-अशोक उजळंबकर

गुलाम महंमद यांची आठवण निघाली की आठवतो ‘पाकिझा’. ‘पाकिझा’ची निर्मिती अनेक वर्षे चालू होती. गुलाम महंमदांच्या निधनानंतर नौशाद यांनी उर्वरित संगीत पार पाडले. ‘पाकिझा’ ची सर्वच गाणी तुफान गाजली. १९६८ साली गुलाम महंमद स्वर्गवासी झाले; तर त्यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी ‘पाकिझा’ प्रदर्शित झाला. नौशाद यांना केवळ पार्श्‍वसंगीत द्यावं लागलं, तसं पाहिलं तर गुलाम महंमद यांची सारी हयात नौशाद यांचे सहाय्यक म्हणूनच गेली. स्वतंत्र संगीत देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘दिल की बस्ती’ या १९४९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला गुलाम महंमद यांनी सर्वप्रथम संगीत दिलं.

pakeezah

‘आग लगे जग सारा देखे, दिल का जलना किस को दिखाएँ’ हे लताच्या आवाजातील गाणं भग्नप्रेमी रसिकांना दिलासा देणारं ठरलं. ‘पारस’, ‘शायर’, ‘हँसते आँसू’, ‘मांग’, ‘परदेस’ या चित्रपटांना गुलाम महंमद यांनी संगीत दिलं होतं. ‘परदेस’ ची गाणी गाजली. नौशाद यांच्या तावडीतून सुटलेले चित्रपट गुलाम महंमद यांना मिळत होते.

‘हुर-ए-अरब’ हे एका चित्रपटाचं नाव आहे हे अनेकांना माहित देखील नसेल; परंतु या चित्रपटाला गुलाम महंमद यांनी संगीत दिलं होतं. लताच्या आर्त स्वरात, ‘दर दर की ठोकरे है, कोई नही सहारा, अब मेरी जिंदगी है टुटा सितारा’ हे गाणं गाजलं होतं. याच चित्रपटातील ‘तारारारा रम मेरे दिल मै सनम’ हे गीत खरंच सुंदर होते. ‘हुर-ए-अरब’ नंतर मात्र गुलाम महंमद यांना फारशी संधी मिळाली नाही. तलत मेहमूद नायक असलेल्या ‘दिले नादान’ची सर्वच गाणी लोकप्रिय होती. ‘जो खुशीसे चोट खाये’, ‘जिंदगी देने वाले सुन’ ही तलतची गाणी काळजाच्या तारा छेडणारी होती.

Bharat Bhushan and Suraiyya in Mirza Ghalib
Bharat Bhushan and Suraiyya in Mirza Ghalib

‘मिर्झा गालीब’ या चित्रपटाला गुलाम महंमद यांनीच संगीत दिल होतं व गालीबच्या गझलांना योग्य रीतीने प्रकाशात आणलं होतं. ‘मिर्झा गालीब’ आठवला की, लगेच तलत-सुरैय्याच्या आवाजातील, ‘दिले नादान तुझे हुआ क्या है’, ‘ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता’ ही गाणी आठवतात. मिर्झा गालीबमधील अवघड रचना स्वरबद्ध करणे यातच गुलाम महंमदचे यश दिसून आले. गुलाम महंमद आपल्याच चित्रपटातील, ‘जिंदगी देनेवाले सुने, तेरी दुनिया से दिल भर गया’ या गाण्याप्रमाणे हे जग सोडून गेला. गुलाम महंमदची संगीत कारकीर्द ही अल्प होती; परंतु दुर्लक्षित करता येणारी नव्हती. त्यांना खरं तर नौशादची साथ सोडून स्वतंत्ररित्या बाहेर पडायचं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. ‘पाकिझा’ची सर्वच गाणी गाजली. काही गाण्यांवर नौशाद यांनी मेहेनत घेतली होती असं नंतर लिहून आलं होतं पण गाण्यांची लज्जत पाहाता हे काम गुलाम महंमद यांचंच होतं हे मान्यच करावं लागेल.

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment