-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मदन मोहन यांना संगिताच्या दुनियेत जे अपयश आलं अगदी तशीच अवस्था खय्याम (Music Director Khayyam) या संगितकाराची येथे झाली. एक दुर्दैवी संगितकार म्हणून खय्याम येथे ओळखला जातो. अनेक चित्रपटांना उत्कृष्ट संगीत देऊनसुद्धा ते चित्रपटाच्या व्यावसायिक गणितात नापास झाले व त्या अपयशाबद्दल खय्यामला दोष देण्यात आला. खरंतर चित्रपट अपयशी ठरल्यावर सगळा दोष काही संगितकाराला देता येणार नाही, परंतु तो येथे देण्यात आला. फ्लॉप चित्रपटांचा यशस्वी संगितकार मदन मोहनकडे बोट दाखविले जाते. अगदी त्याचप्रमाणे खय्यामकडेही बघितले जाते. खय्यामची कारकीर्द आठवली तर लगेच ‘शगुन’ या चित्रपटातील त्याच्या पत्नीच्या आवाजातील ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो’ या ओळी आठवतात. जणू काही या कठीण काळात जगजीत कौर आपल्याच भावना खय्यामकरिता गात होती असे वाटते. (Remembering Hindi Cinema’s Finest Music Director Khayyam)

      ‘बीबी’ या 1950 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून खय्यामने आपली कारकीर्द सुरू केली. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव होतं अजीज हिंदी या संगितकाराचं; परंतु सगळी गाणी मात्र खय्यामनीच तयार केली होती. असा हा खय्याम येथे आला होता ते नायक होण्याकरिता. चित्रपटात काम करायचं असेल तर गाता आलं पाहिजे अशी अट होती व त्या करिता त्यानं गाण्याचा सराव केला. हुस्नलाल भगतराम यांचे बंधु पंडित अमरनाथ यांच्याकडे तो संगीत शिकला; परंतु एवढं करूनही जेव्हा चित्रपटात काम मिळालं नाही तेव्हा मात्र सरळ सैन्यात दाखल झाला. तिथून परतल्यावर देखिल चित्रपटाचं वेड कायम होतं; परंतु आता संगीतकार म्हणून ‘बिबी’ या चित्रपटात रफीच्या आवाजातील ‘अकेले में वो घबराती तो होगी’ हे गाणं गाजलं, पण पुढे काम मिळेना. मजरूह सुलतानपुरी व अन्वर हुसेन हे दोघे खय्यामचे चांगले मित्र होते. रणजित मुव्हिटोनच्या चंदुलाल शहा यांच्याकडे ते खय्यामला घेऊन गेले. झिया सरहदी दिग्दर्शन करीत असलेल्या ‘फुटपाथ’ या चित्रपटाकरिता ते नव्या संगितकाराच्या शोधातच होते. ‘फुटपाथ’ मध्ये दिलीपकुमार मीनाकुमारी ही जोडी चमकत होती. मजरुहच्या गाण्यांना खय्यामनी सुरेख चाली दिल्या. तलत महमूदच्या कंपभऱ्या स्वरात, ‘शाम-ए-गमकी कसम, आज गमगीं भी है हम आ भी जा, आज मेरे सनम’ हे गीत कमालीचं यशस्वी ठरलं. ‘फुटपाथ’नंतर ‘लालारुख’, ‘फिर सुबह होगी’, इत्यादी चित्रपट मिळाले; परंतु प्रवास अगदी हळूहळू चालू होता. ‘फिर सुबह होगी’चं संगीत मिळविणं तर फारच कठीण काम होतं राज कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘फिर सुबह होगी’चं संगीत त्याला मिळालं होतं. राज कपूरच्या दोन चालू असलेल्या परीक्षेत खय्याम उत्तीर्ण झाला; परंतु जी गत ‘फुटपाथ’ची झाली तीच गत ‘फिर सुबह होगी’ची झाली. ‘वो सुबह कभी तो आयेगी, फिर न किजे मेरी गुस्ताख निगाहों का गिला’, ‘आसमां पे है खुदा और जमीन पे हम, इस प्यार से तोबा’ यासारखी मुकेशच्या आवाजातील गाणी असताना या चित्रपटाने खय्यामला साथ दिली नाही.

