-विजय न्यायाधीश

गज़ल क्या होती है ? या प्रश्नाला उत्तर देताना एका शायराने सांगितले की, ‘ रेशम मे लिपटी हुयी आग सी होती है!’ आणि या विधानाची प्रचिती देत सर्व सामान्य रसिकांच्या काना- मनात गज़ल रुजविण्याचे महान कार्य ज्या कलावंतांनी केले त्यामध्ये जगजीत सिंह यांचे नाव अग्रभागी येते. असं म्हणतात की, गज़ल कहना बहोत बडा हूनर है, और गज़ल गाना उस से भी बहोत बडा हूनर है! आणि हा हूनर जगजीत सिंह यांच्यामध्ये होता. त्यांच्या आवाजातील आशिकाना मिजाज, उत्कट प्रेमातील यादगार क्षणांचे प्रतिबिंब आणि विशेष म्हणजे शब्दातील भावना स्वर- संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनात ठळकपणे बिंबवण्याची किमया जगजीत सिंह यांच्याकडे होती.

singer jagjit singh in his early days

 

पूर्वीच्या काळी तबला आणि हार्मोनियमच्या साथीने गज़ल पेश करण्याची पध्दत होती. जगजीत यांनी ही चौकट बदलून टाकली. तबला, हार्मोनियम यांच्यासह गिटार, बेस गिटार, कि बोर्ड, व्हायोलिन तर कधी संतूरचा वापर करीत जगजीतने गज़ल सादर करीत गज़लगायनात नवे आयाम प्रस्थापित केले. याशिवाय सर्व सामान्यांशी निगडीत विषयांची शायरी निवडून त्याला प्राधान्यक्रमाने मैफलींव्दारे सादर केल्याने जगजीतची लोकप्रियता वाढत गेली. आपल्या कारकिर्दीत १९६० नंतर जवळपास चार दशके या कलावंताने अतिशय तरल, म्रुदू मुलायम, रेशमी आवाजाद्वारे रसिकांना आपलेसे करत त्यांच्या मनावर ठसा उमटविला. लहानपणी गायनाच्या क्षेत्रात करियर करायचे हे ध्येय त्यांनी ठरवले होते आणि त्याद्रुष्टीने त्यांनी यशस्वी वाटचाल केलेली आहे.

Jagjit Singh

 

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ साली राजस्थानमधील गंगानगर येथे जगजीत यांचा जन्म झाला. लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या जगजीत यांनी लहानपणी पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर उस्ताद जमालखान यांच्याकडून त्यांनी उपशास्त्रीय संगीताची तालीम हासील केली. गायक म्हणून नशिब आजमावण्यासाठी १९६५ साली त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला विविध सांस्क्रुतिक कार्यक्रम तसेच लग्नसमारंभात छोट्या- मोठ्या मैफिली सादर करीत त्यांनी आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला. दरम्यान चित्रा सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यादेखील उत्तम गायिका असल्याने दोघे मिळून मैफिली सादर करायचे. एच. एम. व्ही. कंपनीने त्यांची ‘ द अनफॉरगेटेबल ‘ हा अल्बम प्रकाशित केला आणि जगजीत सिंह या नावाची संगीतक्षेत्रात दखल घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक अल्बममध्ये त्यांनी आपल्या गायनाचा अविष्कार रसिकांसमोर सादर केला.

Jagjit Singh with Wife Chitra Singh
Jagjit Singh with Wife Chitra Singh

काही चित्रपटातही गाणी गायली परंतु गज़ल गायनात त्यांची रुची वाढली किंवा त्यांना खऱ्या अर्थाने सूर गवसला. पुढचा इतिहास सर्वांसमोर आहे. फिल्मी ढंगाने गज़ल गायन करीत रसिकांना त्यांनी आपलेसे केले. मिर्झा गालीब, मीर, निदा फाजली, गुलजार, जावेद अख्तर, बशीर बद्र आदी शायरांच्या गज़लांना त्यांनी आपल्या स्वरसौंदर्याचे कोंदण लेवून लोकप्रिय केल्या. ‘ सजदा ‘, ‘मरासिम’, ‘कहंकशा’,’ इनलाईट’ हे त्यांचे काही गाजलेले अल्बम. देश- विदेशात गज़ल गायनाच्या मैफिलीद्वारेही त्यांनी मोठ्या संख्येने आपला चाहतावर्ग निर्माण केला. चित्रपटातही त्यांनी पार्श्वगायन केले. ‘ होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो ‘, ‘ चिठ्ठी ना कोई संदेश ‘, ‘ होश वालों को क्या खबर क्या बेखूदी क्या चीज है ‘, ‘ ये तेरा घर ये मेरा घर ‘ या त्यांच्या फिल्मी रचनांना रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला आहे.

Singer Jagjit Singh
Singer Jagjit Singh. (Courtesy-India Today)

गज़ल व्यतिरिक्त भक्तिगीत गायनातही जगजीत यांचा हातखंडा होता. ‘ अंबे चरण कमल है तेरे ‘ ‘ आनंदमयी सत्यमयी ‘ , ‘ हे राम हे राम …’ या काही त्यांच्या भक्तिगीतांचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. शब्दात अभिप्रेत असलेला भक्तिभाव आपल्या धीर गंभीर आवाजातून रसिकांच्या काना- मनात प्रभावीपणे प्रतिबिंबीत करण्याचे कसब जगजीत यांनी साध्य केले होते. या व्यतिरिक्त ‘ तुमको देखा तो ये खयाल आया ‘, ‘ तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ‘, ‘ झुकी झुकी सी नजर ‘, ‘ वो कागज की कश्ती ‘, ‘ चराग – ए – इश्क जलाने की रात ‘, ‘ तेरे आने की जब खबर ‘, ‘ये दौलत भी ले लो ‘, ‘ मै नशे मे हू ‘ या काही जगजीत यांच्या रचना रसिकांच्या मर्मबंधातील ठेव बनल्या आहेत.

आपल्या आवाजातील रेशीम लडी उलगडत रसिकांना भावविभोर करणाऱ्या या महान गायकाबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. गज़ल गायनाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गायकास त्याच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

Singer Ghazal King Jagjit Singh

Vijay Nyayadhish
+ posts

Leave a comment