ठरल्यावरचे ओपी यातील फरक पाहण्यासारखा आहे.

ओपींचे संगीत केवळ ताल आणि ठेक्याचे नव्हते, ते अर्थवाही, सामान्यांबरोबर जाणकारांनाही चकित करणारे संपन्न संगीत होते, हे नंतरच्या आणि अर्थात शिखरावरच्या त्यांच्या शेवटच्या टप्प्यात सिद्ध झाले. चैन से हम को कभी आपने जीने ना दिया…हे आशा भोसले – ओपी यांचे अखेरचे गाजलेले गीत. दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि ओपींचे संगीत निस्तेज होत गेले. लतादीदींच्या स्वराशिवाय पुढे गेलेले संगीत आशा भोसले बाजूला होताच फिके व्हावे हे आश्चर्याचे खरे, पण ते घडले! पुढे पडेल चित्रपटांची रांग लागली. काम मागायला ते गेले नाहीत. स्वतःच्या अटीवर जगत राहिले. घरही सोडले आणि हा मानी, मनस्वी कलाकार ठाण्यात राजू नाखवांच्या घरात राहू लागला. भारताच्या भूभागावर पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर लाखो भूमीपुत्र रातोरात परके ठरले. त्यात ओपी होते. प्राणप्रिय लाहोरमधून आपल्याला अपमानास्पद रितीने बाहेर काढले गेले ही सल ते आयुष्यभर विसरले नाहीत. नंतर संधी येऊन देखील त्यांनी याच मानी स्वभावामुळे लाहोर भेटीला जाणे टाळले.

ओपी या जगात नाहीत. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचे त्यांचे सहप्रवासीही आज नाहीत. पण ओपींसह त्यांच्या असंख्य रचना कालजयी ठरल्या आहेत. या प्रभावळीत असूनही ओपी वेगळे होते, वेगळे ठरले. संगीत रचना सुरू होताच ती कोणाची हे चटकन ओळखता यावे असे संगीतकार मोठ्या संख्येने नक्कीच नाहीत. ओपी त्या मालिकेत अव्वल आहेत. दिल की आवाज भी सुन…, आँचल में सजा लेना कलियाँ…, पूछो न हमें हम उन के लिए…, प्यार पर बस तो नहीं हैं…अशी कितीतरी गाणी पिढ्या न पिढ्यांच्या केवळ आठवणीत नव्हे तर ओठांवर आहेत. अमर्त्य संगीत म्हणजे काय? याचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या मनात त्याच सुरावटींचे प्रतिध्वनी आहेत!

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

Swapnil Pore
+ posts

Leave a comment