      ज्या मुकेशला खय्यामने एवढा स्कोप दिला, त्या मुकेशने पडतीच्या काळात खय्यामला मदत केल्याचा एक मोठा विचित्र किस्सा वाचण्यात आला. खय्यामचे ते अतिशय वाईट दिवस होते. दोन वेळा पोटभर जेवावं इतकाही पैसा त्यांच्याकडे नव्हता. त्याच काळात एकदा मुकेश खय्यामला भेटायला आला. बराच वेळ त्यांनी गप्पा केल्या. मुकेश गेल्यावर खय्याम आणि त्याची पत्नी जगजीत यांच्या असं लक्षात आलं की, मुकेश खय्यामकडे एक बासमती तांदळाचं पोतं विसरून गेलाय. ही घटना खय्याम आजपर्यंत विसरला नाही. ‘फिर सुबह होगी’ ची गाणी आपल्याला मिळाली व त्यामुळे आपण पुढं गेलो हे मुकेश विसरला नव्हता. पुढे ‘कभी – कभी’ ची गाणी खय्यामकडे आली तेव्हा त्यानं खास मुकेशला बोलावलं होत.

 

      लता खय्यामकडे गायली ती फार उशिराने. 1950 मध्ये त्याने संगीतकार म्हणून येथे कारकीर्द सुरू केली व लता त्याच्याकडे सर्वप्रथम गायली ती ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटाकरिता. लताच्या आवाजातील ‘रात लगाके आयी चंदा की बिंदिया’ व ‘नैन में कजरा लगाईये’ ही दोन गाणी गाजली. इथंही खय्यामचं दुर्दैव आड आलं. ‘हम है राही प्यार के’ पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. ‘बारूद’ मध्ये ‘रंग रंगीला सांवरा मोहे मिल गया जमुना के पार’ आणि ‘तेरी दुनिया में नही कोई सहारा अपना’ या दोन गाण्यांनी बरीच लोकप्रियता मिळविली होती. मध्यंतरीच्या काळात म्हणजे 1950 व 1960 च्या दरम्यान खय्यामला चित्रपटच फारसे मिळत नव्हते. आपल्या फिल्मी संगीताच्या कारकीर्दीत खय्यामला अगदी बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट संगीताकरिता मिळाले. 1960 ते 1966 पर्यंतचा काळ त्याने खूपच हलाकीच्या परिस्थितीत कंठला. या काळात त्याला एकही चित्रपट मिळाला नाही; परंतु 1966 साली मिळालेल्या ‘आखरी खत’ मधील लताची गाणी आजही ओठांवर येतात. ‘बहारो मेरा जीवन भी सवारों’ हे गाणं खूप गाजलं, तर ‘मेरे चंदा मेरे नन्हे’ ही लोरी लोकप्रिय ठरली. ‘आखरी खत’ मध्येच भूपेंद्रनं ‘रूत जवां जवां रात मेहरबां’ हे आपलं पहिलं सोलो गीत गायलं होतं. परंतु पुन्हा काय? काहीच नाही! इतकी चांगली गाणी देवून सुद्धा खय्यामकडे कुणाचेच लक्ष जात नव्हते.

      1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी-कभी’ या चित्रपटास खय्यामने संगीत दिले होते. अमिताभ बच्चन करिता मुकेकशच्या आवाजातील, ‘कभी-कभी मेरे दिल में खयाल आता है’ हे गाणं सर्वत्र गाजलं. लताने खय्यामकडे गायलेल्या गाण्यांची लज्जत काही न्यारीच असायची. ‘अहले-ए-दिल युँ ही निभा लेते हैं’ तसेच ‘दिखाई दिये युं के बेखुद किया याद’ या ‘दर्द’ व ‘बाजार’ मधील चित्रपटातील दोन गाण्यात लताचा आवाज एकदम खुलल्यासारखा वाटायचा. लता जर उपलब्ध होत नसेल तर सुमन कल्याणपूरचा उपयोग खय्यामने केला. शगुन मधील ‘बुझा दिये हैं खुद अपने हातो’  हे सुमनच्याच आवाजातील गाणं सुंदर जमलं होतं. याच ‘शगुन’ मध्ये ‘परबतों के पेडों पर शाम का बसेरा है’ हे सुमन -रफी यांचं द्वंद्वगीत व ‘ठहरिये होश में आ लूं हे मोहब्बत इसको कहते है’ मधील याच जोडीचं युगलगीत त्यांनी सुरेख गाऊन घेतलं होतं. नव्या गायकांच्या आवाजाचा उपयोग अगदी हवा तसा करून घेण्याचं सामर्थ्य खय्याममध्ये होतं. सुलक्षणा पंडित सारख्या नवख्या गायिकेकडून त्याने ‘संध्या’ व ‘संकल्प’ या चित्रपटातील गाणी खुलवली होती. ‘अंग अंग रंग छलकाये’ व ‘तू ही सागर तू ही किनारा’ ही सुलक्षणा पंडितच्या आवाजातील गाणी याची प्रचिती देतील. समर्थ संगीतकारच ही किमया करून दाखवू शकतो. लता उपलब्ध असतांना सुद्धा आशा भोसलेच्या आवाजाचा सुरेख उपयोग करून याच खय्यामने ‘उमराव जान’ची गाणी खुलवली होती.

 

      ‘उमराव जान’ ची आठवण झाली की लगेच ‘दिल क्या चीज है आप मेरी जान लिजिये’ व ‘इन आँखो की मस्ती में’ ही गाणी आठवतात. रेखाकरिता आशाने गायलेल्या या चित्रपटातील पाचही गझला अप्रतिम होत्या व कायम स्मरणात राहतील अशी त्यांची गुंफण खय्यामने केली होती. खय्यामच्या संगीताने या चित्रपटात एक वेगळी उंची गाठली होती. व त्याला राष्ट्रीय सन्मानही मिळाला होता. 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘रझिया सुल्तान’ ला खय्यामचंच संगीत लाभलं होतं. अनिता साब्रीवर चित्रित झालेलं ‘जलता है बदन’ व हेमामालिनी व परविन बॉबीवर चित्रित झालेलं ‘चुमकर रात सुलायेगी तो निंद आयेगी’ हे गाणं खय्यामच्या खास ठेवणीत असल्यासारखं लतानं गायलं होतं. पण ‘रझिया सुल्तानचं’ खरं आकर्षण होतं लताचं ‘ऐ दिले नादान’ हे अप्रतिम गीत चित्रपटाचा हबशी नायक याकूत (धर्मेंद्र) याच्यासाठी रेडिओ निवेदक कब्बन मिर्झाचा जगावेगळा आवाज वापरण्याची कल्पना खय्यामचीच. त्यांच्या आवाजातील ‘आयी जंजीर की झन्कार खुदा खैर करे’ व ‘तेरा हिज्र मेरा नसीब है’ ही दोन्ही गाणी काळ्या कुरूप नायकावर एकदम फिट बसली आहेत.

      किशोर, लता, आशा, रफी, मुबारक बेगम, सुमन कल्याणपूर या सर्वच गायक-गायिकांच्या आवाजाचा उपयोग खय्यामने गरज पडल्यावर व्यवस्थित करून घेतला होता. रफीला तर त्यानं पहिल्याच चित्रपटात संधी दिली होती; परंतु ‘शोला और शबनम’ मधील ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’ व ‘जाने क्या ढुंढती रहती है ये आँखे’ करिता सुंदर वापरून घेतलं होतं. ‘शंकर हुसैन’, ‘चंबल की कसम’ मध्ये रफीची गाणी होतीच. प्रत्येक गीतकाराच्या कवितांना सुरेख सुरात बांधण्याचं काम खय्यामने पार पाडलं आहे. ‘कभी-कभी’ नंतर खय्यामचं दैव बदललं होतं, कारण यानंतर ‘नूरी’, ‘त्रिशूल’, ‘नाखुदा’, ‘खानदान’, ‘बाजार’, ‘मेहेंदी’,  आणि ‘उमराव जान’ यासारखे चित्रपट त्याला मिळाले. ‘नूरी’ मधील गाण्यांनी तर कमालीची लोकप्रियता मिळविली होती. या चित्रपटातील ‘आजा रे ओ मेरे दिलबर आजा’, ‘कसम है यार तेरी तेरे यारों को मजा आया’ ही गाणी गाजली. ‘नुरी’ पासून खय्याम आधुनिक संगीताकडे वळणार असं दिसत होते व ‘त्रिशुल’ मधील ‘गापूजी गापूजी गम गम’, या गाण्याने हे दाखवून दिले; परंतु आपली गोडी तो येथे टिकवून होता. गोडवा हा त्याच्या संगीताचा स्थायीभाव होता. 1988 साली मध्यप्रदेश सरकारने दिलेल्या लता मंगेशकर पुरस्कारचं मोल एक लाख रूपये इतकं होतं; पण खय्यामनं स्वरबद्ध केलेल्या गाण्याचं मोल त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. खय्यामचा ‘शंकर हुसैन’ कधी आला आणि गेला कळलं नाही, परंतु या चित्रपटातील ‘अपने आप रातों मे चिल्मने सरकती है’ व ‘आप यूं फासलों से गुजरते रहे’ (लता), ‘कहीं एक मासूम नाजूकसी लडकी’ (रफी) ही गाणी कधीच विस्मरणात जाणार नाहीत. 

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.